केवढी आसक्त असते !

Submitted by निशिकांत on 15 December, 2014 - 00:15

वादळे आली नि गेली पण तरी उन्मुक्त असते
आठवांच्या वादळांवर, केवढी आसक्त असते!

जीवनाची सांज असुनी, मोगरा वेणी दिल्यावर
आजही पाहून दर्पण, होत ती आरक्त असते

तू दिलेल्या खोल जखमा, वेगळी त्यांची तर्‍हा की
बैसली खपली तरी साकाळलेले रक्त असते

जास्त मी की तू उचलला भार ही चर्चा कशाला?
नेटका संसार करणे ध्येय हे संयुक्त असते

लाख बेड्या घातल्या अन् डांबले कैदेतही पण
हौस स्वप्ने पाहण्याची अंतरी भयमुक्त असते

प्राप्त का सर्वांस होतो मंच दु:खे सांगण्याला?
बोलुनी अपुल्यास आपण व्हावयाचे व्यक्त असते

हासवाया हासणार्‍या विदुषकांचे दु:ख हे की
हास्यकल्लोळात त्याचे मन बिचारे रिक्त असते

फोन, काँप्यूटर नि किंडल, हातचा मळ नातवांच्या
राहिलो मागे उभयता, टोच इतकी फक्त असते

शोधसी "निशिकांत" का खेड्यातल्या खाणाखुणा तू?
राक्षसी शहरास, गिळण्या गाव रे! उपयुक्त असते

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users