बरे जाहले

Submitted by निशिकांत on 6 February, 2015 - 00:06

उगाच माझे मृत्त्यूनंतर
पुतळे असते उभा राहिले
ना मी नेता, ना मी विभुती
खरेच देवा! बरे जाहले

काय दुर्दशा पुतळ्यांची ती !
धूळ, जयंतीलाच झटकती
नंतर इतकी कुचंबणा की
अडगळ वाटे रस्त्यावरती
कीर्तिरुपाने उगाच उरलो
असेल त्यांना मनी वाटले
ना मी नेता, ना मी विभुती
खरेच देवा! बरे जाहले

संसदेतल्या पुतळ्यांना तर
गुदमर इतका ! काय म्हणावे?
सभोवताली कोल्हे फिरती
गिधाड होउन उडती रावे
तत्व कशाचे? सत्तेसाठी
डावे उजवे साथ चालले
ना मी नेता, ना मी विभुती
खरेच देवा! बरे जाहले

भेडसावतो जो पुतळ्यांना
एक प्रश्न सुटलेला नाही
उपयोगी ते कसे जनाला ?
विचार कोणी केला नाही
विटंबुनी पुतळ्यांना, दंगे
भडकवणारे खूप माजले
ना मी नेता, ना मी विभुती
खरेच देवा! बरे जाहले

गांधीजींचा रोष असावा
समस्त सरकारांच्या वरती
तत्वे त्यांची पायदळी अन्
स्वतःस त्यांचे शिष्य म्हणवती
मोह कधी पैशांचा नव्हता
नोटांवर का तरी छापले ?
ना मी नेता, ना मी विभुती
खरेच देवा! बरे जाहले

जरा आर.के. लक्ष्मणाचा
कॉमन मॅनच मला बनू दे
देवा ! सुखदुखं:शी त्यांच्या
समरसण्याचे स्वप्न पडू दे
व्यंग दावता चित्रामधुनी
वेदनेतही हास्य पाहिले
ना मी नेता, ना मी विभुती
खरेच देवा! बरे जाहले

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users