हेऽऽ श्यामसुंदर राजसा...मनमोहना !

Submitted by चैतन्य दीक्षित on 7 February, 2015 - 09:04

'ती' एक गोपिका. संध्याकाळची यमुनाकाठी गेली असता दुरून बासरीचे स्वर तिच्या कानी पडले आणि तिला स्वत:चा विसर पडला. त्या सुरांच्या दिशेनं ती यमुनेपासून दूर घनदाट वनांत कशी गेली हे तिचं तिलाही समजलं नाही. तिथे तिला बासरी वाजवत असलेला कान्हा दिसला, त्याने तिचा हात धरला आणि तीही क्षणभर मोहात पडली. दुसर्‍या क्षणी मात्र तिला जाणवलं की ती एकटीच खूप दूरवर आली आहे. तिला कृष्णासोबत इतक्या दूरवर आलेलं कुणी पाहिलं तर???
एकीकडे हवाहवासा वाटणारा कृष्णाचा सहवास तर दुसरीकडे लोकलज्जा ! अशा वेळी स्वतःला नक्की काय पाहिजे हे ठरवता न येऊन तिला कृष्णाच्या जवळ असण्याचाच त्रास होऊ लागला. अंतःकरण पिळवटून निघालं. या सगळ्या भावना कृष्णाला तिच्याकडे नुसतं बघूनही उमगल्या आणि तो नेहमीसारखाच गूढ हसला. त्याच्या हसण्याने तिची हॄदयव्यथा अजून तीव्र झाली. आपल्याला कृष्ण हवा आहे, हे कृष्णालाही कळलंय याचाही तिला साश्चर्य राग आला ..अर्थात लटकाच. मग कृष्णाला खोटं पाडण्यासाठीच जणू ती असं भासवू लागली की तिला कृष्णाचा सहवास नको आहे आणि तरीही कृष्णानंच तिला थांबवून ठेवलंय. आणि आपल्याला हे असं भासवावं लागतंय याचाही काहीसा त्रागा करत ती म्हणाली ... "हे श्यामसुंदर राजसा...मनमोहना, विनवुनी सांगते तुज, जाऊ दे मला परतुनी |"
हे ऐकून कृष्ण अजूनच गूढ हसला. तिचा हात तो सोडणार नाहिये हेच त्या हास्याने सूचित केलं. ते उमगून आता ती एक एक कारणं सांगू पाहतेय. "गांव गोकुळ दूर राहे, दूर यमुना-नीर वाहे, हरवले मी कसे मज ? चालले कुठे घन वनी?" कारण "पावरीचा सूर भिडला, मजसि माझा विसर पडला, नकळता पाउले मम राहिली इथे थबकुनी".... हे मनमोहना, तुझ्या पावरीच्या सुरांमुळे मी इतक्या दूर घन वनांत आले. त्या सुरांनी मोहिनीच अशी घातली की मी स्वतःला अक्षरशः विसरले आणि माझी पावलं इथेच थबकली." नाही तर मी इतक्या लांब आलेच नसते असा त्यातला लपलेला अर्थ!
एवढंच कृष्णाला पटणार नाही हे ठाऊक असल्याने तिने अनिच्छेनेच पण मनाशी अगदी खोल असलेली भीती बोलून दाखवली. कृष्णही असा मनातलं सगळं बोलायला लावणारा ! ती म्हणते 'पानजाळी सळसळे का? भिवविती रे लाख शंका.' वार्यानंच पानं हालतायत पण मला मात्र अगदी लक्ष शंकांनी घाबरवून सोडलंय. त्या झुडुपाआड कुणी नसेल ना? मला इथे तुझ्याबरोबर एकांतात असलेलं कुणी पाहात तर नसेल ना? अशा त्या शंका.
त्या शंकांनी "थरथरे बावरे मन, संगती सखी न च कुणी"...हे माझंच बावरं मन आहे जे मलाच येत असलेल्या शकांनी थरथरतंय. माझ्याबरोबर माझी कुणी सखी असती तर त्या शंकांना वाव मिळाला नसता, पण मी तर एकटीच आहे इथे.म्हणूनच "हे श्यामसुंदर राजसा, मनमोहना, विनवुनी सांगते तुज, जाऊ दे मला परतुनी"!

