वारसा भाग ३

Submitted by पायस on 23 January, 2015 - 18:24

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52429

***कापालिकांची भूमि?***

आज जमीन अधिक कठीण का भासतीये? रात्री गड्यांनी बाजेवर अंथरूणही पसरले होते. हे काय खडकाळ जमीन? हा तर गावाबाहेरचा माळ भासतोय. उद्या येथेच जायचे होते. मी इथे कसा आलो? चहूबाजूला कोणीच दिसत नाही. कोडेच आहे हे खरे. असो चला चालत. ओह्ह्ह, तू तर तो त्या दिवशीच्या स्वप्नातला आदिवासी संन्यासी. होय तूच तो. आज वेष थोडा वेगळा असला तरी मी तुला नाही विसरु शकत.
"सलामत सा म्गा पापुरी. मालक, का आता तुला वारस संबोधू? असो, पुन्हा भेट झाल्याने मला खूप आनंद होत आहे."
आज तरी याला निरखून पाहुया. माझ्याएवढाच उंचापुरा आहे, आज तरी कपडे एखाद्या अघोरासारखे वाटतात. दाढी-मिशाही भरघोस वाढल्यात. पण हे डोळे; अंधारात नीट दिसत नाही परंतु काळे नक्कीच नाहीत.
"माझे निरीक्षण करुन जाहले असले तर पुढे चलुया. तसेही माणसाचे, हा शब्द खरे योग्य नव्हे पण दुसरा शब्द सुचत नाही, निरीक्षण त्याच्या आत्म्यावरुन करावे. शरीर काय एक वेश आहे. आणि अजून माझ्या आत्म्यापर्यंत तुमची पोचण्याची क्षमता नाही. माझ्यामागून या."
मी पुन्हा भारल्यासारखा त्याच्यामागोमाग चालु लागलो. ती टेकडी काल दुरुन पाहिलेल्या सीतामातेच्या टेकडीसारखीच वाटतीये. परंतु काल ज्या सडकेवरुन आलो ती सडक गायब आहे. हा मी नक्की कोठे आलो आहे? हे स्वप्न असेल तर देवा मला कृपा करुन लवकर उठवू नका. कारण खूप प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही आहेत.
" इथे प्रवेश करायचाय. चला माझ्यामागे. त्या पहारेकर्‍यांची चिंता करु नका ते तुम्हाला पाहू शकत नाहीत."
कोण्या एका गुंफेच्या तोंडाशी आम्ही उभे होतो. बाहेर दोनजण उभे होते. वेषावरुन ते अघोरपंथीय असावेत. आपण निडरपणे आत घुसावे. तसेही स्वप्नच आहे. गुहा फारशी खोल गेलेली दिसत नाहीए. या पायर्‍या, बरं उतरल्या. हा दरवाजाही उघडला. फारच विचित्र स्वप्ने बघतो मी आजकाल.
"हे रुढार्थाने स्वप्न नाही, मूर्खा. कसा मालक मिळाला आहे? एकंदरीत नवी पिढी दिवसेंदिवस मूर्खच होत चालली आहे. अजून १००-१२५ वर्षांनी काय होईल मनुष्य प्रजातीचे लुमिखाच जाणे. बघ नीट."
ही कसली भयाण मूर्ती? चार हात मागे शंख दिसतोय लांबून आणि कसलेसे फूल देखील आहे. विष्णु? एवढी उग्र विष्णुमूर्ती मी कधी पाहिली नाही. ही कोणत्या अवताराची मूर्ती? आणि अरे विष्णुच्या हातात परशु? गदाही काटेरी दिसतीये. तिलकही दिसत नाही. अघोर विष्णुला कधी भजत नाहीत. ही कोणती मूर्ती?
"ही विष्णुमूर्ती नाही. तुझी विचारमालिका बरोबर आहे. ही मूर्ती लुमिखाची आहे. जहागीरदार म्हणून आता तुझी लुमिखाशी ओळख होणे गरजेचे आहे."
समोर कोणी साधक उघड्यानेच बसला होता. पण त्याच्या समोर हवन कुंड नव्हते. तर एक घंगाळे होते. तो कुण्या गूढ भाषेत काही मंत्रसाधना करीत होता. त्याने अचानक त्या घंगाळ्यात हात घालून काही धारदार शस्त्र काढले. हे कोणते नवे शस्त्र? तो सावकाश चालत वेदीवरुन उतरला. अरे तो कोणाला तरी फरफटत नेतोय. ही तर कोणी स्त्री दिसतीये.
"महान लुमिखा. मी एक मायाकापालिक हा शेवटचा बळी देतोय. यानंतर आपला वायदा पुन्हा एका शतकासाठी नवीन होईल."
अरे त्याने ते शस्त्र उगारले. अरे ए काय करतोयस? आह मी मी तर त्याच्यातून आरपार झालो. मूर्तीवर लाल शिंतोडे? ललनेचे मस्तक धडावेगळे.. नराधमा ....
हे काय? मी परत आरपार झालो की काय? नाही मी तर वाड्यातच आहे. पुन्हा एक विचित्र स्वप्न. कोण होता तो अघोर साधक? का मला अशी स्वप्ने पडतात? आणि आज त्या संन्याशाने माहिती सांगताना एवढी सहज चूक कशी केली?
~*~*~*~*~*~

