बोन्साय

Submitted by D_Saurabh on 19 December, 2014 - 00:53

कुंडीत लावलेल्या बोन्सायकडे
तिनं आश्चर्याने पाहिलं
त्या बुटक्या झाडाकडे पाहताना
तिचं तिलाच हसु आलं

त्याची सगळी वैशिष्ट्य
मैत्रीण ठसक्यात सांगत होती
विस्तारणं मर्यादीत केलेल्या बोन्सायकडे
ती टक लावुन पहात होती

एखाद्या दिखाव्याच्या रुपात
ते कोपऱ्यात पडुन राहिलं होतं
त्याला थोडासा प्रकाश आणि थोडसं पाणी
वेळ मिळेल तेव्हाच मिळत होतं

मैत्रीण कौतुक करत होती
ती क्षणाक्षणाला गंभीर होत होती
त्या वाढ खुंटलेल्या बोन्सायमध्ये
नकळत स्वताला पहात होती

दिवसामागुन दिवस गेले
बोन्साय मनात सलत होता
त्याच्या-तिच्या जुळणाऱ्या गुणांची
सतत जाणीव करुन देत होता

असंच एकदा त्याच्याकडुन
बोन्साय तिच्यासुद्धा घरात आलं
त्यानंसुद्धा कौतुक केलं बोन्सायचं
अनं विचारलं कसं काय वाटलं ?

घरात आलेल्या बोन्सायला पहाता
ती थोडी अंर्तमुख झाली
चार भिंतीत आक्रसुन गेलेल्या तिला
मग मोकळ्या आकाशाची जाणीव झाली

खुंटलं होतं जीवन
नुसतंच शोभीवंत होऊन बसले होते
अनं कुंडीतल्या बोन्सायसारंख
तिनंसुद्धा वाढायचे केव्हाचं टाकले होते...

Group content visibility: 
Public - accessible to all site users