इथे थांबुनी घे विसावा जरा

Submitted by रसप on 25 December, 2014 - 05:11

नसे मी तुझा तू तरी खास माझा
मना जाणवावे कधी हे तुला ?
तुझ्या प्रकृतीला, तुझ्या विकृतीला
असे चेहरा मीच माझा दिला

तुझे कालचक्रापुढे धावणे हे
मना, गुंतवाया तुला ना कुणी
मला तूच देशी नव्या स्वप्नगाठी
दिसे सप्तरंगी मला ओढणी

कधी पाहिले तू कुणा दूर गावी
सुखाचे खजीने कुणाच्या घरी
मला ते नको मी सुखासीन आहे
जरी ओढतो फाटक्या चादरी

तुला भावतो अंबराचा पसारा
मला पावलाएव्हढी वाटही
तुला पाहिजे प्राशणे सागराला
मला एक डोळ्यातली धारही

नको आठवू तू जुन्या वेदनांना
सहानूभुतीचे नको भार ते
उगाळू नको दु:ख गेल्या दिसांचे
तुझी हीच वृत्ती सुखे मारते

पहा आज तूही जरा भोवताली
कसा गंध देती फुलांचे सडे
खरे ह्या क्षणाचेच तू मान वेड्या
भरूनी पुन्हा घे सुखांनी घडे

कुठे चाललो मी मला ठाव नाही
तुझ्यामागुनी मी निघालो खरा
तुझ्या ह्या प्रवासास ना अंत काही
इथे थांबुनी घे विसावा जरा

....रसप....
४ एप्रिल २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/04/blog-post_04.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users