निवाडा

Submitted by मंजूडी on 14 January, 2009 - 02:45

जवळ जवळ २०-२५ मिनीटं यशूची वाट बघत होते बस स्टॉपवर... दोन-तीन फोनही करून पाहिले तिला... पण ती मोबाईल उचलतच नव्हती. शेवटी कंटाळून मी ऑफिसला निघून आले. नंतर कामाच्या गडबडीत यशू कधी ऑफिसला आली, कशी आली वगैरे विचार काही डोक्यात आलेच नाहीत. दुपारी लंचला जाण्याअगोदर तिला missed call द्यावा म्हणून पर्समधून मोबाईल बाहेर काढला आणि बघते तर काय........ १६ missed calls... कर्म माझं.. मोबाईल सायलेंटवर असल्याने फोन वाजलेला कळलाच नव्हता.
'चुलीत घाल ते तुझं डबडं.... ' यशूचे शब्द मला आठवले आणि खुदकन हसायलाच आलं. काल रात्री पिक्चर बघताना मोबाईल सायलेंटवर ठेवला होता आणि सकाळच्या गडबडीत ते विसरायलाच झालं होतं. त्या पिक्चरची स्टोरी यशूला सांगायची होती, आणि गधडीने नेमकी आजच रोजची बस चुकवली होती.

missed calls कोणाचे ते बघितले तर ७ फोन यशूच्याच नंबरवरून.... पुढचे ३ तिच्या नवर्‍याचे.. ३ असेच सटरफटर बिनओळखीचे आणि शेवटचे ३ माझ्या नवर्‍याचे.... श्शी बाई!! आता हा मकरंद पण वैतागला असेल माझ्यावर.... असं मनाशी म्हणत त्याला फोन लावला आणि लगेचच फायरींग सुरू....
'ऐकू येत नाही तर मोबाईल ठेवावाच कशाला माणसाने जवळ?? उपयोग काय त्याचा??'... वगैरे वगैरे.... नेहमीचीच वाक्य.... कधी संपतील ह्याची वाट बघत मी नुसतीच 'हूं' 'हूं' करत राहिले. माझा इतका थंड प्रतिसाद पाहून मकरंद फिस्कटलाच..
"तुझी सख्खी मैत्रीण हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडलीये आणि तू काय झक् मारतेयस तिकडे ऑफिसमध्ये??"

ह्या त्याच्या वाक्याने मी हादरलेच.... यशू?...... हॉस्पिटलमध्ये??
का? कधी? वगैरे प्रश्न विचारायचं पण भान राहिलं नाही मला.
"मी गाडी पाठवतोय ऑफिसमध्ये.." मकरंदचे एवढेच शब्द माझ्या कानात घुसले. पुढे त्याची गाडी कधी आली, मी कशी गाडीपर्यंत गेले.. हॉस्पिटलमध्ये पोचले काहीही आठवत नाही.

नि:शब्द यशू..... शांतपणे बेडवर झोपलेली.. हाताच्या कोपरावर भलंमोठं बँडेज... बाकी इथे तिथे बर्‍याच खरचटलेल्याच्या खुणा.... कधी शुद्धीवर येईल माहीत नाही. तिची ही अवस्था पाहून खोली आपल्या भोवती गरगरतेय असं वाटू लागलं.

सुनिलने, यशूच्या नवर्‍याने, माझा हात धरून स्टूलवर बसवलं. मकरंदने गरम कॉफीचा ग्लास हातात ठेवला.... चटका बसताच क्षणी मी भानावर आले.
थोडंफार सुनिलने, थोडंफार मकरंदने सांगितलं ते असं:
सकाळी नेहमीप्रमाणे सुनिल आणि ती घराबाहेर पडले ऑफिससाठी.. सुनिल स्टेशनला गेला आणि यशू बस स्टॉपकडे चालत येत होती... जरा वेगातच... उशीर झाला होता आणि मी वाट बघत असेन म्हणून.... बहुतेक रस्ता क्रॉस करताना भरधाव येणार्‍या गाडीने तिला उडवलं... तो धक्का इतका जोरदार होता की यशू जागच्या जागी तीन-चारदा आपटली....आणि जागीच बेशुद्ध झाली असं ऍक्सिडंट प्रत्यक्ष बघणार्‍यांचं म्हणणं... गाडीवाला तर पळून गेला पण तिथे जमा झालेल्या लोकांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवलं.

