पाठ फिरता बोलती तो पोर आहे ...

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 February, 2015 - 11:24

********************************
लागला माझ्या जिवाला घोर आहे
भेटतो जो जो इथे तो चोर आहे

रंगला ना सावळ्याचा रास येथे
कंस इथल्या गोकुळी शिरजोर आहे

विठ्ठला सोडा कटीचे हात आता
का ’बळी’च्या गर्दनी तो दोर आहे

सांगतो रस्ता मला थांबू नको तू
अडथळ्यांचा मात्र थोडा जोर आहे

भेटल्यावर सूज्ञ ते म्हणती मलाही
पाठ फिरता बोलती तो पोर आहे

बोल खोटे लावता कां सावल्यांना?
दाटला अंधार हा घनघोर आहे

हो विशाला आज थोडा बोलका तू
सोड आता मौन..., ते कमजोर आहे !

********************************

विशाल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोड आता मौन..., ते कमजोर आहे !<<< मस्त ओ़ळ! 'मक्ता'च करण्याची आवश्यकता नव्हती तशी म्हणा!

सांगतो रस्ता मला थांबू नको तू
अडथळ्यांचा मात्र थोडा जोर आहे<<<

मी दुसरी ओळ 'अडथळ्यांना मग कुणाचा जोर आहे' अशी केली असती. पण एकेकाची तबीयत! कृ गै न! खयाल आवडलाच.

भेटल्यावर सुज्ञ ते म्हणती मलाही<<< सूज्ञ!
पाठ फिरता बोलती तो पोर आहे

बोल का हो लावता त्या सावल्यांना?
दाटला अंधार हा घनघोर आहे<<< खयाल मस्त, पण 'हो' भरीचा! पहिली ओळ कृपया फेरविचारात घ्यावीत अशी एक मित्र म्हणून निव्वळ मागणी म्हणा! Happy

उद्धृत केलेल्या शेरांंमधील खयाल आवडले.

हो विशाला आज थोडा बोलका तू
सोड आता मौन..., ते कमजोर आहे !<<हा शेर सर्वात छान झालाय

बाकी शेर जरा काफियानुसारी जाणवत राहिले

विठ्ठ्लाच्या शेरातली नावाची ओळ मस्त उतरली आवडली

धन्यवाद
(चला आता बेफीजींचा प्रतिसाद वाचावा म्हणतो Happy )

विशाल,

खयाल आवडले. गझलेत एक प्रकारचा प्रवास जाणवतो. म्हणून की काय ही एकदम बेफि शैलीतली वाटते. (हे बरोबर बोललो का! :-))

आ.न.,
-गा.पै.

गझलेत एक प्रकारचा प्रवास जाणवतो.<< तुम्ही नेहमी म्हणता गामाजी पण ही बाब मला आजवर कधीच समजली नाही
एकप्रकारचा प्रवास म्हणजे काय म्हणायचे आहे आपल्याला सांगाल का

अवांतर : हे बरोबर बोललो का!<< क्षमस्व !! मलातरी तसे जाणवले नाही काही

वैवकु,

मला जाणवलेला अर्थप्रवाह सांगतो.

१.
लागला माझ्या जिवाला घोर आहे
भेटतो जो जो इथे तो चोर आहे

अर्थ उघड आहे.

२.
रंगला ना सावळ्याचा रास येथे
कंस इथल्या गोकुळी शिरजोर आहे

राज्यकर्ता जर दुष्ट असेल तर प्रजा सदैव शंकित असते.

३.
विठ्ठला सोडा कटीचे हात आता
का ’बळी’च्या गर्दनी तो दोर आहे

कंसाच्या जाचातून सोडवण्यासाठी विठ्ठलरूपी कृष्णाला केलेलं आवाहन.

४.
सांगतो रस्ता मला थांबू नको तू
अडथळ्यांचा मात्र थोडा जोर आहे

विठ्ठल सांगतो की यत्न तोच देव जाणावा. म्हणून कवीने स्वत:च रस्ता धुंडाळून वाटचाल सुरू केली.

५.
भेटल्यावर सूज्ञ ते म्हणती मलाही
पाठ फिरता बोलती तो पोर आहे

स्वत:च्या हिम्मतीवर मार्गक्रमण सुरू केलं की असा सार्वत्रिक सार्वकालिक अनुभव प्रत्येकाला येतोच.

६.
बोल खोटे लावता कां सावल्यांना?
दाटला अंधार हा घनघोर आहे

रस्त्याशी (= परिस्थितीशी) झुंजता झुंजता प्रौढत्व आले. तेव्हा कळलं की सावल्यांचा अंधार पडतोय. कारण की सावल्या लांब (= हितशत्रू जोमात) आहेत. लांब सावल्या म्हणजेच दिवस संपत आला.

७.
हो विशाला आज थोडा बोलका तू
सोड आता मौन..., ते कमजोर आहे !

