"हर मोडपें दिल घबरायें.. सजना तेरे बिना.."

Submitted by अनुराधा म्हापणकर on 13 January, 2015 - 06:20

परवाच कुठूनतरी रिक्षातून घरी परतत होते. बोरिवली स्टेशनच्या ट्राफिकमधे कुठल्याही वेळी साधं चालायलाही नको इतकी गर्दी असते. चालणारा माणूस मागून येऊन पुढे निघून जाईल इतक्या संथगतीने वाट काढत माझी रिक्षा इंच इंचभर पुढे सरकत होती. पण तरीही आजूबाजूची दुकानं, रस्त्यावरचे असंख्य फेरीवाले, त्यांच्याकडची रसरशीत फळं, रंगीत फुलं, हिरव्यागार भाज्या, फुलांचे भरगच्च हार, गजरे, चादरी, साडी कव्हर्स, सोफा कव्हर्स, पर्सेस, पाऊच्स, ड्रेसेस काय नी काय बघण्यात माझं स्त्री सुलभ मन नेहमी प्रमाणेच गुंतलं होतं. चालत दोन-पाच मिनिटांइतक्या अंतरावर रिक्षाचं मीटर कधी दोनदा पुढे सरकलं तेही मला लक्षात आलं नाही. अंडरग्राऊन्ड सबवे हा आपल्यासाठी नसतोच, अशी ठाम समजूत बाळगणारी असंख्य माणसं रस्त्यावर कसोशीने सरकणा-या गाड्यांसमोर जीव द्यावा तशी क्रॊसिन्गला उड्या मारत होती.

अशाच भाऊगर्दीत माझी नजर खिळली ती एका जोडप्यावर ! छान सजलं नटलेलं ते जोडपं ! डिझायनर साडीतून डोकावणारा कोपरापर्यंतच्या फिकटल्या मेंदीचा तिचा हात ! तोही जरा टिपटॊप कपड्यात ! दोघेही मस्त स्मार्ट होते. नक्कीच नुकतचं लग्न झालं होतं. म्हणजे कदाचित हनिमून संपवून नुकतेच दोघं परतले असावेत आणि ऒफिसमधे रुजू व्हायच्या आधीचे त्यांचे दिवस असावेत. सरपटणा-या गाड्यांच्या ताफ्यातून दोघं रस्ता ओलांडत होती. माझ्या रेंगाळलेल्या रिक्षाच्या समोरुन दोघांनी क्रॊस केला. निरागस भाव चेह-यावर आणत तिने जणू स्वत:ला त्याच्याकडे सोपावलं होतं. आणि आपण हात धरला नाही तर ती कुठेतरी हरवेल किंवा कुठली तरी गाडी तिला निर्दयपणे धडक मारेल असे भाव त्याच्या चेह-यावर दाटले होते. जीव एकवटून दाही दिशांनी तो तिला जपत होता. त्याचे दोन्ही हात तिच्यात गुंतले होते आणि डोळ्यात अजिजी आणून माझ्या रिक्षावाल्याला हळूच थांबण्याची आर्जवे तो करत होता.

