ज्ञानेश्वरी नित्यपाठ - स्वामी स्वरूपानंद (पांवस)

Submitted by पुरंदरे शशांक on 14 December, 2014 - 22:00

ज्ञानेश्वरी नित्यपाठ - स्वामी स्वरूपानंद (पांवस)

पूजनीय स्वामीजींनी जी काही ग्रंथसंपदा निर्माण केली त्यातील हा अतिशय छोटेखानी ग्रंथ - ज्ञानेश्वरीतील निवडक १०९ ओव्या असलेला - "ज्ञानेश्वरी नित्यपाठ". केवळ १५-२० मिनिटात या ओव्या वाचून होतील इतका हा सुटसुटीत ग्रंथ. मात्र अर्थाकडे ध्यान देऊन शांतपणे या ओव्या वाचत गेल्यास आपल्या नित्याच्या जीवनालाही जागृती प्रदान करणारा असा एक समर्थ ग्रंथ आहे.

नाथ संप्रदायातील स्वामीजी काय किंवा इतर सत्पुरुष काय - सर्वांनाच ज्ञानेश्वरी हा प्रमाण ग्रंथ. या नाथ संप्रदायातील सगळेच महापुरुष ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीच जीवनात उतरवणारे - त्यातील भक्तलक्षणे असोत वा गुणातीताची लक्षणे असोत वा स्थितप्रज्ञ लक्षणे असोत - ही सारी जीवनात कशी उतरवता येतील याचा सार्‍या आयुष्यभर पाठपुरावा करणारे.
स्वामी स्वरूपानंदही याच पठडीतले. त्यांना माऊलींची सारी ग्रंथसंपदा म्हणजे जीव की प्राण. माऊलींच्या ज्ञानेश्वरी तसेच चांगदेव पासष्टी व अमृतानुभव यांचे त्यांनी अभंगात्मक अनुवाद केलेले आहेत. यातील "अभंग ज्ञानेश्वरी" जर पाहिली तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना मूळ ज्ञानेश्वरी कळायला कठीण म्हणून या ग्रंथाची रचना स्वामीजींनी केलेली आहे हे लक्षात येईल. माऊलींच्या काळातली मराठी भाषा आपल्या पचनी पडणे अवघड म्हणून सध्याच्या (प्रचलित) मराठी भाषेत ही अभंग ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे.

असे असताना मूळ ज्ञानेश्वरीची गोडी, तिचे महत्व स्वामीजी पूर्ण जाणून होते. मात्र मूळ ज्ञानेश्वरी खूप मोठी ( - एकूण सुमारे ९३०० ओव्या) असल्याने त्यातील काही निवडक साररुप ओव्या जर दररोज वाचनात आल्या तर ज्ञानेश्वरी भाविकांना त्याचा खूप उपयोग होईल हे लक्षात घेऊन स्वामीजींनी या ग्रंथाची निर्मिती केली आहे.

आपण जर या ग्रंथाचा नीट अभ्यास केला तर असे लक्षात येईल की या ओव्या निवडण्यामागे स्वामीजींचे काही स्पष्ट विचार आहेत - एक विचारधारा आहे. तसेच ज्याला प्रॅक्टिकल परमार्थ म्हणता येईल तो यात सांगितला आहे.
ज्ञानेश्वरी नित्यपाठे या ग्रंथाचा गोषवारा सांगायचा तर -

पहिल्या चार ओव्या नमनाच्या आहेत.

पाच आणि सहा या देह आणि आत्मा यांचे पूर्णपणे विभिन्नत्व दाखवणार्‍या ओव्या आहेत.

यानंतरच्या सुमारे चाळीस ओव्या या कर्मपर आहेत.

४६ ते ६३ या ओव्या ज्ञान महात्म्य सांगणार्‍या आहेत.

६४ ते ९६ या ओव्या भक्तिमार्गाची गोडी विशद करणार्‍या आहेत.

९७ ते ९९ - या ग्रंथाचा अधिकारी कोण तसेच गीतातत्व इतर भाविकांना उलगडून सांगणार्‍या मर्मज्ञ भक्ताबद्दल भगवंतांना कसे विशेष प्रेम वाटते हे सांगणार्‍या या ओव्या आहेत.

१०१ ते १०५ - गीता ग्रंथ महात्म्य यात विशद केले आहे.

१०६ ते १०९ - निवडक पसायदान
अशी या ग्रंथाची एकंदर रचना आहे.

आता स्वामीजींना अभिप्रेत असलेली यामागची विचारधारा समजावून घ्यायचा प्रयत्न करुयात.

कर्माचे महत्व, कर्मयोग हे सारे माऊलींनी ज्या ओव्यांमधे अतिशय स्पष्टपणे मांडले आहेत अशाच नेमक्या ओव्या स्वामीजींनी कशा काय निवडल्या याचे मला तरी फारच आश्चर्य वाटत रहाते. कारण मूळ ज्ञानेश्वरीत कर्मयोग, संन्यासयोग यावर वेगवेगळे स्वतंत्र अध्याय असताना त्यातील आपल्या उपयोगाच्या ओव्या निवडून काढणे याकरता ज्ञानेश्वरीचा साक्षात मर्मज्ञच इथे उपस्थित असल्याचे आपल्याला जाणवते.