किशोरीताईंनी गायलेल्या दोनच भावगीतांपैकी हे एक. जाईन विचारित रानफुला हे दुसरं भावगीत. दोन्ही भावगीतांची भावनेची जातकुळी पूर्णतः भिन्न. या गीताचे शब्द शांताबाईंना कसे सुचले असावेत? त्यामागे ह्या वर लिहिल्यात त्याच भावना असाव्यात का? हे माहिती नाही. पण गाणं ऐकताना ही केवळ एका गोपिकेची किंवा राधेची कृष्णाकडे केलेली विनवणी नसावी हेच सारखं वाटत राहतं. भावनांची असंख्य आंदोलनं ह्या तीन कडव्यांत एकवटली आहेत खास !
गाण्याच्या सांगीतिक बाजूकडे बघावं तर ते हिमालयासारखं वाटू लागतं. जितका हिमालय लांबून आकर्ष़क वाटतो तितकाच तो जवळ गेल्यावर अवघड आणि अवाढव्य ! एखादा थेट लागलेला स्वर ऐकू यावा, तो हवाहवासा वाटावा आणि त्याच क्षणी त्या थेटपणामुळे आपल्याला होणार्‍या अस्वस्थतेमुळे काहीसा नकोसा वाटावा, असं कधी कधी होतं हे गाणं ऐकताना. कोणतंही गाणं ऐकताना मला आधी शब्द, त्यांचे अर्थ, त्यातली चमत्कृती दिसते, सूर त्या मानाने नंतर मनाचा ठाव घेतात. हे गाणंही तसंच. यातले सूर पकडू जावं तर गाण्यातले राग ओळखायची केविलवाणी धडपड होते फक्त. गाण्याला निवडलेला रूपक तालही विशेष! चालता चालता प्रत्येक पावलावर जर रूपकाची एक एक मात्रा मोजली तर एकदा सम डाव्या पायावर येईल आणि पुढच्या वेळी ती उजव्या पायावर येईल. गाण्यातले राधेचे भावही काहीसे असेच. एकदा तिला तिथेच थांबावं असंही वाटतंय तर पुढच्याच क्षणी शंकांनी तिचं मन कातर होतंय. दोन कडव्यांच्या मध्ये येणारी बासरी प्रत्येक कडव्यागणिक भावार्त अवस्था अधिक तीव्रपणे दाखवणारी. प्रत्येक कडव्याचा तिसरा भाग (विनवुनी सांगते तुज, नकळता पाउले मम इ.) बहार रागात आहे (हे मला गुरु़जींनी सांगितल्याने मी छातीठोकपणे लिहितोय) बासरीवरही या बहार अंगाचं सा-म वाजतं. तो षड्जावरून येणारा मध्यम प्रत्येक वेळी मनाला अजून कातर करणारा आहे. तानपुरा, स्वरमंडल, तबला आणि कडव्यांच्या मध्ये बासरी इतका मोजकाच वाद्यमेळ असूनही इतकं प्रभावी गाणं होऊ शकतं हे आजच्या नुसत्या वाद्यांचाच भरणा असलेल्या गाण्यांच्या जमान्यात अविश्वसनीयच वाटेल.
या गाण्याची सगळ्यात उच्च बाजू कोणती असेल तर किशोरीताईंचा स्फटिकासारखा शुद्ध, पारदर्शक स्वर ! स्वर हे भाववाही असतात याचा साक्षात्कार या गाण्यात खचितच होतो. भाव निर्माण करण्यासाठी म्हणून मुद्दाम कुठे हरकत घेतली आहे, तानबाजी केली आहे असे नाही. संगीतकाराने तयार केलेली रचना सच्चेपणानं सादर केली गेली आहे इतकंच. ह्या स्वरांत राधेचं प्रेम आहे, मीरेचा भक्तिभाव आहे आणि किशोरीताईंचं स्वतःचं समर्पण!
हे गाणं केवळ गाणं उरतच नाही. ह्यात मनोरंजनमूल्यापेक्षाही अधिक असं शब्दांत सांगता न येण्याजोगं काहीतरी आहे. डोळे मिटून हे गाणं ऐकावं, त्यातलं तंत्र-शास्त्र सगळ्याच्याही पलिकडून कान्ह्याची बासरी ऐकू यावी आणि रोमारोमांत समर्पण भरून रहावं...ह्याहून अधिक काय लिहावे?

