अनपेक्षित - भाग १

Submitted by धनि on 11 February, 2015 - 14:23

(ही एक पूर्णतः काल्पनिक कथा आहे. कोणतेही साधर्म्य हा एक निव्वळ योगायोग मानावा)

सकाळची सवय उठल्या उठल्या फेसबुक उघडले. फोनवरच असल्यामुळे अंथरुणातून उठण्याचीही गरज नाही. तसेही सकाळी हवामान पाहणे आणि बातम्या वाचून झाल्यावर फेसबुक उघडलेच जाते पण आज सकाळी सकाळी नोटिफिकेशन मध्ये एक नवीन फ्रेंड्स रिक्वेस्ट होती. पहिले तर कोणीतरी अनोळखी कन्या होती. आताशा अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारणे बंदच केले आहे. तरीही कॉलेज मध्ये गेल्यावर कॉम्प वर परत फेसबुक उघडले. कन्या दिसायला तर एकदम सुंदर होती. जास्ती काही कळले नाही - प्रायव्हसी सेटिंग एकदम जोरदार होत्या. मित्रांमध्ये तीन चार ओळखीचे चेहरे दिसल्यामुळे एक्सेप्ट केली आणि नेहमीच्या कामाला लगलो.

भरपूर काम होते आणि एकाच आठवड्यात दोन परीक्षा होत्या त्यामुळे त्या सकाळच्या कन्येचा विसरच पडला. दिवसभर एकदम धावपळीत गेला. संध्याकाळी रेनाबरोबर कॉफी प्यायला गेलो. एकदम झकास मुलगी. सोनेरी केस आणि गहिरे निळे डोळे. अशा वर्णनाच्या मुली मठ्ठ असतात असा समज आहे तो हिने अगदी खोटा ठरवला आहे. वेगवेगळ्या विषयांचा व्यासंग आणि अतिशय बोलघेवडी त्यामुळे हिच्याबरोबर वेळ कसा जातो काही कळतच नाही. तिच्याबरोबर बसून रहावेसे वाटते पण सध्या कामच इतके असल्यामुळे काही पुढे जाता येत नाही. असे वाटते की आता नेहमीचीच सबब झाली आहे. मुलगी चांगली वाटती. तिच्याबरोबर दोन तीन वेळा कॉफी - खाणे पिणे होते. दोघे मिळून चित्रपट पाहणे ही होते. पण गाडी काही पुढे सरकत नाही. बहुतेक मुली कंटाळतात आणि मग कोणीतरी दुसरा शोधतत. आपण मात्र "काम आहे - वेळ नाही." आता मागच्याच महिन्यात एका कन्येबरोबर चार वेळा भेटणे झाले. चारही वेळा फक्त ती अन मी. भरपूर गप्पा झाल्या. आणि मग एकदम खूप काम वाढले आणि परीक्षा आल्या. मग दोन आठवडे फोन करायला पण वेळ नाही. शेवटी ती दिसली तर कोणी तरी तिसराच तिच्या हातात हात घालून फिरत होता. आपण आपले काम भले असे मार्गक्रमण करतो.

आज सकाळीच मातोश्रींचा मिस्ड कॉल आला. त्यांना फोन केला तर नेहमीचेच पुराण चालू झाले. लग्न कधी करतो - करून टाक आता. त्यांना पण "काम आहे - वेळ नाही" सबब ऐकवली. मागच्याच आठवड्यात परीक्षा होऊन गेल्यामुळे जरा निवांतपणा होता मग काय फेसबुक चालू केले. काम पण कमी असल्यामुळे कधी नव्हे ते कोण कोण ऑन लाइन आहे ते पहिले. कोणी जास्ती दिसत नव्हते. असे काम नसल्यामुळे नुसते पकलो होतो. वाटले आता हे बंद करून रेनाला मेसेज करावा आणि कोठेतरी बाहेर जावे. तेव्हड्यात मंजुळ आवाज झाला आणि पाहतो तर कोणी तरी Hi केले होते. पाहतो तर तीच मागच्या आठवड्यातली कन्या. मी तर तिला पूर्णपणे विसरूनच गेलो होतो.

बोलणे सुरु झाले - ओळखी पाळखी निघाल्या. कळले की अनुष्का आमच्याच कॉलेज ला होती. परंतु तीन वर्ष मागे असल्यामुळे कधीच ओळख झाली नव्हती. मित्र आणि इकडून तिकडून तिला माहिती कळली होती आणि ती सुद्धा आमच्याच युनिव्हर्सिटित शिकायला येत होती. आमच्याच कॉलेजातून शिकायला येणार म्हटल्यावर मी जर अजून चौकशी केली पण काही फार उत्तरे मिळाली नाहीत. उलट मलाच थंडी, हवामान, इतर विद्यार्थी अशा शंका विचारल्या गेल्या. आणि कोणाच्या तरी ओळखीने राहण्यासाठी जागा पाहण्याची विनंती करून संभाषण संपले. आता जागा पाहणे आले असे म्हणतानाच बॉसचा ईमेल आला. काही तरी नवे काम अजून काय!

