भटकंती ७

Submitted by इन्ना on 16 December, 2014 - 04:47

भटकंती -७

विविध ठिकाणी पाहिलेल्या इमारती, वाचलेली पुस्तके , गंध, चाखलेले पदार्थ ,ऐकलेली गाणी याना एका माळेत बांधणार यडच्याप मन आहे माझ. वरवर पाहता एकमेकाशी काहीही संबध नसता देखिल एकामागे एक फ्रेम्स उलगडातात.

परवा 'तिरकी वाढलेली झाड' नावाच्या पुस्तकाचा उल्लेख झाला. थोर माणसं , आणि त्यांचे मातीचे पाय, किंवा आपाप्ल्या विषयात महामहिम पण माणूस म्हणून तोकडा, वगैरे मोजमाप अन फुटपट्ट्या ! अशी लाइन दोरी ओळंब्यात माणस बघावी का? सामान्यांचा अन थोरांचा ओळंबा वेगवेगळा असेल का? समतोल म्हणजे काय अन तो तराजू कोणाच्या नजरियाने पहायचा. वरवर ओळंब्यात दिसणार्‍या भिंती आभासी असतात का? असे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट प्रश्न वर आले अन झर्कन डोळ्यासमोर आल्या फ्रेम्स एका मेमोरियलच्या . ओळंब्यात वाटणार्‍या समांतर ठोकळ्यांच्या फ्रेम्स , अन माणसाच्या अत्यंत टोकाच्या तिरकेपणाच एक ठोकळेबद्ध स्मारक !

६० लाख ज्युंच्या खुनाचे स्मारक! नावच अंगावर येतं .

राजधानी बर्लीन मधे ऐन मोक्याच्या, राइश्टाग (जर्मनी च संसदभवन म्हणाना) च्या शेजारी तब्बल पाच एकरा त निर्माण केलेल स्मारक.

बर्लीन ल जाताना नक्की पहायच्या यादीत, नॉर्मन फॉस्टर यांनी केलेल राइश्टाग च एक्स्पान्शन आणि पिटर आइन्मन यांनी केलेल हे स्मारक होतच. माझ्या जर्मन आर्किटेक्ट मैत्रीणीबरोबर हे पहायला मी गेले. निव्वळ तपशिल तर माहित होतेच. १९९५ पासून विविध स्तरांवर चर्चा , वाद विवाद होउन शेवटी ही ४.११ एकराची जागा नक्की करण्यात आली. पिटर आइन्मन ह्या आर्किटेक्ट नी ब्युरो हेपॉल्ड ह्या एंजिनियरिंग फर्म च्या मदतीने हे २७११ ठोकळ्याच स्मारक बनवल. ह्या तपशिलात काहीच खास नाही ,निव्वळ इमेजेस पाहिल्या होत्या त्यातही खडकीच्या वॉर सिमेटरी पेक्षा अद्भूत दिसल नाही. पण स्वतःला डिकन्स्ट्रक्टीव्ह म्हणवून घेणार्‍या आइन्मन यांच काम प्रत्यक्ष पहाण्याची /अनुभवण्याची उत्स्तुकता होती.

नाझींनी केलेल्या संहाराचा काळात सत्तेच केंद्र , अन हिटलर चा बंकर ह्यापेक्षा सुयोग्य दुसरी कोणती जागा सापडणार होती ह्या स्मारकाला! १९८९ मधे जर्मन एकीकरणाअनंतर , एक देश म्हणून , जनतेच्या ,नागरीकांचा आणि पर्यायाने राज्यकर्त्यांच्या मनात , नाझी भूतकाळ हा फार वेदनादायी, प्रसंगी डिफेन्सिव्ह व्हायला लावणारा इतिहास. बर्लीन मधे तर ठायी ठायी ह्याच्या खुणा दिसत रहातात. ह्या बाबतीतली आपली भूमिका काय हे उमजून ती भळभळ अशी खुनाच स्मारक म्हणून साकारणे हे खरतर धाडसाच आणि प्रगल्भ स्टेटमेंट आहे.

