लागलेली जंगलाला आग आहे

Submitted by जयदीप. on 24 January, 2015 - 02:05

लागलेली जंगलाला आग आहे......
व्यक्त झालेला हवेचा राग आहे!

वाटतो आरामही वैताग येथे
ही कुणाच्या मालकीची बाग आहे?

बाप झाल्यावर मलाही बाप कळला
झोपलो आहे तरीही जाग आहे

तू दिलेल्या राहिल्या नाहीत जखमा
राहिला प्रत्येक जागी डाग आहे!

मानलेले विश्व तू आहेस ज्याला
सूर्यमालेतील छोटा भाग आहे!

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानले आहेस ज्याला विश्व 'जयदिप'
सूर्यमालेतील छोटा भाग आहे! << मस्त.

बाप झाल्यावर मलाही बाप कळला
झोपलो आहे तरीही जाग आहे ...हाही आवडला. Happy

वाटतो आरामही वैताग येथे
ही कुणाच्या मालकीची बाग आहे?

व्वा व्वा. बापाचा शेर आणि मक्ताही छान.
गझल आवडली.

मानलेले विश्व तू आहेस ज्याला
सूर्यमालेतील छोटा भाग आहे!

शेर आता अधिक छान वाटत आहे.