आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग ३- अंतिम

Submitted by सूनटून्या on 18 November, 2014 - 06:36

आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग ३- अंतिम
============================================================================

७ डिसेंबर १९९१ :
सकाळी उठून पाण्याची १ बाटली व सुका मेवा घेऊन किरण व पुंडलिक काल ठरवल्याप्रमाणे पाण्याच्या शोधात निघून गेले. तर नरेंद्र व दत्ता कॅंप २ वरून सामान वर आणण्याच्या कामाला लागले. किरण व पुंडलिक डाव्या हाताला फ्री-मूव्ह करत वर वर सरकत कड्याच्या पायथ्याशी पोचले व तेथून डावीकडे नेढ्याच्या दिशेने निघाले. वाटेत सापाने नुकत्याच टाकलेल्या ३ काती मिळाल्या. म्हणजे एव्हढ्या उंचावरसुद्धा साप आमची पाठ सोडणार नव्हते. सावधपणे सरकत दोघेही मिलिंदने सांगितल्याप्रमाणे नेढ्यापाशी पोचले. तेथील परिसर हिरवागार दिसत होता. तो पाहताना १००% पाणी मिळेल हि खात्री पटली. पण तो आनंद थोडाच वेळ टिकला कारण जंग जंग पछाडूनही पाण्याचा कुठेही मागमूस नव्हता. निराश मनाने नेढ्यावरून डावीकडे सरकलो. डावीकडे आजोबाचा सुमारे ३ हजार फुटी विस्तारीत कडा दिसत होता, त्यापलीकडे तसाच कात्राबाईचा कडा होता व दोघांच्यामध्ये असलेल्या खिंडीतून कुमशेत गाव सुमारे १५/२० मिनिटाच्या अंतरावर आहे, असे मिलिंदनेच आम्हाला सांगितले होते. त्यामुळे कड्याच्या पायथ्याशी खिंडीपर्यंत जाऊन वाटेत पाणी नाही मिळाले तर खिंडीत वरच्या बाजूस पाणी १००% मिळणारच होते, पण ते ठिकाण आमच्या चढाईच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल ते महत्वाचे होते व हा एकच मार्ग सध्या आमच्या समोर होता.

१.
From Aajoba 1991

दोघेही नेढ्यावरून जवळपास ५० फुटी रॉकपॅच उतरून जंगलात पोचले. डावीकडे कारवीची दाट झाडी तर उजवीकडे उंच कडा यांच्या मधून वाट काढत दोघेही चालले होते. प्रत्येक पावलागणिक वाट तयार करावी लागत होती. इतक्यात पुंडलिकच्या पायाखालून एक पिवळाजर्द सर्प सळसळत खाली जाऊन दिसेनासा झाला. आता दोघांनीही कड्याच्या पायथ्यापासून वरच्या बाजूला चढण्यास सुरुवात केली. कारण शुक्रवारी नरेंद्र, किरण व कुट्टी खालच्या भागातूनच पाण्याच्या शोधात खिंडीत पोचले होते व तेथे कुठेच पाणी सापडले नव्हते. कड्याच्या माथ्यावर पोहोचून सभोवार नजर फिरवली तर समोर साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर काळ्या दगडांच्या मध्ये खड्डया खड्ड्यातून साचलेले पाणी नजरेस पडले. पण संपूर्ण मार्ग कारवीच्या दाट झाडीने गच्च झाला होता. पण त्यातूनच जाणे योग्य होते. पुन्हा चढलेल्या वाटेनेच खाली उतरलो व कारवीच्या रानात घुसलो. दोन्ही हातानी कारवी बाजूला सारत अक्षरशः रांगतच आम्ही पुढे सरकत होतो. तब्बल अर्धा तास या पद्धतीनेच पुढे सरकल्यावर आम्ही मोकळ्या जागी पोचलो. नंतर जरा उजवीकडे सरकून खाली उतरणारा एक रिकामा ओढा पकडला व त्यातून पुढे सरकून सुमारे १५ मिनिटात दोघेही वरून पाहिलेल्या पाण्याच्या जागी पोहोचलो. तब्बल ४ दिवसानंतर पाण्याचा एव्हढा साठा पाहून उड्याच मारायला लागलो. हावरटासारखे घटाघटा पाणी पिउन घेतले.

२.
From Aajoba 1991

दमल्याने अर्धा तास तिथेच आराम केला. इतके पाणी पाहिल्यानंतर पुन्हा आलेल्या मार्गानेच माघारी फिरलो. सकाळी नेढ्यातून इथे येतांना नेढ्याच्या आतमध्ये जायचे राहिले होते, तेंव्हा आता नेढ्यात प्रत्यक्ष शिरून तिथेही पाणी आहे का याचा मागोवा घेतला. तेथे पाणी नसल्याची खातरजमा केल्यावर साधारणपणे ३ वाजता किरण व पुंडलिक दोघेही आमच्या चढाईच्या ठिकाणावर अर्थात कॅंप २ च्या वर पोचले होते. एक कॅन पाणी आणण्यासाठी पाच तास लागले होते. म्हणजे पाण्याच्या या मार्गाचा अवलंब पुढील काळात शक्यच नव्हता. कारण सहकाऱ्यांची अनुपस्थिती! दरम्यान किरण व पुंडलिक पाण्याच्या शोधत गेल्यावर इथे नरेंद्र व दत्ताने सर्व सामान कॅंप २ पासून वर चढवून कड्याच्या पायथ्याशी व्यवस्थित रचून ठेवले होते.