prachi 1

ब्रॅन्डन बर्ग गेटाच्या थोडस पुढे गेल्यावर राइश्टाग इमारतीच्या शेजारी प्रथम दिसते ती जेमतेम तीन साडेतीन फुट उंचीच्या कॉन्क्रीटाच्या ठोकळ्यांची काटेकोर ग्रीड. ठीके ,हे अगदीच ढोबळ आहे , आइनमन च काहीच जाणावत नाहीये असा विचार करतच त्या ग्रीड मधे आपण शिरतो. दोन तिन ठोकळे मागे टाकले की ठोकळ्यांची उंची वाढल्यागत जाणवते. आत शिरताना तर सगळे ठोकळे एकसारखे वाटले होते की या संभ्रमात अजून एक दोन ठोकळे मागे टाकतो आपण .अजूनही आपण बुद्धी शाबुत आणि सिच्युएशन इन कंट्रोल याच विचारात . जरा डावीउजवीकडे वळून पाहू म्हणून काटाकोनात वळून पुढे सरकल की ,ठोकळे ,त्यांच्या टेक्श्चर मधे ही काहीच फरक नाहीये की ,आकार पण सेमच दिसतोय , काय बर सांगायच असेल यातून असा विचार करेपर्यंत ठोकळे आप्लयापेक्षा उंच होतात आणि शब्दशः पायखालची जमीन सरकते. पोटात पहिला खड्डा पडतो, चारी बाजूना पाहिल्यावर लक्षात येत की बाहेरच्या जगाशी आतापर्यंत असलेला व्हिज्युअल संबंध संपलाय आणि १० -११ फुटी अजस्त्र काँक्रीटाचे ठोकळे अंगावर येतात , दडापून टाकायला बघतात . ठोकळे ,आतापर्यंत जाणावलेला काटेकोरपणा अन तोल सोडून वेडेवाकडे दिसायला लागतात. एक शिरशिरी येते आणि भीती राज्य करायला लागते मनावर, इन अ मोमेन्ट यु आर नो मोअर इन कंट्रोल ऑफ द सिच्युएशन . पायाखालच पेव्हिंग खाली जाताना दिसत. तोवर उजवीकडे, डावीकडे, सरळ ,मागे करत आपण त्या गर्तेत शिरत जातो, प्रत्यक्षात संथपणे चालत असलो तरी मनातल्या मनात जिवाच्या आकांतानी बाहेर पडायच असत. ह्या जगातून बाहेर , माझ सुरक्षित , उबदार आणि प्रेडिक्टेबल जग. पाच एकरातून बाहेर दुसर्‍या टोकाला पोचेपर्यंत, ह्या थंड , अंगावर येणार्‍या ठोकळ्यां च्या माध्यमातून आइन्मन काकांच इंटर्प्रिटेशन अनुभवतो आपण. दुसर्‍या टोकाच्या जवळ जाताना बाहेरच जग , आपल जग दिसल की निश्वास सोडतो आपण , संपल हे स्वप्न म्हणून. रस्त्याच्या कडेला , सगळ्यात शेवटाल्या बुटक्या ठोकळ्यावर बसून उजळणी होते मनातच, नुकत्याच घेतलेल्या अनुभवाची, माहित असलेल्या इतिहासाची , आणि आज अजून काहीही नको म्हणत पावल घराकडे वळतात.

अत्यंत थंड डोक्यानी , पद्धतशिर यंत्रणे सारखा राबवलेला हा नरसंहार , वर्तमानात त्याबद्दलची जर्मनीची भूमिका, पश्चात्ताप, अजूनही जगात ह्या आणि ह्यासारख्याच नरसंहाराच्या बाजूनी मत देणारे जनसमुदाय, होलोकास्ट सारख्या घटना असलेली इतिहासाची पान पटकन उलटून पुढे जाउ पहाणारे , नाकारणारे लोक, ह्या सगळ्याना एका अमुर्त , अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पद्धतीनी अनुभवायला लावत हे स्मारक. हा दुष्टावा, पराकोटीची क्रुरता , ह्याच तुमच्या जगाचा भाग होती, आणि अजूनही आहे हे जाणवून देत हे स्मारक. कोणतेही कूंपण नाहीये इथे , बस स्टॉप च्या बाकड्याच्या उंचीचे ठोकळे भर रस्त्यावर आणि ह्याच वर्तमाना चा भाग म्हणून तिथे उभे आहेत. ही कृरता , तिरकेपण , ह्याच रोजमर्रा जगाचा एक भाग आहे . अत्यंत सोयिस्कर पणे आपण ह्या तिरकेपणाकडे बोथट जाणिवानी पाहतो, आजूबाजूला तो असू देतो, हे प्रतिध्वनित होत राहत.

