पिंपरीची बस, प्रेमशास्त्र आणि मै प्रेम की दीवानी हूं।

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 8 January, 2015 - 02:56

१. पिंपरीची बस - त्या काळी पुण्यात पीएमपीएमएल ऐवजी पिंपरी-चिंचवड (पीसीएमटी) व पुणे (पीएमटी) महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या बस सेवा होत्या. कोणी कुठल्या भागात सेवा द्यायची याबद्दलचे काही नियम होते. पुणे महानगरपालिकेच्या पुणेस्टेशन परिसरात पीसीएमटी ला प्रवासी भरण्यास मुभा होती परंतु पुणे मनपा परिसरात येथे पीसीएमटीला परवानगी नव्हती. तसेच पीएमटीला निगडीच्या मुख्य चौकात तसेच पुढे जकातनाका, सोमाटणे फाटा, तळेगाव या भागापर्यंत प्रवासी वाहतुकीस परवानगी होती परंतु पिंपरी चिंचवड नवनगर (निगडी-प्राधिकरण), मासूळकर कॉलनी, पिंपरी गांव, वडगांव अशा काही भागांमध्ये पीएमटीला परवानगी नव्हती. तिथे जायचे तर पीसीएमटीतूनच जावे लागे. थोडक्यात काय तर तुमचे प्रवासाचे अंतिम इच्छित स्थळ काय असेल त्याप्रमाणे तुम्हाला पीएमटी की पीसीएमटी हा पर्याय निवडावा लागे. तसेच पीएमटी व पीसीएमटी हे दोन्ही पर्याय देखील एकाच ठिकाणी उपलब्ध असतील असे नाही. म्हणजे बघा, जर मी अहमदनगराहून एसटीचा प्रवास करून पुण्याला येत आहे तर ती एसटी बस पुण्यात पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर या दोन ठिकाणी थांबत असे. जर मी शिवाजीनगर येथे उतरलो तर मग मला तिथून १.२५ किमी अंतर पायी अथवा तीन आसनी रिक्षाने जाऊन मनपा भवन येथून निगडी करिता पीएमटी पकडावी लागे. निगडी येथून प्राधिकरणातले माझे घर १.६ किमी अंतरावर, म्हणजे मला हे अंतर देखील पायी अथवा तीन आसनी रिक्षाने पार करावे लागे. दुसरा पर्याय असा की एसटी बस मधून पुणे स्टेशन येथे उतरून पाऊण किमी अंतर पायी अथवा तीन आसनी रिक्षाने पार करून साधू वासवानी चौकातील शालीमार हॉटेलजवळून प्राधिकरणात जाणारी पीसीएमटी बस पकडणे. तिथून पुन्हा अर्धा किमी अंतर पायी अथवा तीन आसनी रिक्षाने पार करून माझ्या घरी पोचता येई. वरवर पाहता दुसरा पर्याय जास्त आकर्षक वाटत असला तरी त्यात काही अडचणी होत्या. त्या अडचणींचे मूळ पिंपरी-चिंचवड परिवहन महामंडळ (पीसीएमटी) ची आर्थिक ताकद पुणे परिवहन महामंडळाच्या आर्थिक ताकदी पेक्षा कमी असण्यात होते. पीसीएमटी कडे बसेसची कमतरता असल्यामुळे साधू वासवानी चौकात बसची वाट पाहण्यात फार वेळ जाई तसेच बसथांब्यावर उन्हाचा त्रास देखील जास्त होत असे. याउलट पीएमटी कडे बसेसची विपुलता असल्याने मनपाभवन येथे पटापट बस मिळत असे. अर्थात पीएमटीला प्रवाशांची गर्दी देखील बरीच जास्त असे. तसेच पीएमटी बस प्रवासाच्या पर्यायात जास्त अंतर पायी चालावे लागत असल्याने (तीन आसनी रिक्षाचा खर्च परवडण्यासारखा नसे) आम्ही शक्यतो पीसीएमटीचाच पर्याय निवडत असू.

तर असाच मी एकदा मे १९८५ मध्ये अहमदनगराहून एसटीने प्रवास करून पुणे स्टेशन येथे उतरलो होतो. तिथून पिंपरी चिंचवड नवनगरातल्या (निगडी-प्राधिकरण) आमच्या घरी येण्याकरिता स्थानिक बस धरण्याकरिता साधू वासवानी चौकातील शालीमार हॉटेलसमोर थांबलो होतो. बराच वेळ वाट पाहूनही प्राधिकरणाची बस काही आली नव्हती. दुपारच्या उन्हाचा फारच त्रास होऊ लागला होता. शेजारीच एका झाडाच्या सावलीत पिंपरीगांवची दुमजली (डबलडेकर) बस थांबली होती. बसथांब्यावरचे प्रवासी हळूहळू त्या बसमध्ये जाऊन बसू लागले. मी देखील सावलीच्या आशेने त्या बसमध्ये खालच्या डेकवर एका चांगल्याशा आसनावर जाऊन बसलो. थोड्या वेळाने वाहक (कंडक्टर) येऊन तिकिटाविषयी विचारणा करू लागला. प्राधिकरणाला जाणारी बस अजूनही दिसत नसल्याने इतर अनेकांप्रमाणे मी देखील पिंपरीचे तिकीट काढले. पाचच मिनिटांत बसथांब्यावर प्राधिकरणाची बस आली. माझ्यासह अनेक प्रवासी पिंपरीगांवच्या बसमधून उतरून प्राधिकरणच्या दुमजली बसमध्ये शिरले. आम्ही सर्वच प्रवासी वाहकाला पिंपरीपासून पुढे प्राधिकरणापर्यंतचे वाढीव तिकीट मागू लागलो. यावर वाहकाने साफ नकार दिला. त्याचे म्हणणे असे की, इथून जर या बसचे तिकीट हवे असेल तर पुणेस्टेशन ते प्राधिकरण असे संपूर्ण तिकीट घ्यावे लागेल शिवाय आधी काढलेले पुणेस्टेशन ते पिंपरी हे तिकीट देखील रद्द होणार नाहीच. यावर सर्वच प्रवाशांनी आम्हाला प्राधिकरणातच जायचे होते परंतु बराच वेळ वाट पाहूनदेखील बस न आल्याने आम्ही पिंपरीगांवच्या बसमध्ये नाईलाजाने शिरल्याचे व पिंपरीचे तिकीट काढल्याचे सांगितले. त्यावर वाहकाने हसत हसत ही वस्तुस्थिती त्यास ठाऊक असल्याचे सांगितले. त्याने आम्हाला खुलासा केला तो असा की, पीसीएमटी प्रशासनाने पुणेस्टेशन ते प्राधिकरण आणि पुणेस्टेशन ते पिंपरीगाव अशा दोन दुमजली बसेस सुरू केल्या परंतु पिंपरीगावच्या बसला अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याने ती बंद करायची वेळ आली होती. याउलट प्राधिकरण च्या बसला बऱ्यापैकी प्रवासी प्रतिसाद होता. याचे कारण असे की, पीएमटीची बस प्राधिकरणात जात नसल्याने प्राधिकरणातील प्रवाशांना पीसीएमटीखेरीज पर्यायच नव्हता. परंतु पिंपरीगावच्या बसला प्रतिसाद मिळण्याचे असे काही कारण नव्हते. एक तर पिंपरीगाव हे पिंपरी चौकापासून फार लांब नव्हते त्यामुळे तिथले प्रवासी पीएमटीने पिंपरीपर्यंत जात व तेथून पायी आपल्या इच्छित स्थळी जात. शिवाय वाकडेवाडी, खडकी, दापोडी, कासारवाडी असे अधलेमधले प्रवासी देखील पीएमटीलाच आपली पसंती देत कारण पीएमटीच्या बसेसची असलेली विपुलता. तर अशा प्रकारे पिंपरीगावच्या बसला असलेला तोकडा प्रवासी प्रतिसाद भरून काढण्यासाठी या वाहकांनी आधी पिंपरीगावची बस थांब्याजवळ आणून उभी केली आणि बराच वेळानंतर जेव्हा त्यात पुरेसे प्रवासी भरले गेले आणि त्यांची तिकिटेदेखील काढली गेली तेव्हा हळुच प्राधिकरणाची बस थांब्याजवळ आणली. वाहकांच्या या खेळीमुळे आम्ही सर्व प्रवासी चिडलो आणि दोन्ही वाहकांशी वादविवाद करू लागलो तेव्हा त्यांनी आम्हाला समजावले की हे असे करावे लागणे हा त्यांचाही नाईलाज होता. त्यामुळे आता ते दोन्ही बसेस सोबतच जाऊ देतील. पिंपरी चौकात आम्ही उतरून बस बदलू शकतो व पुढे आम्हाला तिथून प्राधिकरणापर्यंतचे तिकीट घेऊन प्रवास करता येईल. शेवटी चरफडत आम्ही सर्व प्रवासी पिंपरीगावच्या बसमध्ये बसलो आणि त्या वाहकांच्या योजनेप्रमाणे पिंपरी चौकात बस बदलून वाढीव तिकीट घेत प्रवास पूर्ण केला.

