प्रेम

Submitted by बाळ पाटील on 12 February, 2015 - 00:40

प्रेम असते गुरू प्रेम असते आई
हाडाचा बोरू अन रक्ताची शाई

प्रेम म्हणजे नवस, सायास, वनवास
आणि कधीकधी आजन्म कारावास

प्रेम म्हणजे सूर्याने पणतीला ओवाळणे
प्रसंगी वाघानेही हरिणीला कवटाळणे

प्रेमात मृगजळही खळाळून जाते
परिसाविना लोखंड झळाळून येते

प्रेम म्हणजे वरवर चढणारी नशा असते
मरणाच्या दारातही उरणारी आशा असते

प्रेम म्हणजे काळजाचा अचूक वेध
अन वासनेचा ....शिरच्छेद

प्रेम असतोच एक दुर्दम्य विश्वास
तुटलाच तर .... अखेरचा श्वास

प्रेम बेधुंद असतं रगेल तट्टूसारखं
मैनेच्या चोचीत भरवणार्‍या मिठ्ठूसारखं

प्रेम म्हणजे शत्रूच्या नजरेतलं चांदणं
नागामुंगसानेही एकत्रित नांदणं

प्रेम म्हणजे झाडाचे उन्मळून पडणे
अन धरणीचे कळवळून रडणे

प्रेम म्हणजे एकदाच दिलेला शब्द
पुन्हा आयुष्यभर... नि:शब्द

प्रेमात ऐकू येतात बासरीचे मंजूळ स्वर
आणि उभं जग .... परमेश्वर !

प्रेम म्हणजे असतो जगण्याचा अर्थ
प्रेमाशिवाय सगळा अनर्थ

प्रेमात हारजीत नसते, असतं पतंग वा भ्रमर होणं
कधी कधी जगणार्‍यापेक्षा मरूनंच अमर होणं

( राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कविता )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक Valentine Day साजरा करतात. खरं तर प्रेम हे नित्यनुतन असतं , ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रेमाला एक दिवसाच्या चौकटीत नाही बसवता येणार. प्रेमाच्या खर्‍या अर्थापर्यंत पोचण्याचा बालिश प्रयत्न या कवितेतून केला आहे.