ह्या स्मारकाची ही काही प्रकाशचित्रे, पण ह्यातून काहीच उमजत नाही, त्या पिलर्स च्या जंगलात पायी फिरून घेतलेला अनुभव प्रतिध्वनीत होउन आदळात रहातो मनावर. एक समाज म्हणून ह्या इतिहासाला सोइस्कर्पणे गुंडाळून बासनात ठेवताना हेही लक्षात घेतल पाहिजे की हा तिरकेपणा अजूनही आहे आजूबाजूला . आणि जागल्याच काम करावच लागणारे आपल्याला , आजचा समाज म्हणून , परत अशी स्मारकं बांधावी लागू नयेत म्हणून.

prachi 2prachi 3prachi 4http://www.maayboli.com/node/31802 भटकंती-१
http://www.maayboli.com/node/35461 भटकंती २
http://www.maayboli.com/node/35470 भटकंती ३
http://www.maayboli.com/node/47043 भटकंती ४
http://www.maayboli.com/node/48169 भटकंती ५
http://www.maayboli.com/node/48184 भटकंती ६

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलयं!! वेदनादायक पण अंतर्मुख करणारा अनुभव!! कंबोडियाच्या जेनोसाईड म्युझियम मध्येही असाच अनुभव येतो. दिनेश म्हणत आहेत तसं सुन्न व्हायला होतं!!

जागल्याच काम करावच लागणारे आपल्याला , आजचा समाज म्हणून , परत अशी स्मारकं बांधावी लागू नयेत म्हणून.>++११ इन्ना ..खुप कमी शब्दात खुप काही सांगीतलेस इथे बसल्या बसल्या पण काटा आला अंगावर.

जागल्याच काम करावच लागणारे आपल्याला , आजचा समाज म्हणून , परत अशी स्मारकं बांधावी लागू नयेत म्हणून.>++११ इन्ना ..खुप कमी शब्दात खुप काही सांगीतलेस इथे बसल्या बसल्या पण काटा आला अंगावर>>> अगदी

थरकाप उडाला अगदी!
<<काय बर सांगायच असेल यातून असा विचार करेपर्यंत ठोकळे आप्लयापेक्षा उंच होतात आणि शब्दशः पायखालची जमीन सरकते<< इमॅजीन केल आम्ही पण हे!
नि:शब्द!

शप्पथ.... सुन्न झाले वाचून
अतिशय मोजक्या शब्दात नेमकं मांडलयस इन्ना
वाचता वाचता मी ही दचकून आजुबाजूला बघितलं....
शेवटी लिहिलेलं फारच पटलं >>एक समाज म्हणून ह्या इतिहासाला सोइस्कर्पणे गुंडाळून बासनात ठेवताना हेही लक्षात घेतल पाहिजे की हा तिरकेपणा अजूनही आहे आजूबाजूला . आणि जागल्याच काम करावच लागणारे आपल्याला , आजचा समाज म्हणून , परत अशी स्मारकं बांधावी लागू नयेत म्हणून.<< जिओ

Inna, nice writing and photos.

There is worldwide publicity for Jewish genocide in WWII, how come no one ever talk about Indian Genocide in the same war Sad Most of the Indians doesn't know that how many of us died in various parts of the World fighting for white skinned people belonging to different countries. ( Sorry! For writing totally un-related stuff)

खरच वाचताना एव्हडे सुन्न व्हायला होते. तिथे गेल्यावर काय अवस्था होत असेल इमॅजीन करु शकत नाही.

एक समाज म्हणून ह्या इतिहासाला सोइस्कर्पणे गुंडाळून बासनात ठेवताना हेही लक्षात घेतल पाहिजे की हा तिरकेपणा अजूनही आहे आजूबाजूला . आणि जागल्याच काम करावच लागणारे आपल्याला , आजचा समाज म्हणून , परत अशी स्मारकं बांधावी लागू नयेत म्हणून.>>> एकदम पटलं.