*****

२. प्रेमशास्त्र (१९७४) - सागर (देव आनंद) एक लेखक असतो. तो आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या नीलिमाच्या (बिंदू) प्रेमात पडून तिच्याशी लग्न करतो. परंतु काही काळातच त्याचा भ्रमनिरास होतो. त्या दोघांच्या जीवनपद्धती पूर्णतः वेगळ्या असल्याचे आणि त्यांचे सहजीवन यशस्वी होऊ शकत नसल्याचे त्याच्या लक्षात येते. तो पत्नी पासून विभक्त होण्याचे ठरवतो. त्यावर पत्नी त्याला सुचविते की लगेचच कायद्याने विभक्त व्हायची अशी काय गरज आहे? आपल्या दोघांपैकी कुणाला एकालाही जर कधी तिसऱ्या कुणात रस वाटला तर आपण लगेच कायदेशीर घटस्फोट घेऊ आणि एकमेकांना मुक्त करू. तोवर आपण समाजात दाखवायला पती-पत्नी म्हणून तरी वावरू शकतो. सागरला हा प्रस्ताव मान्य होतो व त्याप्रमाणे तो नीलिमासोबत केवळ दिखावू कायदेशीर नाते चालू ठेवतो. काही काळाने त्याच्या आयुष्यात त्याच्या पेक्षा बारा वर्षांनी लहान तरुणी बरखा (झीनत अमान) येते. तो तिच्या प्रेमात पडतो. तिच्याशी लग्न करायचे ठरवतो आणि त्याप्रमाणे स्वतःला मुक्त करून घेण्याकरिता पत्नी नीलिमाला विनंती करतो. परंतु नीलिमा त्याला सांगते की बरखा ही तिची आधीच्या संबंधातून झालेली मुलगी आहे. इतकेच नव्हे तर बरखाचा बाप हा सागर सख्खा मोठा भाऊ (अभि भट्टाचार्य) आहे. तेव्हा सागरला कायद्यानुसार स्वतःच्या सावत्र मुली सोबत (जी नात्याने त्याची सख्खी पुतणीदेखील आहे) लग्न करता येणार नाही.

ही वस्तुस्थिती ऐकून सागर अतिशय निराश होतो. परंतु बरखावरील त्याचे प्रेम त्याला स्वस्थ बसू देत नाही. आधी तो आपल्या मोठ्या भावाच्या पूर्वायुष्याविषयी माहिती घेतो आणि त्याला खात्री होते की बरखा ही त्याच्या भावाची मुलगी नाही. त्यामुळे बरखासोबत असलेले त्याचे काका-पुतणीचे नाते आपोआपच संपुष्टात येऊन लग्नातला एक मोठा कायदेशीर अडथळा दूर होतो. आता लग्नातला दुसरा मोठा अडथळा असतो तो म्हणजे नीलिमा सागरला त्या दोघांच्या विवाहबंधनातून मुक्त करायला तयार नसते आणि तिसरा अजून एक अडथळा असतो तो म्हणजे बरखाचे नीलिमासोबत असलेले मुलगी-आई हे नाते. बरखाची आई असल्याने नीलिमा ह्या विवाहाला संमती देत नसते. तेव्हा बरखाचा बाप कोण आहे व त्याची संमती आपण मिळवू या दिशेने शोध घेत असता सागरला आढळते की बरखाचा बाप म्हणजे नीलिमाचा पूर्व पती (रेहमान) याने नीलिमाला कधीच घटस्फोट दिलेला नसतो. फक्त त्यांच्यातील मतभेदांमुळे ते एकमेकांपासून दूर राहत असतात. त्याचप्रमाणे नीलिमाने बरखाला लहानपणीच शालेय शिक्षणाकरिता स्वतःपासून दूर ठेवलेले असते. तेव्हा नीलिमाच्या नकळत बरखाचा पिता आपल्या खऱ्याखुऱ्या मुलीला स्वतःकडे घेऊन येतो आणि तिच्या जागी दुसऱ्याच मुलीला ठेवतो. नीलिमा आपल्या मुलीला थेट मोठेपणीच पाहत असल्याने तिला हा बदल कळत नाही.

