आप की आँखों में कुछ ...

Submitted by विशाल कुलकर्णी on 3 February, 2015 - 00:49

तसा मी अगदीच नास्तिक नाहीये, पण तरीही देव, दानव, साक्षात्कार, चमत्कार अश्या गोष्टींवर चटकन विश्वास टाकणं नाही जमत मला. पण मग जेव्हा पंडीतजींचं 'भाग्यद लक्ष्मी बरम्मा' कानी पडतं, किंवा सैगलचे 'सो जा राजकुमारी' चे सुर कानावर रेंगाळायला लागतात किंवा जेव्हा शास्त्रीय संगीताचे कसलेही शिक्षण न घेतलेले किशोरदा लताबाई, मोहम्मद रफी सारख्या दिग्गजांच्या नाकावर टिच्चून ताकदीने आपले साम्राज्य उभे करतात किंवा कुणी गुलझार जेव्हा एकीकडे "आंपकी आँखोंमें" सारखं वेड लावणारं लिहीताना त्याच ताकदीने 'कजरारे कजरारे' सारखं भन्नाट काहीतरी लिहून जातो तेव्हा साहजिकच मनात एक प्रश्न उभा राहतो...

देव नसेलही कदाचित या जगात पण काहीतरी दैवी पाठबळ असल्याशिवाय हे असं काही जमवून आणणं, करणं सामान्य, मर्त्य मानवाला शक्य आहे का? की याप्रकारे स्वतः अज्ञात राहून सामान्य मानवाकडून अशी अफाट, अचाट कामं करवून घेणार्‍या त्या शक्तीलाच 'देव' म्हणतात? गीत-संगीत हे माझ्या मते मानवी नसून प्रकृतीची, निसर्गाची भाषा बोलणारं, थेट आत्म्याशी संवाद साधणारं एक शक्तीशाली माध्यम आहे. इथे भाषा हा अडसर असुच शकत नाही. माझ्या मते आपल्या व्यावहारिक जीवनातले वेगवेगळे पैलू व्यक्त करण्यासाठी, आपल्या सदसदविवेक बुद्धीचा कौल लक्षात घेवून थेट आत्म्याशी संवाद साधणारी ही एक भाषेपल्याडची भाषा आहे. मानवी आयुष्यातील आनंद, दु:ख, दया, घ्रूणा, राग, प्रेम, शृंगार अशा अनेक घटकांच्या सहज सुंदर आणि थेट अभिव्यक्तीचे हे एक सोपे पण सामर्थ्यवान माध्यम आहे. याला दैवी नाही म्हणायचं तर अजुन काय म्हणायचं?

आता हेच बघा ना कलकत्त्यात जन्माला आलेला 'पंचम', सद्ध्या मध्य प्रदेशात असलेल्या 'खांडव्या'चा एक मिश्कील, खुशमिजाज तरूण 'आभासकुमार गांगुली' आणि दिना (सद्ध्या पाकिस्तानात असलेले एक गाव) इथे जन्माला आलेला एक कोमल मनाचा गुलझार कवि 'संपुरणसिंग काल्रा' यांना एकत्र यायचे काय कारण होते? ते सुद्धा आपापल्या जन्मभुमीपासून हजारो मैल अंतरावरील एका मायानगरीत. बरं नुसतेच एकत्र नाही आले तर माझ्या सारख्या लाखो, करोडो लोकांचे जगणे समृद्ध करण्याचे काम या तिघांनी एकत्रीतपणे केले. याला दैवी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? देव नावाची काही शक्ती जर असेलच तर ती 'गीत, संगीत' यामध्येच पुर्णपणे वास करून आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.

हे चमत्कार इथेच थांबत नाहीत. तर पुढे जावून कुणीतरी 'माणिक चटर्जी' नावाचा एक वेड लावणारा वेडा या तिघांबरोबरच सिने सृष्टीतले अजून तिन हिरे निवडतो आणि त्यातुन जे काही निर्माण होतं ते निव्वळ अवर्णनीय असंच असतं. आपली अवस्था अगदी.... "आज काल पाव जमींपर.., नही पडते मेरे" अशी होवून जाते.

किशोरदांनी त्यांच्या फिल्मी आयुष्यात साकारलेल्या बहुतेक भुमिका विनोदीच होत्या, पण या विनोदी स्वभावाच्या माणसामध्ये एक विलक्षण संवेदनशील आणि गंभीर प्रवृत्तीचा गायक कायम तरूण होता. किशोरदांनी बर्‍याच संगीतकारांसाठी कित्येक अमर गाणी दिली आहेत, पण त्यांचं गोत्र जुळलं होतं ते म्हणजे 'पंचमदा' उर्फ राहुल देव बर्मन यांच्याशी. किशोरदांनी इतरांबरोबर जितकी म्हणून द्वंद्वगीते केली त्या सर्व गीतांमधून एक विलक्षण खोडकर स्वभाव डोकावत राहतो, पण पंचमबरोबर मात्र किशोरदांनी नेहमीच आपल्या स्वभावापासून एकदम हटके गाणी दिलेली आहेत. त्यात पंचमदांचं वैशिष्ठ्य हे की एक विनोदी प्रवृत्तीचा गायक म्हणून ओळखला गेलेल्या किशोरदांच्या खर्‍या-खुर्‍या सामर्थ्याची जाणिव किशोरदांना स्वतःलाही आणि इतर जगालाही त्यांनीच करून दिलेली आहे. 'मेहबुबा' मधलं 'शिवरंजनी' रागातलं ' मेरे नैना........' असो (मेल व्हर्जन) वा 'अगर तुम ना होते' मधलं "हमे और जीनेकी चाहत..." असो, शास्त्रीय संगीताचा कसलाही अभ्यास नसलेले किशोरदा या दोन्ही गाण्यातून लताबाईंपुढे एक जबरद्स्त आव्हान उभे करतात. किशोरदा जास्त करून खुलले ते पंचमसोबतच. आणि अशा या जोडगोळीला त्या तिसर्‍या अवलियाची साथ मिळाली. अतिशय गुंतागुंतीच्या भावनाही सहजपणे समजणार्‍या आणि थेट आतपर्यंत जाऊन पोचणार्‍या, सहजपणे आपल्या आयुष्याशी जुळवून घेणार्‍या शब्दात मांडणारा हा मनस्वी कवि किशोर, पंचमच्या जोडगोळीला येवुन मिळाला आणि मग एकामागुन एक नितांतसुंदर गाण्यांचे खजीने रसिकांसमोर उलगडायला लागले. गुलझारनेच लिहीलेलं 'खामोशी' या चित्रपटातील एका गीतातली एक ओळ या अनुशंगाने आठवतेय....

"झुकी हुयी निगाहमें, कही मेरा खयाल था"

यातला जो 'खयाल' गुलझारना अपेक्षीत होता त्याला मुर्त स्वरूप दिले किशोरदांनी. याच गाण्यात असे नाही तर नंतर गुलझारबरोबर केलेल्या प्रत्येक गाण्यात किशोरदांनी प्राण भरले. "घर" या चित्रपटातलं हे एक गाणं त्यापैकीच एक....

'सावन भादो (१९७०) ते 'घर' (१९७८) असा रेखाचा 'घर' पर्यंतचा प्रवास जर पाहीला तर एक गोष्ट ठळकपणे अधोरेखीत होते की घर पर्यंत रेखा आपल्या चित्रपट करीयरविषयी म्हणावी तितकी गंभीर कधी नव्हतीच. पण 'घर' मध्ये माणिकदांनी रेखाचे कॅरेक्टर इतके ताकदवान रंगवले होते की ( आणि अर्थातच रेखाने या पात्राला अतिशय समर्थपणे न्याय दिलेला आहे) या चित्रपटापासून रेखाची कारकिर्दच बदलून गेली. एका बदकाच्या कुरूप पिल्लाचे रुपांतर या चित्रपटाने एका डौलदार राजहंसीत करून टाकले. बरोबर विनोद मेहरा सारखा देखणा सहकलाकार (उगीच नाही रेखा प्रत्यक्ष जीवनातही विनोदच्या प्रेमात पडली) होता.

ghar-aap-ki-aankhon-me-vinod-rekha

खरं बघायला गेलं तर या चित्रपटातली सगळीच गाणी अतिशय सुंदर होती. त्यातल्या त्यात 'फीर वही रात है' आणि 'आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है" ही दोन गाणी तर एकाला झाकावे आणि दुसर्‍याला काढावे इतकी सरस उतरलेली आहेत. क्षणभर कल्पना करून बघा , "तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला उद्देशून म्हणतोय / म्हणतेय की ...