मस्त लिहलेयस ईन्नातै.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
राजसी , युद्ध आणि युद्ध्जन्य आजार व आपत्ती यामुळे जीव गमवावा लागण वाईटच (भारतातील ८७०० सैनीक जगभरात लढताना आणि जवळापास १५ लाख लोक युध्जन्य कारणानी दगावले) पण एका जमातीचा समुळ नायनाट करायच्या हेतूनी केलेल्या कत्तली युद्धापेक्षा नक्कीच जास्त क्रूर , आणि निर्घॄण आहेत.

वाचून आणि फोटो पाहून अंगावर सर्रकन काटा आला.
पण हे असं सतत आठवण करून देणारं स्ट्रक्चर बनवणं हे ही धाडसच. जखमेवरची खपली निघून जखम सतत भळभळणार.

Ok. I respect your point of view.

I feel that number of Indians actually died all over the world while fighting for one or the other European ruler is much more that what's shown in wiki. Just in recent past mass grave of Indian soldiers was found in Germany. No need to build gas chambers when you can eradicate some race by simply sending them to war to fight on your behalf. Also we don't have wealthy same race counterparts like Jews have in USA especially on Wall Street.

इन्ना.....

ह्या स्मारकासंदर्भात पूर्वी वाचले होते. आता तुझ्या लेखावरून जाणवत गेले की प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या नरसंहाराच्या आठवणी समोर आणणे म्हणजे किती क्लेशदायक अनुभव असू शकतो सोफिया लॉरेनच्या "सनफ्लॉवर" चित्रपटात अशा स्मारकाचा उल्लेख होता. सव्वा लाखाहून अधिक इटालियन सैनिक रशियातील स्टालिनग्राड युद्धात मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या कबरी त्या जागी बांधल्या गेल्या. स्मारकच झाली ती जागा आणि तिथे कथानकातील ही विधवा सोफिया मिलानहून स्टालिनग्राडला आपल्या पतीची कबर शोधायला जाते असा कथानकातील एक भाग. त्यावेळी दाखविलेल्या त्या हजारो कबरींच्या दृष्याने अंगावर शहारे आल्याचे स्मरते....बर्लिनमधील "होलोकॉस्ट मेमोरीअल" पाहून तीच भावना अंगावर उमटली.

...आणि आता तुझा हा सुन्न करून टाकणारा लेख वाचल्यावर राहूनराहून वाटू लागले की अशा स्मारकांच्या स्तंभ उभारणीबाबत ज्यावेळी शासन दरबारी निर्णय होतो, त्यावेळी मिनिट्समध्ये नेमके काय लिहिले जाते ? कोणत्या भाषेत स्मारकाचा हेतू स्पष्ट केला जातो ? कमिटी नेमली जाते जी, त्यातील सदस्यांवर कामाची जबाबदारी सोपविताना कोणत्या सूचना अधोरेखीत केल्या गेल्या असतील. ज्यू संहाराचे प्रतीक म्हणजे आपल्या देशात अत्यंत निर्दयीरित्या आपल्याच बांधवांकडून घडलेल्या घटनेची साक्ष सांगणारे एक शिल्प....ते तयार करायचे आणि परत आपल्याच बंधूभगिनी तसेच पुढील पिढीसमोर ठेवायचे.....का ? तर तो एक जळजळीत इतिहास ह्या मातीत घडला आणि सार्‍या जगाने आपल्या देशाची घृणा केली.....असे हे सारे विचार पीटर आईन्मन आणि इंजिनिअर ब्युरो हॅपॉल्ड यांच्या मनी जेव्हा उतरले तेव्हा डीझाईन निश्चित्त करण्याबाबत त्यानी किती बैठका घेतल्या असतील तसेच किती तज्ज्ञांशी चर्चा केली असेल याचा विचार करूनसुद्धा मन थक्क होऊन जाते. कारण त्यामागे आहे एक वेदनेचे सिम्बॉल उभा करणे....जे पाहताना क्रूर तर वाटता कामा नये, पण त्यातून क्रूरतेचा संदेश तर गेलाच पाहिजे. स्मारकासंदर्भात सार्‍याच बाजूने काही योग्य आणि होकारार्थी मते येणे शक्यच नव्हते. विरोधाचा आवाजही उठले होतेच...मला वाटते खुद्द ज्यू कम्युनिटीच्या प्रमुख नेत्यांनी अशा स्मारकाविरोधात आवाज उठविला होता.

