मी असे दूर जाता

Submitted by भुईकमळ on 2 December, 2014 - 07:46

असा स्नेह शब्दातूनी पाझरावा
जशी शांत तेजाळते दीपमाळा
उभा सोबतीला खुळा देवचाफा
तसा गंध तेजातूनी ओघळावा.. ॥१॥ ..

कधी चांदणीशुभ्र वेलु झुकावा
जसा मारवा काजव्यांचा फुलावा
जळी सोडला मी पदर रेशमाचा
कुणी देठ तोडुनिया चांद दयावा.॥२॥

कधी मात्र ते चित्र झिर्पून जावे.
कसे शांत निभ्रांत आकाश व्हावे
डोळ्यात लपल्या फुलपाखरांना
निरंगी फुलांचे नवे गाव दयावे...॥३॥

दरीतून ये मंत्र सांजावताना
छुप्या आसवांचे तिथे अर्घ्य द्यावे
जुना जन्म शब्दातुनी श्वास घेता
मुक्या वेदनांचेच दोहे रचावे... ॥४॥

असा अर्थ गाण्यातुनी घमघमावा
जसा कस्तुरीस्पर्श प्राणास व्हावा
घना शिंपुनी मी असे दूर जाता
झरा खोल मातीतुनी या उरावा...॥५॥
...................................... भुईकमळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कविता माणिक. आशावाद आणि जाता जाता थोड्या अपेक्षाही व्यक्त करणारी. त्यासाठी वापरलेली शब्दयोजना आवडली.
दरीतून ये मंत्र सांजावताना
छुप्या आसवांचे तिथे अर्ध्य द्यावे>> ही ओळ फार सुंदर आहे. दाजीपूरला फोंडा घाटाच्या टोकावर असंच कातरवेळी अंतर्मुख होऊन बसल्याचा अनुभव पुन्हा भेटीला आला. सूर्य आतलंही बरंच काही घेऊन गेला होता सोबत..
असा अर्थ गाण्यातुनी घमघमावा
जसा कस्तुरीस्पर्श प्राणास व्हावा.
घना शिंपुनी मी असे दूर जाता
झरा खोल मातीतूनी या उरावा>> सुरेख शेवट.

निभ्रांतचा अर्थ समजला नाही.

काही सुचवू का? अस्थानी आलेले पूर्णविराम-स्वल्पविराम, -हस्व-दीर्घ मजा घालवतायत.. त्यांचं काहीतरी करायला हवंय का? 'छुप्या आसवांचे तिथे अर्घ्य' पाहिजे, अर्ध्य हा शब्दच बहुदा नसावा (काही माबोकर कवीमंडळींशी याच शब्दावर ताजी ताजीच चर्चा झालीये). मला तंत्रातलं काही कळत नाही, पण वाचताना कुठेकुठे लय बिघडतेय. वृत्तबद्ध कविता म्हणुन लयीचा आग्रह, अन्यथा आवश्यकता नसावी.

सर्वप्रथम एका चांगल्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन. वर सई यांनी उल्लेख केलेला भाग मलाही आवडला. चौथे कडवे खूपच छान वाटले.

पदरात....या ओळीत वृत्त सुधारले पाहिजे.
प्रतिमा, शब्दयोजनेबाबत अधिक विचार करा.
उभा सोबतीला खुळा देवचाफा
तसा गंध तेजातुनी ओघळावा....हे सुसंगत वाटत नाही. गंध म्हणजे कपाळाला लावायचे असेल कदाचित पण देवचाफ्याशी त्याचा संबंध कळला नाही. सांगायचे इतकेच की वृत्त पूर्ण व्हावे म्हणून शब्द न योजता त्यांचा आपसातील संबंधही पाहिला पाहिजे.

असो. अतिचिकित्सा करण्यात हशील नाही कारण उत्साह टिकणे महत्त्वाचे. त्यामुळे भरपूर वाचन करा, तंत्रही पाहा. अनघड रचनेला अधिकाधिक निर्दोष करायचा प्रयत्न करा, आनंद गवसेल.
शुभेच्छा.

धन्यवाद सई. इतका अभ्यासपूर्ण रसानुभूती देणारया प्रतिसादाबद्दल. तुर्तास इतकेच .सविस्तर नंतर लिहणार आहे चालेल ना.

धन्यवाद अमेयजी प्रतिसादाबद्दल.अमुल्य मार्गदर्शनाबद्दल. इथे मला देवळा बाहेर एकमेका जवळं उभे असलेले
देवचाफा व दीपमाळा यांचे मैत्र म्हणायचे आहे. त्या पाषाणी दिपमालेच्या मंद उजेडात

कडेच्याच देवचाफयाची फुले ओघळतात तो क्षण म्हणजेच ' तसा गन्ध तेजातुनी ओघळावा ' असे आहे.

सुंदर कल्पना आहे
पण तसा म्हणजे कसा हे नाही कळले मलातरी
असो.
आणि मीही शिकाऊच आहे बऱ्यापैकी, त्यामुळे मार्गदर्शन वगैरेची माझी पात्रता नाही.

अमेय, गंध म्हणजे वास हाही अर्थ होतो ना... फुलाचा गंध, सुवास आणि ज्योतीचा प्रकाश एकत्र असे अभिप्रेत असावे असे मला वाटले होते.