हॉस्पिटलच्या रस्त्यावर असतानाच माझा फोन तिला गेला असणार... ऍडमिट केल्यावर प्रथम त्या लोकांनी माझ्याच मोबाईलवर फोन केले म्हणे.... मी फोन उचलत नाही पाहिल्यावर तिची पर्स धुंडाळली. त्यात मिळालेल्या आय-कार्डवरुन सुनिलला फोन गेला.

सगळं ऐकून सुन्नच व्हायला झालं. हे काय झालं यशूला? नेहमी चारचारदा इकडे तिकडे बघून रस्ता क्रॉस करणारी ही मुलगी... आजच काय असं झालं?

मुख्य डॉक्टर आल्याशिवाय कितपत लागलंय, जखमा किती गंभीर आहेत वगैरे कळायला मार्ग नव्हता. ऍडमिट केल्यावर तिथे ह्जर असलेल्या डॉ़क्टरनी मुख्य डॉक्टरना कळवून यशूवर जुजबी प्रथमोपचार केले होते.

थोड्याच वेळात नर्सेस आणि वॉर्डबॉईजची यशूच्या खोलीत धावपळ चालू झाली. मुख्य डॉक्टर आले होते, यशूला स्कॅनिंगसाठी न्यायचं होतं. देवा रे!! यशूला फार काही गंभीर दुखापत नसू दे...
सुनिलचा चेहरा बघवत नव्हता. मकरंदच सगळी धावपळ करत होता. डॉक्टरांशी बोलणं, फॉर्म्स आणणं, आवश्यक असेल तिथे सुनिलच्या सह्या घेणं, औषधं, यशूचा मेडीक्लेम....

जवळ जवळ तासभर यशू स्कॅनिंग रूममध्येच होती. डॉक्टर बाहेर आले.. मी त्यांचा चेहरा वाचायचा निष्फळ प्रयत्न केला.
सुनिलच्या खांद्यावर थोपटून ते नुसतंच म्हणाले, "Don't worry.... रीपोर्ट्स यायला थोडा वेळ लागेल, मी वॉर्डमध्ये राऊंड घेऊन येतो मग आपण बोलू.."

म्हणजे पुन्हा वाट बघणं आलं.

अर्ध्या तासाने आम्ही तिघेही त्यांच्या केबीनमध्ये अक्षरशः देवाचा धावा करत बसलेलो.... सुनिलने मकरंदचा हात घट्ट धरून ठेवलेला... सगळ्यांच्याच कंठाशी प्राण आलेले..

"Don't worry Mr. Sunil, Mrs. Yashodhara is fine. झालेल्या ऍक्सिडंटमुळे त्यांना शॉक बसलाय म्हणून त्या बेशुद्ध आहेत. पण काळजी करू नका... अर्ध्या तासात शुद्धीवर येतील त्या..."
"पण डॉक्टर, बाकी काही डॅमेजेस? Internal bleeding वगैरे? " मकरंदचा आवाज स्थिर राहत नव्ह्ता.
"सुदैवाने त्यांच्या डोक्याला मार बसलेला नाहीये... ब्रेन स्कॅनिंगचे रीपोर्ट्स नॉर्मल आहेत. डाव्या हाताचं कोपर मात्र फ्रॅक्चर झालंय. त्याचं ऑपरेशन आम्ही उद्या schedule करतो आहोत, आणि एक Mr. Sunil...."

डॉक्टरांचा मोठा पॉज त्या क्षणी फारच असह्य होत होता.

"Mrs. Yashodhara was pregnant...."

"क्काय??" आम्ही तिघेही अक्षरशः हादरलोच.

यशोधरा आणि सुनिलच्या लग्नाला सात-आठ वर्ष तरी सहज झाली असतील. मूल होण्यासाठी चिक्कार प्रयत्न करून दोघंही थकलेले... शेवटी हे आयुष्य आपल्या दोघांचंच हे सत्य स्विकारून शक्य तेवढ्या परीने आनंदात दिवस घालवत होते. आणि आत्ता ही अशी बातमी....

