दोन मिनिटात ...............

Submitted by कौतुक शिरोडकर on 9 January, 2009 - 03:10

(रिकॅप - निलमला बसमध्ये बसवून राजेश पेपर आणण्यासाठी बसमधून उतरतो. पण परत येत नाही. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचते. पण तपास फ़क्त शुन्यावर येऊन थांबतो. आणि एक दिवस अचानक...............)

आणि एक दिवस अचानक...............

एकदम अचानक असं नाही. म्हणजे काय झाल ?

जमदाडेंनी केसची आठवण रहावी म्हणून... आठवण होतीच पण ती सतत हॅमर व्हावी म्हणून राजेशचा फ़ोटो समोरच ठेवला होता. गेला महिना - दिड महिना मिसींगच्या या केसमध्ये त्यांना बर्‍याच गोष्टी मिस करायला लागल्या होत्या. याउपर बायको, मुलं, नातेवाईक आणि वरिष्ठ यांच्याकडून दोन शब्द ऐकायला ही लागले आणि एवढ सोसूनही अजून मामला जैसे थेच होता. ते एकटक फ़ोटोकडे पहात होते.
"बाणे, तुम्ही हा फ़ोटो जनूभाऊना दाखवलात का ? " अचानक आठवल्यासारखं त्यांनी बाणेंना विचारलं.
"त्या म्हातार्‍याला दाखवून काय उपयोग ? त्यांच्या चष्म्याची काच बघीतलीत. केवढी जाड आहे ती. मी सांगतो काय उपयोग नाय. पेपरवाल्याला आणि दुकानवाल्याला दाखवला. ते बोललेत माणूस तोच आहे म्हणून. फ़क्त फ़ोटोत डोक्यावरची टोपी नाय. बाकी सेम."
"टोपी ?" स्वत:लाच प्रश्न करावा तसे जमदाडे बोलले. ही माहीती त्यांच्यासाठी नवीन नव्हती, तरीही त्याना ते टोपीचं कुतूहल होतच. निलमने दिलेल्या वर्णनात टोपी होतीच.
"कॅप हो."
"बाणे टोपी म्हणजे कॅप. हे कळते मला." जमदाडेंचा वैतागलेला स्वर.
"कायम डोक्यावर त्याच्या. जनूभाऊंनीपण विचारलं त्याला तर म्हणाला,'मी हिमेश रेश्मियाचा फॅन हाय." बाणेंनी टोपीमागचं कारण सांगितलं.
"काय पण एकेक नमुने असतात, बाणे. जाऊ द्या. याचा विषय निघाला की पुर्‍या मुडची वाट लागते बघा. चहा टाका जरा दोन कप. तेवढीच तरतरी." जमदाडेंनी जोरदार आळस दिला. पण नजर मात्र परत फ़ोटोकडेच. बराच वेळ ते त्याच फ़ोटोच्या नादात घुमत राहीले. नंतर भानावर आल्यासारखं त्यांनी सहज बाणेंकडे नजर टाकली. ते चहा गाळत होते.
चाहूल लागली आणि त्यांची नजर दाराकडे वळली. जनुभाऊ आत आले आणि नकळत जमदाडे टेन्स झाले. नेहमी नेहमी काय तेच उत्तर द्यायचं ? पोलिस असले म्हणून काय झाल, जनाची नसली तरी मनाची असतेच. तशी जनूभाऊंची ही दुसरी फ़ेरी. बंगलीच्या व फ़ार्महाऊसच्या कामात त्यांना काही उसंत नव्हती. शिवाय रावराणेंच्या कृपेने बंगलीत प्रथमच आलेल्या जोडप्यातला, नवराच अचानक गहाळ झाल्याने गावात नसत्या वंदता सुरू झालेल्या. मागच्या खेपेस बाणेंनी त्यांना दरवाज्यातूनच कटवलेले. पण आज मात्र ते आत येऊन न विचारता जमदाडे समोर आसनस्थ झाले.
"बोला, जनूभाऊ, काय काम काढलतं ?" जमदाडे त्यातल्या त्यात नीट हसून बोलले. सरावाने त्यांना बर्‍याच गोष्टी जमायला लागलेल्या महिनाभरात. जनूभाऊ नुसतेच हसले आणि सरळ जमदाडेंना रूतले. बाणेनी तेवढ्यात दोन कप चहा आणून समोर ठेवला. दोनात तीन केलेले झटकन जाणवले जमदाडेंना.
" तपास चालू आहे जनूभाऊ. पण तुमच्या या पाहूण्याला जमिनीने खाल्लं की आकाशाने गिळलं हे कळायला काहीच मार्ग नाही. दिवसा ढवळ्या हा गडी गायब झालाय. चहात साखर विरघळावी तसा." बाणेंनी त्यांच्या चहाच्या कपात साखर घालताच त्यांनी आपल्या वाक्याचा समारोप बहारीने केला. स्वारी स्वत:वरच खूष झाली.
"चहा घ्या." कपातल्या चहाचा सुर्रर्रर्र असा घोट घेत त्यांनी दुसरा हात जनूभाऊंच्या दिशेने हलवला. जनूभाऊंनी निमुट चहाचा कप उचलला. जमदाडेंचे प्रयत्न चालू आहेत याची त्यांनाही खात्री होतीच. रावराणेंच्या हुकूमामुळे ते रितसर चौकशीला आलेले. समोरचा फ़ोटो उचलून जमदाडेंनी डाव्या हातातला चहाचा कप संपवून पुन्हा बशीत ठेवला.
"माझ्या उभ्या आयुष्यात या माणसाएवढं मला कुणी छळलं नाही. पुढे कोणी इतका छळेल असं वाटतही नाही. हा तुमचा पाहूणा माझ्या आजवरच्या क्लिन सर्विसवर एक मोठा डाग बनून राहतोय की काय अशी मला भीती वाटायला लागलीय. अमरावतीच्या पोलिसांनीही त्यांच्या परिने महिन्याभरात बरीच उस्तवार केली. तिथल्या पेपरातही या बहाद्दराचे फ़ोटॊ छापलेत. पण याला बघणारा कोण समोर येतच नाही. कुठे शोधू मी याला ? " जमदाडे मनात साचलेला राग फ़ोटोवर काढून शक्य तेवढ्या जोरात फ़ोटो टेबलावर आदळला.
"बरयं येतो मी." जनूभाऊनी आदळलेल्या फ़ोटोकडे कनवाळू नजरेने पाहीलं, काहीही झालं तरी चार दिवस पाहुणा होता तो त्यांचा. जनुभाऊ निघाले.
"तुम्ही त्रास घेऊ नका, मी लवकरच छडा लावतो." जमदाडेंचा आशावाद अजून शाबूत होता की ते जनूभाऊला फ़ुंकर घालताहेत हे बाणेंना कळेना. दारापर्यंत गेलेले जनूभाऊ पुन्हा माघारी फ़िरले.
"रावराणेंकडून काही कागदपत्रे आलेली. त्यात हे तुमच्यासाठी होते." जनूभाऊंनी दोन घड्या घातलेला कागदाचा तुकडा फ़ोटोशेजारी टाकला आणि निघाले. जमदाडेंनी त्याच्या पाठमोया आकृतीकडे पहात कागद उचलला व ते वळले. त्याचवेळेस दारापर्यंत गेलेले जनूभाऊ थबकले व पुन्हा माघारी फ़िरले.