-चैतन्य दीक्षित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख समोर ठेवून एकीकडे प्रतिसाद टाईप करत राहिले.. वेळ मिळेल तसा. त्यामुळे आजचे प्रतिसाद न वाचताच माझा प्रतिसाद दिलाय.
बापू, तरीच म्हणत होत्ये की काय म्हणून ठसका लागतोय... Happy

चैतन्य, हे काय रे बाबा... प्रतिक्रियेची वाट वगैरे. तू असं काही लिहिलस की शब्दं सापडू नयेत असं तरी होतं किंवा इतकं भडाभडा बोलावसं वाटतं की... टायपायला नको वाटतं. कसं करायचं?

असंच लिहीत रहा...

ह्या गाण्यातल्या तालाबद्दल तर इतकं सांगण्यासारखं आहे... आमोरी सामोरी व्हायला हवं. Happy
जवळ जवळ सगळंच ऑफ़ बीट उचललय समेनंतर. पण संगीत योजना (चाल) अशी बांधलीये की आधीच्या ओळीचा शेवट पुढच्या आवर्तनाच्या समेवर तरंगल्यामुळे पुढल्या ओळीला समेनंतर (ऑफ़बीट) सुरुवात होतेय ... विलक्षण आहे हे... गंमत आहे.
रूपक सात मात्रा. शाम वर सम आहे (सम - पहिली मात्रा).
नीट ऐकुन बघा, शामसुंदर कुठे संपतय... ’र’ पुढल्या आवर्तनाच्या पहिल्या मात्रेला टेकतोय. त्यामुळे ’राजसा’ ऑफ़बीट,
पुढचं मनमोहना, विनवुनी.. ऑफ़बीट हे ठरवून असेल.
सांगते तुज.. ’सां’ पहिल्या मात्रेवर.. पण ’ज’ संपतो पुढच्या आवर्तनाच्या पहिल्या मात्रेवर. त्यामुळे ’जाउदे’ पुन्हा मात्रेनंतर ऑफ़बीट.

एकच ओळ एकदा ऑफ़बीट तर दुसर्‍यांदा समेवर
अख्ख्या गाण्यात अशा गंमती ऐकता येतील. Happy

कित्ती भारी प्रतिसाद दाद! अगदी समृध्द होतोय धागा आणि हे वाचणारे आम्हीही. तुम्ही तालाची गंमत देखील उलगडुन दाखवली याबद्दल खुप खुप धन्यवाद! "एकच ओळ एकदा ऑफ़बीट तर दुसर्‍यांदा समेवर" हे त्यावेळची चलबिचल अवस्था दाखवण्यासाठी केलं असेल का?
खुप चांगला मुद्द मांडला तुम्ही इथे. गाताना व्यक्त्तीत्व सोडुन गाता येईल का? मुळात व्यक्तीत्व सोडुन गायचं की गाण्याचं व्यक्तीत्व घेऊन गायचं? आणि ते तसं गायिलं जरी असेल तरी ते आपल्याला समजणार तरी कसं? आणि ते तसं करण हेच त्यातलं अंतिम ध्येय का? गहन प्रश्न आहेत. किशोरीताईंच्या शास्त्रीय गायनात मात्र ताई नेहमीच रागाचं व्यक्तीत्व धारण करतात. स्वतः माध्यम होतात. कशाहीपेक्षा रागाचा त्यावेळचा कार्यकारणभाव जो म्हणजे , त्यावेळचा (ताईंच्याच भाषेत) भावरस प्रतियमान करणे किंवा त्या भावाचं अखंड व्यापक असं विश्वरुप दाखवणे हे ताई करतात असं म्हणण्यापेक्षा ते ताईंकडुन होतं हे म्हणणं योग्य ठरावं अशा तन्मयतेने आणि सहजतेने ते होतं!
मी ही हे गाणं ऐकल्यावर असं कल्पायचा प्रयत्न केला की हे दुसर्‍या कुठल्याही गायिकेने कसं म्हटलं असतं? पण ह्या गाण्यातली गोपिका ताईंनी इतकी उत्स्फुर्त केलीय की तिला दुसरा आवाज देणं जमलंच नाहे. मुळातच ताईंचं संगीत इतकं संहत आहे की त्यांच व्यक्तीत्व आणि त्यांचं संगीत अशा दोन गोष्टी नाहीतच. एकाच नाण्याच्या दोन बाजु ही उपमा देखील इथे व्यर्थ होईल कारण नाण्यांच्या दोन बाजुंच्या मध्ये एक बारीक का होईना भिंत असतेच. ताईंचं संगीत हेच व्यक्तीत्व आहे!