दुपारी जेवण घेऊन शैलेश, शेखर, नंदू आले होते. आज नशिबाने २ सहकारी वाढले होते. चढाई टीमचा शेखर फाटक व बेसकॅंपवरील अनिल इमारते. पण दोन दिवसांनंतर दत्ता, शैलेश व बालाजी परत जाणार होते. शेवटी हिशोब एकच होणार होता. उलट एक माणूस कमीच होणार होता. बेसकॅंप पासून चढाई करत सुमारे १८०० ते २००० फुट उंचीवर पोहोचलो होतो. अद्याप जवळपास १००० फुटी चढाई शिल्लक होती. बेसकॅंप पासून कॅंप १ चे अंतर सुमारे ८००-१००० फुट. कॅंप १ पासून कॅंप २ मधील अंतर सुमारे ३०० फुट. आणि आता जिथे आम्ही होतो त्या कड्याचा पायथा ते कॅंप २ चे अंतर ७०० फुट होते. पुढील चढाई सुरु ठेवण्यासाठी बेसकॅंपवर कमीत कमी चार सहकारी, कॅंप १ वर २ सहकारी, कॅंप २ वर दोन सहकारी व त्याच्यावर २ सहकारी असे एकूण दहा सहकारी आवश्यक होते. शिवाय चढाई टीममध्ये ४ सदस्य आवश्यक होते. इथे तर बेरीज वजाबाकी केल्यावर आम्ही फक्त सातच जण उरलो होतो. या परिस्थितीत पुढील चढाई थांबवणे हा एकाच पर्याय डोळ्यासमोर दिसत होता. अक्षरशः डोळ्यात पाणी आले. प्रस्तरारोहण सुरु केल्यापासून गेल्या ७-८ वर्षांच्या कालावधीत हि पहिलीच मोहीम अर्धवट राहण्याची चिन्ह दिसत होती. सोडून गेलेल्या सहकाऱ्यांवर जबरदस्त राग येत होता. पुढे काहीच मार्ग दिसत नसल्यामुळे सल्लामसलत करून दुःखी अंतकरणाने शैलेश, नरेंद्र, शेखर यांना परत बेसकॅंपवर पाठवून दिले. आम्ही चढाई स्थगित करतोय या जाणिवेनेच मेल्याहून मेल्यासारखे झाले.

चढाई स्थगित करण्याचे मुख्य कारण पाणी. पाणी आणण्यासाठी व जेवण पुरवण्यासाठी माणसांची गरज होती. कड्यावर चढवलेले सामान उद्या परत जवळपास १००० फुट खाली कॅंप १ वर उतरावयाचे होते व तेथून चढ उतारावर २ तासांची पायपीट करून बेसकॅंपला पोहोचवायचे होते. सोबत कड्यावर आतापर्यंत ठोकलेल्या ६३ बोल्टमधून जागोजागी अडकवलेले साहित्य काढणे हे एक काम होतच. रात्री जेवताना कोणाचच चित्त थाऱ्यावर नव्हत, ते कधीच कडयावर वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यासोबत अस्पष्ट दिसणाऱ्या क्षितिजापलीकडे उत्तरं शोधण्यास निघून गेल होत. अजूनही चढाई स्थगित करण्यास मन धजावत नव्हत. असंख्य प्रश्नांची उत्तर सापडत नव्हती.
रात्रीच्या आसमंतात विखुरलेल्या चांदण्या पाहतांना किरणच्या मनात एक आशेचा किरण चमकून गेला. परवा पुंडलिक व किरण पाणी आणण्यासाठी गेले होते तेंव्हा त्यांना पाणी मिळाले होते तेथून आजोबाच्या माथ्यावर जाण्यासाठी आणखी एक तास लागला असता. शिवाय गड असल्याने माथ्यावर पाणी मिळण्याची शक्यता होती. फक्त त्यासाठी आश्रमाजवळील बेसकॅंपचा गाशा गुंडाळून तो थेट आजोबाच्या माथ्यावर हलवावा लागणार होता. किरणने हा विचार नरेंद्र व पुंडलिकला सांगितला. तर त्यांच्याही मनात नेमके तसेच विचार चालू होते. त्यामुळे त्वरित होकार आला. आशेचा किरण दिसल्यावर झोपही चांगली आली.

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

८ डिसेंबर १९९१ :
सकाळी उठल्याबरोबर किरण व नरेंद्रने खाली कड्यावर ठोकलेल्या बोल्टला लटकत असलेले सामान काढण्यास सुरुवात केली. तर पुंडलिक व दत्ताने सामान खाली कॅंप १ वर उतरावयास सुरुवात केली. त्यांचे काम सुरु असतानाच शैलेश, नंदू व कुट्टी कॅंप १ वर आले होते. अवघड जागी स्वतःला अडकवून हळूहळू सर्व सामान कॅंप १ वर आणले. उपस्थित ८ जणांनी प्रत्येकाला जास्तीत जास्त जमेल तेव्हढे सामान उचलून बेसकॅंपच्या दिशेने कूच केली. बेसकॅंपवर रामेश्वरबाबा गावचे कोतवाल श्री. सुकऱ्या यांच्या बरोबर आमची वाटच पाहत होते. सलग तीन रात्री आम्ही कड्यावरच असल्याने रामेश्वरबाबांनी काळजी वाटून कोतवालांना पाचारण केले होते. कडाक्याची थंडी, बोचरे वारे व रानातील जिवजंतू यातून सुटून परत सुखरूप आलेले पाहून त्यांनाही समाधान वाटले.
हिच संधी साधून किरणने त्यांच्याशी पाण्याचा विषय काढला. रामेश्वरबाबा आणि कोतवालांनी माथ्यावर पाणी असल्याचे सांगितले. बेसकॅंपवर उरलेल्या इतर सहकाऱ्यांना सर्व योजना समजावताच सर्वांचा एकसाथ होकार आला. मोहीम अर्धवट सोडून नंतर पुढे म्हणजेच मार्चमध्ये पुन्हा येउन पूर्ण करण्यापेक्षा आजोबाच्या माथ्यावर बेसकॅंप स्थापून तिथूनच त्याचे नियंत्रण करायचे. सगळ्यांनाच हुरूप आला, काही झाले तरी आता मोहीम अर्धवट न सोडण्याचा संकल्प केला.