या घटनेनंतर चवथ्या दिवशी खरेंच्या घरी जमदाडे पोहोचले ते सोबत अमरावतीच्याच इन्स्पेक्टर घाटपांडेना सोबत घेऊन. शिवाय सावलीसारखे बाणेही होतेच. घरी निलम व तिची आई होती. जमदाडेंना पहाताच निलम त्यांच्याकडे धावली.
"काही कळल का ? "
"नाही अजून नाही. पण मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचय." जमदाडेंचा सुरात किंचीतसा राग डोकावला.
"बोला." निलमला त्यांच्या सुरातला वेगळेपणा जाणवला.
"तुम्ही एवढ सगळं आम्हाला सांगितलत. पण शशांकबद्द्ल एक शब्द नव्हता." जमदाडेंचा रागाच कारण स्पष्ट झाल.
"त्याचा यात काहीच संबंध नाही." शशांकबद्द्ल यांना कोणी सांगितलं, असा भाव तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट होता.
"नसेलही. पण अशा केसेस मध्ये एखादी गोष्ट जर लपवली तर संशय बळावतो." जमदाडेचा सुर वेगळाच होता.
"तो माझा भुतकाळ आहे व त्याचा यात काहीच संबंध नाही." निलमने पुन्हा मघासचा मुद्दा रेटला.
"तुमच्या या भुतकाळाचा जरा खुलासा कराल. तुमच्यासाठी नसला तरी माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहे." जमदाडे आता अडूनच बसले.
"मला शशांकशी लग्न करायचं होतं." रावराणेंनी जमदाडेंना पत्रातून कळवलेले पहिले वाक्य निलमने स्वत:च उच्चारलं आणि निलमची आई कपाळावर हात मारून मटकन जागीच बसली.
"पण बाबांना ते पसंत नव्हतं. लग्न त्यांच्या पसंतीच्या मुलाशीच करायचं हा त्यांचा हेका. त्यांनी तातडीने हे लग्न जुळवलं आणि मला जणू नजरकैदेतच ठेवलं. शशांक म्हणाला,'एकदा इथून बाहेर पडलीस की मग बघू काय करायचं ते. मी तयार झाले मग लग्नाला. लग्नाच्या रात्रीच मी राजेशला सगळं स्पष्ट सांगितलं. पण आश्चर्याची गोष्ट ही की तो माझा मार्ग मोकळा करायला तयार झाला. मनं जर जुळणारचं नसतील तर एकत्र संसार करण्यात काहीच अर्थ नाही, हे राजेशचं मत. अनपेक्षितपणे सारं कसं मनासारखे झालेलं. तोच बाबांच्या बातमीने आम्ही इथे परतलो. राजेशचं आणि माझं झालेलं बोलणं फ़क्त आम्हा दोघांना माहीत. इथे आल्यावर मी शशांकला कळवलं. राजेशने त्याला लवकरच सगळं आमच्या मनासारखं होईल असं आश्वासनही दिलं. पण आता राजेशच्या अशा नाहीश्या होण्याने सगळं मुसळ केरात गेलयं. दुर्दैवाचे दशावतार पाठी लागलेत." निलम बोलायची थांबली.
"शशांक सध्या कुठे आहे ? " जमदाडेंना तिच्या या सत्यावर पुर्ण विश्वास नव्हता.
"त्याच्या घरी. तुम्हाला पत्ता व फ़ोन नंबर हवाय का ?" त्यांचा होकार अपेक्षित धरून तिने त्याना बोटभर कागदावर पत्ता व नंबर लिहूनही दिला.