सागर पुढे न्यायालयात हे सिद्ध करतो त्याला जिच्यासोबत लग्न करायचे आहे ती (झीनत अमान) ही नीलिमाची खरी मुलगी नसून खरी मुलगी (अंजू महेंद्रु) ही आहे. तसेच नीलिमाचा पूर्वपतीपासून कधीच घटस्फोट झालेला नसल्याने सागर आणि नीलिमाचा विवाह हादेखील आपोआपच रद्द ठरतो. अशा प्रकारे मार्गातले सर्व कायदेशीर अडथळे दूर होऊन सागर व बरखा एकत्र येतात. दिग्दर्शक बी. आर. इशारा यांच्या दाव्यानुसार हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.

*****

३. मै प्रेम की दीवानी हूं (२००३) - संजना (करीना कपूर) एक पदवीधर तरुणी. तिची परदेशस्थ बहीण तिच्या आईवडीलांना (हिमानी शिवपुरी व पंकज कपूर) सुचविते की त्यांच्या माहितीतला एक तरुण प्रेम भारतात त्यांच्या गावी येणार आहे. हा एक घरंदाज व श्रीमंत तरुण असल्याने त्याच्यासोबत संजनाचा विवाह जुळविण्याकरिता प्रयत्न करावेत. ठरल्याप्रमाणे प्रेम भारतात येतो. तो संजनाच्या प्रेमात पडावा व त्याकरिता त्यांच्यात जवळीक व्हावी अशी पुरेपूर व्यवस्था संजनाची आई करते. सुरुवातीला संजना प्रेम सोबत तुटक वागते. परंतु जसजसे ते एकमेकांसोबत अधिक वेळ घालवतात तसतसे तिच्या लक्षात येते की ती त्याच्यात मनाने गुंतत जात आहे.

पुन्हा काही दिवसांनी संजनाच्या बहिणीचा आईवडीलांना निरोप येतो की तिने सुचविलेला प्रेम म्हणजे प्रेम कुमार (अभिषेक बच्चन) भारतात पोचलेलाच नसतो तर त्याऐवजी त्यांचा एक सहाय्यक असलेला प्रेम किशन (हृतिक रोशन) भारतात आलेला असतो. प्रेमकुमार आगामी काळात भारत येणार असतो. यानंतर संजनाची आई आता प्रेम कुमारच्या आगमनाची प्रतीक्षा करू लागते. तिला आता संजनाचा विवाह प्रेम किशन ऐवजी प्रेम कुमार सोबत जुळवायचा असतो. यथावकाश प्रेम कुमारचे आगमन होते. आधी जो सन्मान, आदर, जिव्हाळा संजनाच्या आईकडून प्रेम किशन ला मिळालेला असतो तो आता प्रेम कुमारला मिळू लागतो. संजनाची आई पदोपदी प्रेम किशनचा अपमान करू लागते, त्याला फटकारते, संजनापासून दूर ठेवायचा प्रयत्न करते. संजना व तिचे वडील हे सर्व पाहून व्यथित होतात परंतु असाहाय्यपणे पाहत बसण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत. तर भोळ्याभाबड्या प्रेमकिशनला हे समजतच नाही. तो आपल्याच नादात असतो. इकडे आईच्या योजनेप्रमाणे संजना आणि प्रेम कुमार हे एकमेकांच्या सहवासात येतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की त्या दोघांच्या आवडीनिवडी, त्यांच्या आवडीनिवडी यांच्यात कमालीचे साम्य आहे. यामुळे प्रेम कुमार ला संजना फारच आवडते. परंतु संजनाची मोठीच अडचण होते कारण ती प्रेमकुमारला नकार देणार तरी कशी? तो सर्वच दृष्टीने योग्य वर असतो आणि मुख्य म्हणजे तिला अगदी अनुरूप असतो प्रेम किशन पेक्षाही जास्त आणि तेही कैक पटीने. पण... टाइमिंग हा घटक फार महत्त्वाचा. प्रेम किशनचा प्रवेश आधी झालेला असतो आणि सर्वार्थाने तो संजनाच्या मनात वसू लागलेला असतो.

जर प्रेम कुमार आधी प्रवेश करता तर किंवा अगदी एकाच वेळी प्रेमकुमार व प्रेमकिशन सामोरे आले असते तरीही प्रेमकुमारचीच निवड ठरलेली होती परंतु संजनाच्या जीवनात प्रेमकिशनचाच प्रवेश आधी झाला असल्याने प्रेमकुमार हा सर्वार्थाने बेटरचॉईस असला तरीही अंतर्मनाचा आवाज ऐकत संजना प्रेमकिशनलाच आपला जीवनसाथी म्हणून निवडते. प्रेमकुमार हे समजून घेतो तर संजनाच्या आईला ही वस्तुस्थिती तिचे वडील समजावतात.

*****

अनेकदा आपल्या आयुष्यात निर्णय घेईपर्यंत आपल्यासमोर दुसरा पर्याय नसतो परंतु एकदा निर्णय घेऊन झाल्यावर कधी कधी दुसरा आकर्षक पर्याय समोर येतो. दरेक वेळी निर्णय घेऊन झाल्यावर तो पुन्हा बदलणे हे एका बसमध्ये घाईघाईने चढल्यावर दुसरी अधिक सोयीची बस दिसते आहे म्हणून पुन्हा तितक्याच घाईघाईने पहिल्या बस मधून उतरून दुसऱ्या बसमध्ये चढण्याइतके सहज सोपे नसते. आपली बस चुकली हे मान्य करूनही निदान काही अंतर तरी चुकीच्या बसमधून प्रवास करीत पुढे जावे लागते. पिंपरीगावची बस बदलून प्राधिकरणाची बस धरण्याच्या घटनेत हा कालावधी तासाभराचा असू शकतो तर प्रेमशास्त्र चित्रपटातील नायक सागरच्या आयुष्यात जोडीदार बदलण्याकरिता त्याला वाट पाहावी लागण्याच्या प्रसंगात हा कालावधी अनेक वर्षांचा देखील असतो. याहून भिन्न म्हणजे आपली निवड सर्वोत्तम नसली तरीही जी निवड आता आपण केली आहे त्यात भावनिक गुंतवणूक असल्याने हीच निवड आपल्या आयुष्यभराकरिता आहे हे मानून अन्य पर्यायांचा विचारच बाजूला ठेवणे अशी वेळ देखील मै प्रेम की दीवानी हूं मध्ये दाखविले आहे त्याप्रमाणे होऊ शकते.