अंधारात मार्ग क्रमण्यासाठी आता आवाजच उपयोगी पडेल. म्हणून मौन सोडलं पाहिजे. इथे दोन अर्थ होऊ शकतात. वटवाघूळासारखा आवाज काढून अडथळ्यांचा वेध घे किंवा सिंहासारखी गर्जना करून शत्रूंच्या उरात धडकी भरव. काहीही केलं तरी मौन सोडावंच लागेल.

असो.

ओढाताण करून अर्थोत्पत्ती केल्याची वाटंत असल्यास कृपया सांभाळून घेणे. Happy

आ.न.,
-गा.पै.

नाही ओढाताण करून अर्थोत्त्पत्ती केल्यासारखे जाणवले नाही पण आपली एखाद्या कवितेत शिरण्याची वृत्ती किती 'आतून' असू शकते हे पाहून कौतुक वाटले तथापि गामाजी आपण गझल वाचताना एक बाब लक्ष्क्षात घ्या की प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असतो तो वाचून झाला की त्यातून स्वतःला आपसूक सोडवून पुढच्या शेरात वेगळ्याने गुंतण्यास सिद्ध रहावे लागते ही गझलेला अनुभवण्याची खरी पद्धत आहे.
शिवाय आपण जाणवून घेतलेत तशी ही गझल एकाच आशया-विषयावर आधारलेली नाही . रासच्या शेरात कृष्ण -कंस ह्या प्रतिमा वापरल्यात त्यानंतरच्या शेरात कंसाचा अजिबात संदर्भ नाही आहे "बळी" म्हणजे शेतकरी भूमिचा खरा मालक- बळिराजाचा पौराणिक संदर्भ आहे हा - आणि सांप्रत परिस्थिती पाहता जो शेतकर्‍यांचे बळी जात आहेत त्यालाही हा श्लेष ठरतो
तसेच रस्त्याच्या शेरात रस्ता म्हणजे फक्त रस्ता /आयुष्य(वाटचाल)/ हाती घेतलेले एखादे काम /इतक्याशी संदर्भ लावणे पुरेसे आहे .,तर लोक समोर अमुक म्हणतात पाठीमागे तमुक म्हणतात !..ह्या शेरात रस्ता रस्त्यात झालेली भेट असे संदर्भ आपण लावत आहात ते बिनमहत्त्वाचे आहेत कारण शेरात आशयाचा केंद्रबिंदू लोक पाठीमागे एक आणि समोर एक बोलतात हा आहे .. रस्त्यात झालेली भेट हानव्हेच दोनही शेर उगाचच एकात एक गुंतवून पाहिल्याने शेराची मूळ मजा कमी होते

जी बात शायराने केली आहे ती जशीच्या तशी पोचवून घेता येणे हाही प्रयत्न शेवटी रसिकाचाच आहे

तरीही आपण रसिक आहात आणि मी देखील ह्या गझलेचा शायर नाही त्यामुळे मीदेखील ह्या अर्थांवर काही बोलणे गैर ठरावे हे समजते आहेच
मुद्दा शेवटी आपल्या रसग्रहणाच्या niraaळ्या शैलीचा आहे इतके मात्र मी म्हणेन आणि तसे रसग्रहण करणे की नको हे शेवटी आपल्या अधिकारक्षेत्रात येते माझ्या नव्हेच

असो तरीही एक शेर आठवला

नसूनही...तुला हवे असेल तर तसे समज
कसा असेन कवडसा नसेन जर उन्हात मी Happy

धन्यवाद गामाजी (मला माझे ज्ञान पाजळता आले ह्या निमित्ताने हेही नसे थोडके! मी आपण हा प्रतिसाद पूर्ण वाचण्याइतकी sahanशक्ती दाखवाल हे ताडून मी आपले त्याबद्दल धन्यवाद मानीत आहे बरका Happy )

असो धन्यवाद गामाजी

वैवकु,

मला गझलेतलं फारसं कळंत नाही. स्वत:ला गझलेचा रसिक मानावे की नाही अशी मला शंका आहे. या पार्श्वभूमीवर तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. काही विधाने मननीय वाटली. ती येणेप्रमाणे :

१.
>> ... तो वाचून झाला की त्यातून स्वतःला आपसूक सोडवून पुढच्या शेरात वेगळ्याने गुंतण्यास सिद्ध रहावे लागते
>> ही गझलेला अनुभवण्याची खरी पद्धत आहे.

अगदी बरोबर. मात्र ही पद्धत न पाळताही कवितेचा आस्वाद घेता येतोय. माझ्या मते हेच खास लक्षण आहे.

२.
>> शिवाय आपण जाणवून घेतलेत तशी ही गझल एकाच आशया-विषयावर आधारलेली नाही .

मात्र तरीही गझल वाचतांना सुसंगत अर्थ लागतोय. द्विपद्या जरी अमूर्त असल्या, तरी एकत्र वाचल्यास त्या समूर्ताकडे निर्देश करताहेत. प्रत्येक द्विपदीचा बाज वेगळा असला तरी त्यातून प्रकटणारा आशय एका मोठ्या शोधमोहिमेचा (=एक्स्प्लोरेशन) भाग वाटतो.