त्या चारजणांचा गट आता मायकपाळला सरावला. हैबतरावांना काही काम आल्याने ते त्यांच्याबरोबर गाव हिंडू शकले नाहीत. पण घरी स्वयंपाकाला येणार्‍या शांताबाईंची मुलगी मंजूळा त्यांना सोबतीला आली. मंजू त्यांना तशी समवयस्कच. जहागीरदारांचा गावातल्या सर्व मुलांना चार बुके का होईना शिकायला लावण्यावर असलेल्या भरामुळे ती बर्‍यापैकी पुणेरी मराठी बोलत होती त्यामुळे त्या चौघांनाही थोडे हलके वाटत होते.
मायकपाळ तसे छोटेसेच गाव होते. साधारण ३०-४० घरे. गावात एका मातब्बराचा वाडा असून देखील एवढे छोटे गाव पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करीत. तसे इंग्रजांनी जहागीरदार घराण्याला आजूबाजूच्या आणखी १० गावांची जमिनदारी दिली होती. त्यातली काही मायकपाळपेक्षा मोठी देखील होती. यावर हैबतरावांचे उत्तर असे - "माझे पणजोबा मुधोजीराव म्हणत की राजधानी मोठी नव्हे मजबूत असावी. मग हाच नियम मुख्य ठाण्याला का नको?" गावात एका टूमदार गावात असावे ते सर्व होते. जवळच्या टेकडीवर सीतामातेचे मंदिर. गावात एक मारुतीचे मंदिर. याची स्थापना म्हणे समर्थशिष्य गिरिगोसावी यांनी केली होती. गावात दोन मोठ्या विहिरी. वर त्या गढीतला आड. अगदी थोडक्यात सांगायचे तर ते गाव 'luxurious' होते.
"हे बगा आलं सीतामातेचं टेकाड. आज तुमाला मंदिर पाहायचे होते न्हवं? चला मग थोडीशी चढण चढा."
चला रे मी आणि बल्लु आधी पोचतो बघा असं म्हणत थोडेसे माहीतगार असलेले प्रताप आणि बल्लु धावत सुटले. टेकडी चढायला फारशी अवघड नव्हती. एका घटकेत ते मंदिरात होते. मंदिरात आल्यावर जाणवते तशी शांतता जाणवत होती. मंदिर चांगले ऐसपैस बांधले होते. गाभार्‍यात अत्यंत सुबक अशा सीता-राम-लक्ष्मण मूर्तीत्रय होत्या. बाकी मंदिरात फारसे काही नसल्याने ते थोडे ओकेबोके वाटत होते. विशेष म्हणजे एक नंदीही मंदिराच्या दक्षिण बाजूस होता.
"हे थोडे अशास्त्रीय मंदिर नाही?" अग्रजने प्रतापला बाजूस ओढून विचारले. प्रतापने उत्तर देण्याआधी पाहिले मंजू, बळवंत, शाम आपल्याच गप्पांमध्ये रंगले होते. "असे का म्हणतोस?"
"सीता भूदेवीला येथे भेटली. म्हणून तिचे मंदिर बांधले, मान्य. परंतु मग राम लक्ष्मण का? जर ते हवेच होते तर मग संपूर्ण पंचायतन का नाही?"
"अरे पण जेव्हा सीता येथे असेल तेव्हा हनुमान भेट झालीच नव्हती म्हणून असेल. आणि मारुती आहेच की गावात."
"अस्सं. मग इथे नंदी का? तसेच हे मंदिर बाहेरून थोडे मोठे का वाटते. व हे मंदिर गोल आहे. जणू एखाद्या अभेद्य तटबंदीत बंदिस्त. मला खरे खरे सांग, काही दंतकथा आहे का?"
प्रताप या भडिमाराने काहीसा बावरला. मग घुटमळत तो हलकेच बोलू लागला.
"अग्रजा, मी स्वतः लहानपणापासून पुण्यात शिकायला राहतोय. त्यामुळे गावाशी संबंध अंमळ कमीच. पण मी ऐकले आहे की आमचे पूर्वज येथे येण्याआधी इथे मायाकापालिक नावाच्या अघोरपंथीयांची वस्ती होती. हे मंदिर म्हणे त्यांचे होते व इथे सीता मूर्ती व ती कहाणी नंतर प्रचलित करण्यात आली. या गावाचे नावही त्यांच्या नावावरुन पडले. आता खरे-खोटे तो एकटा रामराणा जाणे."
अग्रज विचारात पडला. "माफ कर प्रताप मी तुला फारच सतावले. पण मी अशा बाबतीत हेकट माणूस आहे, मी रहस्य न जाणता नाही राहू शकत."
प्रताप फक्त हसला. तेवढ्यात त्यांना इतर तिघांनी हाका मारायला सुरुवात केली. सांज व्हायला एक घटिका होती. ते आणखी काही वेळ थांबून परत फिरले.
~*~*~*~*~*~