नक्कीच सई त्या ओळींचा तोच अर्थ मला अभिप्रेत आहे.
घरंगळत्या फुलांचा मंद सात्विक सुगंध मिसळत रहातो
दीपमाळेच्या प्रज्वलित झालेल्या अस्तित्वात .
इतके सहज साध सायुज्यभावाने बध्द झालेल नात असाव.
प्रत्येक कडव्यागणिक आयुष्यातले ऋतू पालटत जातात स्वप्ने ,अपेक्षा बदलत जातात.
दुसर कडव ,मन फँटसीत रमु पाहते.तिसरयात मा त्र वास्तवाच भान येऊ लागलय .क्षणों क्षणी रंगाछंदा वर फिदा होणारया ,अतीतरल संवेदना यांना आता तरी शुभ्र
शांततेच गाव मिळवून द्याव आणि सई इथल निभ्रांत नभ होणं म्हणजे भूतकाळातल्या नकोशा घटनांचे मळभ झटकून ,भविष्याच्यातील अद्रुश्य चिंतांचे ओझे फेकून देत मेघविहीन आभाळ होऊन जावे. नुक्तच काढलेल थोड भडक झालेल जलरंगातल चित्र पाण्यात बुचकळून काढल तर कसा इफेक्ट येइल तसचं काहीस.परत एकवार धन्यवाद.

नुक्तच काढलेल थोड भडक झालेल जलरंगातल चित्र पाण्यात बुचकळून काढल तर कसा इफेक्ट येइल तसचं काहीस>> खुप छान वर्णन Happy

रावी मनापासून धन्यवाद!!!
एक बोलायचच राहिलं . सई, तूला आठवलेली ती उदास संध्याकाळ ...
कधी कधी एखादी ओळ अचानक कुठल्यातरी वळणावर नेऊन सोडते अनुभव समानधर्मी असोत नसोत कवितेतला अबोल विलाप तशाच भावुक हृदयांना ऐकू येत असावा..

‘’. नुक्तच काढलेल थोड भडक झालेल जलरंगातल चित्र पाण्यात बुचकळून काढल तर कसा इफेक्ट येइल तसचं काहीस..’’
खूप चित्रात्म अशी जाणीव आहे तुमची भुईकमळ , ती चित्रं प्रत्येक कडव्यात तुम्हीच सांगितलेल्या प्रक्रियेतून अधिक धूसर होऊन हेलकावत आहेत.
असा स्नेह शब्दातूनी पाझरावा.. एका निवांतनिश्चिंत अवस्थेची आस सूचित होते आहे. एकाकीपण नसावं , स्थिर तृप्त जीवन.. दीपमाळा, देवचाफा या प्रतिमा मंदिराचा परिसर, त्यातलं पावित्र्य घेऊन येतात.
कधी चांदणीशुभ्र वेलु झुकावा.. अजून एक रम्य चित्र. चांदणरात्री प्रवाहात सोडलेला रेशीमपदर. तलम नितळ झुळझुळत्या जाणिवा . हे कडवं थोडा वृत्तदोष ( पदर रेशमाचा ) येऊनही वेगळेपणामुळे जास्त अपील होतंय .
कधी मात्र ते चित्र झिर्पून जावे.. अधिक अमूर्त शांत अशा शब्दातीत भावना कवितेत आणण्याचा प्रयत्न,एका प्रकारे निर्गुणाकडे जाणे.
दरीतून ये मंत्र सांजावताना – इथे यू टर्न घेऊन दु:ख, वेदनांचं दबलेलं संचित पुन: वर आलं आहे.
असा अर्थ गाण्यातुनी घमघमावा- हे समिंग अप , कवितेतून हे सर्व साध्य करायचं आहे ..
भुजंगप्रयातातील कविता सुंदरच, त्यामागचा विचारही.

कुलु , धन्यवाद !
आणि भारतीताई ,तुमचा प्रतिसाद अपेक्षित होता पण तो इतका सखोल जाणिवांचे सुक्ष्म पदर उलगडवणारा असेल
याची कल्पना नव्हती. प्रत्येक कडव्याचे इतके
सौंदर्यपूर्ण रसग्रहण यावर कोणत्या शब्दात प्रतिसाद द्यावा
कळत नाहीये. तर खरच अगदी मनापासून धन्यवाद. !!!

कुलु , धन्यवाद !
आणि भारतीताई ,तुमचा प्रतिसाद अपेक्षित होता पण तो इतका सखोल जाणिवांचे सुक्ष्म पदर उलगडवणारा असेल
याची कल्पना नव्हती. प्रत्येक कडव्याचे इतके
सौंदर्यपूर्ण रसग्रहण यावर कोणत्या शब्दात प्रतिसाद द्यावा
कळत नाहीये. तर खरच अगदी मनापासून धन्यवाद. !!!

नीधप, कविता आवडली हे वाचून सुखावले पण तिसरे कडवं मात्र तुम्हास खटकल .
नीधप , या आधीचा माझा कवितांचा प्रवास तुम्ही जाणत नाही. आधीच्या बहुतेक कविता निसर्गछंदी त्याच रंगात
डुंबलेल्या असत .नंतर एका टप्प्या वर हे रंगबेभानलेपण
मावळून गेले. असो प्रत्येकाचे अनुभवविश्व वेगळे त्यानुसार रंगात्म जाणिवांचे आभाळ वेगळेच असणार...
प्रतिसादासाठी धन्यवाद!

सुरेख Happy