दु:खासंगे रमलो होतो

Submitted by निशिकांत on 20 November, 2014 - 01:17

पाठ दावली सुखास जेंव्हा, दु:खासंगे रमलो होतो
जन्मभराची साथ मिळाली म्हणून थोडे हसलो होतो

पिऊन मृगजळ भागवायची तहान होती जिद्द एवढी !
अशक्यतेतुन शक्यतेकडे वाटा शोधत जगलो होतो

मीच पायरी जाणत माझी, शुक्रचांदणीमधे न रमलो
तुटून धरतीवर पडलेल्या तार्‍यासंगे जुळलो होतो

ओळख नसता कधी सुखाची, दु:खाचे मग दु:ख कशाला ?
भुकेस कोंडा, निजेस धोंडा तरी सुखाने निजलो होतो

भ्रांत भुकेची असणार्यांना, ओला श्रावण स्वप्न नसावे
घाम गाळुनी टपटपणार्‍या रिमझिमीत मी भिजलो होतो

पुसली जाते, पण रांगोळी काढती किती लक्ष देउनी !
असून शाश्वत मृत्त्यू, जीवन रंगवावया झटलो होतो

सुवर्णयुग अन् उच्चसंस्कृती अभ्यासुन मी कृतार्थ झालो
मुल्यहीनता, देश आजचा, आठवून भेदरलो होतो

टुकार जगलो, मानमरातब जरी मिळाला, किती उशीरा !
कलेवराचा थाट पाहुनी तिरडीवर मोहरलो होतो

हास्य नेहमी "निशिकांता"च्या चेहर्‍यावरी कसे नांदते?
जे आहे ते मस्त मानुनी जगावयाचे शिकलो होतो

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mali--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर