केशरबागा लावत आहे

Submitted by निशिकांत on 27 January, 2015 - 00:29

आयुष्याच्या उजाड रानी, केशरबागा लावत आहे
व्यर्थ मृगाची वाट पाहिली, मृगजळ आता शिंपत आहे

गंगामाता हिमालयाची प्रवाहताना कुणी मळवली?
आकाशीची गंगा मानव पाप धुवाया मागत आहे

असावीस तू झंझावाती वादळात त्या विनाशकारी
शोध घेत माझ्याच दिशेने वेगाने जे सरकत आहे

दूध, भात अन् साय त्यावरी, बाळ खातसे आनंदाने
माय आजची पिझ्झा, बर्गर, कोक सोबती भरवत आहे

कधी मराठी, कधी इंग्रजी, संस्कृतचीही चर्चा होते
मायबापहो बघा लेकरू धडा कोणता गिरवत आहे

धर्मगुरूंचे वेष वेगळे, सुमार वसती त्यात माणसे
मला न दिसला कुणी असा जो साधू, पाद्री, हजरत आहे

प्रथितयशांनो बंद करोनी लिखाण, ऐका! भुकेजल्यांचे
आग ओकणार्‍या विद्रोही वाङ्मयातही लज्जत आहे

प्रयत्न फसले संपवायचे, जरी नकोशी, तरी जन्मली
श्वास मोकळा घेणे सुध्दा, तारेवरची कसरत आहे

"निशिकांता"ला पैलतिराची ओढ लागली म्हणून सध्या
"इहलोकीचे पाश तोडणे" काम तो अता उरकत आहे

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली

धडा च्या शेरात जे म्हणणे आहे त्याचा नेमका रोख मला समजला नाही
बाकी सर्वच शेर छान आहेत
धन्यवाद काका

शेरांपेक्षा भावना अधिक वाटल्या.
थोडी सूचकता आवश्यक आहे.
अन्यथा गझल विधांनाची मालिक होऊ शकते.
धन्यवाद.

दूध, भात अन् साय त्यावरी, बाळ खातसे आनंदाने
माय आजची पिझ्झा, बर्गर, कोक सोबती भरवत आहे<<< Happy

धर्मगुरूंचे वेष वेगळे, सुमार वसती त्यात माणसे
मला न दिसला कुणी असा जो साधू, पाद्री, हजरत आहे<<< छान!

प्रथितयशांनो बंद करोनी लिखाण, ऐका! भुकेजल्यांचे
आग ओकणार्‍या विद्रोही वाङ्मयातही लज्जत आहे<<< व्वा

प्रयत्न फसले संपवायचे, जरी नकोशी, तरी जन्मली
श्वास मोकळा घेणे सुध्दा, तारेवरची कसरत आहे<<< खयाल नेहमीचा असला तरी दुसरी ओळ सुरेखच!

"निशिकांता"ला पैलतिराची ओढ लागली म्हणून सध्या
"इहलोकीचे पाश तोडणे" काम तो अता उरकत आहे<<< मस्त, ह्यावरून मला माझा एक जुना शेर आठवला तो द्यायचा मोह होत आहे.

उरकत आहे उरलेली पापे मी इथली
तसा यमाचा कॉल मला आलेला आहे

मला उरकायची आहेत पापे खूपशी अजुनी
तुला नरकामधे भेटेन मी स्वर्गीय आयुष्या

~ बेफिकीर

असा एक शेर आठवला
( टाईप करताना मूळ शेरात काही फरक पडला असेल तर क्षमस्व)

फारच आवडली गझल , तळमळ पोचते आहे..
प्रथितयशांनो बंद करोनी लिखाण, ऐका! भुकेजल्यांचे
आग ओकणार्‍या विद्रोही वाङ्मयातही लज्जत आहे..