हसले समोर, मागे दावून जात गेले

Submitted by बाळ पाटील on 15 January, 2015 - 06:38

हसले समोर, मागे दावून जात गेले
माझीच जीभ माझे तोडून दात गेले

जळता मही उन्हाने येते भरू नभाला
अपवाद हे असे की पेरून वात गेले

साथीस पाखरेही जातात सावजाच्या
ज्यांना दिली अवेळी दावून हात गेले

मी चाचपून घेतो माझ्या नसानसांना
नात्यातलेच सारे घडवून घात गेले

इतिहास आठवावा आपल्याच पूर्वजांचा
एका तिळास येथे खावून सात गेले
-- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान, फार आवडली.:स्मित:

मी चाचपून घेतो माझ्या नसानसांना
नात्यातलेच सारे घडवून घात गेले

इतिहास आठवावा आपल्याच पूर्वजांचा
एका तिळास येथे खावून सात गेले>>>>क्या बात है!

रश्मीजी धन्यवाद ! मकरर्संक्रातीच्या दिनी गझलेच्या शेवट्च्या ओळीतील तीळ अपण गोड करून घेतलात.

इतिहास आठवावा आपल्याच पूर्वजांचा
एका तिळास येथे खावून सात गेले

छान.
वृत्तासाठी अपुल्याच करावे लागेल.

माझीच जीभ माझे तोडून दात गेले
भयानक कल्पना आहे. थोड्या सोप्या जमीनी घ्याल.

माझ्या मते (इतर संकेत स्थळांवर वाचलेले तुमचे प्रतिसाद बघून) तुमचा गझलेचा चांगलाच अभ्यास आहे
निदान तुमचे प्रतिसाद वाचून तसे जाणवले.

त्यामानाने तुम्ही लिहिलेली ही गझल आणि या आधीचीही गझल तुम्ही जितके चांगले लिहू शकता त्याच्या १% वाटली

तुमचा अभ्यास चांगला वाटतो, तुमच्यात लेखन प्रतिभा खूप आहे असे वाटते
आधी तंत्राकडे नीट लक्ष द्यावेत असे वाटले, मात्रांच्या चुका असू नयेत
वरील रचनेत राबता (दोन मिसर्यांमधील अर्थ जोडणारा दुवा) कमी जाणवतो

तुम्हाला मार्गदर्शन करायला मी काही तज्ञ वगैरे नाही, पण ह्या इनपुट्स मुळे तुम्हाला फायदा होईल असे वाटते
मला जी इनपुट्स मिळाली, ती फक्त मी पुढे केली तुमच्या

धन्यवाद

पुलेशु

कृपया गैरसमज करून घेऊ नका माझ्या वरील प्रतिसादाचा, माझे प्रांजळ मत नोंदवले इतकेच.

तोडून जीभ माझी माझेच ... दात ...गेले , अस सुलभपणा आणता येइल असे वाटते

अरेच्या ही गझल जुल्काफिया आहे होय !!!! बर बर !

असो

सर्वांनाच धन्यवाद !
समीरजी, सूचनेबद्द्ल धन्यवाद. आपण म्हणाला तशी कल्पना भयानक आहे तथापि काव्यातील नवरसापैकी ती एक असल्याने वावगे वाटले नाही.
वैभवजी , पहीले तीन शेर तितकेसे समजले नाहीत असे आपण म्हणालात. मी मला अभिप्रेत असलेला अर्थ ,एक शेर उलगडून
साथीस पाखरेही जातात सावजाच्या
ज्यांना दिली अवेळी दावून हात गेले

मतल्यातील मझे दात म्हणजे माझी जवळ्ची, मला दगा देणारी माणसे ! त्याच अनुशंगाने पुढे आलेल्या या शेरात तो सांगतो की पारधी शिकार करताना सावजाच्या मागावर असतो तेव्हा पाखरे त्या सावजास सावध करतात, ज्यांचा त्या सावजाशी कसलाच अनुबंध नसतो. पण ही माणसे मात्र अपवादात्मक वागतात ,संकटात हात देण्याऐवजी हात दाखवतात.
धन्यवाद!
जयदीपजी धन्यवाद ! आपल्या सूचना योग्यच आहेत . मला जाण आहे... आताशा कुठे किनार्यावरील वाळू पायाखालून सरकते आहे. सागराचं गंभीर्य , गहनता फार दूरची बाब आहे माझ्यासाठी ! फार मोठी अपेक्षा ठेवताय माझ्याकडून ! वाटतं, माझ्याबद्द्लच्या गैरसमजापोटी बोलताय की काय! आपली प्रतिक्रीया प्रेरकंच ठरेल मला. पुनश्च धन्यवाद !!