शिवाय आपल्या आयुष्याची मर्यादा देखील आपल्या ह्या निर्णय बदलण्याच्या सवयीवर मोठा परिणाम करून जाते. लहानपणी कपडेखरेदीला पालकांसोबत दुकानात गेलेली मुले आधी एक पोशाख पसंत करतात. इतक्यात दुकानदाराने दुसरा आकर्षक पोशाख समोर आणला म्हणजे पहिला टाकून दुसरा निवडतात. त्या टप्प्यापर्यंत ते ठीक देखील असते पण एकदा बिलाची रक्कम देऊन दुकानाबाहेर निघाल्यावर जर शोकेसमध्ये अजून कुठला आकर्षक पोषाख दिसला तर फक्त मनातल्या मनात कुढत बसण्याखेरीज काहीच करता येत नाही. हॉटेलात गेल्यावर खाण्याचे मेन्यू किंवा आइसक्रीमचा फ्लेवर निवडतानाही असे अनेकदा होते पण त्यात फारशी हळहळ होत नाही कारण पोटात जागा असली तर आधीची निवड संपवून नवीन पर्याय देखील पुन्हा मागविता येतो, किंवा मग पुढच्या वेळी आपली ऑर्डर त्यानुसार नोंदविता येते. पुढे महाविद्यालयात प्रवेश घेताना असाच गोंधळ उडतो. दहावीनंतर बारावीला पीसीबी आणि पीसीएम दोन्ही ग्रुप असू द्यायचे. आधी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी यापैकी ज्या शाखेच्या प्रवेशाची प्रक्रिया आधी पार पाडली जाईल तिकडे प्रवेश घ्यायचा मग आपली आवड ज्यात असेल तिकडच्या प्रवेश प्रक्रियेत मनाजोगते काम झाले की आधीचा प्रवेश रद्द करायचा असा उपद्व्याप अनेक विद्यार्थी करत असतातच. तसेच एखाद्या शाखेला प्रवेश घेतला आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर व्यावसायिक संधी तिकडे कमी आढळल्या की पश्चात्ताप करणारेही अनेक जण भेटतात.

पहिली कार / बाइक खरेदी करताना देखील अनेकांचा असाच गोंधळ उडतो. अनेकदा आपण खरेदी केल्यावर आपल्याला आवडेल असे मॉडेल बाजारात येते. जर एकच कंपनी असेल तर काहीवेळा अपग्रेड करून देतात देखील. आम्ही १९८७ साली कायनेटिक होंडा ही स्कूटर खरेदी केली तेव्हा ती फक्त लाल व निळ्या ह्या दोनच रंगात उपलब्ध असल्याने आम्ही निळ्या रंगात घेतली. पुढे सहा महिन्यात तिच्यात पांढरा व चंदेरी हे दोन पर्याय अजून उपलब्ध झाले. आधीच्या ग्राहकांना कंपनीने फुकट रंग बदलून देण्याची सुविधा ठेवली म्हणून आम्ही ती पांढरी करून घेतली. शिवाय नव्याने समाविष्ट झालेली साईडस्टँड सारखी अजून काही वैशिष्ट्ये देखील आम्हाला मिळाली. अर्थात हे दरवेळी शक्य असतेच असे नाही. आपले सध्याचे वाहन विकून पुन्हा नवीन विकत घेणे यात बराच आर्थिक तोटा होतो. अनेकजण तर बुलेट घ्यायचे ठरवितात पण सध्या आर्थिक चणचण आहे तेव्हा गरज भागवायला दुसरी बाइक घेऊ आणि नंतर सावकाशीने बुलेट घ्यायचे स्वप्न बघतात. त्यांच्या वापरातल्या दुचाकीची पुनर्विक्री किंमत झपाट्याने घसरते आणि बुलेटची किंमत तितक्याच वेगाने वर चढत जाते त्यामुळे त्यांचे बुलेट घ्यायचे स्वप्न हे स्वप्नच राहते.

तरीही या सर्व गोष्टींमध्ये निर्णय बदलणे हे तुलनेने कमी त्रासदायक वाटावे असे काही निर्णय आयुष्यात कायमस्वरूपी होऊन जातात. जसे की, करिअर. अनेकांना घरच्या जबाबदारी मुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा भरभरून उत्पन्न देणाऱ्या शाखांमध्ये शिक्षण घ्यावे लागते. कालांतराने त्यांना आपल्या आतला एक कलाकार, लेखक, कवी, गायक टोचणी देत राहतो. मग ती टोचणी तेवढीच तीव्र असेल तर सारे काही सोडून एखादा अभियंता चित्रपट दिग्दर्शक (रामगोपाल वर्मा) होतो. एखादा डॉक्टर अभिनेता (श्रीराम लागू) किंवा गायक (पलाश सेन) होतो. कुणी पूर्णवेळ लेखक तर कुणी निवेदक बनतात. एखादा प्रशासकीय अधिकारी राजकारणी पुढारी (अरविंद केजरीवाल) बनतो. प्रत्येकालाच हे शक्य होते असे नाही मग मी या प्रांताऐवजी त्या प्रांतात असतो तर यशस्वी बनलो असतो असे उसासे सोडले जातात. याउलट काहींना जे बनायचे नसते ते नाईलाजास्तव बनावे लागते आणि तरीही ते अपेक्षेपेक्षा प्रचंड प्रमाणात यशस्वी होतात.

तेव्हा आपल्या आयुष्यात योग्य तो निर्णय घेणे जमले नाही तरी आपण आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहोत हे पाहून निर्णय फिरविल्यास आपल्याला त्याची किती मोठी किंमत चुकवावी लागेल याचा अंदाज घेऊन आणि त्याची तुलना भावी फायद्यांसोबत करीत एकतर लवकरात लवकर निर्णय बदलावा अन्यथा आपली बस चुकली हे मान्य करून पुढचा प्रवास चालू ठेवावा हेच योग्य.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम लेख. लेखकाच्या प्रकृतीला साजेसा असाच आहे. उदाहरणे आवडली. त्यांच्या सहाय्याने मुद्दा मांडण्याचे कसब लक्षणीय वाटले.

स्वत: घेतलेला निर्णय निभावून नेण्याची क्षमता असायला हवी. तशी नसेल तर प्रयत्नपूर्वक अंगी बाणवायला हवी. Happy

-गा.पै.

लेख थोडा लांबुळका आहे पण उदा. चपखल आहेत. वेगवेगळी उदा. गुंफून आपलं म्हणणं पोहोचवण्याची कला उत्तम.

लेख आवडला आणि मुद्दा पटलाही. प्रत्येकवेळी असे निर्णय घ्यावेच लागतात पण मग दुसरा पर्याय लक्षात आल्यावर, त्यावेळी आणि त्या परिस्थितीत आपण घेतलेला निर्णयच योग्य होता.. असे मनाला समजवावे हेच चांगले.

रच्याकने, त्या प्रेमशास्त्र चित्रपटाचे पोस्टर फारच बोल्ड होते !