कर्माच्या भक्कम पायावरच परमार्थाची (किंबहुना जीवनाचीही) इमारत उभी रहाते असे स्वामींजीचे ठाम मत दिसून येते. मात्र हे कर्म कुठले, स्वधर्म म्हणजे काय, ते करता करता या कर्मपाशातून अलगद सुटका कशी करुन घ्यायची हे सारे त्यांनी या ओव्यांद्वारे सुरेख समजावले आहे. स्वधर्माचे महत्व, कर्मफलाची आशा न ठेवता कर्म करणे, अशा स्वकर्मांनीच केलेली सर्वात्मक ईश्वराची पूजा, असा कर्मयोग - त्यातून निर्माण होणारी चित्ताची समता - ज्याची परिणीती सहाजिकच प्रसन्नतेत होते हे सारेच्या सारे या ओव्यांमधून इतक्या सुंदरपणे गुंफले आहे की या सगळ्या ओव्या जणू एखादी सुंदर पुष्पमालाच वाटावी.

त्यापुढे येतात ज्ञानासंबंधीच्या ओव्या. ज्ञानात एव तु कैवल्यम् | अशी वस्तुस्थिती असल्याने ज्ञान म्हणजे काय, ते कोणाकडून प्राप्त करुन घ्यायचे हे देखील अतिशय निवडक ओव्यांमधून स्वामीजी समजावून सांगतात. देहापासून आत्मा कसा निराळा आहे हेदेखील इथे समजावून सांगणार्‍या ओव्या निवडलेल्या आहेत.

यापुढील सर्वच ओव्या या भक्तिला वाहिलेल्या आहेत. भक्ति म्हणजे काय, ती कशी आचरायची, तिचे वर्म, साधने व व्याप्ती हे सर्वच्या सर्व या ओव्यांतून नीट उलगडले आहे. सहाजिकच नवव्या अध्यायातील अनेक ओव्यातून जी वेगवेगळी भक्तिसाधने (श्रवण, कीर्तन, वंदन, अर्चन आदी) सांगितली आहेत त्या ओव्या इथे आहेत. नवविधा भक्तिची साधने समाजातील कुठल्याही घटकाला आचरता येतात हे जे भक्तिविशेष आहे ते वर्णन करणार्‍या ओव्याही इथे घेतलेल्या दिसतील. (ज्ञानमार्ग व कर्ममार्ग यांना काही अधिकार लागतो मात्र भक्ति कोणालाही करता येते हा भक्तिविशेष)
स्वामीजींना अभिप्रेत भक्त हा 'जाणता' (जनी जाणता भक्त होवोनी राहे - श्रीसमर्थ ) असणारच - त्यामुळे अशा जाणत्या भक्तासारखेच ते आपल्याला मन भगवच्चरणी ठेवण्यासाठी काय करावे याचेही मार्गदर्शन करतात. त्याकरता आधी अभ्यासाने मन आवरणे - मग चोवीस तासातले निदान क्षण दोन क्षण परमात्म्याच्या चरणी मन, चित्त ठेवण्याचा प्रयत्न करीत करीत पुढे ते सारे मन, चित्त भगवच्चरणी वहाणे (संपूर्ण समर्पण) - अशा या भक्तिची परिपूर्ती - भगवद्रूपास प्राप्त होणे हे सर्व या ओव्यातून स्पष्ट झालेले आढळते.

अशा या अतिशय आगळ्या वेगळ्या ग्रंथाचे प्रयोजन काय ? तर परमार्थ हा नुसता ग्रंथात सांगितलेला नसून तो रोजच्या आचरणात कसा आणता येईल याचे मार्गदर्शन स्वामीजींनी अतिशय कनवाळूपणे या ग्रंथातून केले आहे असे माझे प्रांजळ मत. आपल्या जीवनातून कर्म, ज्ञान, उपासना या गोष्टी वेगळ्या काढता येत नाहीत तर या सार्‍यांचा एकत्रित विचार हा खरा प्रॅक्टिकल परमार्थ अशी शिकवण स्वामीजी आपल्याला देऊन राहिले आहेत.

हा ग्रंथ नित्यपाठाकरताच आहे व असा नित्यपाठ करता करता त्यातील वर्म समजावून घेऊन जर तो आचरणात आणला तर तोच खरा परमार्थ.
आधी ते करावे कर्म | कर्ममार्गे उपासना | उपासका सापडे ज्ञान | अशा पायर्‍यांनी परमार्थाची निश्चित अशी केलेली वाट स्वामीजी यातून दाखवत आहेत.
ज्या कोणा ज्ञानेश्वरी भाविकांना ज्ञानेश्वरीचे सार हवे असेल त्यांनी या ग्रंथाचा जरुर यथाशक्ति यथामती अभ्यास करावा अशी नम्र विनंती.