होलोकास्ट संदर्भातील फिल्म्स पाहाताना आजही अंगावर शहारे येतात.....तुझ्या ग्रुपला प्रत्यक्ष स्मारक पाहताना काय जाणवले असेल याची कल्पना मी करू शकतो. लेखातूनही ते जाणवतेच. "...परत अशी स्मारकं बांधावी लागू नयेत म्हणून...." असा या लेखाचा शेवट केला आहेस.

......देव करो आणि तसेच होवो.

यडच्याप मन,अ‍ॅब्स्ट्रॅक्ट प्रश्न,अन्गावर येणार ठोकळेबद्ध स्मारक अशी वळण वाचत सुन्न झाले.>>>जागल्याच काम करावच लागणारे आपल्याला , आजचा समाज म्हणून , परत अशी स्मारकं बांधावी लागू नयेत म्हणून.>>>>
असा शेवट करत भानावर पण आणलस.लेखनाप्रमाने कृतीही नक्कीच करशील.

सुन्न! ह्या स्मारकाद्वारे मिळणारा संदेश फार मोलाचा आहे.
जागल्याच काम करावच लागणारे आपल्याला , आजचा समाज म्हणून , परत अशी स्मारकं बांधावी लागू नयेत म्हणून>> अगदी!

इन्ना Sad

आज पाकिस्तान शाळेच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे वाचत असताना मनात नक्की काय कालवाकालव झाली ते लिहिता येत नाहीये. नंतर यावर कधीतरी बोलूच.

>>ठोकळे आप्लयापेक्षा उंच होतात आणि शब्दशः पायखालची जमीन सरकते. पोटात पहिला खड्डा पडतो, चारी बाजूना पाहिल्यावर लक्षात येत की बाहेरच्या जगाशी आतापर्यंत असलेला व्हिज्युअल संबंध संपलाय आणि १० -११ फुटी अजस्त्र काँक्रीटाचे ठोकळे अंगावर येतात , दडापून टाकायला बघतात . ठोकळे ,आतापर्यंत जाणावलेला काटेकोरपणा अन तोल सोडून वेडेवाकडे दिसायला लागतात. एक शिरशिरी येते आणि भीती राज्य करायला लागते मनावर, इन अ मोमेन्ट यु आर नो मोअर इन कंट्रोल ऑफ द सिच्युएशन . पायाखालच पेव्हिंग खाली जाताना दिसत. तोवर उजवीकडे, डावीकडे, सरळ ,मागे करत आपण त्या गर्तेत शिरत जातो, प्रत्यक्षात संथपणे चालत असलो तरी मनातल्या मनात जिवाच्या आकांतानी बाहेर पडायच असत. ह्या जगातून बाहेर , माझ सुरक्षित , उबदार आणि प्रेडिक्टेबल जग.

इन्ना, अत्यंत परफेक्ट वर्णन केलंत!

सगळ्याना प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
पेशावर मधे निष्पाप मुल गोळ्याना सामोरी गेली , बेल्जियम अन सिडनी मधे ओलीस नाट्य घडले ,जीव गमावले लोकानी. स्मारक बांधायची कधी थांबणार. Sad
अशोक मामा, तुम्ही सविस्तर लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. १९८० मधे एक टिव्ही पत्रकार ली रोश आणि इतिहास तज्ञ श्री जॅकेल यानी होलोकास्ट मेमेरियल असाव या बाबत नागरी चळावळ सुरु केली , त्यानंतर १९८९ मधे तर रितसर त्याच डिझाइन अन बांधणी व्हावी यासाठी वर्ङणी गोळा करणही सुरु झाल. वाढत्या नागरी दबावानंतर बुंडेस्टाग (जर्मन संसद ) नी या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिली. हो ,नाही, कुठे , कस च्या चर्चा अन वादांनंतर १९९३ मधे पहिली डिझाइन कॉम्पिटिशन आयोजित केली गेली . राजकारणी, इतिहास तज्ञ, ज्यु अभ्यासक, आर्किटेक्ट, आर्टिस्ट्स , नगररचनाकार, अ‍ॅडमिनिस्ट्रेटार्स स्पर्धेत आलेल्या डिझाइन्स ची छननी करणाअर होते , बराच खल (वाद ) घालून २ डिझाइन्स अंतिम फेरीत पोचली . पण तत्काली न चान्सलर हेल्मट कोह्ल ( ज्यानी ह्या प्रकल्पात सुरवातीपासून रस दाखवला होता) यानी त्याच्या अधिकारात ही स्पर्धाच रद्द केली आणि परत दुसरी स्पर्धा घेण्यास फर्मावल. १९९७ मधे दुसरी स्पर्धा झाली पिटार आइन्मन यांनी ती जिंकली. बहुमतानी संसदेत ते डिझाइन मान्यही झाल. जगात सर्वत्र माणास तीच आणि तशीच असतात हे शाबित करत, जागा देणॅ, लाल फिती ,सरकारी चाल्ढकल चालू झाली. Uhoh शेवटी, वर्तमान्पत्रात 'होलोकास्ट घडलच नाही' ह्या मथळ्याखाली दुसरी नागरी दबाव मोहिम सुरु झाली. 'आज आपण ही घटाना डोळ्याआड करून विसरली म्हणातोय उद्या अस घडालच नाही म्हणाणाअर्‍यांची संख्या अजूनच वाढेल ' अस म्हणात परत वर्गणी गोळा करायला सुअरवात झाली. शेवटी २००३ मधे प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात झाली. दिड वार्षात ते संपल आणि २००५ मधे जनतेसाठी खुल करण्यात आल. नाझींच्या बिनशर्त शरणाअगतीच्या ६० व्या स्मरण दिनी (८ मे ) हे अनावरण झाल.