"आपसे भी खुबसुरत... आपके अंदाज है"

अंगावर नाही रोमांच उभे राहीले तरच सांगा. विशेषतः किशोरदा या गाण्याच्या दुसर्‍या कडव्याची सुरूवात करताना "लब हिले तो मोगरेके......." करतात, तेव्हा त्यांच्या 'लब हिले तो" च्या उच्चारणावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. मला वाटतं लताबाईंच्या आयुष्यातलं हे एकमेव गाणं असेल ज्यात 'लताबाई' असुनही मनात 'ठसून' राहतो तो 'गायकाचा' म्हणजे 'किशोरदांचा' आवाज. एकतर अवखळ, खोडकर मुडमधलं हे गीत, त्याला किशोरदांसारखा तेवढाच अवखळ आणि ताकदीचा गायक आणि गुलझारसाहेबांचे जानलेवा शब्द.... देता किती घेशील दो कराने? अशी अवस्था होवून जाते आपली.

आपकी आँखों कुछ महके हुये से राज है
आपसे भी खुबसुरत.. आपके अंदाज है

असल्या भन्नाट कल्पना फक्त गुलझारनाच सुचू शकतात. म्हणजे बघा ना , म्हटलं तर 'गुपित' आहे, पण गुपितही कसं तर दरवळणारं , म्हणजे गुपित असुनही गुपित नसलेलं असं काही तरी. गुपित असुनही आपल्या अस्तित्वाची अलगद जाणिव करुन देणारं असं काहीतरी ! क्या बात है गुलझारसाहब... क्या बात है !

लब हिले तो मोगरे के फूल खिलते है कही
आपकी आंखोमें क्या साहिलभी मिलते है कही
आपकी खामोशियांभी आपकी आवाज है ...

प्रेयसीच्या ओठांची तुलना मोगरीच्या पाकळ्यांशी करणं, तिच्या डोळ्यातल्या गहिर्‍या भावनांना सागराच्या लाटांची उपमा देणं आणि वर कळस म्हणजे "तुझं मौनदेखील बोलकं आहे" हे सांगणं ही सगळी गुलझार ल़क्षणं व्यक्त करण्यासाठी किशोरच हवा आणि ती सार्थ ठरवण्यासाठी समोर 'रेखाच' हवी.

या गाण्याबद्दल बोलताना 'गुलझारसाहेब' एक किस्सा नेहमी सांगतात. जेव्हा गाण्याचं रेकॉर्डींग चालू होतं. तेव्हा एका ओळीवर गुलझार थोडेसे अडकले होते. म्हणजे त्यांना स्वतःला त्या ओळी प्रचंड आवडल्या होत्या. पण त्यातला एक शब्द, त्यातुन ध्वनित होणारा अर्थ त्यांना स्वतःलाच खटकत होता. खटकत होता म्हणण्यापेक्षा त्यांना संकोच वाटत होता. कारण या ओळी गाण्यात लताबाईंच्या म्हणजे एका स्त्रीच्या तोंडी होत्या.

आप की बातोंमें फीर कोइ शरारत तो नहीं
बेवजह तारीफ करना.., आपकी आदत तो नहीं
आपकी 'बदमाशीयोंके' ये नये अंदाज है.....

यातल्या 'बदमाशीयोंके' हा शब्द, त्यातून ध्वनित होणारा अर्थ यामुळे गुलझारसाहेबांना प्रचंड संकोच वाटत होता. त्यांनी हळुच लताबाईंना विचारले सुद्धा की हा शब्द 'बदलुयात' का आपण? पण लताबाई, किशोर तसेच पंचमचेही मत पडले की तो शब्दच तिथे जास्त पक्का बसतोय. आणि रेकॉर्डींगला सुरूवात झाली.

पहिल्या दोन ओळी रेकॉर्ड झाल्या आणि लताबाईंना रेकॉर्डींगच्या आधी गुलझार यांच्याशी झालेली चर्चा आणि त्यांचा तो संवाद आठवला आणि न राहवून त्यांना हसु आवरलं नाही, त्यांचं ते नाजुक हंसणंदेखील रेकॉर्ड झालं आणि ते मुळ गाण्यात इतकं चपखल बसलं की आजही हे गाणं ऐकताना असं वाटतं की गुलझारनी गाण्याचे बोल लिहीताना ते हास्याचे स्वरही लिहीले असावेत. पण त्या नाजुक हास्याने पुढच्या ओळीला, त्यातला 'बदमाशी' या शब्दाला जो काही गहीरा अर्थ मिळवून दिला तो निव्वळ लाजवाबच. हे गाणं केवळ आणि केवळ किशोरदांचं होतं. त्यांनी इतक्या उत्कटपणे गायलय हे गाणं की लताबाई असुनही नसल्यासारख्या आहेत या गाण्यात. अथ पासून इतिपर्यंत फक्त आणि फक्त किशोरदाच व्यापून राहतात या गाण्यात. लताबाईंना गाण्याच्या बाबतीत एवढं डॉमीनेट कुणीच आणि कधीच केलेलं नसेल. पण तरीही लताबाईंशिवाय हे गाणं अधुरं राहीलं असतं हे ही तितकेच सत्य आहे.