आजोबाच्या माथ्यावर जाण्यासाठी आम्ही योजना तयार केली. दहा दिवसांच्या धावपळीमुळे सर्व सहकारी अतिशय थकलेले होते. म्हणून सर्व सामान टेंपोमध्ये घालून आजोबाच्या माथ्यापासून जवळचे गाव कुमशेत येथे न्यायचे. (आजोबा पायथा-आसनगाव-इगतपुरी-भंडारदरा-राजूर मार्गे). गाडी सोबत दोन सहकारी जातील तर उरलेले सहकारी कात्राबाई व आजोबा यांच्यामध्ये असलेल्या खिंडीतून चालत कुमशेत गावी पोहोचतील. तेथून सर्व सामान पाठीवर वाहून आजोबाच्या माथ्यावर स्थापन करणार असलेल्या नियोजीत बेसकॅंपवर न्यायचे. सध्याचा बेसकॅंप आजोबाच्या पायथ्याला होता, तर नियोजित बेसकॅंप थेट त्याच्या माथ्यावर होणार होता. पण रस्त्यावरून जावयाचे म्हटले तर अंतर १५० किमी होत. त्यापैकी राजूर ते कुमशेत खडीचा कच्चा रस्ता होता. परत यासाठी टेंपो मिळवणे हि अवघड होणार होत. आता हे सर्व करण्यासाठी आमच्यासमोर एकच व्यक्ती उभी राहिली. अशोक शिबे! कारण कित्येकदा अडी-अडचणीच्या वेळी ओबडधोबड कच्च्या घाट रस्त्याने स्वतःची जीप नेऊन त्याने आमचे सामान पोचवले होते, तेही विनामूल्य! केवळ त्याच्याच भरवशावर आम्ही हा निर्णय घेतला, पण त्यासाठी परत डोंबिवलीला जाणे क्रमप्राप्त होत.

सगळ्यांची जेवण झाल्यावर रात्री ११ वाजता किरण डोंबिवलीला जाण्यास निघाला तर सोबत दत्ता व बालाजी परत घरी जाण्यास निघाले. अशा रीतीने सुभाष पाठोपाठ मोहिमेचा दुसरा नेताही घरी निघाला. किरण व सहकारी १२ वाजता डेहणे गावात पोचले. तेथे रात्री मुक्कामाची बस हजर होतीच, तिच्यातच जाउन झोपलो मनात अनेक शंका-कुशंकाचे जाळे घेऊनच.

From Aajoba 1991

९ डिसेंबर १९९१ :
सकाळी बसने शहापूर-आसनगाव असा प्रवास करून किरण दहा वाजता डोंबिवलीला पोचला. प्रथम अशोकला फोन करून तो ओफिसमध्ये असल्याच पक्क केल आणि त्याला कुठेही जाऊ नकोस असा निरोप दिला. आंघोळ करून फ्रेश होताच दारात अशोक आणि अनिल दगडे दोघेही उभे! मित्राचे लग्न आटोपून अनिल परत आल्यावर तब्येत बिघडल्यामुळे परत मोहिमेमध्ये सामील होऊ शकला नव्हता. त्यातच अशोकला मी फोन करून बोलावल्याचे त्याला कळल्यावर काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाल्याने अनिलसुद्धा तातडीने अशोकबरोबर किरणला भेटायला आला. किरणकडून सर्व हकीकत कळल्यावर अशोक मदतीस लगेच तयार झाला. अशोकने महेंद्र साटमला हि घरी निरोप पाठवला होता, इकडे किरणने स्वतः मिलिंद आपटेला भेटण्यासाठी निरोप पाठवला होता.
दरम्यान किरण परत घरी आल्याचे कळल्यावर सुभाष त्याला भेटायला आला. किरणने मनातला सगळा राग सुभाषवर काढला. तुझ्यासारखा जबाबदार माणूसच काहीही न सांगता परत मागे फिरतो अस म्हणून त्याला खूप बोल लावले. कारण सुभाष सुद्धा मोहिमेच्या नेत्यांपैकी एक होता. रागाच्या भरात किरणने त्याला परत मोहिमेवर न येण्याची सूचना केली. पण झाल्याप्रकाराने सुभाष सुद्धा खजील झाला होता. इतरांकडून परत जाण्यासाठी कधी निघणार याची विचारणा करून सुभाष रात्रीच आम्हाला येउन सामील झाला. आम्हाला आमचा एक नेता परत मिळाला होता.

दरम्यान किरणची मिलिंदशी भेट झाली, त्यालासुद्धा ''नेढ्यातील पाणी'' शोध प्रकरणामुळे बोल लावले. कारण त्याने खूपच चुकीची माहिती दिली होती. वर कुमशेत गाव आजोबाच्या माथ्यावरून १०-१५ मिनिटांच्या अंतरावर असल्याच चुकीचच सांगितलेलं. प्रत्यक्षात ते तास-दीड तासाच्या अंतरावर आहे याची झलक आम्हाला प्रत्यक्ष त्या मार्गाने कुमशेतला गेल्यावर कळल. रात्री ठीक १२ वाजता डोंबिवलीहून अशोकच्या जीपने अशोक, किरण, अनिल, संजय रेडकर, बालाजी, व सुभाष निघालो. साधारण साडेतीनच्या सुमारास आजोबाच्या पायथ्याशी अर्थात बेसकॅंप वर पोचलो.

१० डिसेंबर १९९१ :
सकाळी सामानाची बांधाबांध करून जीपमध्ये चढवले व किरण, अनिल दगडे व अशोक दुपारी दोन वाजता आजोबा पायथा-आसनगाव-इगतपुरी-भंडारदरा-राजूर मार्गे कुमशेतच्या दिशेने निघाले. तर शिल्लक राहिलेलं सामान पाठीवर घेऊन पुंडलिक, नरेंद्र, सुभाष, नंदू, शैलेश, शेखर, कुट्टी, अनिल इमारते, संजय वगैरे मंडळी वाट दाखवण्यासाठी गावातील एका ग्रामस्थांना बरोबर घेऊन कात्राबाई आणि आजोबा यांच्यामधील खिंडीतून कुमशेतच्या दिशेने निघाले.