कित्ती भारी प्रतिसाद दाद! अगदी समृध्द होतोय धागा आणि हे वाचणारे आम्हीही. तुम्ही तालाची गंमत देखील उलगडुन दाखवली याबद्दल खुप खुप धन्यवाद!>>>+११११११११
दाद, तुमचा प्रतिसाद ही एक पावतीच आहे आमच्यासाठी.तुमच्याकडून लेखाची नुसती स्तुती होत नाही तर शिकण्याजोगं, विचार करण्याजोगं खूप काही मिळतं.

तुम्ही मांडलेला मुद्दाही असाच विचार करण्याजोगा आहे.
अर्थात्, गाण्यातून वाजवण्यातून स्वतःला पूर्णपणे वगळून काही करता येत नाही. उलट स्वत:ला झोकून देणं होतं आणि अनाहूतपणे च त्या त्या कलाकाराचं व्यक्तित्व त्या कलाकृतीत उतरत असतं. म्हणून तर कालाचं महत्त्व असावं आपल्या संगीतात.
संगीत हां ईश्वराजवळ पोहोचण्याचा सगळ्यांत जवालाचा मार्ग म्हणतात त्यामागेही हे 'झोकून देणे' हेच कारण असावे.
धन्यवाद नाही म्हणणार तुम्हाला...☺

परत परत वाचतोय हे सर्व.... हे असे तुम्ही छान लिहित रहा... आम्ही वाचत राहू.. आणि परत परत ते गाणे ऐकताना, आठवण काढू.

एखाद्या गायिकेच्याच तोंडी एखादे गाणे शोभावे... असे मला काही गाण्यांच्या बाबतीत कृष्णा कल्ले या गायिकेबाबत वाटते.

कृष्णाचीच म्हणाल तर.. १) मीरेचे कंकण, भक्तीचे दर्पण, स्मरे ते रंगून, हरीनाम

२) कशी मी आता जाऊ, जाऊ, जाऊ घरी, सांग मला श्रीहरी.... ही दोन गाणी ऐकून पहा.

आणि मग, " परिकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का ? " आज ४० / ५० च्या पुढे वय असलेल्या प्रत्येक मुलीला हे गाणे, त्या काळात घेऊन जाईल.

<<मुळात व्यक्तीत्व सोडुन गायचं की गाण्याचं व्यक्तीत्व घेऊन गायचं? आणि ते तसं गायिलं जरी असेल तरी ते आपल्याला समजणार तरी कसं? >>
गाण्याचं व्यक्तित्वं घेऊन. शास्त्रीय संगीतात रागाचं जे रूप गयकाला गाण्याच्यावेळी दिसतं... ते रूप तो साकार करायचा प्रयत्नं करतो. त्यामुळे एकाच रागाची वेगवेगळी रुपं एकाच गायकाकडून वेगवेगळ्यावेळी ऐकायला मिळतात.
पण भावगीतं, उपशास्त्रीय वगैरेचं तसं नाही. त्यातल्या शब्दांशी प्रामाणिकपणा आणि म्हणूनच गाण्याच्या भावाशी प्रतारणा होणार नाही असं गाणं हे’च’ महत्वाचं आहे.

<<ते तसं गायिलं जरी असेल तरी ते आपल्याला समजणार तरी कसं? >> कबूल. नाही कळणार कदाचित एकाच गाण्यात.
पण जेव्हा सगळ्याच प्रकारची (भाव समृद्धं) गाणी एकच कलाकार स्वत्वं सांडून गाऊ शकतो तेव्हा माझ्या दृष्टीने तो अधिक पक्वं कलाकार असतो (पुन्हा हे शास्त्रीय ला किती लागू पडेल तो एक वेगळा चर्चेचा विषय)
उदा. देऊन विचार करूया. ’खिलौना जानकर तुम तो मेरा दिल छोड जाते हो’. ह्यात ’बुद्धिमान नायक’ दिसून चालणं शक्यंच नाही... असं माझं मत.
किशोरदांनी ही किमया केलीये... अनेकदा.
’गाण्यात बुद्धिमत्ता’ पेक्षा ’गाणं गाण्यातली बुद्धिमत्ता’ हे अधिक योग्यं आहे.