सर्व वाचक, प्रतिसादकांचे आभार. लेख लांबलचक असल्याचा आरोप मान्य आहे, पण काही स्पष्टीकरण मला आवश्यक वाटले विशेषतः बससेवेबाबत. पुण्यात आता पीएमपीएमल ही एकच स्थानिक बससेवा आहे जी पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांच्या क्षेत्रात तसेच जवळपासच्या ग्रामीण भागात देखील सेवा पुरविते. शिवाय आता साधु वासवानी चौकाजवळ देखील मोठे बसस्थानक केले आहे तेव्हा उन्हाचा त्रास वगैरे इतिहासजमा झालं आहे. आता प्राधिकरणाकरिता वेगळी बस आधीच ठरवून धरायची गरज नाही. शहरातल्या कुठल्याही भागातून आधी निगडीपर्यंत या. मग तिथून निगडी ते आकुर्डी रेल्वे स्टेशन अशी बस धरा जी प्राधिकरणातल्या बहुतेक सर्व भागांच्या जवळून जाते. माझ्या तर अगदी घराजवळ बसथांबा (सुहृद तंत्रनिकेतन) आहे.

पुर्वी फारच वेगळी परिस्थिती होती लाल आणि पिवळे पट्टे असलेली पीएमटी आणि गुलाबी व पांढरे पट्टे असलेली ती पीसीएमटी पुर्णतः वेगळ्या होत्या. एकीचा पास / तिकीट दुसरीला चालायचं नाही. समजा तुम्ही पीसीएमटी नं जात आहात, काही कारणानं ती बंद पडली, पंक्चर झाली तर मागुन दुसरी पीसीएमटी येईपर्यंत वाट पाहावी लागे. त्यात कधी कधी तर दीड दोन तास लागत. तुलनेने पीएमटीची वाट पाहण्यात फारसा वेळ लागत नसे. त्यामुळे लोक सहसा पीएमटी नेच प्रवास करीत. त्यांच्या कर्मचार्‍यांच्या वागणुकीतही कमालीचा फरक होता. पीएमटीचे बहुतेक सर्व वाहक उद्धट, उर्मट होते पण भ्रष्ट नव्हते (कारण पगार चांगला होता). तर पीसीएमटीचे वाहक भ्रष्ट होते आणि त्यांचा हा भ्रष्टाचार प्रवाशांच्याच मदतीने चाले त्यामुळे आपसुकच गोडबोले होते. म्हणजे तुमच्या प्रवासाचं तिकीट दहा रुपये आहे तर तुम्हाला सरळ विचारणार की तिकीट काढून जाताय की असेच पाच रुपये देऊन? प्रवाशाने तिकीटाचा आग्रह धरलाच तर दहा रुपये घेऊन तिकीट फाडणार, जर प्रवासीदेखील यांच्यासारखाच असला तर पाच रुपये देऊन विनातिकीट प्रवास करायचा. बरेचसे तिकीट तपासणीस देखील यात सामील असल्याने सहसा कधी पकडले जाण्याचा प्रसंग येत नसे. अर्थात यातही एकदा एक गंमतीदार आणीबाणी ओढवली. रात्री दहाच्या आसपास अशीच एक पीसीएमटीची बस पुण्याहून निगडीच्या दिशेने चालली होती. चालक, वाहक आणि प्रवासी सारेच गाववाले, रोजच्या पाहण्यातले, एकमेकांच्या ओळखीचे. साहजिकच तिकीटे काढण्याचा प्रश्नच नाही. वाहकाने सर्वांकडून ठरलेली रक्कम घेतली आणि निवांतपणे प्रवाशांशी गप्पा मारत बसलेला. अचानक बसचालकाने कचकून ब्रेक दाबला. पुढे एका जीपने बसचा रस्ता अडवला होता. तिकीट तपासणीसांचे पथक आत घुसले. वाहकाचे तर धाबेच दणाणले. एकाचेही तिकीट काढलेले नव्हते. प्रत्येक प्रवाशाला तपासत तिकीट तपासणीस वाहकापर्यंत आले. इतक्यात पुढे चालकाने बसमधून उतरून जीपचे निरीक्षण केले आणि तो आनंदाने ओरडत मागच्या दारापर्यंत आला, आणि वाहकाची व प्रवाशांची त्या कठीण प्रसंगातून सुटका झाली. झाले असे होते की मध्यंतरी जाहिरातीतून मिळणार्‍या उत्पन्नामुळे हरखून जात पीएमटी व पीसीएमटी या दोघींच्याही बसेस बाहेरून पुर्णतः पिवळ्या, हिरव्या, निळ्या अशा कुठल्याही रंगात रंगविण्याचे खूळ वाढले होते. त्यामुळे पीएमटी व पीसीएमटीतला फरक चटकन कळत नसे. रात्री तर अजुनच घोळ होई. त्याचमुळे त्या रात्री चुकून पीएमटीचे तिकीट तपासणीस पीसीएमटीत तपासणी करायला शिरले. शिवाय एकाही प्रवाशाने तिकीट काढले नसल्याने अजुनच गोंधळ वाढला. एकजरी तिकीट त्यांनी पाहिले असते तरी ही पीएमटी नसून पीसीएमटी आहे हे त्यांना कळले असते. चालक वाहकांच्या गणवेशाचीही तीच तर्‍हा. खाकी गणवेशाची लाज वाटत असल्याने पँट फक्त खाकी रंगाची, शर्ट पांढर्‍या रंगाचा. शेवटी चालकाने जीपवरील पीएमटी ही अक्षरे पाहिली आणि त्याच्या लक्षात आले. वाहक, प्रवासी सुटले आणि तिकीट तपासणीस हात हलवत परतले. अर्थात त्यांनी हा किस्सा बसच्या क्रमांकासह नंतर वर्तमानपत्रांना पुरविला.

आता तर सारीच परिस्थिती बदललीय, दोन्ही संस्थांचे एकत्रीकरण होऊनही तिकीटे प्रचंड महाग आहेत. प्रवासी तिकीटे काढत असूनही बसवाहतूक प्रचंड तोट्यात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिकीटांची पाठीमागची बाजू, आसनांची पाठीमागची बाजू, बसची आतील आणि बाहेरची बाजू, चालक व वाहकांचे गणवेश तसेच सर्व बसथांबे आणि बसस्थानके यावरील जाहिरातींचे कंत्राट पुढील दहा वर्षांकरिता दिले तर प्रवाशांकरिता १० पैसे प्रति किमी इतक्या नाममात्र दरात बससेवा चालवून दाखवू असा एका जपानी कंपनीने दिलेला प्रस्ताव देखील स्वीकारला जात नाहीये.

असो. तर तीनदशकांपासून आजच्या काळापर्यंत ही बदलत आलेली बससेवेची अवस्था आजच्या पिढीतील प्रवाशांना काय ठाऊक असणार? ती व्यवस्थित समजावून सांगायची तर लेख लांबलचक होणारच. नाहीतर रीयासारखे नवे वाचक प्रवासी मलाच विचारत बसणार की मी पीएमपीएमलने प्रवास कधी करतो का किंवा कधी केलाय का? १९८४ ते २०१० पर्यंत प्रचंड आणि त्यानंतर प्रासंगिक असा प्रवास केलाय. २०१४ ऑगस्ट नंतर तो पूर्णतः बंद झाला असला तरी पुर्वानूभव बर्‍यापैकी आहे. त्यातला काही भाग यानिमित्ताने लेखात आणि प्रतिसादात टाकलाय.