आज संध्याकाळी कोणाचा मेसेज आहे का ते पाहत होतो. अनुष्काचा होताच. या कामाच्या रगाड्यात तिच्यासाठी कोणाला जागा आहे का ते विचारणे राहूनच गेले होते. तिला sorry म्हणून या आठवड्यात नक्की काम करतो असे सांगितले. थोडे इकडचे तिकडचे बोलून ती गेली. मी लगेच फोन फिरवला. नूरीला विचारले तिच्या कोणी मैत्रिणी रूममेट शोधतात का. आणि काय विचारता पहिल्याच फटक्यात जागा मिळाली. नूरीचीच रूममेट सोडून जाणार होती त्यामुळे ती कोणाला तरी शोधतच होती. लगेच अनुष्काला मेसेज टाकला. म्हटले काम फत्ते. पण येताना काजू कतली घेऊन यावी लागेल खास!! तिला नूरीला फेसबुक वर भेटायला सांगितले आणि मी माझ्या जावाबादारीतून मोकळा झालो.

तेवढ्यात रेनाचा मेसेज आला. संध्याकाळी काही तरी वेगळे करायचा विचार होता. मग काय निघालो आणि जिम मध्ये जाऊन rock-climbing केले. तिच्याबरोबर कोठेही मजा असते. पुढच्या वेळेस badminton खेळायचे ठरले. रेना खरच चांगली मुलगी आहे आणि माझ्यात जर जास्तीच रस घेतीये असे वाटत होते. रॉब पण चिडवत होता काय सारखे रेना बरोबर फिरत असतो. काय विचार आहे ? त्याला आमचे ठराविक उत्तर दिले "अरे फक्त मैत्रीण आहे रे". आज`एकदम कामाचा विचार न करता मुलींचा विचार करत झोपलो.

परीक्षा आल्या आणि सेमिस्टर संपायची वेळ झाली. थंडी भरपूर वाढली आणि त्यात बर्फ हि भरपूर पडले. त्यामुळे बाहेर जाऊन काही करावेसे वाटत नव्हते. मग काय आपण आणि आपला अभ्यास. रेना पण अभ्यासात मग्न आहे त्यामुळे अजून काही चालू नाही. नाही म्हणायला अनुष्काला सूचना देणे चालू आहे. आजच तिला मेसेज केला. किती पैसे आणायचे - कसे आणायचे - पासपोर्ट नीट सांभाळ. ती म्हणाली इतक्या सूचना द्यायला मी काही कुक्कुलं बाल नाही. खूप दिवसांनी कुक्कुलं शब्द ऐकला. या अभ्यासात काही तरी विरंगुळा.

आज संध्याकाळी रेनाबरोबर सिनेमा पाहायला जायचे आहे. परीक्षा संपल्यामुळे आज जर उशिराच उठलो. फोन वाजतो आहे असे वाटले. पाहतो तर कोठला तरी अनोळखी नंबर होता. तरी उचलला. आणि काय अनुष्काचा फोन होता. ती न्यूयॉर्क विमानतळावरून बोलत होती. थोड्याच वेळात इकडे पोहोचणार होती. श्याSS विसरलोच! तिला सांगितले होते विमानतळावर घ्यायला येईन म्हणून. तिला म्हटलो काळजी करू नकोस. येतोच घ्यायला. आवरायला घेतले आणि नूरीला फोन टाकला. पाहायला हवे ती घरी आहे की नाही. सुदैवानी तिच्या लक्षात होते अनुष्का येणार आहे ते. तिनी एक खोली रिकामी करून ठेवली होती. तिला सांगितले मी येतो अनुष्काला घेऊन थोड्याच वेळात.

विमानतळावर थोडे आधीच पोहोचलो. गाडी लावून आत गेलो. कुठल्या पट्ट्यावर न्यूयॉर्कहून येणारे सामान आहे ते लिहिले होते त्याच्या जवळ जाऊन उभे राहिलो. इकडे हे तरी चांगले आहे. जरा आतमध्ये उभे राहता येते. नाही तर मुंबई विमानतळावर बाहेर वाट बघताना उकाडा आणि डास अगदी हैराण करतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांचेही बरोबर वाटते. विमान आल्याची सूचना झाली आणि माझे डोळे जिन्याकडे लागले. बरेच प्रवासी उतरल्यावर अगदी शेवटी शेवटी अनुष्का हळू हळू उतरत होती. एक बावरलेला भाव होता तिच्या चेहऱ्यावर. तिचे डोळे कोणीतरी ओळखीचे शोधत होते.

आमची नजरानजर झाली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले. नजरेत चमक आली आणि तिनी जोरात हात हलवून मला हाय केले. जत्रेत हरवलेल्या मुलाला त्याचे आई-बाबा सापडल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद तिला झालेला वाटत होता. ती खाली उतरून माझ्या जवळ आली. मी नकळत हात पुढे केले. तिला मिठीत घेतले. अशी मिठी मित्र-मैत्रिणींची इकडे सामान्य असते. ती सुद्धा प्रथम खुश झाली. मग मात्र बावरून लगेच दूर झाली. मी पण एकदम चमकून ती भारतीय मुलगी आताच भारतातून आली आहे हे भान येउन तिला दूर केले.

(भाग १)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरुवात झाली आहे! Valentine day special म्हणून मायबोलीवर love stories येत आहेत का? Happy नंदिनीची कथा आहेच आलेली!

अरे मस्त लिहिलेय. आणि पहिल्याच भागाचा शेवट ऐअरपोर्टवर मग काय विचारता!!! ही प्रेमकथाच पाहिजे, चालणारच नाही दुसरं काही. Happy

छान सुरवात. Happy अशी गोष्ट कुठेतरी वाचल्यासारखी वाटतेय.. कुठल्या ब्लॉगवर की काय आठेवत नाही.. तिथेही पहिली भेट अशीच बाकी जास्त साम्य आत्तातरी नाहीये.. किती भाग आहेत.. लिहा लिहा.. Happy