मागे जयजयकार चालला आहे

Submitted by बाळ पाटील on 6 February, 2015 - 01:25

मागे जयजयकार चालला आहे
चौखांद्यावर स्वार चालला आहे

वाटेलाही लाज वाटली थोडी
या वाटे तो फार चालला आहे

आप्तानाही रान मोकळे झाले
कंठाने मल्हार चालला आहे

जाळ्यामधुनी मुक्त जाहला "तो ' ही
केवळ हा उपचार चालला आहे

होवो अथवा काकस्पर्श ना होवो
या पिंडातुन पार चालला आहे

भाळी त्याच्या भस्म रेखिले होते
सरणावर संस्कार चालला आहे

भिंतीचा आधार चालला आहे
ओट्यावरचा भार चालला आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीरजी, बेफिजी धन्यवाद !
आणखी एक शेर होता,जो मी द्यायचा टाळला. पण तो आपणास सांगण्याचा मोह होतो आहे, सांगतोच.......
अंती नुरते ढुंगणास लंगोटी
नेसुन तू सलवार चालला आहे

उत्तम गझल अभिनंदन एखाद दुसरा शेर असा वाटला अजून क्लीअर यालला हवा होता असे जाणवले(उदा: मल्हार.. भारचा शेर मला कळालाच नाही आहे क्षमस्व ) पण अभिनंदन आपले हार्दिक अभिनंदन !!
जमीनच मस्त निवडलीत आपण ह्यासाठी विशेष अभिनंदन
तो पिंडातुन ...असा एक तुरळक बदल सुचला ..ह्याच्या पुढचा संस्कारवाला शेर ..मस्त गहिराई टिपलीत
फार चालला आहे <<हा हासिले गझल शेर माझ्यामते
चौखांद्यावर स्वार चालला आहे << आधी आपण मला >>तो खांद्यांवर चार चालला आहे <<< अशी ओळ ऐकवली होतीत तीमला खूप आवडलेली आता आहे हीपण छानच आहे म्हणा

ही तर आपली गझल म्हणावी अशी पहिलीच गझल आहे असे मी म्हणीन बरका तेव्हा पट्तले तर शीर्षक बदला हे ! आणि लिहीत रहा लिहीत रहा बस !

अनेकानेक शुभेच्छा Happy

सोड चिंता की कुठे पोचेल हा नद भावनांचा
शायरा तू शेर कर बस् पावणारा पोच देतो !!

धन्यवाद !

तो पिंडातुन ...असा एक तुरळक बदल सुचला >>>>>.
वैभवजी, या पिंडातुन म्हणण्यात या मानवी (|ज्या मानवाला इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत अधिक ज्ञान असल्याने दु:खही अधिक आहे ) पिंडातुन अभिप्रेत आहे.

उदा: मल्हार.. भारचा शेर मला कळालाच नाही आहे क्षमस्व>>>>>>
मी स्पष्ट करतो.......
आप्तानाही रान मोकळे झाले
कंठाने मल्हार चालला आहे

एक अर्थ : माणूस मेल्यावर नातलग, आप्त हे आपल्या भावना रड्ण्यातून (कंठाने मल्हार चालला आहे)मोकळ्या करतात.त्यांना भावना व्यक्त करण्यासाठी रान मोकळे होते, सन्धी मिळते.दुसरा अर्थ :पण तथाकथित आप्त असतील तर मात्र त्याना त्याच्या म्ररण्याचा गैरफायदा घेण्यासाठी रान मोकळे होते.अर्थात त्यांचेही मल्हार आळवणे आलेच.
भिंतीचा आधार चालला आहे
ओट्यावरचा भार चालला आहे

येथे कवी मानवी जीवनाची क्षणभंगुरता, मानवी सम्बन्धातील नात्याची दुरावत चाललेली दरी उपहासात्मक रीतीने अभिव्यक्त करतो आहे. त्याच्या जाण्याने कोणाचे बिघडले ?
जसे......
चन्द्र सूर्यही आले गेले
त्यावीण जग का ओसच पडले! (भा.रा ताम्बे )
माझ्याच शब्दात सांगू म्हटले तर त्याच्या जाण्याने .....

कोणावाचून काय कुणाचे अडले!
कार्डाचा आधार चालला आहे

>तो खांद्यांवर चार चालला आहे यात मलाच थोडे इनव्हरजन जाणवले.

बाकी मथळ्यातील श्लेष आपल्या नजरेतून सुटला नाही. .धन्यवाद !

