एक विचार

Submitted by Avanee73 on 7 February, 2015 - 05:08

आज दुपारी जेवणाच्या वेळी घरीच होते. मुलींच ताट मीच वाढून दिल. डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी; उजवीकडे एक भाजी, वाटीत आमटी, ताक, पोळ्या आणि मग गरम गरम वरण-भात दोघी अगदी मनापासून जेवल्या. आमच्याकड़े कामाला येणा-या बाई सगळ बघत होत्या. मला म्हणाल्या,"वाहिनी, अस रोज वाढून द्या. बघा मुलींची तब्बेत कशी महिन्याभरात सुधारेल." मी हसले; म्हणाले,"अहो, कस शक्य आहे? मग माझी बाहेरची कामं, जवाबदा-या कोण पूर्ण करणार?" मी आणि बाई दोघी हसलो आणि विषय तिथेच संपला.

मात्र विषय संपला अस मला वाटल तरी विचार मनात घोळत राहिले. आता तो काळ मागे पडला.. जेव्हा; स्त्री केवळ घरातल्या अर्थकारणाला हातभार लावण्यासाठी शिक्षण घेऊन नोकरी करायची. आज आपण आपल्या मुलांना कोणताही भेदभाव न करता शिक्षण देतो... निदान दिल पाहिजे; हां विचार मान्य करतो. आज कमी शिकालेले आई-वडिल ही आपल्या मुलीने चांगले शिक्षण घ्यावे आणि तिच्या आयुष्यात चांगली प्रगति करावी ही इच्छा मनात ठेवतात. आणि त्या दृष्टीने कायम प्रयत्न करतात. 10वि 12वि च्या रिजल्ट्स नंतर वर्तमान पत्रातून आपन जे वाचतो ते फ़क्त ट्रेलर असत. अशी अनेक मूल आणि त्यांचे पालक स्वमेहतीने पुढे येतातच की.

आजचे आई-वडील आपल्या मुलाला देखिल संसार, स्वयंपाक आणि घराच्या जवाबदा-यांची जाणिव देतात. आज नविन लग्न झालेले मुलगा-मुलगी एकमेकांच वैयक्तिक स्वातंत्र्य जाणतात. मुल जन्माला घालण्याची त्यांना घाई नसते. कारण त्यांना आपल्या एकुलत्या एका बाळाला सर्व प्रकारची सुख द्यायची असतात. त्याच बरोबर स्वतःच स्वातंत्र्य... 'स्पेस'.... जपायची असते.

पण मग यासर्वात आपण कुठेतरी कुटुंब व्य्वस्था आणि पुढील पिढीवरील संस्कार या भारताच्या कण्याला धक्का देतो आहोत का?

आज मनात येणारे काही प्रश्न फ़क्त तुमच्या समोर मांडते आहे. पूर्वी शाळेच्या वर्गातील मुलांमधे केवळ 1 किंवा 2 टक्के मुलांना चश्मा असायचा. कदाचित त्यामुळेच चश्मा असलेल्या मुलांना 'बॅटरी' म्हणून इतर मूलं चिडवायची. आज मात्र एका वर्गातील किमान 8/10 मुलांच्या डोळ्यावर सर्रास चश्मा दिसतो... काय असाव याच कारण? आज मुलांना घरातील भाजी-पोळी, वरण-भात, आमटी-ताक, चटणी-कोशिंबीर अस जेवण मुळात माहीत आहे का? असेलच तर आवडत का? वयाच्या 12-13व्या वर्षीच ब्यूटी पार्लरची पायरी मुली चढायला लागल्या आहेत...का?

मला आजही आठवत; माझ्या आईला खूप लहानपणी कगश्मा लागला होता. आणि भावाला देखिल केवळ मुळचे डोळेच कमजोर असल्यामुळे चश्मा लागला होता. तरीही माझ्या आईने अनेक प्रयत्न केले होते त्याचा चश्मा जावा म्हणून. रोज सकाळच्या शाळेला जायला आम्ही 6.30 ला निघायचो. त्यागोदार उठून रात्रि भिजत घातलेले बदाम ती सहाणेवर उगाळून आमच्या दुधात घालायची. इडली, डोसा, थालीपीठ, परोठे हे पदार्थ घरीच बनायचे. दर रविवारी उगाळलेल हलकुंड आणि तेल लावून मगच अंघोळ करण्याचा नियम होता.