हैबतराव अस्वस्थपणे येरझार्‍या घालत होते. त्यांना अग्रजशी बोलणे आता गरजेचे वाटु लागले होते. अखेरीस मनाशी निर्णय घेऊन ते वर आले. अग्रज एक पुस्तक वाचत पडला होता. आर्थर कॉनन डॉईल त्याला भारतीय पुराणांपेक्षा जवळचा वाटे. आजही तो साईन ऑफ फोर घेऊन पडला होता. एव्हाना आठवडा झाला होता. पुण्याचा प्लेग हटण्याचे निशाण दिसत नसल्याने चौघांची स्वतंत्र खोलीत व्यवस्था करण्यात आली होती. हैबतराव अग्रजच्या खोलीत प्रवेश करते झाले. अग्रजही लगेच पुस्तक ठेवून उठला पण हैबतरावांनी त्याला मानेनेच बसण्याचा इशारा केला.
"अग्रज मी म्हणलो होतो की तुला की तुझी भेट नीरस होणार नाही. आठवते?" त्याने रुकार दिला.
"मला याच संदर्भात बोलायचे होते. पण त्या आधी तु आण घे कि पुढील संभाषण गुप्त ठेवशील." पुन्हा रुकार.
"तर ऐक. मायकपाळला जवळपास २-३ शतकांचा इतिहास आहे. तर माझ्या माहितीत जहागीरदारांचा इतिहास ७व्या शतकापर्यंत मागे जातो. जहागीरदार घराणे चालुक्यांचे वंशज असल्याचे कागदपत्र माझ्याकडे आहेत. मी त्यातली भाषा वाचू शकत नाही पण माझ्या वडिलांनी मला जे सांगितले, जे त्यांना त्यांच्या वडिलांनी, त्यावर संपूर्ण विश्वास आहे."
"ही तर फारच गौरवशाली बाब आहे."
"होय. अशा घराण्याकडे समृद्ध खजिना असणे काहीच आश्चर्याची गोष्ट नाही."
"काय?" अग्रज उडालाच. "मायकपाळ मध्ये खजिना आहे?"
"होय. मी तुला तो दाखवेनच. पण तो मूळ खजिन्याचा एक अंशमात्र आहे. १८१८ मध्ये माझे पणजोबा मुधोजीराव जहागीरदार येथले सर्वेसर्वा होते. त्या काळात खजिना लुटण्याचा एक असफल प्रयत्न झाला. असे सांगतात कि तेव्हा खबरदारी म्हणून मुधोजीरावांनी तो खजिना अनेक तुकड्यांमध्ये विभागून ठिकठिकाणी लपविला व फक्त एक हिस्सा मूळ गुप्त जागी ठेवला. ती जागा अजूनही सुरक्षित आहे पण एक खबरदारी. पण त्यांचे निधन तसे अकालीच झाले आणि त्या उर्वरित खजिन्याची माहिती आम्हा वारसांना पूर्णपणे मिळू शकली नाही. त्यांनी सोडलेले काही दस्तावेज आहेत पण ते सांकेतिक भाषेत आहेत. प्रतापला यात रस नाही व त्याचे वडील आता या जगात नाही. म्हणून खजिना शोधू इच्छिणारा शेवटचा जहागीरदार म्हणून मी तुझी मदत मागतो."
अग्रज आता तीन ताड उडाला होता. "पण यात मी काय मदत करु शकतो?"
"असे म्हणतात मुधोजीरावांनी एका गणित्याची मदत घेतली होती कारण त्यांचा विश्वास होता की गणिती कोडी चोरांना समजणारच नाहीत तर ते सोडवतील कसे? तू देखील गणितीच आहेस. प्रताप जेव्हा मला म्हणाला की त्याचा एक मित्र गणिती आहे तेव्हा मला तो दैवी संकेतच वाटला. मला विश्वास वाटतो की तूच हे काम करु शकशील."
"आजोबा. हे सर्व माझ्यासाठी धक्कादायक आहे. पण तरीही मी विचार करेन. याखेरीज मी आत्ताच काही आश्वासन देऊ शकत नाही."
"ठीक आहे बेटा. सद्यस्थितीत एवढे पुरेसे आहे. येतो मी. चांगली वामकुक्षी घे."
दार लोटता लोटता जहागीरदारांनी अग्रजच्या चेहर्‍याकडे पाहिले. तो गहन विचारात गढला होता.
आणि अग्रजचे सांगायचे तर त्याला द अ‍ॅडव्हेंचर ऑफ मसग्रेव्ह रिचुअल आठवत होती.
~*~*~*~*~*~

