मी असेन ..

Submitted by भारती.. on 15 January, 2015 - 04:48

मी असेन.. (तूणक वृत्त )

श्वास खोल आर्त ओळ मंत्र घालते जिवा
मी असेन तोच अर्थ जो तुला हवा हवा

नृत्यमग्न शिल्पभग्न मुग्ध अप्सरा कुणी
मी असेन ती तुझीच स्वप्नलीन पापणी

वर्दळीत पावसात थार वाहना नसे
मी असेन त्या क्षणात गीत गात मुक्तसे

मालवेल कालवेल गारवा जळीस्थळी
मी असेन प्राणस्रोत उष्णज्योत आतली

अविश्रांत श्रांतक्लांत तू उदास जाणुनी
मी असेन एक सत्व शांततत्त्व जीवनी

दूर त्या पुलावरून जायचे तुला कळे
मी असेन ओतप्रोत बिंबचिंबली जळे..

-भारती बिर्जे डिग्गीकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा.. .किती तरल! शब्दात मावत नाही अशी कविता आहे.

<<अविश्रांत श्रांतक्लांत तू उदास जाणुनी
मी असेन एक सत्व शांततत्त्व जीवनी << क्लासच !! Happy

हो खरंच. आवडली रचना. योजलेली एकेक शब्दरूपं देखणी आहेत.

एखाद्यानं खांद्यावर मान टेकून डोळे मिटून आयुष्याच्या अंतापर्यंत अगदी निवांत निश्चिंत व्हावं इतका सुरेख आश्वासक टोन झिरपतोय ओळीओळीतून.

अप्रतिम! वळण अन् वळण उठावदार... सुंदर आकृतीबद्ध रचना. वाचता वाचताच काळजाला कळत उलगडत जाणारा हवाहवासा आश्वासक सूर...
वाचूनच हेवा वाटू लागला 'त्या' कुणाचातरी....

खूपच छान.
परत परत वाचावीशी वाटतेय. कवितेतल्या शब्दामुळे आणि एकदा समजलेल्या अर्थच खरा आहे का काही वेगळंच आहे ते बघायला. एकाच ओळीचे परिस्थिती, अनुभव इ नुसार किती वेगवेगळे अर्थ निघू शकतील ते बघायला आवडतं आणि तुमच्या कवितेत ते हमखास सापडतं . धन्यवाद.
वरचं लिहिलं आणि परत पाहिलं कडवं वाचलं आणि हसू आलं. Happy

शब्द आणि त्यातून व्यक्त होणार्‍या नेमक्या जाणीवा ...खूप आवडले
बिंबचिंबली < ग्रेट !!
आता अर्थासाठी सावकाश एक एक द्विपदी उकलत उकलत वाचावे म्हणतोय

धन्यवाद

बिंबचिंबली जळे..>>>>> एकदम भारी ताई.

काव्यलेखन मध्ये तुमच्या नावाची कविता बघितली आणि मनातल्या मनात "येस्स! भारतीताईंची कविता" असं म्हणत ह्या धाग्यावर टिकली मारली. सुंदर कविता!
कविता पुन्हा पुन्हा वाचली. जेव्हा जेव्हा वाचली तेव्हा तेव्हा संगीत आठवलं! असं वाटलं की आपलं रागसंगीतच असं म्हणतय की बाबा काय काळजी करतोस काहीही झालं तरी केव्हाही आणि कुठेही तुला हवं असेल ते मी देतोच की! अगदी आनंदी कल्याणापासुन अश्रुतुन वाहणार्‍या तोडी पर्यंत आणि वादळी मल्हारापासुन ते उदास मारव्यापर्यंत!!अगदी पहिल्या कडव्यातल्या "मी असेन" पासुन शेवटच्या कडव्यातल्या "मी असेन" पर्यंत जणु संगीतच बोलतय असं वाटलं! अर्थात ह्या कवितेचा तसा अर्थ नक्कीच नसणार, पण मला ती अशी भावली! वर अमितव यांनी म्हटल्याप्रमाणे कवितेतुन नेहमी वेगवेगळे अर्थ निघु शकतात, त्यात हा मला भावलेला अर्थ!