म्हणजे दोन पिढ़या मागे गेल तर एक लक्षात येत की त्या काळात घरातील पुरुष 'कमावता' होता आणि स्त्री 'कुटुंब वत्सला' होती. पुरुष जे आणि जितके कमवून आणायचा त्यातच घर चालत असे. 'वाघळे की दुनिया' मधील मिस्टर वाघळे म्हणा किंवा आर. के. लक्षुमण यांचा 'कॉमन मॅन' म्हणा. परवडत नाही म्हणून एकाच ताग्यातुन घरातील पड़दयांपासून ते कपड्यां पर्यंत सर्व शिवणे ही जरी सीरियल मधिल अतिशयोक्ति वाटत असली; तरी निदान मुलांचे कपडे एकाच ताग्यातिल असणे त्या काळात ख़रच 'कॉमन' होते. आदल्या दिवशी उरलेल्या पोळ्यांचे लाडू दुस-या दिवशी डब्यात हमखास असत. 'आज मी जेवणात फोडणीचा भात किंवा गुळ आणि भाकरी खाल्ली'; हे सांगताना कोणी ओशाळत नसे. आणि असे शिळे पदार्थ खाणारी पिढी जास्त मजबूत हाड़ा-पेराची होती हेदेखिल तेवढेच खरे.

त्या काळात संपूर्ण सोसायटीमधे एखाद्याच घरी फोन किंवा फ्रिज असायचा. ज्या एकाच घरात टी. व्ही. असायचा त्या घरात संपूर्ण सोसायटीने मिळून शनिवार-रविवारचा सिनेमा बघणे हा ठरलेला कार्यक्रम.

त्यानंतरच्या पिढीच्या मात्र थोड्या अपेक्षा वाढल्या. एका ताग्यातले कपडे घालायला मूलं नकार देऊ लागली. प्रत्येक घरात एक टू व्हीलर, फोन, फ्रिज, टी.व्ही. दिसू लागले. वाढणा-या अपेक्षांमुळे घरच्या स्त्रीला देखिल कमावण्यासाठी बाहेर पडण्याची गरज वाटू लागली. त्यासाठी बि. ए., बि. कॉम. किंवा मग बि. एड. असे शिक्षण घेऊन बैंक किंवा सरकारी कारकुनि किंवा शिक्षिका अशी नोकरी करायला स्त्री बाहेर पडु लागली. पण तिचे विश्व तरीही ऑफिस आणि घर इतकेच मर्यादित होते. ऑफिसमधुन निघताना आज संध्याकाळी काय नाश्ता द्यावा सर्वाना हां विचार तिच्या मनात घोळत असे आणि रात्रि झोपताना सकाळची भाजी चिरून, कणिक मळल्याशिवाय तिला झोप येत नसे.

लंच अवर्स मधे गप्पांचे विषयदेखिल ठरलेले असत. 'अग माझ्या अभयला चश्मा लागला ग.' 'अरे फ़क्त पहिलित ना ग तो? आत्ताच? त्याला गाईच तूप घाल खायला.' नाहीतर...'माझी मंजू बाहेर बसायला लागली बर का.' 'मग डिंकाचे आणि मेथीचे लाडू तुला आणून देते उद्याच्. मी केले आहेत माझ्या शोभासाठी.'

आता मात्र बदलत्या काळाचे विचार बदलले आहेत; अपेक्षा बदलल्या आहेत. आज जिजामाता उद्यान, जुहू, चौपाटी, हैंगिंग गार्डन असे जवळचे ऑप्शन्ससुद्धा आपण विचारात घेत नाही. कधीतरी एखाद वेळेस दाखवले की आपले कर्तव्य संपले असे आपल्याला वाटते. मग तर किल्ले, लेंणी दाखवणे तर दूरच. आज 15 दिवसातून एकदा बाहेर जाऊन जेवायचे आणि कंटाळा आला की घरी हॉटेल मधिल काहीतरी मागवायचे हे खूपच कॉमन झाले आहे.

आजच्या 'कॉमन मॅन'ची परिभाषा जशी बदलत चालली आहे; तशी कुटुंब संस्थेची देखिल बदलायला लागली आहे.

आणि आज मला फ़क्त एकच प्रश्न भेडसावतो आहे; या नविन युगात जन्मणा-या नविन पिढीला आपण 'सर्व दृष्टीने सुदृढ़ भविष्य' देतो आहोत का? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनातच द्याव... कारण जर कुटुंब सुखी आणि सुदृढ़... तर समाज सुखी आणि सुदृढ़... आणि जर समाज सुखी आणि सुदृढ़.... तरच प्रगत आणि यशस्वी देश! हे आपण सर्वच जाणतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users