लांबून पाहता गर्द झाडींनी वेढलेला तो जंगलाचाच एक हिस्सा वाटत होता. दुरुन कोणालाही तिथे शिलाहारकालीन भग्नावशेष आहेत हे सांगूनही पटले नसते. भग्नता त्या वास्तूचे पावित्र्य घालवते हेच खरे. मग अशा पडक्या, ओसाड जागा यातर दंतकथांचा हिस्सा बनतात किंवा दरोडेखोरांचे आश्रयस्थान! तो कोण दुर्दैवी ज्याच्या मुसक्या वळून त्याला तिथे नेले जात होते. लवकरच तो त्या दरोडेखोरांच्या प्रमुखासमोर होता.
"दुर्जन..." त्या मनुष्याची ततपप होत होती.
दगडावर एक काळा कभिन्न माणूस उभा होता. खिशातून तपकिरीची चांदीची डबी बाहेर काढून त्याने चिमूटभर तपकीर नाकात कोंबली व एक जोरदार शिंक दिली - ऑक् छू! वा मझा आला.
"क्युं तुकोजी? पकडले गेलातच ना?"
तुकोजीची बोबडी वळली होती. त्याला जेव्हा घरातून रातोरात उचलले गेले तेव्हाच खरेतर त्याल काय वाढून ठेवले आहे हे दिसले होते.
"तुकोजी गोर्‍यांकडे अमाप पैसा आहे. त्याची हाव बाळगावी, कोन न्हाई म्हनत न्हाई. पर तो मिळवण्याची पर येक पद्धत आसते. तो आपुन लुटण्यासाठी हाय. दौलतराव नाईकांसारखी माणसे पद्धत बरुबर वापरायची पर त्येंच्या ह्ये ध्यानात येईना कि तो आपल्यासाठी पैका असतो वाटण्यासाठी न्हाई. आता जर हे तत्त्व दुर्जन बरोबर वापरत असेल तर त्यात दुर्जनचा काय दोष?"
"आक्षी बरुबर सरकार"
"मग आपल्या सरकारशी दगाबाजी करुन इंग्रजाला खबर देताना कुटे गेली होती अक्कल? इठोबाचे पाय चेपायला? फार दुखत असतील न्हाई इतक्या शतकांपासून विटेवर उभा त्यो. म्हनल घे माही अक्कल तुहे पाय चेपून दील." आजूबाजूच्या दरोडेखोरांमध्ये खसखस पिकली.
"सरकार पुन्यांदा न्हाई होणार. पुन्यांदा माही जीभ न्हाई रेटणार."
"आक्षी बरुबर पुन्यांदा तुही जीभ न्हाई रेटणार कारण ती राहणारच न्हाई. धरा रं याला"
तुकोजीची जीभ दुर्जनने ओढून धरली. अचानक दुर्जनच्या हाती अचानक एक गुप्ती आली आणि क्षणार्धात तिचे पाते आडवे फिरले. तो गुलाबी लिबलिबीत तुकडा दुर्जनने २-३ क्षण न्याहाळला. तुकोजी वेदनांनी तडफडत पडला होता. तो तुकडा फेकून देत दुर्जन म्हणाला - याच्या मुसक्या आवळा आणि द्या फेकून तरसांमध्ये आज मेजवानी मिळाल्यावर रडतील तरी कमी.
तो तसाच एका पडक्या इमारतीत घुसला. समोर महाकालाची कराल मूर्ती होती. त्याने मूर्तीला रक्ताचा तिलक केला. "हे महाकाला! आता सर्व तयार्‍या पूर्ण झाल्या. गद्दाराला सजा द्यायचे कामही पूर्ण झाले. आता लक्ष्य फक्त मायकपाळात दडलेला तो खजिना व जहागीरदार. पुन्हा एकदा तिथल्या खर्‍या दैवताची म्हणजे तुझी स्थापना करेल हा खरा मायाकापालिक!"