काही जुजबी प्रश्नानंतर जमदाडे घाटपांडेंसोबत निघाले. मागोमाग बाणे.
"तुम्हाला काय वाटते घाटपांडे? " जिने उतरता-उतरता जमदाडेंनी प्रश्न केला.
"जर तिचं म्हणणं सत्य मानलं तर मग राजेश नाहीसा होण्यामागे शशांकचा हात असेल वाटत नाही. जर ते असत्य मानलं तरी दोन मिनिटाच्या अवधीत दिवसा ढवळ्या, कुणाच्याही नकळत राजेशच्या मनाविरूद्ध त्याला नेणे शक्य नाही." घाटपांडेंनी आपले तर्क मांडले.
"राजेश आणि शशांक एकमेकांशी बोलले होते. निलमच्या सांगण्यावरून कदाचित शशांक तिथे आला असेल व तो राजेशला सोबत घेऊन गेला असेल तर...." जमदाडेंची पुढची शंका.
"ही एक शक्यता आहे जमदाडे. पण फ़क्त शक्यता. कारण एक वेळ असे मानले तरी ते दोघे तिला तिथेच सोडून गेले हे पटणे कठीण आहे. कारण एकाची ती प्रेयसी आहे तर दुसर्‍याची बायको. शिवाय तिचे म्हणणे सत्य असो वा असत्य, शशांक जर तिथे गेला असता तर तो राजेशच्या परवानगीने किंवा परवानगी शिवाय तिला तेथून घेऊन गेला असता. हे त्यांनी आधीच ठरवलेलं. शिवाय आता तर तिचे वडीलही नाहीत. यात राजेशला गायब करण्याची गरजच नाही." घाटपांडेंनी त्यांच्या तर्काचे तोड दिले.
"मग हा राजेश स्वत:हून नाहीसा झाला असेल काय ? " जमदाडे वैतागून म्हणाले.
"असं होऊ शकते. पण याने तो काय साध्य करेल ? तिला थोडा मानसिक त्रास किंवा जोपर्यंत तो सापडत नाही, तोपर्यंत तिल विधवा म्हणून जगावं लागेल आणि शशांकशी तिला नवे नाते जुळवता येणार नाही, बस एवढेच. यासाठी स्वत:च्या आयुष्याची वाताहात करायची गरज काय ? तिने आपली फ़सवणूक केली म्हणून आपण सुड घ्यावा असा जर त्यांचा विचार असेल तर मग तिला मोकळं करून तो बदनामही करू शकतो किंवा तिला बायको म्हणून राबवून तिच्या बापाची इस्टेटही लुबाडू शकतो. पुरूषी अहंकार हे नक्कीच करेल." घाटपांडेचा अनुभव बोलत होता.
"घाटपांडे, एक माणूस हरवलाय आणि गेल्या दिड महिन्यात काहीच सुगावा लागत नाही. फ़ार नामुष्कीची गोष्ट आहे ही." जमदाडेंना स्वत:चाच राग येत होता.
"जमदाडे, सगळेच प्रश्न सुटत नसतात. काही काळावर सोडावे लागतात. आज ना उद्या तो सापडेलच. जीवंत वा मृत. सापडेल नक्की." घाटपांडेनी दिलासा दिला. एव्हाना ते तिघे जीपजवळ पोहोचले.
"मी काय म्हणतो साहेब, असं झाल असेल तर...." बाणेंना आता राहावलं नाही. त्यांनी तोंड उघडलचं.
"कसं बाणे ?" जमदाडे बाणेंकडे वळले.
"म्हंजे बघा. तो राजेश आधी त्या दोघांना एकत्र करायला तयार झाला. पण मुलीचा बाप मेल्यावर इस्टेट सोडावी लागेल म्हणून नंतर नाही म्हणाला. आणि म्हणून त्याला त्या पोरीने आणि तिच्या हिरोने गायब केला असेल तर..." बाणेंचा अफ़लातून तर्क.
"बाणे तुमच्या मुद्द्यात दम आहे. पण राजेशला दोन मिनिटात कसा गायब केला असेल आणि त्याला गायब करण्याची या दोघांना काही गरज नाही, ह्याची आपण मघाशीच नाही का चर्चा केली." घाटपांडेंनी बाणेंच्या तर्काला पुर्णविराम दिला.
"चला बाणे, जीपमध्ये बसा." जमदाडेंनी बाणेंना आवाज दिला आणि त्याचवेळेस.....................

