अडगळ

Submitted by सचिनकिनरे on 5 January, 2015 - 13:02

अडगळ

अडगळ आवरताना
खुप चिटोरे मिळाले
हिशेबांचे कागद, अर्ध्या मुर्ध्या कविता
मनातील भावनांसारख्या,
अपूर्ण....

खुप सारे कागद
वेगवेगळ्या अर्थांचे
किती विस्कळीत झालोय मी
की तसाच होतो...फ़क्त कागद वाढलेत

तुझी काही पत्रे
लपवून ठेवलेली,
म्हणाली, किती छान वाटलं भेटलास
अधून मधून भेटत जा रे
त्याना कस सांगू,
त्यांना भेट्न बांध फुटतो ते....

जुनी रोजनिशी,
अचानक समोर आली, म्हणाली..
साऱ्यांपासून लपत, तुझ मन जपत,
तुला मोकळ होताना पाहिलं
अजुन किती लपून राहायच...

खुप सारी पुस्तके
अचानक येऊन उभी राहिली
अरे आम्हाला वाचलस नाहीस तू
रागवलोय आम्ही...
एक वेळ सांग पाहू, कधी वाचणार ते
मी घाबरलो...
इथे स्वतःशीच् बोलायचे वांधे....

जुनी अभ्यासाची पुस्तके
लांबुनच वाकुल्या दाखवत होती
नजर नाही दिली त्यांना

काही जुनी मेडल्स, सर्टिफिकेट्स
मी घाबरलो...
पण विचारलच त्यानी..
ह्याचसाठी जिंकलस कारे आम्हाला
त्यांना काय सांगू,
जे चलनात नाही,ते कसं नी किती जपणार?
सर्टिफिकेट,असो की मेडल की माणूस...
फ़क्त पुसून परत ठेवलं त्यांना...

घरातलं जूनं सामान,
बासरी आणि कवितांची वही
सगळेच समोर आले
मी शेवटी कोसळलोच, म्हणालो...

टाईम प्लीज आहे रे मित्रांनो...
सारं कुठं नी कसं एका ओंजळीत मावणार?...
कधी आपलीही अडगळ झाली तर,
याला उत्तर नव्हते माझ्याकडे....

सचिन किनरे
05 Jan 2015

Group content visibility: 
Public - accessible to all site users