या नित्यपाठाचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की - यातली एकही ओवी अनावश्यक वा जास्तीची वाटत नाही. तसेच एखाद्या ओवीऐवजी दुसरी कुठली ओवी तिथे टाकू म्हटले तर तेही शक्य वाटत नाहीये. इतक्या चपखल, एकसंध प्रवाही अशा ओव्या शोधणे हे खरोखरीच पाण्डित्याचे काम वाटत नाही तर ज्ञानेश्वरीचे ह्रदय जाणलेल्या, ज्ञानेश्वरीशी एकरुप झालेल्या एका योगीराजाचेच किंवा भक्ताचेच किंवा ज्ञानी महापुरुषाचेच हे प्रकट चिंतन असल्याचे जाणवते. (तेही साधकांना त्याचा उपयोग व्हावा या एकमेव हेतूने केलेले..). जणु काही माऊलीच त्यांच्या ह्रदयात सुप्रतिष्ठीत झाली आहे व त्यामुळेच स्वामीजी सहजरित्या या ओव्या एकापुढे एक मांडत गेले आहेत असा एक सहजसुंदर ओघ या ग्रंथाला प्राप्त झाला आहे. कर्म-ज्ञान-भक्ति हे एकातून एक उलगडून दाखवत असतानाच परमार्थातील त्यांची एकरुपता अशी काही विलक्षण पद्धतीने मांडलेली आहे की या संपूर्ण रचनेकडे पहात असताना माझ्या मनात - हे सारेच "केवळ एक अद्भुत" असा भाव उमटतो आणि पुढे मग संजयाप्रमाणेच "हृष्यामि च मुहुर्मुहुः" अशी अवस्थाही सहजच होऊन जाते.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

http://abhangdnyaneshwari.org/Dnyaneshwari%20Nityapath.pdf

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१] ॐ नमो जी आद्या | वेद प्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||अध्याय १- ओवी १||
(आद्य - मूळचा, सर्वांच्या आरंभीचा, वेद प्रतिपाद्य - वेदांच्या प्रतिपादनाचा विषय, स्वसंवेद्य - स्वतःच स्वतःला जाणण्यास योग्य असा)

२] देवा तूंचि गणेशु | सकलार्थमतिप्रकाशु | म्हणे निवृत्तिदासु | अवधारिजो जी ||१-२||
(अवधारिजो - ऐकावे)

३] आतां अभिनव वाग्विलासिनी | ते चातुर्यार्थकलाकामिनी | ते शारदा विश्वमोहिनी | नमिली मियां ||१-२१||
(अभिनव वाग्विलासिनी - वाणीची अपूर्व क्रीडा करणारी)

४] मज हृदयीं सद्गुरु | जेणें तारिलों हा संसारपूरु | म्हणौनि विशेषें अत्यादरु | विवेकावरी ||१-२२||

--------------------------

५] या उपाधिमाजीं गुप्त | चैतन्य असे सर्वगत | तें तत्त्वज्ञ संत | स्वीकारिती ||२- १२६||
(उपाधीमाजी - देहादी प्रपंचात, सर्वगत-सर्वव्यापी )

६] उपजे तें नाशे | नाशलें पुनरपि दिसे | हें घटिकायंत्र जैसें | परिभ्रमे गा ||२-१५९||
(घटिकायंत्र - रहाटगाडगे (वाळूचे घड्याळ))
----------------------------

७] जैसें मार्गेंचि चालतां | अपावो न पवे सर्वथा | कां दीपाधारें वर्ततां | नाडळिजे ||२-१८७||
(अपावो=अपाय, पवे=पावे, नाडळिजे = ठेच लागत नाही)

८] तयापरी पार्था | स्वधर्में राहाटतां | सकळ कामपूर्णता | सहजें होय ||२-१८८||
(राहाटतां=वागत असता)

९] सुखीं संतोषां न यावें | दुःखीं विषादा न भजावें | आणि लाभालाभ न धरावे | मनामाजीं ||२-२२६||
(विषादा न भजावें=खिन्न होऊ नये)

१०] आपणयां उचिता | स्वधर्में राहाटतां | जें पावे तें निवांता | साहोनि जावें ||२-२२८||
(निवांता=शांतपणे)

११] आम्हीं समस्तही विचारिलें | तंव ऐसेचि हें मना आलें | जें न सांडिजे तुवां आपुलें | विहित कर्म ||२-२६५||
(विचारिलें = विचार केला, जे = की, विहित कर्म = कर्तव्य (शास्त्राने सांगितलेले))

१२] परी कर्मफळीं आस न करावी | आणि कुकर्मीं संगति न व्हावी | हे सत्क्रियाचि आचरावी | हेतूविण ||२-२६६||
(हेतूविण=फलाशा न ठेवता)

१३] तूं योगयुक्त होऊनी | फळाचा संगु टाकुनी | मग अर्जुना चित्त देउनी | करीं कर्में ||२-२६७||

१४] परी आदरिलें कर्म दैवें | जरी समाप्तीतें पावे | तरी विशेषें तेथ तोषावें | हेंही नको ||२-२६८||
(आदरिलें=आरंभलेले)

१५] कीं निमित्तें कोणें एकें | तें सिद्धी न वचतां ठाके | तरी तेथिंचेनि अपरितोखें | क्षोभावें ना ||२-२६९||
(वचता = जाता, ठाके = राहे, अपरितोखे = असंतोषाने)

१६] देखैं जेतुलालें कर्म निपजे | तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे | तरी परिपूर्ण सहजें | जहालें जाणैं ||२-२७१||
(जेतुलालें=जेवढे, आदिपुरुषीं=परमात्म्याचे ठायी)

१७] म्हणौनि जें जें उचित | आणि अवसरेंकरूनि प्राप्त | तें कर्म हेतुरहित | आचरें तूं ||३-७८||
(अवसरेंकरूनि = प्रसंगानुसार)

१८] देखैं अनुक्रमाधारें | स्वधर्मु जो आचरे | तो मोक्षु तेणें व्यापारें | निश्चित पावे ||३-८०||
(अनुक्रमाधारें=वर्णाश्रमधर्माप्रमाणे)