इकडे शहापूर बस स्थानकावर रस्त्याची व्यवस्थित चौकशी करून किरण व मंडळी जीपने भंडारदऱ्याच्या दिशेने निघाले. संध्याकाळी साडेसात वाजता राजुरला पोचले. या वेळेस रस्त्यावर चीटपाखरूही नव्हते. तशातच वाटेत धामणगावला राहणारा एक ग्रामस्थ अचानक भेटला, त्यालाही आमच्याबरोबर घेऊन कुमशेतच्या दिशेने निघालो. त्याच्या सल्ल्याप्रमाणे धामणगावापर्यंत तर बिनदिक्कतपणे पोचलो. आता पुढे मात्र त्याने सांगितल्याप्रमाणे पुढचा प्रवास सुरु झाला. धामणगाव सुटल्यावर रस्ता पूर्ण सुनसान होता. विचारपूस करण्यासाठी सुद्धा कोणी नव्हत. त्यामुळे रात्रीच्या या प्रहरात रस्ता चुकलो कि काय असे वाटून गेले. पुढे जातो तर आणखी एक संकट उभे राहिले, आता समोर एकाचे दोन रस्ते झाले होते. त्यामुळे कुठे जावे हेच कळेनासे झाले. कुणी दिसतंय का हे पाहण्यासाठी गाडीतून खाली उतरून पुढे चालत गेलो. खूप चालल्यावर सुद्धा कुणीही सापडले नाही, म्हणून परत फिरलो. इतक्यात अशोकला गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात मातीवर एका वाहनाच्या पुसटशा खुणा दिसत होत्या बहुतेक रात्री मुक्कामाची बस कुमशेतला गेली असावी असा अंदाज केला आणि आम्ही त्याच वाटेला लागलो.
आमचा अंदाज बरोबर ठरला होता. २ किलोमीटर पुढे गेल्यावर एक आश्रमशाळा लागली. त्यांच्यापाशी चौकशी केल्यावर कुमशेतची वाट बरोबर असल्याचे कळले व हायसे वाटले. नऊ वाजले तरी कुमशेत गावाची काहीच चिन्हे दिसत नव्हती. अशोक तर दिवसभर धुळीच्या रस्त्याने गाडी चालवून थकला होता. याच दरम्यान अचानक गाडीच्या प्रकाशात एक मोठे रानमांजर दर्शन देऊन गेले. भूक सुद्धा लागलेली होती बरोबर आणलेली केळी कधीच संपली होती. साडे दहाच्या सुमारास त्या निर्मनुष्य रत्यावर दूर एका विजेरीचा (Torch) उजेड दिसला आणि जिवात जिव आला. एकदाचे कुमशेतला पोचलो होतो. पण इथेही आमचे नशीब आड आले. आम्ही पोचत नाही अशी कल्पना करून सर्वांनी भांडी घासून पुसून ठेवली होती.

दरम्यान सकाळी किरण व मंडळी जीपने कुमशेतच्या दिशेने निघून गेल्यावर दुपारी २ वाजता उपाशीपोटीच पुंडलिक, नरेंद्र, शैलेश, शेखर, नंदू, सुभाष, संजय, अनिल इमारते इत्यादी उरलेलं भरपूर सामान पाठीवर घेऊन वाटाड्यासोबत कुमशेतला येण्यासाठी कात्राबाई व आजोबा डोंगराच्यामध्ये असलेल्या खिंडीच्या दिशेने निघाले. वाटाड्याही त्यांना खिंडीपर्यंतच दिशादर्शन करणार होता आणि नंतर परत फिरणार होता, त्या पुढचा सगळा प्रवास अंदाजानेच करायचा होता. भुकेची चिंता करीत बसले असते तर वेळेवर कुमशेतला पोहोचणे अशक्य होते. वाटेत रानकोंबड्या, भेकरांचे भेसूर आवाज रानाची भयानकता वाढवत होते. खिंडीत पोहोचल्यावर वाटाडे सुकऱ्या यांना सुद्धा अंधार पडायच्या आत परत फिरणे आवश्यक असल्याने ते खिंडीतूनच निघून गेले. कधी सरळ चालत तर कधी प्रस्तरारोहण करीत एक एक गडी खिंडीतून वर सरकत होता. वाटेत बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळल्याच्या खुणा दिसत होत्या. काळोख पडता पडता सर्वजण खिंडीच्यावर पोहोचले. खिंडीच्यावर पोहोचल्यावर पुंडलिक व किरणने काही दिवसांपूर्वी शोधलेल्या पाणवठ्यावर जाउन आपली तृष्णा भागवली. पुंडलिक सोबतच असल्याने शोधाशोध करावी लागली नाही. इथून कुमशेत गाव फक्त १५ मिनिटांवर आहे अशी माहिती मिलिंदने पुरविली होती, जी चुकीची होती हे त्यांना लवकरच कळणार होते. अंधार वाढू लागला आणि पायाखालची वाट अनोळखी झाली. सुमारे अर्धा तास चालूनही गावाच्या काहीच खाणाखुणा दिसत नव्हत्या. उपाशीपोटीच पाच-सहा तास चालल्याने सगळेच थकलेले होते, पावले झिंगल्यासारखी पडत होती. अशाच अवस्थेत समोर दोन वाटा फुटलेल्या आढळल्या. कपाळावर हात मारून स्वतःच्याच नशीबाला दोष देत पुंडलिकने डाव्या वाटेने जाण्याचे सुचवले, कारण तो आणी किरण जेंव्हा पाण्याच्या शोधात आले होते तेंव्हा वरच्या टेकाडावरून गाव डावीकडे असल्याचे पाहिलेले त्याला आठवले.

आणखी अर्धा तास त्याच वाटेवर चालल्यावर दूरवर कुत्रे भुंकण्याचा आवाज आला व सर्वांची मरगळलेली शरीर ताठ झाली. थोड्याच वेळात माणसांचा आवाज कानी पडला आणि त्या आवाजाच्या रोखाने गेल्यावर त्यांना काही गावकरी त्या रानात आपल्या गायीच्या मोडलेल्या पायावर उपचार करताना दिसले. त्या गावकऱ्यांनी दाखवलेल्या वाटेवर गेल्यावर एका गावात पोचले पण ते कुमशेत गाव नसून ठाकूरवाडी गाव होते. मग त्या गावातीलच काही मुलांना घेऊन कुमशेतकडे निघाले. अखेर दुपारी २ वाजता आजोबाच्या पायथ्याकडून निघालेली मंडळी रात्री ९ वाजता कुमशेत गावात दाखल झाली होती. एका घरासमोर मुक्कामाची बस उभी होती. रात्री भयानक थंडी असल्याने त्याच घरात रात्रीचा मुक्काम करण्यास घरातल्या मंडळींनी परवानगी दिली. कुमशेत गावात पोचल्यावर त्यांनी एखादी जीप आली आहे का याची विचारणा केली, अर्थात नकार आला कारण किरण व अशोक अद्याप जीप घेऊन आलेच नव्हते. त्या मंडळीनी यांना ताजे जेवणसुद्धा बनवून दिले. किरण व मंडळी रात्र वाढू लागली तरी येण्याची काही चिन्हे दिसेनात म्हणून भांडी वगैरे घासून झोपण्याच्या तयारीला लागले. त्याच वेळेला साधारण साडे दहा वाजता किरण व मंडळी जीपने गावात दाखल झाले. एकदाचे सर्वजण कुमशेतला पोचले होते.