अनेकांनी मला सांगितलंय की आजची पिढी ही कसोटी तर सोडा एकदिवसीय सामने देखील पाहत नाही त्यांना ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट आवडतं. इतके मोठे लेख ते वाचणार नाहीत. त्यांना वॉट्सअ‍ॅपवरील छोटे छोटे किस्से किंवा वनलायनर्स वाचायची सवय आहे. हीच जर वस्तुस्थिती आहे तर मग मला एक प्रश्न पडतो की ही शॉर्ट अ‍ॅन्ड स्वीट एन्टरटेन्मेट आवडणारी पिढी होणार सून मी या घरची ही मालिका कशी काय बघते? जिथे प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने आणि सविस्तर अगदी पूर्वप्राथमिक शाळेतील मुलांना समजावून सांगावी तशी सांगितली जाते. नायिकेने साडीऐवजी घरात गाऊन घालावा ह्या मुद्याकरिता आठ भाग जातात आणि तिने गाडी चालवावी की चालवू नये या घोळ आठ भागांपर्यंत चालतो. तिने आजीसासूच्या खोलीत झोपावे की नवर्‍याच्या खोलीत झोपावे हा गोंधळ तर दोन महिन्यांत देखील निस्तरत नाही. एकाच वेळी ही मालिका लोकप्रिय होत राहते आणि मी लिहीलेले लेख मात्र लांबलचक वाटत राहतात ह्या कोड्याचा उलगडा काही केल्या मला होत नाही.

चेतन सुभाष गुगळे,

>> अनेकांनी मला सांगितलंय की आजची पिढी ही कसोटी तर सोडा एकदिवसीय सामने देखील पाहत नाही
>> त्यांना ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट आवडतं. इतके मोठे लेख ते वाचणार नाहीत.

मन जिथे ओढ घेतं ते कितीही लांबलचक असो माणूस पूर्णपणे हरवून जातोच. Happy

हे चिरंतन सत्य आहे. तर मग तुम्ही सांगितलेला समज कुठून उत्पन्न झाला? तर छोट्या चटपटीत कलाकृतींतून पैसे वा प्रशंसा झटपट मिळतात म्हणून.

आ.न.,
-गा.पै.

अरे देवा, एवढे लांबलचक मुद्देसूद सविस्तर लिहिण्याएवढा पेशन्स कसा काय आहे तुमच्याकडे ? _/\_ Happy
वकील होण्याचा विचार होता का कधी ? Wink

@ महेश,
<< वकील होण्याचा विचार होता का कधी ? >>
मायबोलीवर मी जी माहिती दिली आहे ती पाहावी.
व्यवसायाचे क्षेत्र - आरोग्य, अर्थ व क्रीडा वगळता इतर सर्व
या इतर सर्व मध्ये सर्व काही आलेच. "वकील" अशा चौकटीत कधी अडकून पडलो नाही पण युक्तिवाद अनेकदा केलेत अजुनही करावे लागतात. लवकरच एखादा व्यावसायिक किस्सा इथे प्रकाशित करेन.

@ गामा_पैलवान_५७४३२,

<< मन जिथे ओढ घेतं ते कितीही लांबलचक असो माणूस पूर्णपणे हरवून जातोच >>

धन्यवाद.

<< तर छोट्या चटपटीत कलाकृतींतून पैसे वा प्रशंसा झटपट मिळतात म्हणून. >>
ते तर झालंच शिवाय रसिकांचा संयम (पेशन्स) देखील हल्ली कमी होत चाललाय, त्यांना सारं काही झटपट हवं असतं असं दिसतंय. आशय गुणे यांनी http://www.maayboli.com/node/52108 या लेखात हे फार व्यवस्थित मांडलंय. ते म्हणतात - विशिष्ट वेळेत सारे काम आटपायचा प्रयत्न करणे ही नवीन लक्ष्ये निर्माण झाली. इतर शहरांचा अगदी असा प्रश्न नसला तरीही त्यांच्या वाढत्या विस्तारामुळे आणि सतत लोकांच्या होत असलेल्या विहारामुळे तिथल्या राहणीमानात एक गती निर्माण झाली आहे. साहजिकच लोकांचा कल प्रत्येक गोष्ट ‘लगेच’ होण्यामध्ये आहे.

@ अंकु
धन्यवाद.

चेतनसाहेब,

आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी कै विलासराव देशमुख साहेबांनी विषेश अध्यादेश काढुन पी एम टी आणि पी सी एम टी या दोन मंडळांचे पी एम पी एम एल मध्ये विलिनीकरण केले.

सध्याच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सत्ताधार्‍यांना ते मान्य नाही म्हणुन त्यांनी रिटाय्र्डमेंट ला आलेला आसीएस ची नेमणुक गेले पाच वर्षे पी एम पी एम एल वर करुन घेतली. त्याही पुढे जाऊन जी रक्कम या दोन्ही महानगर पालिका पी एम पी एम एल ला देणे लागतात ती उशीरा द्यायची, टाळा टाळ करायची असे धोरण अवलंबले आहे त्यामुळे ही सेवा डबघाईला आलेली आहे.

फडणविसांनी डॉ श्रीकर परदेशी यांची नियुक्ती सध्या केली आहे. अनेक बस नादुरुस्त असल्यामुळे अनेक अधिकार्‍यांचे पगार त्यांनी थांबवुन जनहितार्थ पवित्रा घेतलाय.

बघुया आता काय होतय.

दिल्ली , महाराष्ट्र च्या पाठोपाठ आता पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सत्ता परिवर्तन झाल्यासच स्थिती बदलेल.

