आपले प्रेम

Submitted by संतोष वाटपाडे on 6 January, 2015 - 01:20

वाहणार्‍या नदीचे किनारे जसे हात हातात घेऊन चालायचे
आपले प्रेम तेव्हा मला साजने त्या जलासारखे धुंद वाटायचे...

यायची भेटण्या रोज घाटावरी जायची घेऊनी शब्द ओठातले
स्पर्श झाले जरी राहिलेही जरी दुःख माझ्या मनी मात्र दाटायचे...

सागरी लाट पायात रेंगाळते पावलांना कधी लाजुनी चुंबते
दूर गेल्यावरी ती मला सोडुनी सांग कोठे तिला रोज शोधायचे...

हे धुके रोज येते तुला स्पर्शण्या पांघराया जुनी आठवे घेत जा
मी कुणाला कुणाला बरे साजने लक्ष ठेवूनिया व्यर्थ टोकायचे..

सांज व्याकूळ होते मनासारखी थांबते चालते.. थांबते चालते
रात्र होते कधी एकदा वाटते स्पंदनांना किती काळ रोखायचे...

पेरली चांदण्यांची फ़ुले अंगणी मेघ दारी उभे शुभ्र चंद्रासवे
पाहण्याला तुझे हासणे बोलणे ते झरोक्यावरी गोल थांबायचे....

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users