कवयित्रीच्या कवित्वशक्तीचा मोहक विलास "मी असेन" मधून प्रतिबिंबित होताना दिसतो. भारती जेव्हा काव्यरचना करते त्यातील प्रत्येक ओळीत जो मुलायमपणा उतरतो त्याचा वाचनानुभव घेताना मन हरखून जाते.
श्वास, आर्त ओळ मंत्र, नृत्यमग्न शिल्पभग्न मुग्ध अप्सरा स्वप्नलीन पापणी वर्दळी थार वाहना, मालवेल कालवेल गारवा अविश्रांत श्रांतक्लांत तू उदास जाणुनी ओतप्रोत बिंबचिंबली जळे.....शब्दांची ही अनोखी जादू केवळ सुटी अशी वाचत गेलो तरीही ते आपली पकड कायम ठेवतात. आशय आणि अभिव्यक्ती यांचा इतका गोड मिलाफ़...तो या रचनेत वाचकाला आकर्षून घेतो...वाटते यातील सारे भाव मूर्तिमान बनले आहेत...."मी असेन" चा ताल असा काही धरला गेला आहे, जो प्रत्येक ओळीनंतर भोवती फ़ेर धरत आहे. हे सारे फ़ार लोभसवाणे आहे. "बिंबचिंबली"....कुठून स्मरली ही अवस्था भारती ? केवळ याच्या उगमाबाबत विशेष जाणावे असे वाटत आहेत. कोमल आणि आश्वासक तत्त्वावर भारतीचा गाढा विश्वास दिसून येतो "मी असेन" मधून. मला वाटते कवयित्री सातत्याने आशेच्या छायेत कालक्रमणा करणे उचित मानते...जे योग्यच आहे.

हे सुंदर प्रतिसाद पुन: एकदा कवितेच्या उगमाबद्दल , अर्थविस्ताराबद्दल कुतूहल व्यक्त करत आहेत , मला पुन: एकदा बोलतं करत आहेत.
कुलु, >>अगदी पहिल्या कडव्यातल्या "मी असेन" पासुन शेवटच्या कडव्यातल्या "मी असेन" पर्यंत जणु संगीतच बोलतय असं वाटलं! अर्थात ह्या कवितेचा तसा अर्थ नक्कीच नसणार, पण मला ती अशी भावली! वर अमितव यांनी म्हटल्याप्रमाणे कवितेतुन नेहमी वेगवेगळे अर्थ निघु शकतात, त्यात हा मला भावलेला अर्थ!>>

कवितेचं एक सगुण असतं एक निर्गुण. ती सगळ्यांची होते तेव्हा खूप विस्तारत जाते .सत्कृतदर्शनी ही एक प्रेयसी आपल्या प्रिय व्यक्तीला आश्वस्त करते आहे.. ''मी आहे ना !'' जगण्यातले सुखाचे, दु:खाचे, प्रीतीचे विरहाचे क्षण रंगगंधअर्थ यांनी भारून टाकायला .
पण आतून ही माझी कविताच मला धीर देते आहे ,''मी असेन ! नेहमीच तुझ्याबरोबर.जगण्यातली कोंडी ( वर्दळीत पावसात थार वाहना नसे- एक चिरपरिचित अवस्था) , निरर्थकता फोडून तुला वाहतं करायला !''

म्हणून कुलु, तुला भावलेला अर्थ तितकाच खरा आहे,तुझं संगीत तुला हेच आश्वासन देतं आहे.

अशोक,>> "बिंबचिंबली"....कुठून स्मरली ही अवस्था भारती ? केवळ याच्या उगमाबाबत विशेष जाणावे असे वाटत आहे >> नेणिवेतून येतात ही चित्रं अशोक, तिथे तर कसलातरी कारखानाच चालू असतो !
दूर त्या पुलावरून जायचे तुला कळे
मी असेन ओतप्रोत बिंबचिंबली जळे..
पुलावरून पलीकडे जाणारं एक प्रेमाचं माणूस , त्याला निरोप देणारी ती, आणि मग हे चित्र अर्थांचे रंग भरून गडद होत जातं. तो पूल संवादाचा तर नाही ? ज्यावरून तो आला होता आणि आता परत जातो आहे ? मग हे प्रतिबिंबांनी झगमगणारं पाणी म्हणजेच ती असं तिला वाटतं आहे. कारण ती अशाच अंधारणाऱ्या वेळी ओतप्रोत प्रकाशमान भावनांनी समृद्ध होऊन निरोप देते आहे ..
- आता व्यक्तिगत संदर्भ या प्रतिमेमागचा- ही बिंबचिंबली जळे घरालगतच दिसतात, म्हणून कवितेत कधीतरी येतात. इथे आठवतेय ‘’ना समुद्रपक्षी आले वाऱ्यावर गाज विराली |तो तृषार्त सागर आहे माझ्याच घराच्या खाली| पण रात्र साठता येथे चेटूक दिव्यांचे घडते |लाटांच्या वैराग्याशी बिंबांची ओळ झगडते ‘’!

