शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका

Submitted by ए ए वाघमारे on 9 February, 2015 - 14:41

Shamitabh.jpg
शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका

अमिताभ बच्चन आणि देव आनंद यांच्यात साम्य काय असं कोणी मला विचारलं तर मी म्हणेन दोघांमध्ये भलेही जमीनअस्मानचा फरक असेल पण एक साम्य आहे ते म्हणजे अमिताभही देव आनंदसारखा म्हातारपणी दिवसेंदिवस तरूण होत चालला आहे. निदान ताजाताजा ‘शमिताभ’ पाहून मला तरी असंच वाटलं. लौकिकार्थाने प्रचंड यशस्वी कारकिर्दीच्या ‘आखरी पडाव’ वर, पिक्चर पडला तरी हारण्यासारखं काहीच नाही अशा एका स्थितीला पोचल्यावर आता अमिताभने स्वत:ची ‘मन की बात’ ऐकत वेगवेगळे प्रयोग करायला सुरूवात करूनही आता बराच काळ लोटला आहे. स्वत: केवळ स्वत:साठीच पिक्चर काढण्याच्या किशोर कुमार, देव आनंद यांच्या लहरी वाटेवर अमिताभही आता चालायला लागला आहे, हे ‘शमिताभ’ पाहिल्यावर मला प्रकर्षाने जाणवलं.

एका वाक्यात चित्रपटाची कथा सांगायची म्हणजे सिनेमात हिरो बनण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा असलेला मुका नायक [धनुष] एका अपयशी म्हातार्‍या नटाचा [अमिताभ] आवाज उसना घेतो आणि पडद्यावर साकारते एक अनोखे द्वंद्व जे कधी अनपेक्षित तर बर्‍याचदा अपेक्षित वळणे घेत शेवटी ०२ तास ३५ मिनिटांनी एका शोकांतिकेत संपते. मध्येमध्ये गोष्ट पुढे सरकवण्यासाठी टेकू म्हणून अक्षरा हसन नावाचा [बहुधा वशिल्याचा] ठोकळा येतो आणि आपल्या सहनशीलतेची परीक्षा घेतो. अमिताभ ज्या विद्यापीठाचा Professor Emeritus आहे त्या विद्यापीठाच्या अंगणवाडीतही अक्षरा हसनला अद्याप अ‍ॅडमिशन मिळायची आहे.

ऑफ-बीट सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा यांच्यात संतुलन साधताना चित्रपट थोडा पसरट झाला आहे. पण त्यामुळे माझ्यासारख्या प्रेक्षकाला मधेमधे थोडी डुलकी घेऊन अक्षरा हसनच्या गंभीर अभिनयाने [?] येणारा शीण घालवण्यास मदत होते. सुरुवातीलाच नायकाचं सगळं आयुष्य एका गाण्यात लपेटून टाकल्यावर चित्रपट वेगवान असेल ही आपली समजूत लवकरच खोटी ठरते. आता मध्यंतर घ्यायची वेळ झाली आहे हे आपल्याला जाणवूनही दिग्दर्शकाला तसे वाटेपर्यंत खुर्चीत बसून राहणे भाग पडते.

अमिताभ- अमिताभ करता करता संकलनात अनेक त्रुटी राहून गेल्या आहेत. थोडी अजून कात्री चालवून चित्रपट थोडा आटोपशीर करण्यास बराच वाव होता. अनेक ठिकाणी प्रसंग पॅच अप केल्यासारखे वाटतात,जसं काही अमिताभ-धनुषची मुख्य कथा आधी लिहून, चित्रित करून मग बाकीचे प्रसंग घुसडले आहेत. सांप्रतकालीन मसाला सिनेमाला चिमटे काढण्याच्या नादात बाल्कीने भरपूर दाक्षिणात्य आचरटपणा केला आहे. कदाचित मुंबैय्या सिनेमावाल्यांच्या पार्श्वभूमीवरचा चित्रपट असल्याने AIB छाप भाषाही यथेच्छ वापरली आहे. अमिताभनेही आतापर्यंत पडद्यावर दिल्या नसतील एवढ्या शिव्या या एकाच चित्रपटात दिल्या आहेत.