अर्थ लक्षात घेण्याचा प्रत्यत्न करत आहे आय मीन दोन ओळीतला राबता .
पहिल्या तीन शेराना जे व्यक्त करायचे आहे ते चौथ्याने केले आहे की मग ते तीन शेर ; जे लक्षातही येत नाहीयेत लवकर ते नसते तर चालले असते

साथीस पाखरेही जातात सावजाच्या
ज्यांना दिली अवेळी दावून हात गेले

ह्यात तुम्ही जी कथा सांगताय तिच्यातला पारधी शेरात दिसत नाहीयेय की ...! बर पहिली ओळ पाखरे सावजाच्या साथीला म्हणजे मदतीला जातात असे सांगते हे लक्षात घेतले (त्यातही 'ही' भरीचा व अर्थाचा भ्रम वाढवणारा ) तरी पुढची ओळ समारोपासाठी निरर्थक अशी वाटते आहे . ज्याना दिली म्हणताना कोणाला दिली आणि काय दिली हा प्रश्न पडतो पुढे अवेळी हा शब्द अवेळीशात दवून जाणे अश्या अर्थासाठी असल्याचे लक्षातही येत नाही

असे करा म्हणजे असे करण्याचा विचार करून बघा

मदतीस पाखरे जी आलीत पारध्याच्या
त्यांच्यामुळेच सावज दावून हात गेले

ह्यातदेखील आशय नेमकेपणे उमटत नसला तरी कथा समजते आहे व्यवस्थीत

आपल्याला आधी खयाल (चिंतन )नेमके आणि व्यवस्थित करून मग शेर रचता येत असतील तर आपला अन्वय आधी कागदावर दोन एक ओळीत व्यवस्थित मांडता येइल अश्यारिते गद्यात लिहा मग त्या लिहिलेल्यातून नेमके शब्द जे वृत्तात बसवता येतील ते निवडून सोपेपणाने निदान कथासूत्र वाचकाना समजेल असे लिहिण्याचा प्रयत्न करू शकता

धन्यवाद

गझल तंत्रशुद्ध असावी व शेरांचा शब्दार्थ सहज भिडण्याजोगा असावा. Happy

आपणांस अनेक शुभेच्छा!

त्याच अनुशंगाने पुढे आलेल्या या शेरात << असा एकाच्या अनुशंगाने पुढचा शेर गझलेत सहसा करायचा नसतो म्हणजे विषय तोच असला तरी आशय बदलावा म्हणतात व ही गझलेच्या निराळेपणाची एक खूणच आहे म्हणा हवेतर

Happy

बेफिकीरजी, धन्यवाद ! आपण म्हणता तसा प्रयत्न करतो आहे.
वैभवजी ,मला नाही वाटत ही गझल समजण्यास तितकिशी अवघड ! तरिही बघू , पूढच्या खेपेला प्रयत्न करून.

>>>यात तुम्ही जी कथा सांगताय तिच्यातला पारधी शेरात दिसत नाहीयेय की ...! बर पहिली ओळ पाखरे सावजाच्या साथीला म्हणजे मदतीला जातात असे सांगते हे लक्षात घेतले (त्यातही 'ही' भरीचा व अर्थाचा भ्रम वाढवणारा ) तरी पुढची ओळ समारोपासाठी निरर्थक अशी वाटते आहे . ज्याना दिली म्हणताना कोणाला दिली आणि काय दिली हा प्रश्न पडतो पुढे अवेळी हा शब्द अवेळीशात दवून जाणे अश्या अर्थासाठी असल्याचे लक्षातही येत नाही>>>
आपण म्हणता तशी ही कथा जरूर नाही. मला इतकेच सांगायचे होते की सावजाला जशी पाखरी काहीही सबंध नसताना मदत करतात तसा माणसे माणसांना करत नाहीत. पाखरेही या शब्दातील ही हा शब्द पाखरेअसूनदेखिल या अर्थाने अभिप्रेत होता.मग ही तर माणसे आहेत, माझी जवळची माणसे ! ती मला दगा देतात.

आपण म्हणता तशी ही कथा जरूर नाही.<<< बरं सॉरी
आय थिंक मला तुम्हाला सांगताना माझी सांगण्याची पद्धत बदलावी लागेल म्हणजे तुम्हाला माझे म्हणणे समजेल्तरी
पटेल न पाटेल तो भाग वेगळा

असो