१९] स्वर्धमु जो बापा | तोचि नित्ययज्ञु जाण पां | म्हणौनि वर्ततां तेथ पापा | संचारु नाहीं ||३-८१||
(संचारु=प्रवेश)

२०] हा निजधर्मु जैं सांडे | आणि कुकर्मीं रति घडे | तैंचि बंधु पडे | संसारिक ||३-८२||
(रति = आवड)

२१] म्हणौनि स्वधर्मानुष्ठान | तें अखंड यज्ञ याजन | जो करी तया बंधन | कहींच न घडे ||३-८३||
(कहींच=कधीच)

२२] अगा जया जें विहित | तें ईश्वराचें मनोगत | म्हणौनि केलिया निभ्रांत | सांपडेचि तो ||१८-९११||
(विहित = कर्तव्य, निभ्रांत = नि:संशय )

२३] हें विहित कर्म पांडवा | आपुला अनन्य वोलावा | आणि हेचि परम सेवा | मज सर्वात्मकाची ||१८-९०६||
( अनन्य=एकच, वोलावा=जीवन)

२४] तया सर्वात्मका ईश्वरा | स्वकर्मकुसुमांची वीरा | पूजा केली होय अपारा | तोषालागीं ||१८-९१७||
(स्वकर्मकुसुमांची = स्वकर्मरुपफुलांची)

२५] तें क्रियाजात आघवें | जें जैसें निपजेल स्वभावें | तें भावना करोनि करावें | माझिया मोहरा ||९-४००||
(मोहरा=मार्गाला)

२६] आणि हें कर्म मी कर्ता | कां आचरैन या अर्था | ऐसा अभिमानु झणें चित्ता | रिगों देसीं ||३-१८७||
(अर्था = फळासाठी, झणे चित्ता रिगो देसी = रिघू देऊ नका)

२७] तुवां शरीरपरा नोहावें | कामनाजात सांडावें | मग अवसरोचित भोगावे | भोग सकळ ||३-१८८||
(शरीरपरा=देहाच्या ठिकाणी आसक्त, कामनाजात = सर्व कामना)

२८] तूं मानसा नियमु करीं | निश्चळु होय अंतरीं | मग कर्मेंद्रियें व्यापारीं | वर्ततु सुखें ||३-७६||

२९] परिस पां सव्यसाची | मूर्ति लाहोनि देहाची | खंती करिती कर्माची | ते गांवढे गा ||३-१४५||
(परिस = ऐक, सव्यसाची = अर्जुना, लाहोनि=प्राप्त करुन, खंती=कंटाळा, गांवढे = अडाणी)

३०] देख पां जनकादिक | कर्मजात अशेख | न सांडितां मोक्षसुख | पावते जाहले ||३-१५२||
(अशेख=संपूर्ण)

३१] देखैं प्राप्तार्थ जाहले | जे निष्कामता पावले | तयाही कर्तव्य असे उरलें | लोकांलागीं ||३-१५५||
(प्राप्तार्थ = कृतार्थ, लोकांलागीं=लोकांसाठी )

३२] मार्गीं अंधासरिसा | पुढें देखणाही चाले जैसा | अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा | आचरोनी ||३-१५६||
(देखणा=डोळस)

३३] एथ वडील जें जें करिती | तया नाम धर्मु ठेविती | तेंचि येर अनुष्ठिती | सामान्य सकळ ||३-१५८||
(वडील=थोर, श्रेष्ठ, येर=इतर, अनुष्ठिती=आचरण करतात)

३४] हें ऐसें असे स्वभावें | म्हणौनि कर्म न संडावें | विशेषें आचरावें | लागे संतीं ||३-१५९||
(संडावें=सोडावे)

३५] दीपाचेनी प्रकाशे | गृहींचे व्यापार जैसे | देही कर्मजाता तैसे | योगयुक्ता || ५-४९ ||
(व्यापार=व्यवहार)

३६] तो कर्में करी सकळें | परी कर्मबंधा नाकळे | जैसें न सिंपे जळीं जळें | पद्मपत्र ||५-५०||
( नाकळे=सापडत नाही, सिंपे=भिजे, पद्मपत्र=कमळाचे पान)

३७] तयाही देह एकु कीर आथी | लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती | परी आम्हांतें ऐसी प्रतीती | परब्रह्मचि हा ||६-४०८||
(कीर=खरोखर, आथी=आहे )

३८] देह तरी वरिचिलीकडे | आपुलिया परी हिंडे | परी बैसका न मोडे | मानसींची ||१३-४८६||
(वरिचिलीकडे=बाह्यतः, बैसका=बैठक)

३९] अर्जुना समत्व चित्ताचें | तेंचि सार जाणैं योगाचें | जेथ मन आणि बुद्धीचें | ऐक्य आथी ||२-२७३||

४०] देखैं अखंडित प्रसन्नता| आथी जेथ चित्ता| तेथ रिगणें नाहीं समस्तां| संसारदुःखां ||२-३३८||
(रिगणें=प्रवेश करणे)

४१] जैसा अमृताचा निर्झरु | प्रसवे जयाचा जठरु | तया क्षुधेतृषेचा अडदरु | कहींचि नाहीं ||२-३३९||
(निर्झरु=झरा, अडदरु=धाक, भिती, कहींचि=कधीच)