"Mrs. Yashodhara 'was' pregnant म्हणजे काय डॉक्टर?" मी किंचाळलेच.
"yes madam, she 'was'.... miscarriage झालंय unfortunately ....."
"पण डॉक्टर......... हे आम्हाला काही माहीतच नव्हतं.... म्हणजे हे असं काही असेल..... आणि हे असं काहीतरी होईल..... हे काय?.... आणि का??" सुनिलचा आवाज अगदी हेलावून टाकत होता.
"It was just a begining.... आणि जोरात बसलेल्या धक्क्यामुळे त्यांच्या गर्भाशयाला अतिशय गंभीर इजा पोचली आहे..........आणि..."

डॉक्टर!! काय ते बोला लवकर....

"......and I am sorry to say.... त्यांचं गर्भाशय काढून टाकण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाहीये.... "

"....?"

"...???"

सुनिल तर ओक्साबोक्शी रडायलाच लागला. इतका वेळ कसाबसा धीर धरलेला.... हे असं काहीतरी ऐकावं लागेल ह्याची कल्पनाही नव्हती. कुठल्या शब्दात सुनिलची समजूत आम्ही काढणार होतो? आणि धीर तरी काय देणार होतो? बिच्चारा सुनिल.. हे सगळं चांगलेपणी झालं असतं तर किती फुलासारखी जपली असती यशूला... काय हे असं यशूच्या नशिबात?? ह्या बातमीची किती वर्ष वाट पाहिली होती त्यांनी... किती स्वप्नं रंगवली असतील..शेवटी सत्य पचवून आयुष्याला नव्याने सामोरं जातायत तोच ही अशी दुर्दैवी घटना... काय म्हणायचा हा देवाचा न्याय? आधी मातीत अंकूर रुजू द्यायचाच नाही आणि आता रुजतोय तर पुराच्या लोंढ्याने बीजासकट मातीच वाहून न्यायची....... हे काय खरं नव्हे!!

आधी देवाचा धावा करणारी मी, डॉक्टरांचं म्हणणं ऐकून देवालाच दोष देऊन मोकळी झाले. हातात दुसरं होतं तरी काय म्हणा....

यशूला ही बातमी कशी आणि कोणी द्यायची ह्याबद्दल सगळेच टाळाटाळ करत होते.
शेवटी ते काम डॉक्टरांनीच पार पाडलं. यशू मात्र मोठ्या हिंमतीने सामोरी गेली त्या प्रसंगाला.... आपल्या स्त्रीत्वाचा एक अविभाज्य भाग आपल्यापासून अलग करावा लागणार आहे हे धीराने पचवलं तिने.. कुठलाही अपेक्षित त्रागा तिने केला नाही.... माझा हात घट्ट धरून हमसाहमशी रडली मात्र भरपूर..... पण त्यावेळी तिला रडू देणं हेच योग्य होतं.

ठरल्याप्रमाणे सगळी ऑपरेशन्स पार पडली. जास्त काही कॉम्प्लिकेशन्स उद्भवली नाहीत ह्याबद्दल देवाचे आभारच मानायला हवेत..

ऑपरेशन्स नंतर तिची रिकव्हरी वेगात झाल्यामु़ळे तिला १५ दिवसात डिस्चार्ज मिळाला. इतर किरकोळ जखमा आता पूर्णपणे बर्‍या झाल्या होत्या. घरात ती बर्‍यापैकी हिंडू फिरू लागली होती.
माझी, मकरंदची जवळ जवळ रोज खेप होतच होती. यशूला आणि सुनिलला आधार द्यायला हवा होता..... एवढा मोठा धक्का पचवणं सोपं नव्हतंच मुळी....
सुनिल पार ढासळलाच होता, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यशू फारच शांत होती. बरीच हिंमत धरली होती तिने... मी तिच्या जागी असते तर एवढी खंबीर राहूच शकले नसते..

दिवसभर एकटी राहण्याइतका यशूला आत्मविश्वास आल्यावर सुनिल ऑफिसला जाऊ लागला.

