आता नकोशी वाटते

Submitted by बेफ़िकीर on 4 December, 2014 - 11:45

कविता - आता नकोशी वाटते

श्वास ताणातून सारे
सर्व सुस्कारे निराशा
औषधांना मी पुकारे
सज्ज गुंडाळून गाशा

फक्त देहाची घसट आता नकोशी वाटते

सांत्वनांचा मूढ आश्रित
आसवे पुसणार नाही
कोण जाणे पण कदाचित
मी उद्या असणार नाही

जीवनाची ही लगट आता नकोशी वाटते

हासणे तोंडासमोरी
बोल पाठीवर विषारी
आतले हेतू अघोरी
वागण्यामध्ये हुषारी

पक्वता ही पोरकट आता नकोशी वाटते

जन्म द्या आता मला हा
अर्ज मी केलाच नाही
लोक म्हणती का भला हा
आजवर गेलाच नाही

जिंदगी असुदे फुकट......आता नकोशी वाटते

====================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा मस्तच
सगळ्याच ओळी

मधल्या ओळी वेगळ्या एकत्र केल्या तर त्यांचीही अर्थ पूर्ण कविता तयार होईल असं वाटलं

बेफिकीर,

>> पक्वता ही पोरकट आता नकोशी वाटते

विसंगती हाच जिच्या अस्तित्वाचा आधार आहे ती माया! ही दिसते एक आणि असते वेगळीच. देह मायेच्या आधीन आहे.

सतत बदलत्या जगाच्या पार्श्वभूमीवर चिरंतन सत्याकडे अंगुलीनिर्देश होतो आहे. हीच या कवितेची ताकद! Happy

आ.न.,
-गा.पै.

चर्र होत कवितेची एक एक ओळ वाचताना ..

पण आवडली नाही कसे म्हणू ?

अमर्याद आवडली !<<<<<<<<<<<<< १००% अनुमोदन

बेफिकिर यांच्या प्र्तिसादाशी सहमत पूर्णतः सर्वांचे प्रतिसाद अत्यंत अर्थपूर्ण आहेत कारण नकोशी कविता मुळातच
कौतुकास्पद आहे

#१