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

११ डिसेंबर १९९१ :
सकाळी जाग आली ती दातखिळी बसवणाऱ्या थंडीनेच. चहा पिऊन थंडी घालवण्याचा निरर्थक उपाय करून पाहिला. त्यात कुट्टी व शैलेशला थंडी भरून आली होती व तापही होता, तरी थांबून चालणार नव्हते. पटापट जीप मध्ये भरलेले सामान बाहेर काढले गेले. आम्ही एकूण अकरा सहकारी होतो पैकी अशोक जीप घेऊन त्वरित परतणार होता. त्याच्या सोबत शैलेशही जाणार होता. त्यात कुट्टी आजारी पण तरीही त्या अवस्थेत कुट्टी आमच्या बरोबर यायला तयार झाला. प्रत्येकाने स्वतःच्या खांद्यावर / पाठीवर जास्तीत जास्त सामान घेतले तरीही भरमसाठ सामान शिल्लक राहिले. त्यामुळे एक-एक करता तब्बल दहा माणसे गावातून घेतली, तरीही सामान संपेना. गावातली गडीमाणसे शिल्लकच न राहिल्याने अशोक व शैलेशही शिल्लक सामान घेऊन आमच्या बरोबर निघाले, आजोबाच्या दिशेने. आम्ही एकूण २१ जण सामान घेऊन पुन्हा परतीच्या वाटेने आजोबाच्या माथ्यावर असलेल्या पाण्याच्या कुंडापाशी निघालो. काल रात्री कोकणातून वर येताना आमची मंडळी पाणी पिण्यासाठी याच कुंडावर थांबली होती. आजोबाचा पायथा ठाणे जिल्ह्यात तर माथा नगर जिल्ह्यात येतो. पुढे ठाकूरवाडीतून २ गडी माणसे घेऊन त्यांच्या खांद्यावर सामान देऊन त्यांना इतरांबरोबर पुढे पाठवले. तर किरण , नरेंद्र, व शेखर परत कुमशेतला आले कारण अद्यापही थोडे सामान जीपमध्ये शिल्लक होते. परत येताना वाटेत त्यांना कुट्टी एका झाडाखाली बसलेला दिसला, त्याला थकव्यामुळे चक्कर आली होती. त्याच्याकडील सामान या तिघांनी घेतले व वाटेला लागले. कुंडावर पोचल्यावर अशोक व शैलेश परत घरी जाण्यास कुमशेतला उभी केलेल्या जीपच्या दिशेने निघून गेले. वाटेत त्यांना झाडाखाली बसलेला कुट्टी भेटला त्यालाही त्यांनी बरोबर घेतले.

इकडे कुंडाजवळ बसून किरण व मंडळी आपल्या इतर सहकाऱ्यांना (जे यांच्या पुढे निघाले होते) आजोबाच्या सर्वोच्च माथ्यावर मुंगीच्या पावलाने चढताना पाहत होते. दोन दिवसाच्या अथक परिश्रमानंतर सर्वानीच माना टाकलेल्या होत्या. एका धबधब्यातून हळूहळू वर चढत गेल्यावर कड्याच्या पायथ्याला लागुनच वाट आजोबाच्या सर्वोच्च माथ्यावर प्रवेश करत होती. मध्येच एके ठिकाणी काळ्या कातळात निसर्गनिर्मित पाण्याची कुंडे दिसली, त्यांच्या बाजूलाच आम्ही बेसकॅंप लावायचा विचार केला व तेथेच सर्व सामान उतरवून गावकऱ्याना त्यांचा मेहनताना देऊन परत पाठवले. त्यांच्या सोबत संजय रेडकरही मुंबईस गेला. एव्हाना काळोख व्हायला लागला होता त्यामुळे तंबू ठोकणे आवश्यक होते. गवत उपटून निघण्यासारखे नव्हते म्हणून ते मर्यादित पेटवले व तंबू पुरती जागा साफ करून घेतली.

आता सुभाष, पुंडलिक, नरेंद्र, शेखर, अनिल दगडे, किरण, नंदू आणि अनिल इमारते असे फक्त आठ जण शिल्लक होतो. दरीच्या कडेलाच तंबू असल्याने दरीतून धावत येणारा वारा त्याचा चांगलाच समाचार घेत होता. गेल्या १०-१२ दिवसातील एकेक प्रसंग आठवताना कधीतरी झोप लागली.
दरम्यान कुमशेतला परत गेलेले अशोक, कुट्टी व शैलेश जीपने परत डोंबिवलीला जाण्यास निघाले. आजारी असल्याने कुट्टी व शैलेश गाडीतच झोपले, बिचाऱ्या अशोकला एकट्यालाच जागे राहून गाडी चालवावी लागली. अशोकही थकलेला असल्याने इगतपुरीजवळ गाडी थांबवून रस्त्याच्या कडेलाच रात्र काढली व सकाळी सुखरूपपणे डोंबिवलीला पोहोचले. त्यांच्या नंतर निघालेला संजय परत कुमशेतला पोहोचला पण एव्हाना अशोक जीप घेऊन निघून गेल्यामुळे तसेच बसही उपलब्ध नसल्याने रात्री तिथेच मुकाम करून सकाळी मुंबईस रवाना झाला.

From Aajoba 1991

१२ डिसेंबर १९९१ :
सकाळी जाग आली ती तंबूच्या सेंटर पोलच्या थडथड आवाजानेच. पण उठण्याचे त्राण कुणातच नव्हते. २-३ दिवसात धावपळच एव्हढी झाली होती कि प्रत्येक जण आज आराम करण्याच्या इराद्यात होता. त्यामुळे आज सुट्टी जाहीर करण्यात आली. सकाळीच नंदूला ताप आला होता, त्याला गोळ्या देऊन त्याची सोय करण्यात आली. आज फक्त दुपारची जेवण आटोपल्यावर गडाच्या माथ्यावरून आम्ही चढाई अर्धवट ठेवलेल्या कड्याची तपासणी करण्याचे ठरवले होते. दुपारी जेवायला बसलो असताना सुभाष पाणी आणायला कुंडावर गेला होता. तो परत आल्यावर एक गंमत दाखवतो म्हणून सगळ्यांना परत कुंडावर घेऊन गेला. गेले दोन दिवस ज्या कुंडातले पाणी आम्ही पीत होतो त्या कुंडातून सुभाषने एक मेलेला उंदीर बाहेर काढला. ते पाहून आमच्या पोटात मळमळायला लागले. शेखर तर उलटी करयाचाच शिल्लक होता. किरणने खबरदारी म्हणून सर्वांना फ्लूच्या गोळ्या दिल्या. असे प्रसंग पाहण्याची कि काही पहिलीच वेळ नव्हती. १९८८ मध्ये ढाकभैरी चढाईच्या वेळी तर पठारावर रात्री मुक्काम करावा लागला व पाणी कुठेच न मिळाल्याने एका चिखलाच्या डबक्यात बसलेल्या म्हशींना उठवून नंतर तेच पाणी आम्ही पिण्यासाठी वापरले होते.