@ नितीनचंद्रसाहेब,

<< आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी कै विलासराव देशमुख साहेबांनी विषेश अध्यादेश काढुन पी एम टी आणि पी सी एम टी या दोन मंडळांचे पी एम पी एम एल मध्ये विलिनीकरण केले. >>

निदान मला तरी वैयक्तिक रीत्या असे वाटते की ती एक मोठीच चूक झाली. त्याऐवजी पीएमटी व पीसीएमटी दोन्ही ठेवायला हव्या होत्या. फक्त त्यांची हद्द त्यांच्या महापालिका क्षेत्रानुसार ठेवायला हवी होती व हद्दीच्या ठिकाणी सामायिक बसस्थानके ठेवून बसेस बदलण्याचा पर्याय ठेवायला हवा होता. म्हणजे समजा कोथरूड पासून निगडीत यायचे आहे तर कोथरूड ते दापोडी प्रवास पीएमटीने करावा. दापोडीला पीएमटीतून उतरावे व पीसीएमटीत चढावे व पुन्हा निगडी पर्यंत प्रवास करावा. त्याचप्रमाणे हद्दीलगतची गावे देखील वाटून घ्यावीत. जसे की तळेगाव दाभाडे, वडगाव, कामशेत, चाकण, आळंदी व हिंजवडी या ठिकाणी पीसीएमटी ने सेवा पुरवावी. तसेच तळेगाव ढमढेरे, फुरसुंगी, सासवड, नसरापूर आदी ठिकाणी पीएमटीने सेवा पुरवावी. आळंदी व हिंजवडी (पिरंगुटमार्गे) सारख्या ठिकाणी पीएमटीने पिंपरी-चिंचवड महापालिका न ओलांडता तर शिक्रापुर (चाकण मार्गे) येथे पीसीएमटीने पुणे महापालिका न ओलांडता अतिरिक्त सेवा पुरवायला हरकत नाही अशी व्यवस्था करायला हवी होती. अजुनही करता येईल. नाहीतरी पीएमपीएमएल मध्ये मारून मुटकून सहभागी झालेले पीसीएमटी व पीएमटीचे कर्मचारी अजुनही अधूनमधून "वेगळं व्हायचंय मला" चा राग आळवत असतात.

पी सी एम टी वाले माझे अनेक मित्र कंडक्टर होते/ आता रिटाय्र्ड झालेत जे संध्याकाळी ४ ते रात्री १२ ड्युटी असताना रात्री ८ वाजता बस सव्हीस बंद करुन सिनेमाला जायचे. रात्री १२ वाजता गाडी डेपोत जमा करायचे.

त्यांना बंधने नकोत म्हणुन विलिनिकरण नको होते. त्यामानाने पी एम टी कमी बेशिस्त होती.

कामगारांना / कर्मचार्‍यांना काय वाटते यावर विलिनीकरणाचा निर्णय अवलंबुन नसावा. सार्वजनीक सेवांना हद्दीचे बंधन नसावे अन्यथा प्रत्येक जिल्हावार एस टी महामंडळ निर्माण करावे लागेल.

पी एम पी एम एल चे डेपोचे निर्णय रस्त्यांचे जाळे, लोक संख्या आणि वारंवारता ( फ्रिक्वेन्सी ) यावर आधारीत असावे यात कोणत्या महानगर पालिकेची हद्द याचा संबंध नसावा.

<< त्यांना बंधने नकोत म्हणुन विलिनिकरण नको होते. त्यामानाने पी एम टी कमी बेशिस्त होती.

कामगारांना / कर्मचार्‍यांना काय वाटते यावर विलिनीकरणाचा निर्णय अवलंबुन नसावा. सार्वजनीक सेवांना हद्दीचे बंधन नसावे अन्यथा प्रत्येक जिल्हावार एस टी महामंडळ निर्माण करावे लागेल. >>

तरीही महाराष्ट्रात इतरत्र कुठे दोन किंवा अधिक महापालिकांची एकत्र बससेवा मी तरी पाहिली नाही. मुंबईत बेस्ट आहे, ठाण्यात टीएमटी, कल्याण डोंबिवलीत केडीएमटी. परंतु यांचे कुठेही एकत्रिकरण झालेले नाही व तशी मागणी देखील नाही. जी ती वाहतूक संस्था ज्या त्या महानगरपालिकेला बांधील आहे. पीएमपीएमल मुळे हे चित्रच बदलले. दोन्ही एकत्र येऊन दोघी बेशिस्त झाल्यात. वेगळ्या होत्या तेव्हा फक्त पीसीएमटीचीच वाईट अवस्था होती आता एकत्रित संपूर्ण पीएमपीएमएल चीच अवस्था वाईट आहे. प्रेमशास्त्र चित्रपटातील नायक सागर (देव आनंद) प्रमाणेच आता पीएमटीने पीसीएमटी पासून वेगळे व्हायला हवे.

छान लेख, आवडला आणि अर्थातच पटला.
आपण प्रत्येकानेच असे कित्येक निर्णय आयुष्यात घेतलेलेच असतात.
त्यातही खास करून प्रेमप्रकर्रण आणि करीअर संदर्भात घेतलेले निर्णय आयुष्यावर भलामोठा इम्पॅक्ट टाकणारे असतात..

माझेही मागे वळून पाहता प्रेमप्रकरणात ढिगाने आठवतील आणि करीअर संदर्भातही म्हणाल तर दहावी नंतर ईंजिनीअरींगला येणे आणि त्यातही चुकीची शाखा (ब्रँच हा, शाहरूख नव्हे) घेणे हा निर्णय तसा टोटल चुकलाच, आणि चुकलाय याचा हिशोब लागेपर्यंत दुरुस्त करायची वेळही निघून गेली होती वा तेवढा युटर्न मारायची इच्छा नव्हती.

पण याकडे बघायची माझी एक नजर सांगतो,
तेव्हा जर मी काही वेगळा निर्णय घेतला असता तर कदाचित त्या पातळीवर चांगला परीणाम मिळालाही असता पण या मधल्या काळात आयुष्याने इतरही काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत ज्या त्या परिस्थितीत नसत्या.

उदाहरणार्थ माझी ग'फ्रेंड - तेव्हा माझा निर्णय वेगळा असता तर तिथून माझे आयुष्य वेगळ्या ट्रॅकवर धावत असते आणि आमचा योग जुळून आलाच नसता. Happy

लाखो मार्ग आहेत, जगण्याचे या जगात
एण्ड ऑफ द डे, सर्वांनाच जायचेय ढगात..
बोलो आमीन!

प्रेमशास्त्र चित्रपटातील नायक सागर (देव आनंद) प्रमाणेच आता पीएमटीने पीसीएमटी पासून वेगळे व्हायला हवे. नाही दादा. यांना एकत्र नांदवणारा खलनायक ( खरे तर प्रशासक ) आता डॉ श्रिकर परदेशी यांच्या रुपाने लाभला आहे.

इतके मोठे लेख ते वाचणार नाहीत. त्यांना वॉट्सअ‍ॅपवरील छोटे छोटे किस्से किंवा वनलायनर्स वाचायची सवय आहे. >> हे काही खरं नाही .ज्यांना मोठ्या मोठ्या कादंबरया वाचायला आवडतात त्यांना हा लेख उलट लहानच वाटेल. Happy

पण तुमचा लेख आणि प्रतीसाद फार मोठा आहे हेही खरं आहे(बराच वेळ लागतो वाचायला).पण सगळ्या चार भागांची सरमिसळ करुन मुद्दा पटवुन द्यायची कला भारी आहे. लेख आवडला .पीएमटी आणि पीसीएमटी बद्दल एवढं कधी वाचायला मिळेल याची शक्यता नव्हती.पण वाचली पुर्ण लेख समजण्यासाठी .