पुन्हा एकदा सांगते. किशोरीताई आणि त्यांचं हे गाणं हे एक उदाहरण आहे. आणि ते उदाहरण घेऊन त्या एका संदर्भातच बोलते आहे. ह्या बद्दल बोलताना/वाचताना आपण चर्चेतून एक दृष्टीकोन बघतो आहोत. किशोरीताईंसारख्या विदुषीचा अपमान ही माझ्या स्वप्नातलीही शक्यं गोष्टं नाही.
ह्या चर्चेतून मलाही शिकण्यासारखंच आहे.

’गाण्यात बुद्धिमत्ता’ पेक्षा ’गाणं गाण्यातली बुद्धिमत्ता’ हे अधिक योग्यं आहे.>>>> अगदी अगदी खरं बोललात दाद!
किशोरीताईंसारख्या विदुषीचा अपमान ही माझ्या स्वप्नातलीही शक्यं गोष्टं नाही.>>> हा विषय बोलुन तुम्ही कुणाचाही अपमान करत नाही आहात दाद. ही फक्त एक चर्चा आहे ज्यातुन प्रत्येकालाच काही ना काही तरी गवसणार आहे. त्यामुळे तुम्ही आजिबात ते अपमान वगैरे किल्मिष मनात ठेऊ नका. Happy

आणखी एक गोष्ट असते ती म्हणजे माझ्यासारख्या श्रोत्यांचा श्रवणदोष! म्हणजे आता मला किशोरीताई आवडतात , त्यामुळे त्यांनी किती जरी स्वत्व सोडुन गायिल असेल तरी मला त्यात ताईंच व्यक्तीत्व दिसणारच! हे मनाच्या हळवेपणाचे खेळ आहेत नक्कीच पण त्याचा श्रवणावर परीणाम होतोच. Happy

पण भावगीतं, उपशास्त्रीय वगैरेचं तसं नाही. त्यातल्या शब्दांशी प्रामाणिकपणा आणि म्हणूनच गाण्याच्या भावाशी प्रतारणा होणार नाही असं गाणं हे’च’ महत्वाचं आहे. >>> +१

ह्या गाण्याची चाल अप्रतीम बांधली आहे हृदयनाथांनी आणि किशोरी ताईंनी अफाट गायलय गाणं. पण....

'विनवूनी सांगते तुज' यात विनवाणी न जाणवता उलटे आव्हानच जाणवते - 'मला नाही जाऊ दिलस तर बघ' असं. गोपिकांची भक्ती इतकी उच्च स्तरावरची होती की त्या श्यामसुंदराला आव्हान देऊ शकत होत्या हे पण माहिती आहे. पण गाण्याचे शब्द बघता इथे विनवणीच पाहिजे असेच वाटते. अर्थात हे मा.वै.म. आहे,

संगितकाराचा अथवा गायिकेचा अवमर्द करायची माझी पात्रता नाही.

व्वा, काय मस्त चर्चा चालू आहे!
दाद, 'लताबाईंची काही "छप्परतोड" गाणी मला आशाबाईंनी किती शेमले-फ़ेटे गायली असती असं वारंवार वाटतं. लिहिण्याच्या फ़ंदात ’व्यक्तित्वं सांडून गाणं’ लिहून गेले खरं... पण असं खरच शक्यं आहे का? सर्वस्वी गाण्यातल्या भावाचं होऊन गाणं?'>>> ह्या वाक्यासाठी ५ गावे इनाम!
'मुझे भूल जाओ तो कोई गम न होगा की सब गम के मारे मुझे जानते है' हा दु:खातून प्रकटलेला आत्मविश्वास गायिकेच्या व्यक्तित्वापासून अलग करणे फार अवघड होऊन बसते. आणि मग वाटते की हे असेच आहे की माझाच कन्फर्मेशन बायस?!

लेख खूप सुरेख आहे! हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. पण मला हे भावगीत कमी आणि शास्त्रीय गाणं जास्ती असं वाटतं!

पण भावगीतं, उपशास्त्रीय वगैरेचं तसं नाही. त्यातल्या शब्दांशी प्रामाणिकपणा आणि म्हणूनच गाण्याच्या भावाशी प्रतारणा होणार नाही असं गाणं हे’च’ महत्वाचं आहे. >>> +१
हे असं मला "मी राधिका मी प्रेमिका" ऐकताना वाटतं नेहमी! मी आरती ताईंना मैफिलीत प्रत्यक्ष ऐकलं आहे आणि मी त्यांची मोठी fan आहे पण ह्या भावगीतात आरती ताईंचा आवाज आजिबात सूट होत नाही असं वाटतं.