४२] तैसें हृदय प्रसन्न होये | तरी दुःख कैचें कें आहे ? | तेथ आपैसी बुद्धि राहे | परमात्मरूपीं ||२-३४०||
( कैचें=कसले, कें=कोठे, आपैसी=आपोआप)

४३] जैसा निर्वातीचा दीपु | सर्वथा नेणें कंपु | तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु | योगयुक्तु ||२-३४१||
(निर्वातीचा=निवार्‍याला)

४४] जया पुरुषाच्या ठायीं | कर्माचा तरी खेदु नाहीं | परी फलापेक्षा कहीं | संचरेना ||४-१०३||
(फलापेक्षा=फलेच्छा, संचरेना=प्रवेश करीत नाही)

४५] आणि हें कर्म मी करीन | अथवा आदरिलें सिद्धी नेईन | येणें संकल्पेंहीं जयाचें मन | विटाळेना ||४-१०४||
(आदरिलें-आरंभिलेले)
-------------

४६] ज्ञानाग्नीचेनि मुखें | जेणें जाळिलीं कर्में अशेखें | तो परब्रह्मचि मनुष्यवेखें | वोळख तूं ||४-१०५||
(अशेखें =संपूर्ण, मनुष्यवेखें=मनुष्यवेशाने, मनुष्यरुपाने)

४७] तें ज्ञान पैं गा बरवे | जरी मनीं आथि आणावें | तरी संतां यां भजावें | सर्वस्वेसीं ||४-१६४||

४८] जे ज्ञानाचा कुरुठा | तेथ सेवा हा दारवंठा | तो स्वाधीन करी सुभटा | वोळगोनी ||४-१६५||
(कुरुठा=घर, दारवंठा=उंबरठा, सुभटा=चांगल्या योद्ध्या (अर्जुना), वोळगोनी=सेवा करुन)

४९] तरी तनुमनुजीवें | चरणांसीं लागावें | आणि अगर्वता करावें | दास्य सकळ ||४-१६६||
(अगर्वता=अभिमान सोडून)

५०] मग अपेक्षित जें आपुलें | तेंही सांगती पुसिलें | जेणें अंतःकरण बोधलें | संकल्पा नये ||४-१६७||
(अपेक्षित= हवे असलेले, पुसिलें= विचारले (असता))

५१] तें वेळीं आपणपेयां सहितें | इयें अशेषेंही भूतें | माझ्या स्वरूपीं अखंडितें | देखसी तूं ||४-१६९||
(आपणपेयां सहितें=आपल्यासहित, इये=या , भूतें=प्राणिमात्र)

५२] ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल | तैं मोहांधकारु जाईल | जैं गुरुकृपा होईल | पार्था गा ||४-१७०||
(पाहेल=उजाडेल)

५३] जरी कल्मषाचा आगरु | तूं भ्रांतीचा सागरु | व्यामोहाचा डोंगरु | होउनी अससी ||४-१७१||
(कल्मषाचा=पापाचा, व्यामोह=मोह)

५४] तऱ्ही ज्ञानशक्तिचेनि पाडें | हें आघवेंचि गा थोकडें | ऐसें सामर्थ्य असे चोखडें | ज्ञानीं इये ||४-१७२||
(पाडें=योग्यतेने, थोकडें=लहान, चोखडें=शुद्ध)

५५] मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे | आणि हृदयीं स्वयंभचि असे | प्रत्यक्ष फावों लागे तैसें | आपैसयाचि ||९-४९||
(मोटकें=अल्प, उदैजत दिसे=उगवताना दिसते, फावों लागे=अनुभवास येऊ लागते, आपैसयाचि=आपोआप)

५६] सांगें अग्नीस्तव धूम होये | तिये धूमीं काय अग्नि आहे ? | तैसा विकारु हा मी नोहें | जरी विकारला असे ||७-५९||
(धूम=धूर)

५७] देह तंव पांचांचें जालें | हें कर्माचें गुणीं गुंथले | भंवतसे चाकीं सूदलें | जन्ममृत्यूच्या ||१३-११०३||
( पांचांचें=पंचमहाभूतांचे, गुणीं गुंथले=दोर्‍यांनी गुंफले आहे, सूदले=घातले)

५८] हें काळानळाच्या तोंडीं | घातली लोणियाची उंडी | माशी पांखु पाखडी | तंव हें सरे ||१३-११०४||
(काळानळाच्या=काळाग्नीच्या, पाखडी=फडफडावत)

५९] या देहाची हे दशा | आणि आत्मा तो एथ ऐसा | पैं नित्य सिद्ध आपैसा | अनादिपणें ||१३-११०७||
(आपैसा=सहज)

६०] सकळु ना निष्कळु | अक्रियु ना क्रियाशीळु | कृश ना स्थुळु | निर्गुणपणें ||१३-११०८||
(सकळु=भागासहित, निष्कळु=भागरहित)

६१] आनंदु ना निरानंदु | एक ना विविधु | मुक्त ना बद्धु | आत्मपणें ||१३-११११||
(निरानंदु=आनंदरहित)

६२] तें परम तत्त्व पार्था | होती ते सर्वथा | जे आत्मानात्मव्यवस्था- | राजहंसु ||१३-११४३||
(जे आत्मानात्मव्यवस्था-राजहंस= जे आत्मा आणि अनात्मा ह्याची निवड करण्यात राजहंस)