३.
>> रासच्या शेरात कृष्ण -कंस ह्या प्रतिमा वापरल्यात त्यानंतरच्या शेरात कंसाचा अजिबात संदर्भ नाही आहे

तसा नसला तरी काही बिघडत नाहीये! एकदा का अमूर्ताची सलगता प्राप्त झाली की समूर्त प्रतिमा बदलल्या तरी चालतात. Happy

४.
>> ह्या शेरात रस्ता रस्त्यात झालेली भेट असे संदर्भ आपण लावत आहात ते बिनमहत्त्वाचे आहेत

बरोबर. समूर्त कल्पना इथे गौण आहेत. अमूर्त जाणीव प्रखर आहे. मात्र हे बाफवर लिहायचं कसं? तर त्यासाठी सुसंगती हवी म्हणून समूर्ताची योजना केली आहे.

५.
>> दोनही शेर उगाचच एकात एक गुंतवून पाहिल्याने शेराची मूळ मजा कमी होते

मान्य. मात्र त्यांचा जाणवलेला अमूर्तसा आशय परस्परपूरक आहे.

६.
>> मुद्दा शेवटी आपल्या रसग्रहणाच्या niraaळ्या शैलीचा आहे इतके मात्र मी म्हणेन

मी जे केलं त्याला रसग्रहण म्हणणे हा तुमचा मोठेपणा आहे. मी केवळ गझल वाचल्यावर मनात आलेले सैल विचार मांडले. लिहिण्यापुरती किंचित सुसंगती साधून. ते काही रसग्रहण नव्हे. सैलसर विचार असूनही एकत्रितरीत्या ते अमूर्त आशयाकडे अचूक निर्देश करतात (असं मला वाटतं). माझ्या मते हे प्रतिभेचं लक्षण आहे. Happy

७.
>> धन्यवाद गामाजी

जी नका लावू हो! उगीच वय वाढल्यासारखं वाटतं! Proud

असो.

तर सांगण्याचा मुद्दा काय की प्रस्तुत कवितेत एक प्रकारचा प्रवास आढळतो. हा आंतरिक शोधप्रवास (सेल्फ एक्स्प्लोरेशन) आहे.

आ.न.,
-गा.पै.

<<<<प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असतो तो वाचून झाला की त्यातून स्वतःला आपसूक सोडवून पुढच्या शेरात वेगळ्याने गुंतण्यास सिद्ध रहावे लागते ही गझलेला अनुभवण्याची खरी पद्धत आहे.>>>>

वैभवशी सहमत आहे. मी इथे प्रत्येक शेराचा अर्थ विशद करत बसणार नाही कारण शेवटी प्रत्येकाची सानुभूती वेगळी आणि स्वतंत्र असू शकते. एक गोष्ट मात्र नक्की की वैभवभाऊ मला अपेक्षित आशयाच्या खुप म्हणजे खुपच जवळ पोहोचलाय. धन्यवाद बंधु !

तर सांगण्याचा मुद्दा काय की प्रस्तुत कवितेत एक प्रकारचा प्रवास आढळतो. हा आंतरिक शोधप्रवास (सेल्फ एक्स्प्लोरेशन) आहे.<<<<<<< आपल्या ह्या मताचा मी निश्चितच आदर करत आहे आधीपासूनच Happy

समूर्त कल्पना इथे गौण आहेत. अमूर्त जाणीव प्रखर आहे<<<समजलं !! माफी असावी Happy

एकदा का अमूर्ताची सलगता प्राप्त झाली की समूर्त प्रतिमा बदलल्या तरी चालतात<<<< एक म्हणजे मला समूर्त -अमूर्त यातलं घंटा काहीही कळत नाही !

मुळात माझा प्रयत्न असा अस्तो की विठ्ठल कुणीतरी सांगीतला म्हणून तो तसा आहे किंवा आत्ता मला तो असा दिसला म्हणून तो तसा आहे असे म्हणण्यात मला काही इंटरेस्ट नसतो(कदाचित तो अश्या पद्धतीने आहे त्यापेक्षाही जास्त सुंदर दिसत असेलही मला काय !!) माझा कल तो जसा आहे तसाच्यातसा मला पाहता आला पाहिजे ह्या बाबीकडे आहे मी त्यासाठी जमेल तो प्रयत्न करून पाहत असतो इतकेच काय ते ...!! मी त्या भूमिकेतून आपल्याला समजावत बसलो होतो पैलवान

आता आपल्याला जसे जमेल तसे अर्थ लावत आपण बसणे ह्याला माझी क्काहीच हरकत असू शकत नाही ..मुळीच नाही ...कधीच नाही Happy

पण आपल्याला , एक सहज सुचलेला माझा शेर(कच्चापक्का) ऐकवतो

असे बघून पहा मग तसे बघून पहा
अश्यामधेच मग कयास संपणार तुझे !

असो शुभेच्छा आपणाला पैलवान

आणि पुनश्च धन्यवाद

आपला नम्र

`~वैवकु Happy