न्यूनतेला पूर्णता करतेस तू

Submitted by जयदीप. on 20 January, 2015 - 23:47

न्यूनतेला पूर्णता करतेस तू
मी कमी पडतो तिथे असतेस तू

शांत सगळी वादळे करतेस तू
हात माझा ज्या क्षणी धरतेस तू

सांग ना नक्की कुठे लपतेस तू
मारतो मी हाक अन् सुचतेस तू

सांग हे करणे कसे जमते तुला -
पाहतो जेव्हा फुले, दिसतेस तू ...

बोलके तर माैनही असते तुझे
पाहतो डोळ्यात अन् कळतेस तू

काळजी माझी किती रस्त्यासही
वाट माझी केवढी बघतेस तू...

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व शेर आवडले शेवटाकडे जातो तसे शेर अधिक उत्तम होत गेल्याचे एक जाणवले
पहिल्या दोन शेरात उला आणि सानीची अदलाबदल करून पाहिली आणि व्यक्तिशः मला जास्त मजा आली

धन्यवाद

गझलेपेक्षा गीत वाटले. ही रचना गायनानुकुल आहे. मात्र गझलेच्या शेरांंमध्ये अधिक खोली असावी किंवा निदान अर्थाकडे जाताना एखादी भरारी घेतल्यासारखे रसिकाला वाटावे अशी अपेक्षा (मी तरी) ठेवतो.

न्यूनतेला पूर्णता करतेस तू
मी कमी पडतो तिथे असतेस तू

दोन्ही ओळींत साधारण एकच गोष्ट सांगितल्यासारखे आणि त्यामुळे पहिल्या ओळीचे फक्त उदाहरण दुसर्‍या ओळीत दिल्यासारखे झाले आहे. किंवा पहिली ओळ वाचल्यानंतर 'म्हणजे काय' असे कोणी विचारले तर त्याचे उत्तर म्हणजे दुसरी ओळ, असे झाल्यासारखे वाटत आहे. ह्याऐवजी 'मी जिथे असतो तिथे असतेस तू' असे केले असते तर 'मी म्हणजे न्यूनता' आणि 'तू म्हणजे पूर्णता' हा अर्थ गझलेच्या शैलीत पुढे आला असता असे वाटते. विस्तृतपणे तुमच्या गझलेवर लिहिण्याची माझी पहिलीच वेळ आहे तेव्हा कृपया मोठ्या मनाने माफ करावेत. दुरुस्त्या सुचवायचा मोह समजू नयेत, चर्चा व्हावी.

शांत सगळी वादळे करतेस तू
हात माझा ज्या क्षणी धरतेस तू <<< ठीक

सांग ना नक्की कुठे लपतेस तू
मारतो मी हाक अन् सुचतेस तू<<<

सुचल्याशिवाय हाक कशी मारता येईल? ही आशयाशी निगडीत तांत्रिक बाब आहे (गझलतंत्राशी निगडीत नव्हे). तसेच, 'ती नक्की कुठे लपते' ह्या प्रश्नाशी 'तिला हाक मारली की ती सुचते' ह्याचा अर्थानुसारे राबता लक्षात आला नाही. 'प्रभावी समारोप' ही एकमेव अट दुसर्‍या ओळीत पालावी असा (माझा तरी) आग्रह नाही, पण राबता स्वच्छ यायला हवा.

सांग हे करणे कसे जमते तुला -
पाहतो जेव्हा फुले, दिसतेस तू ...<<< शेर सपक झालेला आहे.

बोलके तर माैनही असते तुझे
पाहतो डोळ्यात अन् कळतेस तू

मौनाला बोलके म्हणणे हे खरे तर आता खूप जुने झाले आहे, पण म्हणून ते गझलेत येऊ नये असे म्हणण्याचा कोणाला अधिकारही नाहीच. पण हाही शेर सपक झालेला आहे. उदाहरणार्थ, ह्या ओळी उलट्यापालट्या (जमीन बदलेल हे माहीत आहे) करून शेर वाचला तरी तोच अर्थ निघत आहे. तसेच आधीच्या (दिसतेस तू) ह्या शेरातही होत आहे.

काळजी माझी किती रस्त्यासही
वाट माझी केवढी बघतेस तू...<<<

एक तर रस्त्यासही मधील 'ही' चा संदर्भ स्पष्ट होत नाही आहे. त्यानंतर, जर रस्त्यास काळजी असली तर ती वाट बघते ह्याचा काय संबंध, असे मनात येते.

गझल रचताना शेर अधिकाधिक खोल व्हायला हवा असे माझे मत!

चु भु द्या घ्या

विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद बेफिजी.

न्यूनतेला पूर्णता करतेस तू
मी कमी पडतो तिथे असतेस तू

न्यून म्हणजे कमी, त्याला पूर्ण करायचं असल्यास खूप भर घालावी लागते. उल्यात सांगितलं आहे की न्यूनतेची तू पूर्णता करतेस. पण सानी मध्ये तुझा वाटा मोठा आहे असे सांगितले आहे.

शांत सगळी वादळे करतेस तू
हात माझा ज्या क्षणी धरतेस तू

तू माझ्यासोबत असल्याचा दिलासा (माझा हात पकडून) जेव्हा देतेस त्या क्षणी माझ्या मनातली वादळे शांत होतात. तोवर मला भिती वाटत असते.

सांग ना नक्की कुठे लपतेस तू
मारतो मी हाक अन् सुचतेस तू

मी तुला शोधायला गेलो तर सापडत नाहीस. म्हणून उल्यात म्हणालो आहे - सांग ना नक्की कुठे लपतेस तू
पण मी जेव्हा तुला हाक मारतो (जेव्हा असे काही प्रसंग येतात की मनातले लिहावेसे वाटते) तेव्हा माझी हाक ऎकून तू लगेच सुचतेस (हा शेर obviously गझलेसाठी लिहिला आहे)

सांग हे करणे कसे जमते तुला -
पाहतो जेव्हा फुले, दिसतेस तू ...

हा शेर दोन्ही अर्थाने वाचू शकतो. उपहासात्मकही आहे.

बोलके तर माैनही असते तुझे
पाहतो डोळ्यात अन् कळतेस तू

तू बोलकी आहेस, पण तू गप्प बसलीस तरीही तुझे माैन बोलत राहते, तुझ्या डोळ्यात मी ते वाचू शकतो

काळजी माझी किती रस्त्यासही
वाट माझी केवढी बघतेस तू...

वाट : रस्ता, ही चा संदर्भ : तुझ्याबरोबरच रस्त्यालाही माझी काळजी आहे, कारण मी सुखरूप घरी येईन ना हे तो बघतो आहे, कारण तुझ्या वाट (रस्ता) पाहण्यातली आर्तता त्याने बघितली आहे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद! बहुधा तुम्हाला असे वाटत आहे की मी शेरांचा अर्थ विचारला आहे. असो!

तुमच्या प्रतिसादाची शेवटची ओळः

>>>तुझ्याबरोबरच रस्त्यालाही माझी काळजी आहे, कारण मी सुखरूप घरी येईन ना हे तो बघतो आहे, कारण तुझ्या वाट (रस्ता) पाहण्यातली आर्तता त्याने बघितली आहे<<<

हा खयाल चांगला आहे. मात्र तो त्या शब्दरचनेत व्यवस्थित बसलेला नाही आहे.

बेफिजी, तुमच्या प्रतिसादाने माझ्या मनात गझलेबद्दल अनेक मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत.
वेळ मिळाला की सविस्तर लिहीन.
धन्यवाद