पहिलं प्रेम - चौथीमधलं

Submitted by रसप on 3 December, 2014 - 07:01

पहिलं प्रेम - चौथीमधलं
पुन्हा एकदा करायचंय
पुन्हा एकदा माझ्यावर
तिला हसताना पाहायचंय
काही गोष्टी चुकून सुटतात
आणि काही सुटून चुकतात
चुकलेलं, सुटलेलं बरंच काही
पुन्हा एकदा जमवायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्हायचंय

तिची हुशारी अभ्यासातली
माझी होती खोड्यांमधली
तिला मिळती शाबासक्या
मला नेहमी उठा-बश्या
पहिला नंबर दोघांचाही
तिचा वरून, माझा खालून
- एकदा तरी बदलायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्हायचंय

मागल्या बाकावरची माझी
जागा होती ठरलेली
तिरका कोन साधून गुपचुप
नजर तिला भिडलेली
सर मला नेमके तेव्हाच
प्रश्न काही करायचे
- आणि नंतर झोडायचे
एकदा तरी मला त्यांना
उत्तर चोख द्यायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्हायचंय

अजून पाचवीतला पहिला दिवस
मनात तसाच आहे
नवे शहर, नवी शाळा
सारं नवीन आहे
एकदाही तिच्याशी
बोललो सुद्धा नाही
आज सुद्धा त्याची
बोच मनात आहे

गाव माझे सोडण्याआधी
एकदा तिला भेटायचंय
काही करून आयुष्यात
पुन्हा लहान व्हायचंय

काही करून आयुष्यात
पुन्हा लहान व्हायचंय

....रसप....
१४ जुलै २००९
http://www.ranjeetparadkar.com/2009/07/blog-post_15.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चौथीपासून उद्योग सुरूयेत वाटतं Proud

काहीही असो पण कवितेचा गर्भितार्थ भावला... प्रत्येकालाच असं वाटत असेल की मनातला तो हळवा कोपरा पुन्हा जगावा..

छान कविता..

छान.

माझी Story पण Same आहे. फक्त मी कधी मार खाल्ला नाही. पाचवीला मी पण गाव सोडल शहरात गेलो. she is happily married now, [not with me]