६३] ऐसेनि जे निजज्ञानी | खेळत सुखें त्रिभुवनीं | जगद्रूपा मनीं | सांठऊनि मातें ||१०-११७||
(निजज्ञानी=आत्मज्ञानी)
-------------------------------

६४] हें विश्वचि माझें घर | ऐसी मती जयाची स्थिर | किंबहुना चराचर | आपण जाहला ||१२-२१३||
(मती=बुद्धी, किंबहुना=फार काय सांगावे, चराचर=सजीव-निर्जिव सृष्टी)

६५] मग याहीवरी पार्था | माझ्या भजनीं आस्था | तरी तयातें मी माथां | मुकुट करीं ||१२-२१४||६५||

६६] तो मी वैकुंठीं नसें | वेळु एक भानुबिंबींही न दिसें | वरी योगियांचींही मानसें | उमरडोनि जाय ||९-२०७||
(वेळु एक=एकवेळ, मानस=मन, उमरडोनि=ओलांडून)

६७] परी तयांपाशीं पांडवा | मी हारपला गिंवसावा | जेथ नामघोषु बरवा | करिती माझा ||९-२०८||
(गिंवसावा=शोधावा)

६८] कृष्ण विष्णु हरि गोविंद | या नामाचे निखळ प्रबंध | माजी आत्मचर्चा विशद | उदंड गाती ||९-२१०||
(निखळ=केवळ, प्रबंध=कविता(ग्रंथ), माजी=मध्ये, विशद=स्पष्ट, उदंड्=पुष्कळ)

६९] जयांचिये वाचें माझे आलाप | दृष्टी भोगी माझेंचि रूप | जयांचें मन संकल्प | माझाचि वाहे ||९-४४५||
(आपाल=कथा, गोष्टी)

७०] माझिया कीर्तीविण | जयांचे रिते नाहीं श्रवण | जयां सर्वांगीं भूषण | माझी सेवा ||९-४४६||
(रिते=रिकामे, श्रवण=कान)

७१] ते पापयोनीही होतु कां | ते श्रुताधीतही न होतु कां | परि मजसीं तुकितां तुकां | तुटी नाहीं ||९-४४९||
(होतु कां=असेनात का, श्रुताधीतही=ऐकून व पढून विद्वान झालेले, तुकितां=तुलना केली असता, तुका=तोलाला)

७२] तेंचि भलतेणें भावें | मन मज आंतु येतें होआवें | आलें तरी आघवें | मागील वावो ||९-४५७||
(भलतेणें=कोणत्याही, आघवें=सगळे, वावो=व्यर्थ)

७३] जैसें तंवचि वहाळ वोहळ | जंव न पवती गंगाजळ | मग होऊनि ठाकती केवळ | गंगारूप ||९-४५८||
(पवती=पावती)

७४] तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया | कां शूद्र अंत्यजादि इया | जाती तंवचि वेगळालिया | जंव न पवती मातें ||९-४६०||
(अंत्यज=हरिजन)

७५] यालागीं पापयोनीही अर्जुना | कां वैश्य शूद्र अंगना | मातें भजतां सदना | माझिया येती ||९-४७४||
(अंगना=स्त्रिया)

७६] पैं भक्ति एकी मी जाणें | तेथ सानें थोर न म्हणे | आम्ही भावाचे पाहुणे | भलतेया ||९-३९५||
(साने=लहान, भलतेया=कोणासही)

७७] येर पत्र पुष्प फळ | हें भजावया मिस केवळ | वांचूनि आमुचा लाग निष्कळ | भक्तितत्त्व ||९-३९६||
(येर =इतर, मिस= निमित्त, लाग = संबंध (आवड, प्रिती), निष्कळ = शुद्ध)

७८] मग भूतें हे भाष विसरला | जे दिठी मीचि आहें सूदला | म्हणौनि निर्वैर जाहला | सर्वत्र भजे ||११-६९८||
(भूतें=प्राणिमात्र, दिठी=दृष्टीने, सूदला=घातला)

७९] हें समस्तही श्रीवासुदेवो | ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो | म्हणौनि भक्तांमाजीं रावो | आणि ज्ञानिया तोचि ||७-१३६||
(प्रतीतिरसाचा=स्वानुभवाचा)

८०] तूं मन हें मीचि करीं | माझिया भजनीं प्रेम धरीं | सर्वत्र नमस्कारीं | मज एकातें ||९-५१७||

८१] माझेनि अनुसंधानें देख | संकल्पु जाळणें निःशेख | मद्याजी चोख | याचि नांव ||९-५१८||
(अनुसंधानें=ध्यानाने, निःशेख=संपूर्ण, मद्याजी= माझे यजन करणारा)

८२] ऐसा मियां आथिला होसी | तेथ माझियाचि स्वरूपा पावसी | हें अंतःकरणींचें तुजपासीं | बोलिजत असें ||९-५१९||
(आथिला=(माझ्या योगाने) संपन्न)

८३] तूं मन बुद्धि सांचेंसीं | जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी | तरी मातेंचि गा पावसी | हे माझी भाक ||८-७९||
(सांचेंसीं=खरेपणाने, भाक=शपथ)

८४] अथवा हें चित्त | मनबुद्धिसहित | माझ्यां हातीं अचुंबित | न शकसी देवों ||१२-१०४||
(अचुंबित=समग्र )