आता धनुषसारख्या माणसाला अमिताभचा प्लेबॅक देणं, त्यावर तो यशस्वी झालेला दाखवणं हा अनेकांच्या मते मायनस पॉइंट असू शकतो. पण एक अतिसामान्य चेहर्‍याचा नायक म्हणून धनुष ‘फिट’ आहे. बाकी राहिला ते अमिताभचा त्याला असलेला प्लेबॅक. संपूर्ण चित्रपटभर एका ब्लॅक कॉमेडीचा अंडरकरंट आहे, तो म्हणजे आजच्या तंत्रशरण झालेल्या आणि संवादफेक, शुद्ध उच्चार , उत्तम लेखन अशा नाट्य-सिनेमाच्या मूलभूत तत्वांपासून दूर झालेल्या व्यावसायिक सिनेमावर केलेली ही टीका आहे. आणि ही टीका करणारा आवाज अमिताभचा आहे. ‘लाईफबॉय’ची जाहिरातही त्यातलाच एक प्रकार असावा [ती खरोखर in-script जाहिरात नसली तर. पण असावी कारण अमिताभ या चित्रपटासाठी टीव्हीवर Benadrylचीसुद्धा जाहिरात करतो आहे. असो.] हे सगळं करण्याच्या नादात नट आणि आवाज यांतील संघर्ष या [आधी कधीतरी] मुख्य असलेल्या विषयाकडे दिग्दर्शकाचं दुर्लक्ष होतं आणि चित्रपट मध्येच पकड सोडतो. पण मध्यंतरानंतर शेवटाकडे जाताना पुन्हा वेग घेतो. सिनेमात अमिताभ धनुषचा पर्सनल स्टाफ [वॅलेट] म्हणून वावरत असतो. या पर्सनल स्टाफच्या कष्टाचं रेक्गनिशन म्हणूनच की काय साधारणत: शेवटच्या टायटल्सच्या शेवटी शेवटी येणारं मुख्य कलाकारांच्या वॅलेच नाव चित्रपट संपल्यावर लगेच दिग्दर्शकाच्या नावाआधी येतं. स्वानंद किरकिरे हा खरोखरच ‘मेहनती’ गीतकार आहे हे या चित्रपटात पुन्हा सिद्ध होतं.

चित्रपट अमिताभसाठीच लिहिलेला आहे हे तर स्पष्टच आहे. पण तो अमिताभनेच लिहून घेतला आहे की काय अशी मला दाट शंका आहे. संपूर्ण सिनेमाचे नसले तरी स्वत:च्या सीन्सचे दिग्दर्शनही त्यानेच केले असावे. कारण त्या त्या सीन्सचे टेकिंग थोडं जुन्या वळणाचं आहे. अर्थातच हा माझा एक अंदाज आहे. कदाचित तांत्रिकतेपेक्षा अंगभूत कलेला महत्त्व देणार्‍या जुन्या नटाच्या व्यक्तिरेखेला साजेसं म्हणून दिग्दर्शकाने तसं केलं असावं. पण खर्‍या अमिताभच्या वैयक्तिक आयुष्यातले संदर्भही कधी चोरटेपणाने तर कधी जोरकसपणे येऊन जातात. उदा. रेडिओवर अमिताभचा आवाज कसा ‘रिजेक्ट’ झाला होता व त्यानंतरची कथा सर्वांनाच माहिती आहे. ‘शमिताभ’चा विषयच मुळी नट आणि आवाज असल्याने हा संदर्भ जोरकसपणे आला आहे. तसेच रेखाच्या काही सेकंदाच्या गेस्ट अपीअरन्स मधून प्रेक्षक काय समजायचे ते समजतो. इथे लेखक-दिग्दर्शक बाल्की प्रेक्षकाला चित्रपटशी कनेक्ट करण्यात यशस्वी होतो. फिल्म इंडस्ट्रीने स्वत:ला ‘बॉलीवूड’ म्हणवून घेणं हे खर्‍या अमिताभप्रमाणे पडद्यावरच्या अमिताभलाही आवडत नाही. या व अशा अनेक गोष्टींमुळे चित्रपटात अमिताभ बच्चन हा अमिताभ सिन्हा म्हणून वावरत असला तरी तो खरा अमिताभ बच्चनच आहे हे शेवटपर्यंत जाणवत राहते. कदाचित याला काही समीक्षक उणे मार्क्स देतील. पण मला तर हे जाणीवपूर्वक केलं आहे असं वाटतं. किंबहुना म्हणूनच सिनेमाची कल्पना ही स्वत: अमिताभचीच फॅण्टसी असावी असं मला वाटतं. त्यामुळेच कितीही शमिताभ, शमिताभ म्हटलं तरी शेवटी अमिताभच उरतो, पडदाभर. मग तुम्ही आमच्यासारखे त्याचे चाहते असा किंवा नसा.

