वेदनांचा अंत होता आसवे ढाळीत आलो

Submitted by बाळ पाटील on 13 January, 2015 - 00:48

वेदनांचा अंत होता आसवे ढाळीत आलो
बंगला सोडून तेथे अन पुन्हा चाळीत आलो

आसवांचा जो पुजारी त्या सुखाने भाळतो का !
सांडली ना आसवे तो प्रांतही टाळीत आलो

पाहिले मी रंगलेले, दंगलेले, झिंगलेले
पेटण्याआधी चितेची लाकडे जाळीत आलो

तावल्यावाचून लोहाचे कसे पोलाद व्हावे !
ऐरणीची प्रेमभावे पाठ कुर्वाळीत आलो

गारगोटी ही तरीही अष्टपैलू रत्न झाले
शब्द माझ्या माउलीचे मी सदा पाळीत आलो
-- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन बाळजी आपण आज मायबोलीवर आपली रचना घेवून आलात त्याबद्दल

खयाल आहेत आपल्याकडे चांगले . ओळी अधिक प्रवाही एकसंध करण्याकडे आणि बोलक्या करण्याकडे कल ठेवा दोन ओळीतला परस्पर संबंध सहसा सहज लक्षात यावा अश्या रितीने प्रयत्न करा आपली गझल अधिक छन होईल

आपल्या मायबोली अकाउंटच्या 'माझे सदस्यत्व' ह्या विभागात 'माझी विचारपूस' हा भाग असतो त्यात अधिक काय ते लिहीन म्हणतो तिथे भेट द्या प्लीज

असो
सर्व शुभेच्छा Happy

टाईप करायला मला वेळ लागतो आजच्या आज आपल्या 'विचारपूस'मधे काही देवू शकेन असे वाटत नाही आहे लागल्यास फोनच करीन मी
धन्यवाद

काही ओळी आवडल्या.
तावल्यावाचून लोहाचे कसे पोलाद व्हावे
काही शब्दप्रयोग गझलेच्या प्रकृतीला न मानवणारे ठरावे:
गा सुखाचे काय त्याला
चांगल्या ओळी ते चांगले शेर ते चांगली गझल असा प्रवास सातत्याने प्रयत्न केलेत तर शक्य आहे.
मनापासून शुभेच्छा.

धन्यवाद समीरजी ! गझल हा प्रकार तसा नव्यानेच हाताळ्तो आहे. आपल्या प्रेमळ सूचना निश्चीतंच मदतीला येतील.