८५] तरी गा ऐसें करीं | यया आठां पाहारांमाझारीं | मोटकें निमिषभरी | देतु जाय ||१२-१०५||
(पाहारांमाझारीं=प्रहरामध्ये, मोटके=अल्प, निमिषभरी=क्षणभर)

८६] मग जें जें कां निमिख | देखेल माझें सुख | तेतुलें अरोचक | विषयीं घेईल ||१२-१०६||
(अरोचक=अरुचि)

८७] मग पुनवेहूनि जैसें | शशिबिंब दिसेंदिसें | हारपत अंवसे | नाहींचि होय ||१२-१०८||
(पुनवेहूनि=पौर्णिमेपासून, दिसेंदिसें=दिवसेदिवस, अंवसे=अमावस्येला)

८८] तैसें भोगाआंतूनि निगतां | चित्त मजमाजीं रिगतां | हळूहळू पंडुसुता | मीचि होईल ||१२-१०९||

८९] म्हणौनि अभ्यासासी कांहीं | सर्वथा दुष्कर नाहीं | यालागी माझ्या ठायीं | अभ्यासें मीळ ||१२-११३||
(दुष्कर=कठीण)

९०] कां जें यया मनाचें एक निकें | जें देखिलें गोडीचिया ठाया सोके | म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें | दावीत जाइजे ||६-४२० ||
(निके=चांगले, ठाया =ठिकाणी, सोके=सवकते)

९१] बळियें इंद्रियें येती मना | मन एकवटे पवना | पवन सहजें गगना | मिळोंचि लागे ||६-४६०||
(येती=वश होतात, एकवटे=मिळून जातात)

९२] ऐसें नेणों काय अपैसें | तयातेंचि कीजे अभ्यासें | समाधि घर पुसे | मानसाचें ||६-४६१||
(अपैसें=आपोआप)

९३] ऐसा जो कामक्रोधलोभां | झाडी करूनि ठाके उभा | तो येवढिया लाभा | गोसावी होय ||१६-४४४||
(झाडी करूनि=नाहीसे करुन, गोसावी=धनी)

९४] पाहें पां ॐतत्सत् ऐसें | हें बोलणें तेथ नेतसे | जेथूनि कां हें प्रकाशे | दृश्यजात ||१७-४०१||
(दृश्यजात=सर्व दृश्य (दिसणारे) पदार्थ)

९५] सुवर्णमणि सोनया | ये कल्लोळु जैसा पाणिया | तैसा मज धनंजया | शरण ये तूं ||१८-१४००||
(कल्लोळु=लाट)

९६] म्हणौनि मी होऊनि मातें | सेवणें आहे आयितें | तें करीं हातां येतें | ज्ञानें येणें ||१८-१४०५||
(आयितें=सहजच)
---------------------------

९७] यालागीं सुमनु आणि शुद्धमती | जो अनिंदकु अनन्यगती | पैं गा गौप्यही परी तयाप्रती | चावळिजे सुखें ||९-४०||
(सुमनु=चांगल्या मनाचा, चावळिजे=सांगावे, बोलावे)

९८] तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं | तूं वांचून आणिक नाहीं | म्हणौनि गुज तरी तुझ्या ठायीं | लपऊं नये ||९-४१||
(इहीं=ह्या (गुणांनी))

९९] ते हे मंत्ररहय गीता | मेळवी जो माझिया भक्ता | अनन्यजीवना माता | बाळका जैसी ||१८-१५१२||
(अनन्यजीवना=ज्याला जीवनास अन्य साधन नाही अशा (बालकास))

१००] तैसी भक्तां गीतेसीं | भेटी करी जो आदरेंसीं | तो देहापाठीं मजसीं | येकचि होय ||१८-१५१३||

१०१] ऐसें सर्वरूपरूपसें | सर्वदृष्टिडोळसें | सर्वदेशनिवासें | बोलिलें श्रीकृष्णें ||१८-१४१७||
(सर्वरूपरूपसें=सर्व रुपांच्या योगाने जो रूपवान आहे अशा श्रीकृष्णाने)

१०२] हें शब्देंवीण संवादिजे | इंद्रियां नेणतां भोगिजे | बोलाआधि झोंबिजे | प्रमेयासी ||१-५८||१०२||
(झोंबिजे=भिडावे, आकलन करावे, प्रमेयासी=तत्वार्थाला)

१०३] जें अपेक्षिजे विरक्तीं | सदा अनुभविजे संतीं | सोहंभावें पारंगतीं | रमिजे जेथ ||१-५३||१०३||
(अपेक्षिजे=इच्छावे)

१०४] हें गीता नाम विख्यात | सर्ववाङ्गमयाचें मथित | आत्मा जेणें हस्तगत | रत्न होय ||१८-१३२३||१०४||
(मथित=सार, रहस्य (लोणी)

१०५] परी वत्साचेनि वोरसें | दुभतें होय घरोद्देशें | जालें पांडवाचेनि मिषें | जगदुद्धरण ||१८-१४६७||१०५||
(वोरसें=पान्ह्याने,प्रेमाने, मिषें=निमित्ताने)

१०६] आतां विश्वात्मकें देवें | येणें वाग्यज्ञें तोषावें | तोषोनि मज द्यावें | पसायदान हें ||१८-१७९४||१०६||
(पसायदान=प्रसाद)