पहिल्यान्दा ही कविता वाचली तेव्हा वाटल ,आपल्या आतील अद्रुश्य चैतन्यधारा किवा पालवती प्रतिभाच ती असणार. पण शेवट्च्या कडव्यापाशी पोचले तेव्हा वेगळाच अर्थ जाणवला प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर भेटणारी विश्वाधार असलेली ही जीवन स्वप्नाचे आभासी कवडसे पाडणारी माया असेल .
मघाशी भारतीताईन्चे विवेचन वाचले तेव्हा समोर आणखी वेगळाच भाव पट उलगडत गेला . हे सर्व अमुर्त चित्रा सारखेच मला वाटतय चित्र काढते वेळी चित्रकाराच्या मनातील भाव वेगळे आणि पहाणाराच्या नजरेत उमटलेले रंगावकाश वेगळेच .
कविता नेहमी प्रमाणेच उत्कट , नादमधुर शब्दलळा लावणारी सुंदर अनुभुती.

उत्तम... खूप आवडली. शब्द आणि अर्थ खूपच आवडला. तुम्ही आणि ईतरानी रसग्रहण ही आवडले. तुमच्या कठीण शब्दाना घेउन नादमय कविता करण्याच्या हातोटीस प्रणाम!

केवळ <<मी असेन ती तुझीच स्वप्नलीन पापणी>> ही उपमा तेवधी चपखल नाही असे वाटले. अर्थात व्यक्तीगत आवडीमुळे असेल असे वाटते.

भारती.....

फार मोहवून टाकत आहे तुझी ही "मी....असेन" म्हणणारी कुणीतरी आशेचा दीप तेवत ठेवणारी. नैराश्येची काळोखी तिच्या मनीरंध्री वसली नसेल का ? नक्कीच, कारण तो तर जीवनाचा अटळ असा घटक होत असतोच, तरीही "...एक सत्व शांततत्त्व जीवनी...." अंगीकारलेली ती देवयानी विरूद्ध दिशा असूनही थकल्याचे जाणवत नाही. हे फार फार आश्वासक आहे..."..मी असेन ओतप्रोत बिंबचिंबली जळे.." योजनेमागील तुझी भूमिका अगत्यपूर्वक तू इथे दिलीस त्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार....मला त्याची आवश्यकता वाटत होती.

....आणि तुझ्या रेखीव मांडणी सौंदर्याबद्दल तर किती लिहावे आणि किती बोलावे हेच मोठे कोडे झाले आहे. गंगाधर गाडगीळ यानी मागे एकदा इंदिरा संत यांच्या कवितेच्या शैली प्रभावाचे "हस्तीदंती तुकड्यावरचे कोरीव काम" असे वर्णन केले होते, ते आठवले.... तुझ्या कविताही याच चित्रमय शैलीमुळे मराठी काव्याचे भूषण ठरतील यात संदेह नाही.

भारतीताई फार सुंदर कविता आणि त्यावरचे अनेकांचे प्रतिसाद आणि त्यावर तुमचे विवेचन सर्वच सुरेख.

मला असं शब्दात नाही सांगता येत पण खरंच तुम्हाला ___/\___.

परत कविता आणि प्रतिसाद वाचायला मात्र येणार.

अशक्य सुंदर कविता आहे!

मालवेल कालवेल गारवा जळीस्थळी
मी असेन प्राणस्रोत उष्णज्योत आतली

अविश्रांत श्रांतक्लांत तू उदास जाणुनी
मी असेन एक सत्व शांततत्त्व जीवनी

___/\___

वा वा वा! काय सुरेख कविता! सर्वांच्या प्रतिसादातून आणि भारती ताईंच्या विवेचनातून इतके विविध अर्थ उलगडत आहेत! मी तर लयबद्ध शब्दांच्या जादूतच अडकून पडले! पण इतकी सुंदर कविता वाचल्यावर जे वाटते त्यावरून माझ्यासाठी ह्या कवितेतली मी म्हणजे जीवाभावाची कविताच! भारती ताई, a big thank you ह्या कवितेसाठी Happy

माझी मु लगी कविता करते इंग्रजीतून. तिला अभ्यास म्हणून वाचून दाखवली समजावली कविता. तुमचे शब्द वैभव टेरिफिक आहे. मुलीला सांगताना तुमच्या लेखनाला अति दुर्मीळ अति सुरेख चायनीज सिल्क ची उपमा दिली. रिच भरत काम केलेले.