यशू देवभोळी कधीच नव्हती पण हा ऍक्सिडंट झाल्यापासून सतत देवाजवळ हात जोडून उभी रहायची.... 'झालं ते बरं झालं', 'योग्य तेच झालं','हे व्हायलाच हवं होतं' असंच काहीतरी म्हणत रहायची.... सुरुवातीला सुनिलने दुर्लक्ष केलं, पण नंतर तेच सारखं सारखं ऐकून तो सुद्धा फ्रस्ट्रेट व्हायला लागला. त्याने मला यशूला समजवायची, तिच्या मनातलं काढून घ्यायची विनंती केली. कारण हे असंच चालू राहिलं असतं तर यशूचं पुढचं आयुष्य अतिशय कठिण झालं असतं.

"जीव वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानत्येस ना यशू...." तिला बोलतं करण्यासाठी म्हणून मी एकदा तिला विचारलं. दोघीच होतो घरात त्यावेळी..
यशू नुसतीच हसली त्यावर...
"आभार मानायचे की जाब विचारायचा देवाला..... तुझी काय चूक झाली होती गं की तुला एवढा मोठा वाईट ऍक्सिडंट व्हावा? तुला उडवणारा तर गेला पळून... फिरत असेल मोकळा राजरोसपणे... आणि शिक्षा मात्र तुला.." त्राग्यानेच मी म्हटलं.
"तो वर बसलाय ना.... त्याच्याजवळ सगळ्यांसाठी न्याय असतो, तो करतो ते योग्यच करतो.."
"यशू, काय योग्य करतो तो? अं? सांग ना...तू असं काय त्याचं बिघडवलं होतंस की त्याने तुला एवढी मोठी शिक्षा करावी?"
"त्याच्या लेखी ही किरकोळच शिक्षा आहे..... मला तर ह्यापेक्षा मोठी शिक्षा व्हायला हवी होती... "
"काय बोलतेस तू यशू.. ही किरकोळ म्हणायची का शिक्षा? अजून मोठी शिक्षा म्हणजे तुला काय व्हायला हवं होतं?" नकळत माझा आवाज चिरकला होता.
"मी मेले असते तर बरं झालं असतं.... ही कायमची टोचणी तरी संपली असती.." खिन्नपणे यशू म्हणाली.
"तुझं डोकं बिकं फिरलंय काय यशू? कसली टोचणी........ मरणाच्या कसल्या अभद्र गोष्टी करतेस? "
"माझ्या हातून अभद्र गोष्ट घडलीये...... खरं तर 'जशास तसे' ह्या न्यायाने माझा जीवच जायला हवा होता ह्या अपघातात..... का वाचले तेच कळत नाहीये."
"यशूsss......"
माझा आवाज ऐकून बाई धावत आली स्वयंपाकघरातून.....
तिला हातानेच 'काही नाही, जा तू' अशी खूण करत यशू म्हणाली,
"बरंच काही झालंय माझ्या आधीच्या आयुष्यात... बर्‍याच घडू नये त्या गोष्टी घडल्यात... तेव्हा केलेल्या अपराधांचा घडा अजून भरलेला दिसत नाहीये, म्हणूनच एवढा मोठा अपघात होऊनही मी जिवंत राहिले आहे...."
"काय गं असं नको नको ते बोलतेयस तू यशू?"
"सुनिलशी हे माझं दुसरं लग्न.... प्रेमात पडून केलेलं पहिलं लग्न.... अतिशय छान दिवस होते ते.. मजेत आयुष्य चाललं होतं आमचं... एक दिवस संध्याकाळी फिरून घरी आल्यावर दूध घेऊन येतो म्हणून बाहेर पडलेला माझा नवरा घरी आलाच नाही.. परत आला तो त्याचा मृतदेह... एकच जबरदस्त मोठा हार्ट ऍटॅक त्याला आलेला..... एकाच ऍटॅकमध्ये खेळ खल्लास.... नवरा चेनस्मोकर होता हे त्यावेळी मला कळलं... " शून्यात नजर लावून बसलेली यशू घडाघडा बोलत होती.
"काय सांगतेस यशू? तुझ्या आयुष्यात इतकं सगळं घडलेलं.... कधीच बोलली नाहीस यशू तू.." माझा स्वर दुखावलेला... पण यशू तिच्याच तंद्रीत होती...
"मला दिवस गेल्याची बातमी आम्हाला तेव्हा नुकतीच समजलेली.... अश्या वेळी काय करावं तेच समजत नव्हतं.. मन अगदी सुन्न झालेलं.. काहीही सुधरत नव्हतं. माझी सद्सदविवेक बुद्धी मी हरवून बसले होते..घरातली मोठी माणसं जे म्हणतील त्याला 'हो, हो' करत गेले आणि ऍबॉर्शन करण्यासाठी जाणतेपणी परवानगी देऊन बसले... मोकळी झाल्यावर जाणीव झाली..हे आपण काय करून बसलो? त्या जीवाचा काय दोष होता? त्याचा जगण्याचा हक्क हिरावून घेणारी मी कोण होते? किती स्वार्थी बनले होते मी... पुढच्या आयुष्यात त्याची अडचण होईल असं वाटून त्याला ह्या जगात येऊच दिलं नाही. एका हत्येचं पातक आहे माझ्या डोक्यावर..... माझ्या कुशीत रुजलेलं बी मी उपटून फेकून दिलं... म्हणून देवाने माझी कूसच काढून घेतली. म्हटलं ना.... तो वर बसलाय तो योग्य निवाडा करतच असतो. त्याने दिलेल्या शिक्षेसाठी आपण सिद्ध असावं हेच खरं..... माझ्या बाबतीत त्याने योग्य न्याय दिलाय... माझ्या बाबतीत हीच शिक्षा बरोबर आहे.... हो की नाही? तुला पण असंच वाटतं ना? खरं सांग... अगदी खरं खरं.."