नियोजित कार्यक्रमाप्रमाणे दुपारी ३ वाजता कड्याच्या तपासणीकरिता निघालो. आजोबाच्या माथ्यावर सगळीकडे पुरुषभर उंचीचे गवत पसरले होते. त्यामुळे अंदाजानेच वाट काढत जाताना खड्ड्यात पडायला होत होते. पुढे काय वाढून ठेवलय या भीतीने हळूहळू पुढे चालत होतो. दीड-एक किलोमीटर विस्तार असलेल्या त्या परिसरात आम्ही कुठे चाललोय आणि दरीचे तोंड कुठे आहे त्याचा पत्ताच लागत नव्हता. चालता चालता अचानक आम्ही एका उंचवट्यावर येउन दाखल झालो होतो. इथून परिसर बऱ्यापैकी दिसत होता. अंदाज लावून दरीच्या तोंडाशी आलो, पण इथून खाली आमचा चढाईचा मार्ग दिसत नव्हता. आता खाली उतरूनच पाहणी करणे आवश्यक होते. कड्याच्या उतारावरून बरेच पुढे गेल्यावर तिथून एक वाट खाली उतरली होती म्हणजे एका लेजवर पोहोचली होती आणि अचानक आम्हाला हव ते गवसलं होत! कड्याच्या माथ्यापासून जवळपास ५०० फुट खाली असलेली हि लेज पुढे खूपच अरुंद होत (अर्धा फुटांपर्यंत) गेली होती व याच लेजच्या सुमारे १०० फुट उंचीवर आम्ही ५-६ दिवसांपूर्वी कॅंप २ वरून पाहिलेलं छत दिसत होत. याच छताच्या खाली सरळ रेषेत आमच्या पायाखाली आमचा अर्धवट राहिलेला चढाई मार्ग होता. चढाईचा मार्ग सापडल्याने खुशीतच अंधार पडू लागल्याने परत माथ्यावरील बेसकॅंपच्या दिशेने निघालो.

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

आमचे आनंदित चेहरे पाहून नंदू, व दोन्ही अनिलना कामगिरी फत्ते झाल्याची खात्री पटली. फावल्या वेळेत इतर सहकाऱ्यांनी जळणाचा साठा करून ठेवला होता. ज्या गोष्टीसाठी परत आजोबाच्या माथ्यावर आम्ही जमा झालो होतो त्या चढाईचे नियोजन करण्यासाठी रात्री एकत्र बसून विचार सुरु झाला. आम्ही आजोबाच्या पायथ्यापासून सुरुवात करून जवळपास २५०० हजार फुटांची गाठली होती आणि चढाई अर्धवट अवस्थेत सोडली होती. ताशीव कड्यावर जवळजवळ १००० फुट चढाई अद्यापही शिल्लक होती. म्हणजे अद्यापही १० ते १२ दिवस लागणार होते. मोहीम सुरु करून १५ दिवस उलटून गेले होते. सर्वांच्या सुट्ट्या पण संपत आल्या होत्या, आता उशीर करून चालण्यासारखे नव्हते. कारण बहुतेक मंडळी लघु उद्योगात काम करीत असल्यामुळे वाढीव सुट्ट्या मिळणार नव्हत्या. आता आम्हा आठ जणांमध्ये पाच जण चढाई करणारे होते त्यामुळे दोन टीम बनवायचे ठरविण्यात आले. पैकी एक टीम आज संध्याकाळी शोधलेल्या लेजवरून खाली म्हणजे कॅंप २ वरच्या भागात उतरेल व तेथेच कड्यावर रात्रंदिवस राहून चढाई करीत वर येईल. त्याच वेळी दुसरी टीम लेजच्या वरील छत व सुमारे ५०० फुटी भिंतीचे आव्हान पेलतील. खालील टीमला लागणारे जेवण/पाणी इत्यादी आवश्यक सुविधा लेजच्या वरील टीम पुरवेल. वरील टीम रोज बेसकॅंपवर येउन जाऊन राहील. या योजनेमुळे आम्ही अर्ध्या काळातच मोहीम पूर्ण करू शकणार होतो. याचे पूर्ण श्रेय आम्ही संध्याकाळी शोधलेल्या लेजला द्यावे लागेल त्यामुळे आमचे काम खूपच सोपे झाले होते.

१३ डिसेंबर १९९१ :
दुसऱ्या दिवशी सकाळी दरीतून येणाऱ्या जोरदार वाऱ्याने आपला इंगा दाखवला होता. दोन दिवस वाऱ्याशी सामना करून थकलेला आमचा तंबू साफ झोपला होता. तंबू तुटल्याने तो पुन्हा तेथेच लावणे शक्यच नव्हते, म्हणून मोहिमेवर जाण्याचे थांबवून आम्ही तंबू लावायला सुरक्षित जागा शोधण्यास निघालो. शेवटी एके ठिकाणी आम्हाला ती जागा मिळाली. कारवीच्या झाडोऱ्यामध्ये एक मोकळी जागा होती. थोडासा उतार होता तो व्यवस्थित केला. वारा कारवीच्या रानात घुसल्यावर त्याचा जोर कमी होत होता. जुन्या ठिकाणी असलेला तंबूमधील सामान उचलताना नंदूला दोन साप आरामात पहुडलेले दिसले. बापरे! गेले दोन दिवस आमच्यासोबत त्यांनीसुद्धा तंबूमध्ये मुक्काम ठोकला होता. अजून किती संकटाना तोंड द्यावे लागणार होते देव जाणे! या सर्व उपद्द्व्यापात चार वाजले. दिवस जवळपास संपत आला होता.