क्रमशः

ऐतिहासिक टीपा - हा भाग पुरेसा काल्पनिक आहे त्यामुळे टीपा नसतील असे वाटले होते. पण निघाल्याच शिंच्या - इति शाम Happy होम्स कथा १८८६ पासून सुरु झाल्या. साईन ऑफ फोर १८९० ची आणि मसग्रेव्ह रिचुअल १८९३ ची. आता त्या १८९६-९७ मध्ये भारतात पोचल्या असाव्यात हे मानून चालतोय त्यामुळे तेवढी तडजोड आपण करावी. मसग्रेव्ह रिचुअल मध्येही होम्स त्याच्या मित्राचे एक खजिना शोध टाईप्स गूढ उलगडतो अर्थात तिथे अघोर वगैरे इतर भानगडी नाहीत. ती कथा आवर्जून वाचा, स्वतः डॉईलची ती अत्यंत आवडती कथा होती. चालुक्य हे एक दक्षिण भारतीय साम्राज्य होते. ७व्या व ८व्या शतकात महाराष्ट्र ते कन्याकुमारी अशा संपूर्ण दक्षिण भारतावर त्यांची अधिसत्ता होती. चालुक्यांना आपण पुन्हा पुढच्या भागांमध्ये भेट देणार आहोत. त्यामुळे जे गेसवर्क करत आहेत त्यांनी चालुक्य शोध सुरु करायला हरकत नाही Happy

पुढील कथा येथे - http://www.maayboli.com/node/52505

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast

फार रंगत चालली आहे कथा! तुमच्या टीपा एकदम मनातल्या शंकांचे योग्य निरसन करणाऱ्या असतात!

नाही बुवा. स्पेसिफिक अशा कुठल्याच कथेचा संदर्भ नाही. टिपिकल खजिनाशोध कथा आहे म्हणून कदाचित वाटत असेल. किंवा कदाचित पूर्वी मी केलेल्या वाचनाचा अनवधानाने शैलीवर प्रभाव पडला असेल.