माझा हात घट्ट धरून यशू मला विचारत होती.... पण काय उत्तर देणार होते मी यशूला....... तिच्या प्रश्नाचं उत्तर तिने मिळवलंच होतं..

--- समाप्त---

गुलमोहर: 

मंजू, बर्‍याच दिवसांनी ! Happy छान लिहिलं आहेस.
.
'ग्रीन फ्ल्युरोसंट प्रोटिन' च्या शोधाबद्दल्'नोबेल' (२००८) - जपानी संशोधक ओसामु शिमोमुरा

नियतीचे निर्णय क्रुर असतात हे मात्र खरे. पण त खरेच असतात की नाही याच मोजमाप ज्याच्या त्याच्या हाती.
छान कथा.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

खिळवून ठेवणारी शैली.
अवघाची मधल्या संयोगिताची कहाणीही आता याच ट्रॅकवर जाईल बहुतेक... कुठेही काहीही आठवतं मला.. Happy
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

हे खुप वाईट, मातृत्वच गमावुन बसणं यासारखं दुसरं दु:ख नाही.
आवडली.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
http://maagevalunpahataana.blogspot.com

अवघाची मधल्या संयोगिताची कहाणीही आता याच ट्रॅकवर जाईल बहुतेक... )) अवघाची बघतेस ?
'कहर' आहे !
ट्टीप्पीकल गोष्ट ...

*************************************
'खवचट' लोकांनी 'मोकळा श्वास' बराच मनावर घेतलेला दिसतोय Wink

मंजू;
कथा छान आहे. पण तिने एक गर्भपात केला त्याची शिक्षा म्हणून दुसरं मृत मूल हे लॉजिक नाही पटत. आणि सुनिल नाही. सुनील. पण एकूण कथा छान!

मंजू, चांगली लिहिली आहेस.
यशूने तिच्या बाबतीत घडलेल्या घटनेचे स्वतःपुरते उत्तर शोधून स्वतःला पटवण्याचा प्रयत्न केलाय इतकंच.