थॅन्क्स इन्ना....

२००३ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाच्या ढाच्याला मान्यता मिळाली संसदेची.. त्या संदर्भात "टाईम" मध्ये मोकळ्या जागेचा...बांधकामपूर्व... अतिशय शांत ठिकाण वाटेल असा एक फोटो (आणि त्यामागील भूमिका, अर्थात इतिहास ....सालाबरहुकूम) प्रसिद्ध झाला होता. तुझ्या प्रतिसादावरून मला ते दहा वर्षापूर्वीचे दिवस आठवले....अन् सांगायला हरकत नाही, व्यक्तिशः मलाही कॉन्क्रिट स्लॅबमधून सिम्बॉल कसा साधला जाईल याबद्दल उत्सुकता वाटत होती....पुढे वेळोवेळी टाईम मॅगेझिन फॉलो केले तरी प्रत्यक्ष स्मारक पूर्ण होईतो कामाबाबत कोणते आर्टिकल आढळले नाही....तुझ्या लेखामुळे ते सारे दिवस पुन्हा आठवले.

आर्किटेक्टचा विषय निघालाच आहे म्हणून लिहितो....पीटर आईन्मन यांच्या City of Culture of Galicia स्पेनमधील ह्या बांधकामाचीही बरीचशी चर्चा घडली होती. आता या क्षणी माझ्याकडे त्याची चित्रे नाहीत, पण तुला नेटवर मिळू शकतील. एक अभ्यासू विद्यार्थिनी ह्या नात्याने तुला त्यात आनंद मिळेलच यात शंका नाही.

खुप प्रभावी लिहिलंयस इन्ना, फार भयावह अनुभव असणार तो !
स्मारकात असताना आजपर्यंत त्यासंदर्भात वाचलेलं लिखित, बघितलेले सिनेमे, ऐकलेल्या गोष्टी आठवून ते सगळं आणखी काळंकुट्ट गडद होत असेल..
शेवट किती परिणामकारक केलास. विचार करायला लावणारा. पण कालच्या संहारानं आपण माणूस म्हणुन कुठल्या दिशेला चाललोय ते कळेनासं झालंय. वास्तव इतिहास विसरू न देणारं भोवंडून टाकणारं आहे, चिमखडी पोरंही सुटेनात माणसाच्या कचाट्यातनं आता Sad

मस्तच लिहिलय नेहमीप्रमाणे Happy लिखाणासाठी __/\__

सिडनी आणि त्यानंतर झालेल्या पेशावरच्या घटनेचे पडसाद अजुन उमटताहेत त्यावेळी हा लेख म्हणजे अगदीच मनावरच्या खपल्या निघुन भळाभळा रक्त वाहतय ही जाणिव.
येडचॅप मन, अ‍ॅब्स्ट्रॅक्ट प्रश्न, बुटक्या पासुन अतिउंच होत जाणारे ठोकळे आणि त्यानुसार दोलायमान होणार मन सगळं सगळं पोचल अगदी.

Pages