<<तेव्हा आपल्या आयुष्यात योग्य तो निर्णय घेणे जमले नाही तरी आपण आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहोत हे पाहून निर्णय फिरविल्यास आपल्याला त्याची किती मोठी किंमत चुकवावी लागेल याचा अंदाज घेऊन आणि त्याची तुलना भावी फायद्यांसोबत करीत एकतर लवकरात लवकर निर्णय बदलावा अन्यथा आपली बस चुकली हे मान्य करून पुढचा प्रवास चालू ठेवावा हेच योग्य.>> हा शेवटचा भाग फार छान लिहिलाय . एकदा निर्णय घेतला की परत त्या निर्णयालाच योग्य मानलेले बरं असतं . तसही एकच बस नसते आयुश्यात . निर्णय चुकले याची खंत करण्यात काहीच अर्थ नसतो. (यासाठी "३इडियट्स" मला आवडतो, त्यातल्या आर माधवनचा निर्णय आवडतो .आवडीचं काम करण्यात इंजीनियरींग मधलं करीयर व तीतका पैसा तुलनेत आदर नसला तरी माधवन आनंदी आणि समाधानी राहु शकतो .हे त्याच्या वडिलांनाही नंतर पटतं.जे सुरवातीला त्याच्या फोटोग्राफीच्या आवडीबद्दल कमालीचे विरोध करत असतात .तो सीन मस्तच आहे)

प्रत्येकवेळी असे निर्णय घ्यावेच लागतात पण मग दुसरा पर्याय लक्षात आल्यावर, त्यावेळी आणि त्या परिस्थितीत आपण घेतलेला निर्णयच योग्य होता.. असे मनाला समजवावे हेच चांगले.+१

अवांतर -प्रेम की दिवानी चा शेवट अगदी अ आणि अ आहे .कीती तो आटापीटा धड्पडत,रडारड्करत, मारत आधी हिरोच्या शर्टाची बाही फाडा ,त्यातला पहील्या प्रेमचा "प्रेममय"टॅटु दुसर्या प्रेम ला दिसला पाहीजे यासाठी . नशीब त्यामुळे संवाद वाचले करीनाचे सगळा गोंधळ समजवायला. शेवटी तीचा निर्णय काही असला असता तरी चित्रपट ओव्हरच होता ज्याने बघणारयांच्या डोक्याला ताप झाला Proud

धन्यवाद ऋन्मेऽऽष, सुरेख, सिनि.

@ नितीनचंद्र,

<< प्रेमशास्त्र चित्रपटातील नायक सागर (देव आनंद) प्रमाणेच आता पीएमटीने पीसीएमटी पासून वेगळे व्हायला हवे. नाही दादा. यांना एकत्र नांदवणारा खलनायक ( खरे तर प्रशासक ) आता डॉ श्रिकर परदेशी यांच्या रुपाने लाभला आहे. >>

काही महिन्यांपुर्वी हे डॉ. परदेशी पिंपरी-चिंचवडमधील सारी बेकायदा बांधकामे, अतिक्रमणे जमीनदोस्त करणार असे चित्र निर्माण झाले होते. प्रत्यक्षात बांधकामे जशीच्या तशी आहेत डॉक्टरांचीच बदली झाली.

प्रत्यक्षात बांधकामे जशीच्या तशी आहेत डॉक्टरांचीच बदली झाली. बेकायदेशिर इमारतींची संख्या काही लाखात आहे. प्रत्यक्षात डॉ. परदेशी दोन वर्षांचा कालावधी सुध्दा पुर्ण करु शकले नाहित.

आपणास उत्सुकता असल्यास आपण आर टी आय द्वारा चौकशी करु शकता की किती बांधकामे डॉ परदेशी यांच्या काळात पाडली गेली. सध्या तर ही प्रक्रिया कोर्टाचा आदेश डावलुन जणु काही गुंडाळुन ठेवली आहे.

असो, फारच विषयांतर होतो आहे मी यापुढे मी डॉ परदेशी यांच्याबाबत लिहणार नाही.

@ नितीनचंद्रजी,

महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीकर परदेशींना पंतप्रधान कार्यालयात बढती
http://www.loksatta.com/maharashtra-news/shrikar-pardeshi-appointed-as-d...

अब तेरा क्या होगा रे पीएमपीएमएल?

वा, वा. तीन निरनिराळ्या गोष्टींमधून एकच कल्पना शोधून काढण्याची तुमची विचारशक्ति फारच छान. अश्या विचारसरणीचा अभ्यास असल्यास कित्येक, वरकरणी कठीण दिसणार्‍या, अडचणींतून मार्ग काढणे हे सोपे व्हावे.

<< विचारसरणीचा अभ्यास असल्यास कित्येक, वरकरणी कठीण दिसणार्‍या, अडचणींतून मार्ग काढणे हे सोपे व्हावे. >>

धन्यवाद झक्कीजी,

नक्कीच. आपण लिहील्यानुसारच माझी विचारपद्धती आहे. माझ्या सभासद माहितीत आपण हे वाचू शकाल -

I am the man of ideas. I use simple ideas to solve complex problems. I strongly believe that with the help of Common Sense, Imagination Power and Decision Making ability, success can be achieved in any field even without the relevant formal education and experience in that field.

मला कल्पना करायला आवडतं. साध्यासोप्या कल्पनांचा वापर करून मी क्लिष्ट समस्या सोडवतो. माझा ठाम विश्वास आहे की, कुठल्याही क्षेत्रामध्ये पुर्वानुभव व संबंधित औपचारिक शिक्षणाशिवाय देखील केवळ सामान्य ज्ञान, कल्पना शक्ती व निर्णय सामर्थ्याच्या जोरावर यश संपादन करता येऊ शकते.

डॉ. श्रीकर परदेशी दिल्लीत गेले. खरंच, आता पीएमपीचा बट्ट्याबोळ होणार ! नगर वाहतुकीसाठी कित्येक दिवसां नंतर (खरं तर दशकां नंतर) एवढा चांगला प्रशासक अधिकारी पीएमपीला लाभल्यामुळे आशा पल्लवित झाल्या होत्या..... पण आता..... ? ? ?

झक्की यांनी लिहिल्यानुसार, गुगळे साहेब, तुम्ही छान लिहिता अन कनविन्स देखील मस्त करता !

तुमच्या वेळी शाळेत सारांश लिहा,थोडक्यात उत्तरे द्या असे प्रश्न नव्हते का ? नसेल तर सरावासाठी प्रश्न.

चार ओळीत हाच लेख लिहून दाखवा . १२ गुण

Pages