मला फार म्हणजे फारच गम्मत वाटली. आमचं लग्न झालं, तेव्हाचे नव्या नवलाईचे दिवस आठवले. गर्दीत रस्त्यात ट्रेन बस मधे जपणारे नव-याचे ते प्रेमळ हात आणि नजर आठवली. कसे फुलपाखरासारखे दिवस असतात नाही ते.. तेव्हा मी नरीमन पॊईन्टला नोकरी करायचे. चर्चगेट स्टेशन वर गाडी प्लॆटफॊर्मवर शिरताना उडी मारुन खिडकी (तीही ठरलेली) पकडायचा आमचा रोजचा एक ग्रुप होता. त्यानंतर उतरतानाही चार स्टेशन आधी उभं राहून रेटारेटी करत आपलं स्थान निर्माण करायचं, हे रोजच्या सवयीचं ! तरीही लग्न झाल्यावर नव्या दिवसांत जेव्हा जेव्हा नव-यासोबत प्रवास करायची वेळ यायची तेव्हा मात्र जणू "लोकल ट्रेन" किंवा "बेस्टची बस" मी पहिल्यांदाच पाहिली असल्यासारखे स्वत:ला पूर्णपणे त्याच्या हाती सोपवून देत असे. तो हात धरुन गाडीत चढवायचा, उतरवायचा. सगळ्यांत मजेशीर म्हणजे गाडीत - बसमधे उभं असताना "मी" म्हणजे फक्त त्याची आणि त्याचीच प्रॊपर्ट्री असल्यासारखा कुणाचा साधा धक्काही लागू नये म्हणून सगळे धक्के स्वत:वर झेलत मला जपत राहायचा. त्याचा पुरुषी बाणा आणि माझा स्रीसुलभ दुबळेपणा(?) तेव्हा उफाळून येई. शंभर एक भित्रे ससे डोळ्यात दाटून आल्याच्या भावनेनं त्याच्या स्वाधीन होताना वेगळीच गुलाबी मखमली भावना असायची. रस्त्याने चालतानाही मी जणू खेड्यातून आले आहे, मुंबईच्या ह्या भाऊ गर्दीत मी प्रथमच पाय ठेवला आहे आणि त्याने हात सोडला की मी कायमची हरवून जाईन अशा प्रकारे तो माझा आणि मी त्याचा हात घट्ट धरत असू. आणि हद्द म्हणजे जन्मल्या पासून लग्नापर्यंतची तेवीस चोवीस वर्षं या इथं मुंबईतच गेलेली असताना चार पावलंही एकटीने चालता येणार नाही अशा भावनाने मी त्याच्यावर पूर्ण विसंबून जात असे. त्याकाळी नवीन नवीन रीलीज झालेल्या "जुदाई" सिनेमातल्या श्रीदेवीची "हर मोडपें दिल घबरायें, सजना तेरे बिना" ही ओळ माझ्यासाठीच लिहिलीय की काय असं वाटायचं तेव्हा..

कसे दिवस असतात ते नव्या नवलाईचे… ! लग्नात संसारात मुरता मुरता हळू हळू हात हातातून वेगळे होतात. कामात गुंततात.. मुलांमधे अडकतात. आपले हात मुलांच्या इवल्या हातांना जपू लागतात. आणि मग एक दिवस मुलंही मोठी होऊन स्वतंत्रपणे आपले रस्ते शोधतात. घराबाहेर पडताना प्रत्येकाच्याच वाटा आणि अस्तित्त्वं स्वतंत्र होऊन जातात.

वेग पकडत रिक्षावाला म्हणाला "आगेसे राईट लेना है क्या मॆडम" ? मी भानावर आले. पर्समधे मोबाइलही वाजत होता. नव-याची रिंगटोन ! "अग किती उशीर.. आणि फोन का उचलत नव्हतीस किती वेळ ? तीनदा केला मी.. ! व्हॊट्सअपपण पाहिलं नाहीयेस किती वेळ".. तो काकुळतीला येऊन बोलत राहिला. म्हटलं "आलेच" ! मनात म्हटलं.. हं…. तोच नवरा…. ! बायकोनं फोन उचलला नाही म्हणून किती घायकुतीला आलाय..! हात सोडला म्हणून काय झालं..? काळजी "व्यक्त" करायची स्टाइल त्याने बदलली फक्त.. !

https://www.facebook.com/anuradha.mhapankar
अनुराधा म्हापणकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेखन ! त्या क्षणाचे विचार अतिशय सुंदर रित्या लिहले आहेत.

अजुन काय लिहु ? लिहीत रहा ! लिहीत रहा !लिहीत रहा !लिहीत रहा !

<< हात सोडला म्हणून काय झालं..? काळजी "व्यक्त" करायची स्टाइल त्याने बदलली फक्त.. !>> मस्त...

खूपच मस्त लिहिलंय. भाऊगर्दित तुम्ही पण स्वतःला त्याच्यावर सोपवायला विसरलात त्याची आठवण पण करून द्या स्वतःला. तुमचे गुलाबी दिवस पुन्हा फिरून येऊ देत. Happy
शुभेच्छा.

मस्तच

Thanks a lot.....

एकदम प्रवाही लेखन.
गंमत वाटली वाचून.

आम्ही म्हणजे फियर्सली इंडीपेंडंट. रस्ता क्रॉस करताना हात धरला तर 'ग्रो अप' असा कटाक्ष मिळेल याची खात्रीच.

हा लेख वचून खरच गंमत वाटली. Happy
रस्ता क्रॉस करताना जर चूकून नवर्याने हात पकडलाच तर 'मी काय गावावारून नाही आले आहे' असे भाव माझ्या चेहर्यावर यायचे...बाकी एकत्र चालताना हात पकडून फिरणे वैगरे ठिक आहे पण मला क्रॉस करताना , ट्रेन मधे चढताना त्याने जर हात वैगरे दिला तर उगीच मलाच माझा अपमान Wink वैगरे वाटतो

Pages