आगावा, <<'मुझे भूल जाओ तो कोई गम न होगा की सब गम के मारे मुझे जानते है' हा दु:खातून प्रकटलेला आत्मविश्वास गायिकेच्या व्यक्तित्वापासून अलग करणे फार अवघड होऊन बसते. आणि मग वाटते की हे असेच आहे की माझाच कन्फर्मेशन बायस?!>>
म्हंजे काय?

मला नेमकं उलटं म्हणायचय. वैयक्तिक आयुष्यंआकाहीही असो... गाण्याचं गाण्यातलं होऊन गाणं जगणं... हे'च' गाणार्^याचं उद्दिष्टं नको का?
नाहीतर कुमारांनी म्हटलेल्या कोणत्याही गाण्यातून फक्तं करुणेची एकतारी ऐकणार?... अनफेअर.

गाण्याचं सोडा.. कोणत्याही कलेचं प्रकटीकरण हे वैयक्तिक आयुष्याचं प्रतिबिंब असून कसं चालेल? (मलाच असं वाटतय का काय?)

>>गाण्याचं सोडा.. कोणत्याही कलेचं प्रकटीकरण हे वैयक्तिक आयुष्याचं प्रतिबिंब असून कसं चालेल? (मलाच असं वाटतय का काय?)

खरेतर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण जर वैयक्तिक आयुष्याच्या जवळ जाणारी कला सादर होत असेल तर ती अन्य कलाकृतींपेक्षा जास्त भावोत्कट असणार नाही का ? नक्कीच असेल असे मला वाटते.
उदा. जर गायकाला किंवा अभिनेत्याला स्वतःचे काही दु:ख असेल आणि नेमके त्याच वेळेस तशाच प्रकारची कला सादर करण्याची वेळ आली तर.

अर्थात हे माझे वैयक्तिक मत, बरोबर असेलच असे नाही. तुम्ही लोक जास्त जाणकार आहात. _/\_

>>किशोरीताईंना शक्यं " ह्यावर इथे गदारोळ उठण्याची शक्यता आहे. मी किशोरीताईंची, त्यांच्या गाण्याची चाहती आहे... तरीही ही चर्चा करण्याजोगी बाब आहे.

Happy
मुळात शक्याशक्यतेच्या पल्याड गेलेलीच माणसं ही. त्यांचा गायन किंवा प्रकटीकरण हा खरे तर अनुभवण्याचाच विषय..! निव्वळ काठावर बसून पाहिलेले डोहावरचे तरंग जितके आकर्षक तितकाच डोहाचा तळ.... अशी काहिशी अवस्था होते आपली. तादात्म्य आणि तदरूप!

ताईंचं कुठलही गाणं ऐका, त्यांच्या अभिव्यक्तीचे संस्कार घेऊनच बाहेर आलेलं असतं हे जाणवतं.

असो.

>>कोणत्याही कलेचं प्रकटीकरण हे वैयक्तिक आयुष्याचं प्रतिबिंब असून कसं चालेल?>>> प्रत्येकवेळा ते तसेच असेल असे नाहीच, पण काहीक्षणी त्या प्रकटीकरणात ते प्रतिबिंब पडले आहे की काय अशी शंका आपल्या मनात येते. आणि अशी शंका ते खरेच तसे असते म्हणून येते की ते तसे असावे/असले पाहिजे अशी आपलीच काहीशी रोमँटीक कल्पना असते म्हणून येते (हाच तो कन्फर्मेशन बायस- आय सी व्हॉट आय वाँट टू सी!)

<<वैयक्तिक आयुष्यंआकाहीही असो... गाण्याचं गाण्यातलं होऊन गाणं जगणं... हे'च' गाणार्^याचं उद्दिष्टं नको का?>> हे ही मान्य आणि ९९%वेळा हे असेच असणार पण जसे अभिनयाच्या क्षेत्रात मेथड अ‍ॅक्टींग आहे किंवा एखादे एक्सप्रेशन देण्यासाठी कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यातून रेफरेन्स घेतात तसे गायनाच्या, विशेषतः भावगायनाच्या बाबतीतही शक्य आहे.