From Aajoba 1991

पण तरीही सुभाष, किरण, पुंडलिक व शेखर असे चौघेजण उद्याचे काम थोडेतरी हलके होईल म्हणून लेजच्या दिशेने निघाले. त्यांना आता मेन लाईन फॉर्म करायची होती. त्यासाठी त्याना काल पाहिलेल्या छताच्या सरळ रेषेत येणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांना अरुंद लेज वरून जवळपास २०० फुटांचा ट्रेवर्स मारून त्या छताच्या बरोबर खाली जाणे भाग होते. मोहीम संपेपर्यंत या अरुंद लेजवर वावर असल्याने तो मार्ग दोर लावून सुरक्षित करणे जरुरी होते. मग किरणने कंबरेला दोर बांधला व रांगत तर कधी सरपटत लेजवर पुढे सरकायला सुरुवात केली. वाटेत त्याला मध्येच एके ठिकाणी माकडांच्या विष्ठेने भरलेली एक गुहा लागली. इथे पोहोचल्यावर त्याने एक बोल्ट ठोकला व नंतर शेखर, सुभाष व पुंडलिक यांना गुहेत घेतले. इतर मंडळी तिथे पोहोचल्यावर किरण छताच्या सरळ रेषेत येण्यासाठी आणखी पुढे सरकला. माथ्यावरून खाली लेजवर उतरल्यावरचे ठिकाण व चढाईचा मार्ग यातील अंतर जवळपास २०० फुट होत आणि आता इथे सारखी धावपळ करावी लागणार होती म्हणून सुरक्षेसाठी एक दोर बांधून टाकला. उद्यापासून काही सहकारी एकदाचे खालच्या कॅंप २ वर उतरल्यावर मोहीम संपेपर्यंत भेटणार नव्हते. त्यामुळे रात्री कॅंप फायर करून खूप धमाल करून उद्यापासून परत सुरु होणाऱ्या मोहिमेसाठी नवीन मानसिक उर्जा साठवून घेतली.

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

१४ डिसेंबर १९९१ :
सकाळी जाग आली ती थंडीमुळेच, तंबूच्या तीन बाजूस असलेल्या कारवीच्या झाडोऱ्यामुळे वारा थेट मारा करत नव्हता, पण रात्री दव पडल्याने तंबूवरून पाणी वाहत होते. आता मोहीम काहीही करून पुढील चार ते पाच दिवसात आटोपायचीच हा निर्धार करूनच लेजच्या दिशेने प्रयाण केले. लेजवर कालच बांधून ठेवलेल्या दोरामध्ये स्वतःला अडकवून सर्वजण त्या अरुंद लेजवरून छताच्या खाली जाण्यासाठी सरकू लागले. काल वाटेत मिळालेल्या गुहेमधील माकडांची विष्ठा साफ करून तिथे तात्पुरता कॅंप लावला. त्यावेळेत किरण व पुंडलिकने पुढे जाऊन वाटेमध्ये दोर दरीमध्ये झुलत असल्याने आणखी दोन बोल्ट ठोकून येण्याजाण्यासाठी मार्ग सुरक्षित केला. गुहेच्या एका खबदाडीतून थेंब थेंब पाणी ठिबकत होते, तिथे एक कॅन लाऊन पाणी जमा करायची सोय केली, म्हणजे बेसकॅंप वरून उद्या पाणी आणायची निकड नव्हती.

आता मुख्य लढाईसाठी परत सज्ज झालो. कालच ठरवल्याप्रमाणे २ टीम केल्या. पुंडलिक व शेखर खाली रॅपलिंग करत आम्ही शेवटी कॅंप नं. २ वर जिथे चढाई थांबवली होती तिथे जाऊन चढाईला सुरुवात करणार होते. तर वरच्या बाजूला सुभाष चढाई करणार होता. दोन्ही टीमच्या मध्ये लेजवर किरण व नरेंद्र होते. नरेंद्रला लेजवर ठेवण्याचे एक कारण म्हणजे आमच्या डोक्यावर असलेले दगडी छत. दगडी छत कसे पार करायचे याचा अनुभव फक्त किरण व नरेंद्रलाच होता.

पुंडलिक रॅपलिंग करत खाली कॅंप २ वर उतरला व पाठोपाठ शेखर ही. इथेच आम्ही दि. १० डिसेंबरला चढाई थांबवली होती व आज म्हणजे दि. १६ डिसेंबर म्हणजे तब्बल ६ दिवसांनी पुन्हा कॅंप २ वर पोहोचू शकलो होतो. ते दोघेही खाली पोहोचताच नरेंद्र व किरण तंबूच्या दिशेने निघून गेले कारण संध्याकाळी खालील टीमला जेवणपाणी पुरवायचे होते. पुंडलिक व शेखरने कॅंप २ वरून चढाई सुरु केली आणि त्याच वेळेला सुभाषने लेजच्या वरच्या भागात छताच्या दिशेने चढाई सुरु केली. सुभाषला सुरुवातीला बोल्टिंग करावी लागणार असल्याने त्याला एकट्यालाच आव्हान पेलावे लागणार होते. तंबूच्या दिशेने जाताना किरण व नरेंद्रची चर्चा चालू होती. खाली कॅम्प २ पासून वर पुंडलिक व शेखर यांना जवळपास ५०० फुट चढाई करायची होती आणि त्यासाठी त्यांना रात्रंदिवस उघड्यावरच मुक्काम करायचा होता. शेवटी त्यांच्या सोबतीला किरणने सुद्धा खाली जाण्याचा निर्णय घेतला.
इथे बेसकॅंपवर नंदू, अनिलने जेवण तयार करून ठेवले होते, ते सर्व घेऊन किरण परत लेजवर एकटाच निघाला. दरम्यान सुभाषने सकाळी ११.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत एकट्यानेच सोलो क्लाइम्बिंग पद्धतीने एकूण १२ बोल्टच्या साहायाने लेजपासून सुमारे ४० फुटांची उंची गाठली होती. तर लेजच्या खाली शेखर व पुंडलिक यांनी १० डिसेंबरला चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून सुरुवात करून ४ बोल्ट, १ पिटोन, १ चोकनट यांचा वापर करत सुमारे ८० फुटांची उंची गाठली होती. ते आता एका अरुंद लेज वर पोहोचले होते. इथे त्यांनी कॅंप ३ ची स्थापना केली आणि किरणची वाट पाहत राहिले.