१०७] जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो | भूतां परस्परें पडो | मैत्र जीवाचें ||१८-१७९५||१०७||
( खळांची=दुर्जनांची, व्यंकटी=वक्रदृष्टी, कुटीलपणा, रती=आवड)

१०८] तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो | हा होईल दानपसावो | येणें वरें ज्ञानदेवो | सुखिया झाला ||१८-१८०२||१०८||
(दानपसावो=दानप्रसाद)

१०९] भरोनि सद्भावाची अंजुळी | मियां वोंवियाफुलें मोकळीं | अर्पिलीं अंघ्रियुगुलीं | विश्वरूपाच्या ||११-७०८||१०९||
(अंजुळी=ओंजळ, वोंवियाफुलें=ओव्या हीच फुले, अंघ्रियुगुलीं=दोन्ही पायांवर)
-----------------------------------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९७४ साली पावसला असताना पाठ केले होते. स्वामींना बरे नसल्यामुळे समोरच्या इमारतीत एका खोलीत स्वामींचा फोटो ठेवून साखळी पध्दतीने ॐ राम कृष्ण हरि चा जप २४ तास चालू केला होता. प्रत्येकाला एक तास वाटून दिला होता. त्यातही रोज भाग घ्यायला मिळाला होता. जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. खूप छान वाटले.

त्यावेळेस
६] उपजे तें नाशे| नाशलें पुनरपि दिसे| हें घटिकायंत्र जैसें| परिभ्रमे गा || ही ओवी मनाला खूप भावली होती.

७३] जैसें तंवचि वहाळ वोहळ| जंव न पवती गंगाजळ| मग होऊनि ठाकती केवळ| गंगारूप ||
या ओवीमुळे आपल्यात कितिही दुर्गुण असले तरी आपण जपाच्या सहाय्याने चांगले होऊ शकू अशी आशा निर्माण केली होती.

नित्यपाठ वर्गवारी करून इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

खूपच सूंदर माहिती , धन्यवाद

"ज्ञानेश्वरी नित्यपाठ" मध्ये ओव्यांचे अर्थही दिले आहेत का ? ब-याच वेळा एखाद्या शब्दाचा अर्थ माहित नसतो किंवा माहित असलेला अर्थ त्या ओवित अपेक्षित नसतो.

अवघड शब्दांचे अर्थ दिलेले आहेत प्रत्येक पानावर. ओव्यांचे अर्थ दिलेले नाहीत. (कदाचित ओव्या पाठ करण्यास सोपे जावे. आकारपण छोटा असावा जेणे करून केव्हाही जवळ बाळगता येऊ शकेल तसेच किंमत कमी ठेवता यावी असे काही उद्देश त्यामागे असावे असे वाटते.)
मात्र माझ्याकडची प्रत खूपच जुनी म्हणजे १९६७ सालची आहे. नवीन काही प्रकाशित झालेले असल्यास माहित नाही.

"ज्ञानेश्वरी नित्यपाठ" मध्ये ओव्यांचे अर्थही दिले आहेत का ? ब-याच वेळा एखाद्या शब्दाचा अर्थ माहित नसतो किंवा माहित असलेला अर्थ त्या ओवित अपेक्षित नसतो. >>>>> स्वामीजींनी मूळ प्रतीमधे कठीण शब्दांचे जसे अर्थ दिले आहेत तेच इथे दिले आहेत.

सर्वांना मनापासून धन्यवाद ...

श्री. भागवत - खरोखर खूपच भाग्यवान ज्यांना स्वामीजींच्या सान्निध्यात "ॐ राम कृष्ण हरि" चा जप करण्यास मिळाला. ___/\___

खूपच सूंदर माहिती , धन्यवाद. ज्ञानेश्वरी वाचायचे खूप मनात आहे.. आता ह्या ओव्यांपासूनच सुरुवात करेन.

शशांक खूप छान लेख.>>>>मूळ ज्ञानेश्वरी कळायला कठीण म्हणून या ग्रंथाची रचना स्वामीजींनी केलेली आहे>>>>
आमच्यासारख्या कच्च्या मडक्यापर्यंत स्वामीजींनी काय केल हे ते उलगडऊन सांगण्याच काम तुम्ही करताय. धन्यवाद!

ज्ञानेश्वरी वाचायचे खूप मनात आहे.. आता ह्या ओव्यांपासूनच सुरुवात करेन. >>>> जरुर जरुर वाचणे. माऊलींचे शब्द हे त्यांच्या अनुभूतीचे असल्यामुळे आपल्या मनात वेगळेच विश्व उभे करतात..
मदतीला स्वामी स्वरुपानंदांची - "अभंग ज्ञानेश्वरी" आहेच - त्याचाही वापर करा.. http://abhangdnyaneshwari.org/

शोभनाताई - खरोखरच सर्व संतांचे आपल्यावर इतके उपकार आहेत की विचारता सोय नाही. भगवंताचे स्वरुप शब्दात आणणे, परमार्थ जगून दाखवणे हे केवळ संतांमुळेच शक्य आहे.

सर्वांचे मनापासून आभार ...

शशांक, ज्ञानेश्वरी नित्यपाठ खुप सुंदर उलगडून पोचवलेत तुम्ही.
स्वामीजींना सादर दंडवत आहे, शिवाय तुमच्या सखोल अभ्यासाला आणि ते आमच्यापर्यंत आम्हाला समजेल अशा भाषेत पोचवण्याच्या चिकाटीलाही प्रणाम आहे _/\_