जाळ्यामधुनी मुक्त जाहला "तो ' ही
केवळ हा उपचार चालला आहे>>>>टची आहे. खरे तर मला दुखःद घटना, प्रसन्ग पहावत, सोसत नाहीत. पण छान आहे गझल.

विशाल कुलकर्णी | 9 February, 2015 - 04:33

मतला खासच... आवडेश !

फक्त "रडण्याला मल्हार म्हणणे" हे नाही समजले >>>>>>>>

......... मल्हार हा गायनातील एक राग आहे. राग आळवताना गायक जशा ताना घेतो, इथे नातेवाईक तशा ताना माणूस मेल्यावर रडण्यातून आळवतात. विशेष म्हणजे मल्हार हा पावसाचा राग आहे. इथेही डोळ्यातून (खरे/खोटे) टिपकतेच की !!
म्हणून म्हटले......कंठाने मल्हार चालला आहे विशालजी धन्यवाद !

रश्मी.. | 9 February, 2015 - 04:38

जाळ्यामधुनी मुक्त जाहला "तो ' ही
केवळ हा उपचार चालला आहे>>>>टची आहे. खरे तर मला दुखःद घटना, प्रसन्ग पहावत, सोसत नाहीत. पण छान आहे गझल.>>>>>>>
................. आपल्या प्रतिक्रियेतून मला आत्मविश्वास आला की ज्या प्रेतयात्रेची मी वतावरण निर्मिती केली ती योग्य प्रकारे झाली आहे, किमान तसे म्हणायला मला वाव मिळाला.धन्यवाद रश्मीजी !
......आणि हो ss ! कुणी मेलं बिलं नाही बरं !

भरतजी, आपणासही धन्यवाद !

<<,मल्हार हा गायनातील एक राग आहे.>>>

हे माहीती आहे हो. Happy

पण रडण्याचा संबंध थेट ' मल्हार' रागाशी जोडल्याचे बघून गंमत वाटली. वैभवभाऊला सुद्धा त्या ओळींचा अर्थ कळला नसेल असे थोडेच आहे? जर मी चुकत नसेन तर त्याला सुद्धा हीच गोष्ट खटकलेली आहे.

माझ्या माहितीनुसार 'मल्हार' राग हा पावसाचे पर्यायाने आनंदाचे आवाहन करण्यासाठी वापरला जातो. मल्हाराच्या गायनाने अतिशय मधुर आणि गंभीर वातावरण निर्मीती होते. त्याचा संबंध तुम्ही रुदनाशी जोडलात म्हणून नवल वाटले इतकेच. असो.

धन्यवाद आणि पुलेशु:_/\_

आप्तानाही रान मोकळे झाले
कंठाने मल्हार चालला आहे>>>>>> आर्त स्वरात कोणी छेडतो मल्हार आहे. असे पण चालले असते.

म्हणजे कोणी गायक पावसासाठी याचना करत गात आहे की ज्याला कोणी त्रयस्थ व्यक्ती मृत पावल्याचे कळले नाही. पण त्याच वेळी त्याच्या दारावरुन प्रेत यात्रा जात आहे की, ज्या यात्रेत नातेवाईकान्च्या डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागल्या आहेत. इकडे आनन्दासाठी मल्हार तर तिकडे नातेवाईका न्च्या डोळ्यातला मल्हार असे चालले असते. मी कवि/गझलकार नाही. पण नेमके हे सुचले म्हणून लिहीले,क्षमस्व.:स्मित:

सॉरी विशाल.:स्मित: माहीत नाही म्हणूनच लिहीले. खरे तर गझला, कविता मनाला भिडतात, पण त्या रचता येत नाही याचेच वाईट वाटते.

पण रडण्याचा संबंध थेट ' मल्हार' रागाशी जोडल्याचे बघून गंमत वाटली. >>>>>>.
........... गम्मतय मोठी !

विशाल कुलकर्णी | 9 February, 2015 - 08:38 वैभवभाऊला सुद्धा त्या ओळींचा अर्थ कळला नसेल असे थोडेच आहे? जर मी चुकत नसेन तर त्याला सुद्धा हीच गोष्ट खटकलेली आहे.>>>>>>>

वैभवजी शांत का आहेत ?

सत्यजित... | 14 January, 2016 - 11:55
ये बात...क्या बात! .........>>>>>>>
............. आपने भी क्या याद दिलाई सत्यजीतजी ! बस ... बातो बातो में बन गई थी वो !!