विसरले वाट परतीची

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 January, 2015 - 09:14

नको जावूस या फसव्या हवेच्या वाहण्यावरती
खरा उद्देश कळतो वादळाने गाठल्यावरती

उन्हाची धग उरी डोळ्यात अख्खा पावसाळा अन
धुके दाटे तिच्या न्हाणीघरातिल आरश्यावरती

फुले चाखून मोहाची विसरले वाट परतीची
कसे पाऊल घ्यावे सांग मागे टाकल्यावरती

जसे निष्पर्ण फांदीवर उमलते फूल चाफ़्याचे
तसे बहरून ये तू पानगळ चेकाळल्यावरती

पुरावा काय द्यावा काळजाला काळजी याची
धुराचा लोट ना ही राख उड़ते जाळल्यावरती

नव्याने रोज जो करतो गुन्हे स्वीकारण्यासाठी
अश्या कृष्णास राधे काय शिक्षा भेटल्यावरती

फुलांच्या पाकळ्या कालांतरे गळणार हे नक्की
वहीमध्ये जरी गंधाळती त्या वाळल्यावरती

हव्या त्या माणसाचांही भुईला भार व्हावा ना...
नको त्या माणसांनी विश्व अवघे व्यापल्यावरती

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उन्हाची धग उरी डोळ्यात अख्खा पावसाळा अन
धुके दाटे तिच्या न्हाणीघरातिल आरश्यावरती<<< वा वा, वेगळाच

जसे निष्पर्ण फांदीवर उमलते फूल चाफ़्याचे
तसे बहरून ये तू पानगळ चेकाळल्यावरती<<< वा

मतलाही छान आहे.

तिसर्‍या शेरात फुलाचा राबता लक्षात आला नाही.

>>>तिसर्‍या शेरात फुलाचा राबता लक्षात आला नाही.<<<

आदिवासी भागात मोहाच्या झाडाच्या फुलांपासून दारू बनवतात, आदिवासी बायका आपल्या लहान मुलांनी कामात सारखा व्यत्यय आणू नये म्हणून त्यांना मोहाची फुले चाखवतात जेणे करून मुले त्या अंमलाखाली राहतील व त्रास देणार नाहीत. Happy

धन्यवाद !

-सुप्रिया.

बेफीजींसोबतच्या आपल्या चर्चेमुळे एक दोन शंका आपोआप निरसल्या
गझल आवडली काफियांमुळे येणारी जमीनीची मजा मस्तय
सगळे शेर आवडले
दोन बदल मला व्यक्तिशः करावेसे वाटले
१-शेर पहिला ओळ पहिली : देवूस ऐवजी देऊस हा शब्द जरा सॉफ्ट वाटावे म्हणून
२- शेर ३ ओळ दुसरी : कसे पाऊल मागे सांग घेऊ टाकल्यावरती / कसे घेऊच मागे सांग पाउल ..टाकल्यावरती असे सुलभतेसाठी (मागे टाकल्यावरती अश्या शब्दक्रमामुळे पाऊल मागे टाकणे असा अर्थ ध्वनित होत आहे )

सुंदर

उन्हाची धग उरी डोळ्यात अख्खा पावसाळा अन
धुके दाटे तिच्या न्हाणीघरातिल आरश्यावरती<<<वाहवा!!!
अन आता मोहाच्या फुलाबद्दल...माझी२००८च्या साहित्य या दिवाली अंकात एक झाडान्ची कविता आहे .त्यात मी पण
मोहाचा श्लेष वापरलाय.ती शंकर वैद्य सरांची आवडती कविता होती .झाडे हा माझा खुप जिव्हाळ्याचा विषय आहे ..... पानगळ चेकाळल्यावरती<<काय मस्त सुचलय तुम्हाला.....

वै व कु आपल्या सुचनांबद्दल खुप खुप आभार पण आपण बदललेली ओळ मला सहज वाटत नाहीय तितकीशी, देऊस बद्दल विचार करतेय.

भुईकमळ अरे वा !

धन्यवाद सगळ्यांचे

सुप्रिया.

वाह वाह सुप्रियाताई मस्तच.
शेर क्रमांक दोन आणि शेवटचा शेर खूपच आवडले. जियो.

नको जावूस या फसव्या हवेच्या वाहण्यावरती
खरा उद्देश कळतो वादळाने गाठल्यावरती

उन्हाची धग उरी डोळ्यात अख्खा पावसाळा अन
धुके दाटे तिच्या न्हाणीघरातिल आरश्यावरती

हव्या त्या माणसाचांही भुईला भार व्हावा ना...
नको त्या माणसांनी विश्व अवघे व्यापल्यावरती

वाह! फार आवडले. त्यातही शेवट विशेष .