तुमची पुस्तके घ्यायची आहेत कुठे मिळतील. येथील सर्व तिला वाचून समजावत आहे. सौंदर्य स्थळे उलगडून दाखवितानाही फार आनंद मिळतो आहे. ऑडिओ बुक बनवून आयट्यून्स वर ठेवा. नक्की चांगला प्रतिसाद मिळेल.

अमा, क्या बात है! उपमा काय सुंदर वापरलीत Happy

भारतीताई, कवितेचं उलगडून दाखवणंही सुरेख. आभार तरी कितीदा मानायचे तुमचे Happy

प्रत्येकाचं नाव घेऊन मी आभार मानते आहे इथे Happy , इतकं प्रेम कविता मिळवून देते, जी माझी असूनही माझी नाही तर ईश्वरी देणगी आहे , मी माध्यममात्र.
अमा, तुमच्या शब्दांनी अक्षरशः काटा आला अंगावर. माझ्या लेखनाबद्दल थोडं लिहिते इथे,माझा एकच कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे , ''मध्यान्ह'', मौज प्रकाशन, २००६. ( मौजच्या साइटवर आहे, मागवता येईल ) मध्यान्ह मधली कविता ( तेव्हाच्या माझ्यासारखीच Happy ) खूप अंतर्मुख आहे , भरपूर पद्य आणि मुक्तच्छ्न्द आहे त्यात , पण वृत्तबद्ध कविता मी गेल्या दीड वर्षातच लिहिते आहे. माझा पुढचा संग्रह ''निळाई'' ज्यात वृत्तबद्ध, पद्यबद्ध आणि मुक्तच्छ्न्द कविता समप्रमाणात असतील सध्या प्रोसेसमध्ये आहे, तो आला की अवश्यच कळवेन. एक ई-पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे गेल्या वर्षी आलं,' रस-सिंधु' , ते मायबोलीवरील रसग्रहणात्मक लेखांचंच आहे . तुमची आय-ट्युन्सची कल्पना खूप सुंदर आहे, पाहू कसं जमेल ते !

भारती...

दोन काव्यसंग्रहाबद्दल लिहिले आहेसच...छान माहिती मिळेल इथल्या तुझ्या प्रशंसकांना....त्याचबरोबर 'ना समुद्रपक्षी आले' ही तुझी कविता श्री. मिलिंद मधुसूदन सोमण यांनी तितक्याच तोलामोलाच्या सुंदर संगीताने स्वरबद्ध केलीय आणि यू ट्युबवर अवतरलीही आहे....त्याबद्दलही तूच इथे सविस्तर माहिती द्यावीस सदस्यांना...असे मला अगत्यपूर्वक वाटते.

अशोक, >>'ना समुद्रपक्षी आले' ही तुझी कविता श्री. मिलिंद मधुसूदन सोमण यांनी तितक्याच तोलामोलाच्या सुंदर संगीताने स्वरबद्ध केलीय आणि यू ट्युबवर अवतरलीही आहे....त्याबद्दलही तूच इथे सविस्तर माहिती द्यावीस सदस्यांना...>>
- खऱ्याखुऱ्या निरपेक्ष जिव्हाळ्यातूनच हे सुचू शकतं, ही लिंक इथे देतेय मी. हे सोमण माझे ऑफिसमधील तत्कालीन सहकारी अधिकारी, मिसो नव्हेत Happy
https://www.youtube.com/watch?v=2sr52KOfh6k

@ सुसुकु, 'स्वप्नलीन पापणी '' या शब्दांबद्दल लिहायचा मोह होतो आहे. या कवितेने हे सुंदर शब्द मला दिले. स्वप्नात विलीन झालेली किंवा स्वप्नभाराने जड ( लीन ) झालेली पापणी - प्रेयसी ही प्रियकराच्या मनातलीच एक कल्पना असते खरं तर , एक भग्न पुरातन गूढ कमनीय शिल्पाकृती.. ती मीच , असं सांगत आहेत या ओळी.
इथे पुन्हा कवी गिरीराज किराडू यांच्या या ओळी आठवत आहेत -
और ठीक इसी छवि में मैंने तुम्हे पाया है सदैव--आईने के भीतर,
बहुत भीतर जहाँ तुम स्वयं को रखती हो--इस संसार से दूर, बहुत दूर
फ़िर क्यूं आई हो ऐसे अपने आप को मिथ्या करते हुए..

Pages