आशा भोसलेच असे म्हणाली होती, कि दू:खात पिळवटून निघाल्याशिवाय चांगली कलाकृती निर्माण होत नाही..
ती बहुतेक " अब के बरस भेज भैया को बाबूल " किंवा " चैनसे हमको कभी.." बद्दल बोलत होती.

पण एरवीही ती गाण्यात स्वतःला झोकून देते, याबाबत दुमत नसावे.

लता, स्वतःच्या गाण्याबद्दल बोलताना श्वासाचे तंत्र, सूरांचे नेमकेपण, तालावर येणार्‍या अक्षरावर किंचीत आघात, पडद्यावरच्या नायिकेचा विचार असे बोलते. ती क्वचितच गाण्यातील भावाविषयी बोलते.

>>आशा भोसलेच असे म्हणाली होती, कि दू:खात पिळवटून निघाल्याशिवाय चांगली कलाकृती निर्माण होत नाही..
ती बहुतेक " अब के बरस भेज भैया को बाबूल " किंवा " चैनसे हमको कभी.." बद्दल बोलत होती.

अगदी अगदी, मीनाकुमारीच्या अभिनयाबद्दल पण असे म्हणता येईल का दिनेशदा ?

अतिशय सुंदर लिहिलंय !!

त्यातलं तंत्र-शास्त्र सगळ्याच्याही पलिकडून कान्ह्याची बासरी ऐकू यावी आणि रोमारोमांत समर्पण भरून रहावं...ह्याहून अधिक काय लिहावे>>> अगदी पटतं !

खूपच मस्त चर्चा !
फार सूक्ष्म मुद्दे आहेत, त्यामुळे त्यावर विचार चालू आहे.
सगळ्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच पडतील.

स्पष्टं आणि सरळ प्रश्नं - हे गाणं गाण्यातल्या गोपिकेचं वाटतं की किशोरीताईंचं?
आणि मला हे गाणं किशोरीताईंचं वाटतं.
तसच गाण्यातल्या गोपिकेच्या व्यक्तीमत्वाशी किशोरीताईंनी ह्या गाण्यात दाखवलेले व्यक्तिमत्वं जुळत नाहीये असं माझं मत.
हे व्हायला नको असंही माझं मत.
ही चर्चा इथे थांबवूया (असंही माझं मत)

पं. हृयनाथांसारखा संगीतकार जेव्हा किशोरीताईंना गाणे देतो तेव्हा बर्‍यापैकी विचार करून देत असावा, असं माझं मत. Happy

लोकहो,

काय सुंदर चर्चा आहे! कशी निसटली माझ्या नजरेतून बरं! मला संगीतातलं फारसं कळंत नाही. पण दाद यांचं एक विधान रोचक वाटलं, त्यावर टिपणी करायचा मोह आवरत नाहीये :

>> तिचं हे करणं ’बुद्ध्याच’ नाही वाटत.. किंबहुना आपण गाव-पाणवठा सोडून इथे कसल्या भुलीनं आलोय
>> ह्यानं ती संभ्रमित आहे. आणि बुद्धी गहाण ठेवल्याविना असं वागणं शक्यं झालं नसतं.

या विधानाला अर्थातंच भारतीताईंनी बांधलेल्या गोपिका प्रखर बुद्धीमती असल्याच्या तथ्याचा संदर्भ आहे. एक गोष्ट इथे स्पष्ट व्हायला हवी की आपण व्यवहारात बुद्धी हा शब्द वापरतो तो मनाच्या ग्रहणशक्ती आणि चिकित्साक्षमता यांना उद्देशून. मात्र 'बुद्धी'चा पारंपारिक अर्थ जरासा वेगळा आहे.

बोध करून देते ती बुद्धी असं म्हंटलं जातं. मनास बोध झालाय की नाही हे कसं ओळखायचं? तर बोधातून निश्चय उत्पन्न होतो आणि माणूस त्यानुसार वागायला लागतो. म्हणून बुद्धीला निश्चयात्मिका म्हंटलं आहे. दाद यांनी बुद्ध्याच असा शब्द वापरला आहे तो निश्चयात्मक या अर्थाने.

याउलट भारतीताईंनी बुद्धीमती हा शब्द गोपिकेच्या ग्रहणशक्तीला उद्देशून वापरला आहे. खरंतर ग्रहणचिकित्सादि क्षमता बाळगणे हे मनाच्या मेधाशक्तीचं लक्षण आहे. त्यामुळे भारतीताईंच्या विधानात किंचित बदल करून गोपिकेला मेधावी म्हणावंसं वाटतं. Happy तसंच प्रखर हे विशेषण पारंपारिक अर्थाने बुद्धीपेक्षा मेधेला अधिक शोभून दिसतं. (बुद्धीला ठाम, दृढ ही शोभून दिसावीत. वै.म.)

