एवढे का गुदमरावे ?

Submitted by निशिकांत on 5 January, 2015 - 01:17

एवढे का गुदमरावे, भावनांच्या वादळाने
भार हलका होत असतो आपुल्यांशी बोलल्याने

हास्य ओठी आत कावा, मी सखे दुर्लक्ष केले
स्त्रीच "मा" करते "ध"चाही घातलेल्या काजळाने

दाह विरहाचा असा की, वाटले उध्वस्त झालो
पोसले प्रेमांकुरांना आठवांच्या ओघळाने

भावना उद्रेक अपुला का जगाला दाखवावा?
दु:ख का होते कमी ते चेहर्‍यावर गोंदल्याने?

कौल अपशकुनी मिळाला, श्वान रडता कळवळोनी
दोष इतरा, आपुल्यावर भरवसा ना राहिल्याने

भावनांचा कोंडमारा भोगतो जो तोच जाणे
केवढा तो त्रास होतो! नाक साधे चोंदल्याने

आठरा अध्याय गीतेचे मुखोद्गत जाहल्यावर
प्राप्त कसले ज्ञान होते? घोकल्या पाठांतराने

साक्ष इतिहासात मिळते, राज्यकर्ते लाख बदलो
फायदा रयतेस नसतो कोणत्या सत्तांतराने

सागराची लाट तू "निशिकांत" हो विक्राळ इतकी!
आसर्‍यासाठी फिरावे घेत धसका कातळाने

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावनांचा कोंडमारा भोगतो जो तोच जाणे
केवढा तो त्रास होतो! नाक साधे चोंदल्याने<<<

मस्त!

(शेरांमध्ये विधानात्मकता अधिक जाणवली ह्या गझलेत)

कैलासरावांच्या 'श्वास झाला मोकळा की कोंडल्यागत वाटते' ची आठवण झाली.

शुभेच्छा!

व्वा

छान आहे. गझला सहसा वाचत नाही, पण सहज वाटलं वाचाविशी आणि आवडली चक्क.
बाकी, काही गझलकार गझलेच्या शेवटी आपला मोबाईल नंबर आणि विपत्रपत्ता का देतात? Smiley

कोकणस्थ,

निशिकांतजी हे आंतरजालाच्या (तथाकथित) राजकारणापासून पूर्णपणे दूर असलेले व वयाने बरेच ज्येष्ठ असे गझलकार आहेत. त्यांना त्यात काही विशेष वाटत नाही त्यामुळे ते तो तपशील देतात. Happy

त्यांच्यावतीने मी का बोललो अशी शंका असल्यास चांगले स्नेहसंबंध असल्यामुळे मला त्यांची ही माहिती होती, जी मी पुरवली. ते कदाचित स्वतः उत्तरते झालेही नसते.

व्वा काका मस्तच !
तुमच्या अनेक खयालांमधून एक सहज साध्या पॉसिटिवनेस्चा फील मिळतो मला (इतक्या प्रदीर्घ आयुष्यातून आलेलं शहाणपण म्हणा हवंतर Wink ) ...तो फील खूप काही देवून जातो नेहमीच

दाह विरहाचा असा की, वाटले उध्वस्त झालो
पोसले प्रेमांकुरांना आठवांच्या ओघळाने

भावनांचा कोंडमारा भोगतो जो तोच जाणे
केवढा तो त्रास होतो! नाक साधे चोंदल्याने

साक्ष इतिहासात मिळते, राज्यकर्ते लाख बदलो
फायदा रयतेस नसतो कोणत्या सत्तांतराने >>> जास्त आवडले आणि मकता ही खूप छान!