गाणे इथे पाहता / ऐकता येइल.

या सगळ्यांबरोबर गाण्याच्या यशात तितकाच, किंबहुना काकणभर जास्तच वाटा होता तो पंचमदांच्या संगीताचा. चित्रपटातला प्रसंग,ती परिस्थिती ओळखून त्यानुसार तिला संगीत देणे, त्यानुसार त्या गाण्यातल्या पात्रांना (काम करणार्‍या कलाकारांना नव्हे) साजेशी संगीतरचना करणे ही पंचमदांची खासियत होती. पंचमदाच्या संगीतात बघा , कुठलाही चित्रपट असो, कुठलेही गाणे असो किंवा पार्श्वसंगीत असो ते कधीही अनाठायी, संदर्भहीन वाटत नाही कारण पंचमदांनी आपल्या संगीताचा वापर नेहमीच सिनेमाच्या कथेचा, त्यातल्या पात्रांचा, त्या पात्रांमधील नातेसंबंधांचा, कथेत उपलब्ध परिस्थितीचा पुर्ण अभ्यास करुन त्या संदर्भातच केलेला आढळुन येतो.

किशोरदा आणि पंचमदा दोघेही त्या जगात निघून गेले आहेत. पण त्यांनी दिलेलं हे गीत अजुनही कित्येक वर्षे, दशके रसिकांच्या स्मरणात राहील यात शंका नाही.

विशाल...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशु, तुझं 'फिर वही रात है' वाचल्यावर लगेच ते ऐकलं आणि पाठोपाठ 'आपकी आँखोंमे कुछ' पण ऐकलं होतं. आता लागोपाठ तू त्यावरही लिहिलंयस Happy

काही म्हणा, रेखा आणि विनोद मेहरा जोडी बघायला मस्त वाटते.

छान लिहीलंय. गाणं झाल्यानंतरही 'कवितापण' न सोडणारं हे एक गाणं.

वाह विशाल - फारच सुर्रेख लिहिलंस - आधीच हे गाणं आवडतं आणि तू जे सगळं उलगडून दाखवलंस ते वाचताना - केवळ आहाहा, क्या बात है असं होत राह्यलं ... Happy
किशोरदा इज किशोरदा ....

विशाल किती गोड लिहीले आहेस रे..गाण्याप्रमाणेच.. गाण्यातले बारकावेही अचूक टिपले आहेस...की वाचता वाचता नकळत गाणे गुणगुणले गेले... आपोआप..वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा रहात होता..
अगदी खरे आहे असे थोर कलाकार एकत्र येउन आपल्यासारख्याना किती आनंद देत असतात त्याला मोल नाही.. आणि यामागे स्रुष्टीचा हात असल्याशिवाय सहजा सहजी असे होणार नाही...

खुप छान लिहलयं विशालदा.
माझ्या टॉप लिस्टवर असलेले गाणं. ऐकताच प्रसन्न वाटणारं, नव्याने प्रेमात पाडणारं असे हे गाणं कधीही ऐकलं तरी तुम्ही म्हंटल्याप्रमाणे अंगावर रोमांच आणतेच.
आधीच हे गाणं आवडतं आणि तू जे सगळं उलगडून दाखवलंस ते वाचताना - केवळ आहाहा, क्या बात है असं होत राह्यलं ... स्मित +१११११११११

तुमच्या आधीच्याच लेखावर लिहिणार होते की घर मधील सर्वच गाणी छान आहेत.

आज कल पाव जमीं पर सुद्धा असेच एक गाणे , त्यातले "बोलो" हे असे उच्छारले जाते ना की आपण ते तिथेच उच्चारून बघतो.

हे गाणं खूप आवडीचं आहे.. पण ते का... ते इतकं तळहातावर ठेवल्यासारखं तू लिहिल्यावर कळलं. कसं शब्दंबद्धं केलयस ते शब्दांच्या पल्याडचं..
जियो, विशाल

खुपच सुन्दर लेख विशाल . घर मधिल सर्वच गाणी अप्रतिम आहेत. या त्रिकुटाचे सर्व गाणी सदाबहार आहेत.
अजुन बघायला गेलं तर आँधी चित्रपटातल तेरे बिना जिन्दगि से.... ईथे पण किशोरदा सरसच..

Pages