मंजू, छान लिहिलीयेस कथा.... वेगवान आहे.
<<काय म्हणायचा हा देवाचा न्याय? आधी मातीत अंकूर रुजू द्यायचाच नाही आणि आता रुजतोय तर पुराच्या लोंढ्याने बीजासकट मातीच वाहून न्यायची......>>
आवडलं! असं बरच काही.....
टिळकश्री, इतक्या दु:खात माणसं विचार करतात त्याला लॉजिक नसतच. झालेल्या गोष्टीचं कारण कळल्याशिवाय मन स्वस्थं बसत नाही... स्वतःला दोष ही त्यातलीच एक पायरी आहे.
'इकडे तिकडे नीट बघत रस्ता क्रॉस केला नाही' इतकं साधं समोर कारण असतानाही, यशूला ठोस कारण हवय... हेच किती इल्लॉजिकल?
अत्यंत दु:खात माणूस "त्या"च्या समग्र प्रोजेक्ट प्लॅनचा अर्थ लावायचा असा प्रयत्नं करतोच करतो. असलं लॉजिक घेऊन बसलेल्या यशूला समजावणं कठीण. कारण तिला पटेल असं दुसरं जबरी लॉजिक असायला हवं आपल्याकडे....
यशूने आपलं उत्तर शोधलय इतकच म्हणायचं. लालू नेही तितकच म्हटलय.. माझा पसाराच जास्तं Happy

चांगली फुलवली आहेस मंजू गोष्ट.. लालूशी सहमत.. Happy

छन लिहिली आहेस मंजु.
------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

ओव्हरऑल गोष्ट आवडली पण शेवट नाही पटला फारसा नी गुंडाळून टाकल्यासारखाही वाटला.
बर्‍याच दिवसांनी दर्शन दिलंत माबोवर...

मंजू, छान कथा... बर्‍याच दिवसांनी आलीस..

मंजू छान आहे कथा. कथा खुप gradually unfold होत जाते. तसे कथानक साधे आहे कदाचीत वास्तव कथा असेल देखिल पण शेवटी खरचं धक्का बसतो climax वाचुन. हि तूमच्या कथानक सादरीकरणाची ताकद आहे, (good skill of storytelling) अगदी कथेचा flow देखिल आवडला. प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला.

मंजु गं, नको ना रडवुस प्लीईईईईज .... हेही वास्तव आहे.

सर्वांना धन्यवाद.

लालू, तू कथेची अगदी अचूक नस पकडलीस.

दाद म्हणाली तसं, घडलेल्या घटनांची कारणमिमांसा करत राहणं हा मनुष्यस्वभाव आहे. त्याशिवाय गर्तेतून बाहेर पडणं त्याला अशक्य होऊन बसतं. आयुष्य स्वतःहून संपवणं कठिणच असतं. जगण्यासाठी उमेद, ताकद मिळवायला माणूस आपल्या परीने चूका शोधत राहतो, निरनिराळी उत्तरं तपासून बघत राहतो.

आपल्या आयुष्यातल्या दोन महत्वपूर्ण घटनांचा परस्परसंबंध लावून अशीच उत्तरं शोधणारी यशू तुम्हाला आवडली ह्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, तरीही नकळत कोणाच्या भावना दुखावल्यास क्षमस्व.

कळावे, लोभ असावा.... Happy

शेवट फार थोडक्यात झाला... छान कथा...!!

कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगायचा यशस्वी प्रयत्न Happy
म्हणुनच मला तुझ्या कथा जास्त आवडतात Happy

खिळवुण ठेवनारि आहे.............

ह्म्म..... !!
कथेचा वेग जबरदस्त आहे..... आणि अगदी खिळवून टाकणारी लेखनशैली...... लगे रहो मंजू डी Happy

मंजू;
कथा परत एकदा वाचली. पहिल्यांदा मी काय कुणास ठाऊक; कथा नीट वाचली नव्हती किंवा मल नीट समजली नाही आणि मी आगाऊपणाची आणि मूर्खासारखी प्रतिक्रिया दिली. त्याबद्दल क्षमस्व! कथा खूपच सुंदर आहे.
श्री

मंजु,

आवडली म्हणण्यापेक्षा खरी वाटली,

तिलकश्री, माणसाच्या मनाला भरपूर कप्पे असतात. प्रक्टिकल भागाला तुमच म्हणण पटेलही पण जो अजुन एक थोडासा दुखरा असा भावनिक भाग आहे, त्याला यशुच वागण खोट नाही वाटणार. काल्पनिक असली तरी वस्तवातही अस होत असेलही.

खरंच ...आईपण गमवुन बसणं ह्या सारखं वाईट काहीच नाही एका स्त्रीच्या आयुष्यात. खुप छान लिहीली आहे कथा.

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************