तर प्रखर मेधावी गोपिकेला यमुनावनी काय चाललंय ते कळतंय पण वळत नाहीये. तिची निश्चयात्मिका बुद्धी श्रीकृष्णाच्या अस्तित्वाने निष्प्रभ होऊन गेलीये. ती त्याला आव्हान देऊ इच्छिते (या पैलूसाठी माधव यांना धन्यवाद!). पण त्याने आपले आव्हान स्वीकारून आपला पराभव करावा, अशी आंतरिक इच्छाही बाळगून असते. हे द्वंद्व किशोरीबाईंनी मोठ्या खुबीने खुलवलंय (असं मला वाटतं, हे सारे अभिप्राय वाचून).

बाकी, गाण्याविषयी म्हणाल तर इतर कोणाचंही ऐकवत नाही. का ते माहीत नाही!

आ.न.,
-गा.पै.

हा लेख कसा काय दृष्टीतून सुटला कोण जाणे.
लेख तर उत्तमच आहे, पण प्रतिसादही एकापेक्षा एक आहेत. किशोरीताई आणि शांताबाई बद्दल बोलायलाच नको.
हृदयनाथांची उंचसखल आणि वेडीवाकडी वळणे घेणारी चाल मात्र खटकली हेमावेम.

कुलदीप धन्यवाद हा लेख वर काढलास त्याबद्दल. मलाही सगळी चर्चा पुन्हा वाचून मस्त वाटलं.

वा! खूप सुंदर लेख आणि कुलु, दाद , गापै - उत्तम चर्चा.

चालता चालता प्रत्येक पावलावर जर रूपकाची एक एक मात्रा मोजली तर एकदा सम डाव्या पायावर येईल आणि पुढच्या वेळी ती उजव्या पायावर येईल. गाण्यातले राधेचे भावही काहीसे असेच. एकदा तिला तिथेच थांबावं असंही वाटतंय तर पुढच्याच क्षणी शंकांनी तिचं मन कातर होतंय. >> क्या बात है! कल्पना आवडली.

दाद यांनी सांगितलेल्या सम आणि ऑफबीट्स च्या मुद्द्याला +१. हे आख्खं गाणंच ऑफबिट आहे, पण तरी वाक्याचा शेवट ओढून समेपर्यंत ताणण्यात जी मजा केली आहे, ती सुखद आहे.

सुरुवातीच्या 'हे' वर जी जागा आहे - (सा)म-(म)ध-(ध)नी - त्या तीन पायर्‍यांत आर्तता वाढत वाढत गेल्याचा अनुभव येतो.

विनवुनी सांगते तुज - इथे तुम्ही म्हणता तसा ठळक बहार राग आहे. पण शामसुंदर राजसा मध्ये कुठला आहे हे नीट माहित नाही. (सुंदर मधल्या द वर) वरचा कोमल रे लागतो आणि मग पुढे थोडा 'सां नी ध् प, मा (तीव्र म) ग' - हा बसंत असल्यासारखा भासतो, पण तो तसा नाही. मध्य सप्तकात कोमल न वापरता शुद्ध रे वापरला आहे ( ऐका - मनमोहना चे स्वर). मला कुणीतरी तो परज राग आहे म्हणून सांगितलं. खखोदेजा. कुणी माहित असल्यास सांगा.

हरचंद पालव,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
हे~ वरच्या जागेबद्दल, ती आर्तता टप्प्या टप्प्याने वाढत जाते हे अगदी अगदी.
मी माझ्या गुरुजींना विचारले, त्यांनी हा परज पण नाही असे सांगितले. पूरिया, बसंत, बहार आणि शुद्ध रिषभामुळे अगदी किंचित कल्याण अंग, अशी रागांगे यात आली आहेत असे ते म्हणाले. विपु करतो एक तुम्हाला. चेक करा.

रूपक सात मात्रांचा. त्या मध्ये गाणे बसवणे आणि म्हणणे( गाणे) वाजवणे कठीण.
ताईंना रूपक, दीपचंदी आवडायचे असे ऐकले आहे.

Pages