क्रमश:

गुलमोहर: 

धत... परत क्रमशः... म्हंटल आज कळेलच दोन मिनिटात राजेश कसा गायब झाला ... तर परत क्रमशः
चांगल वळण घेतलय कथेने .. पण जरा कमी ताणा..

पुढचा भाग पुर्ण पाहिजे. परत क्रमश: दिसल तर तुलाच गायब करेल. कळाल ?

बापरे पुन्हा क्रमशः छे बुवा तुम्ही उत्सुकता फारच ताणून धरता.
मी रोज बघत होते दोन मिनीट अस कुठे दिसतय का ?
पण फार मिनीट काढू नका बुवा.

पुढचा भाग लवकर येउद्या

"रावराणेंकडून काही कागदपत्रे आलेली. त्यात हे तुमच्यासाठी होते." जनूभाऊंनी दोन घड्या घातलेला कागदाचा तुकडा फ़ोटोशेजारी टाकला आणि निघाले. जमदाडेंनी त्याच्या पाठमोया आकृतीकडे पहात कागद उचलला व ते वळले. त्याचवेळेस दारापर्यंत गेलेले जनूभाऊ थबकले व पुन्हा माघारी फ़िरले.>>>

त्या कागदात फक्त शशांकबद्दलची माहितीच होती की अजुनही काही ? पहिल्यांदा जनुभाऊंनी कनवाळुपणे फोटोकडे पाहिले आणि दुसर्‍यांदा जेव्हा त्यांनी रावराणेंकडुन आलेले कागद फोटोच्या शेजारीच टाकले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा फोटो पाहिला...आणि मग दारापर्यंत जावुन ते परत माघारी आले. त्यांना फोटोत काही वेगळेपण दिसलं होतं का ?

प्रश्न हा उभा राहतोय की जो निलमला आता येतो असे सांगुन गायब झाला आणि ज्याला आपण राजेश समजुन शोध घेतोय तो नक्की राजेशच होता ? हिमेश रेशमियाचा फॅन असणारा , कायम टोपी घालणारा राजेश, फोटो मात्र टोपी न घालता काढतो हे पटत नाही. काहीतरी लोचा आहे इथेच.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

मुळात ह्या कौतुकच्या गोष्टी म्हणजे छळवाद आहेत नुस्त्या... त्यात हा आणि मधे मधे क्रम्शा घालणार म्हणजे फरारीत बसवून दोन किलोमिटर मधे आठशेअकरा स्पीडब्रेकरवाल्या रस्त्यावरून जा म्हणण्यासारखं दूssssष्टपणाचं.
ए, लवकर दे रे पुढला भाग....

दाद, तुझ्या कल्पनाशक्तीला दाद बरंका....
दोन किलोमिटरमध्ये आठशेअकरा स्पीडब्रेकर वगैरे...ग्रेटच हो.....

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

कथा मस्त ताणली गेली आहे, पण कथेचं 'K' सिरिज होउ देऊ नका......