"दे"

Submitted by अमेय२८०८०७ on 11 February, 2015 - 22:28

धूळवादळे झेलुन झाली
कोरा आत्मा मळला
ग्रीष्मउन्हाच्या तावावरती
अंकुर हिरवा गळला

शोध निरर्थक, तशीच यात्रा
चालीवाचुन गाणे
सभोवताली खारे पाणी
करशिल काय, तहाने ?

विश्वासाला अगणित छिद्रे
वाळू निसटत जाई
स्वप्न-वास्तवामधे वाढते
दुर्दैवाची खाई

मीच वेगळा? की मानावे
दुनिया उलटी आहे
रक्तपिपासू काळासाठी
जीवनगंगा वाहे

सूर्य मावळे क्षितिजावरती
सरते श्वासकहाणी
चांदण्यातली रात्र तरी दे
विझणाऱ्याला दानी

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users