ता.क.: आता ‘शमिताभ’मध्ये दारुड्याची भूमिका करून मद्यप्राशनाला उत्तेजन दिलं म्हणून कुणा संस्कृतीरक्षकाने बिचार्‍या अमिताभवर FIR दाखल करू नये म्हणजे मिळवलं !

http://aawaghmare.blogspot.in/

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं लिहिलेलं. विशेषतः चित्रपटेतर (पण तरीही चित्रपटाशी संबंधित) गोष्टींवर केलेलं भाष्य.

मला आवडला सिनेमा. धनुषचा रांझणा अर्थातच जास्त आवडला होता, आणि इथं मुद्दामहुन त्याने बॅकसीट घेतलीय- असं जाणवत राहतं. ज्या सीन्सवर 'स्लो' आणि अनावश्यक म्हणून लोकांकडून टीका झाली, नेमके तेच सीन्स भावून गेले. मध्यंतरानंतर वेग कमी झाला, पण तेही मुद्दाम केलेलं शेवटी लक्षात आलं. ज्या नोटवर शेवट केला आहे, तेही अमेझिंग वाटलं. आणि या शेवटच्या पार्श्वभूमीवर आधी वाटलेले वेळखाऊ प्रसंग जस्टिफाय करता आले. बाल्की हा बुद्धीमान दिग्दर्शक आहे, हे मी मनोमन पुन्हा एकदा नक्की करून टाकलं.
खास अमिताभ बच्चनसाठी हा सिनेमा पुन्हा एकदा पाहायला आवडेल.

साजिर्याच्या सगळ्याच मुद्द्यांना + १
मला आवडला सिनेमा आणि हा जर नाटक फॉर्म मधे लाइव्ह असता अजुन मजा आली असती असं वाटलं :).
धनुष -अमिताभ दोघही ग्रेट आणि कुठेही एकतर्फी वाटला नाही , एकट्या अमिताभ वर फोकस केलाय असं पण नाहीच वाटलं नाही उलट दोघांची कॅरॅक्ट्र्स एकामेकांशिवाय अधुरी आहेत :).
अक्शरा हसन क्युट आहे !
थोडा जास्तं लांबलाय पण कथा - कल्पना भन्नाट आहे आणि शेवट सॉलिड केलाय ..

चांगलं लिहिलय. कथा तरी छान वाटते. नक्की पहाणार टीवीवर आला की. बच्चन साहेबांचे वरच्या फोटोतले भाव नेहमीप्रमाणेच भन्नाट!

मस्त रिव्ह्यू लिहिला आहे. सहमत आहे.
सिनेमा आवडला. अमिताभ फॅन्सनी चुकवू नयेच. अमिताभची एनर्जी पाहूनच थक्क व्हायला होते. संथ असला तरी मला आवडला. बाल्कि पंचेस सही आहेत काहीकाही. धनुषची बॉडी लॅन्ग्वेज फारच सही आहे.

उशीरा का होईना काल 'शमिताभ' पाहिला... आणि मला अतिशय आवडला.
'अमिताभला त्याचा आवाजामुळे रेडियोवर नोकरी नाकारली होती, आणि तोच आवाज पुढे नावाजला गेला' ह्या मुद्दा चित्रपटातला केवळ एक अँगल आहे... मुळात चित्रपटाची कल्पनाच जबरी आहे. मूक अभिनय आणी त्याला मिळणारी आवाजाची साथ... ह्या दोन्ही गोष्टींपासून सुरु होणारी कथा पुढे 'बोलविता धनि कोण? ' ह्या प्रश्नापर्यंत येते आणि तिथे खरा संघर्ष आहे चित्रपटातला... जो कथेतून आणि धनुष, अमिताभ दोघांच्याही अभिनयातून, वापरलेल्या प्रतिकातून नीट पोचला माझ्यापर्यंत तरी नक्कीच.
चित्रपटात वापरलेली स्थळं (लोकेशन्स) कमाल, जमिनीलगतचं खेड्यातलं घर, उंचावरची बाल्कनी आणि त्यातला स्मशानाचा, त्या थडग्यांचा तो केलेला वापर तर अमेझिंग... शिवाय धनुष च्या घरात भींतींवर लावलेले फोटोज, त्या घराचा सेट अप, त्यातून दिसणारी डायरेक्टररची आर्टीस्टीक नजर.... वा ! दिल खुष टोटल...
सिनेमा वरून वाटतो तितका साधा सरळ नक्कीच नाही, खूप लेअर्स आहेत, आणि त्यातले काही लेअर्स तर फार डीप फीलॉसॉफी मांडणारे आहेत... बाल्की टोटली इमप्रेस्ड मी !
अक्शरा हसन तिच्या त्या हेअर कट मुळे सतत मान एका बाजुला वाकलेली ह्याच फॉर्म मधे लक्षात राहणार असं दिसतंय !!