किरण लेज वर पोहोचताच आणलेले सामान घेऊन रॅपलिंग करत खाली पुंडलिक व शेखरकडे उतरण्यास सुरुवात केली. पाठीवर वजन असल्यामुळे अतिरक्त भार हातावर पडत होता आणि त्यातच वाटेत ओव्हरहेंग असल्यामुळे कड्यापासून विलग होऊन हवेतच रॅपलिंग कराव लागलं, तरीही दोर हातावर चांगलाच घासला गेला. खाली गेल्यावर किरणला कळल की त्या दोराचे टोक पुंडलिक व शेखरकडे नव्हतेच, ते तर त्यांच्यापासून विसेक फुट दूर हवेतच लटकत होते. मग पुंडलिकने त्याच्याकडे असलेला अतिरिक्त दोर किरणकडे फेकायला सुरुवात केली. किरणने तिसऱ्या प्रयत्नात तो दातांमध्ये पकडला आणि पुंडलिकने किरणला त्या लेजवर (कॅंप ३) वर खेचून घेतले. झाल्याप्रकाराने किरणची बोटे भाजून आतली कातडी सुद्धा दिसायला लागली. आजची रात्र आम्ही तिघे जमिनीपासून ३००० फुट उंचीवर असलेल्या याच अरुंद लेजवर (कॅम्प ३) उघड्यावरच मुक्काम करणार होतो. तर सुभाष व नरेंद्र वरच्या लेजवरून परत बेसकॅंपवर निघून गेले.

रात्री लवकरच मेणबत्तीच्या उजेडात जेवण करून घेतले. जेवायला काय जागा पकडली होती आम्ही व्वा! लेज इतकी अरुंद कि आळसावलेले हात पाय लांब केले तर सरळ हवेतच लटकायचे. झोप तर येतच नव्हती. वर आकाशात चांदणे पसरले होते, चंद्र प्रकाशही खाली पायथ्यापर्यंत झाडा-झुडपांवर पसरला होता. वरून झाडे झुडूपांसारखीच भासत होती. संपूर्ण दृश्यच अवर्णनीय होते, आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी याचा अनुभव घ्यावाच! इकडे आम्ही झोपेची वाट पाहत असताना तिकडे बेसकॅंप वरील नंदू आणि अनिल दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची तयारी करीत होते. कारण सुभाष व नरेंद्र सकाळीच चढाईसाठी निघतांना सोबत तयार जेवण सुद्धा घेऊन येणार होते.

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

१५ डिसेंबर १९९१ :
सुभाष व नरेंद्रने मेन लेजवर येऊन सकाळीच सुरुवात केली. काल सुभाषने चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून नरेंद्रने सुरुवात केली. सलग ७ बोल्ट ठोकल्यावर त्याला फ्री मूव्ह करण्याची संधी दिसली. जवळपास ३० फुटांची उंची गाठत तो आता जवळपास त्या दगडी छताखाली आला होता.

इकडे लेजच्या खाली अर्थात कॅंप ३ वर रात्रीच्या भयानक थंडीने किरण, पुंडलिक व शेखर चांगलेच गारठून गेले होते. सुरुवातीलाच ओव्हरहेंग असल्याने चेन बोल्टिंगशिवाय पर्याय नव्हता. शेखरने ५ बोल्टच्या साहाय्याने तो पार केला व पुढची चढाई किरणने आपल्या हाती घेतली. किरणने सुद्धा ५ बोल्ट मारल्यावर फ्री मूव्हची संधी दिसताच बिलेसाठी पुंडलिकला वर घेतले.

किरणच्या उजव्या हाताला ५-६ फुट अंतरावर एक मोठा दगड वरून खाली येऊन मध्येच एका कपारीत अडकला होता. अंग ताणून किरणने हळूहळू त्या दगडाला मिठीच मारली, आता त्याच संपूर्ण अंग हवेत लटकत होत. हळूहळू स्वतःचा तोल सावरत किरण त्या दगडावर चढला. तिथेच दोर बांधून पुंडलिकलाही त्याने तिथे खेचून घेतले. वरसुद्धा फ्री मूव्ह करण्याची संधी दिसत होती, पण वरचा होल्ड पकडण्याएव्हढी उंची किरणची नव्हती. त्यामुळे त्याने प्रथम पुंडलिकच्या खांद्यावर पाय ठेवला पण तरीही त्याचा हात पोहोचत नव्हता तेंव्हा त्याने थेट त्याच्या डोक्यावरच पाय देऊन वरचा होल्ड पकडला व वर सरकला. आता परत बोल्ट मारावा लागणार होता. पण त्यासाठी आधी तोल जाऊ नये म्हणून स्वतःला कुठे तरी जखडून घ्यावे लागणार होते. आजूबाजूस पाहिल्यावर कड्यापासून एक छोटा दगड बाहेरच्या बाजूस आला होता. त्याच्या चहुबाजूनी एक स्लिंग बांधून तिच्यातून कंबरेचा दोर पास करून स्वतःला तात्पुरत जखडून घेतलं. पुढे संध्याकाळ होई पर्यंत किरण ने १६ बोल्ट ठोकले. आज कॅंप ३ पासून जवळपास ८० फुटांची उंची गाठली होती.

From Aajoba 1991

१६ डिसेंबर १९९१ :
आज दगडी छताचा निकाल लावायचा होता. जमिनीपासून जवळपास ३६०० फुट उंचीवर असलेल्या छतावर नरेंद्रने सकाळीच बोल्टिंगला सुरुवात केली. हवेत संपूर्ण झोपण्याच्या स्थितीत आडवे होऊन त्याने लागोपाठ अकरा बोल्ट ठोकले आणि ३५ फुट रुंद असलेल्या त्या छताचा निकाल लावला. शाब्बास नरेंद्र!!

त्याने कड्यावर ठोकलेल्या शेवटच्या बोल्टला खुणेसाठी एक कॅन अडकवला. कारण उद्या लेजवर न येता थेट माथ्यावरूनच रॅपलिंग करत तो इथे पोहोचणार होता. वेळ वाचवण्यासाठी ते आवश्यक होत. खरतर आज नरेंद्रची अग्नीपरीक्षाच ठरली कारण दीड तासाला एक या हिशोबाने त्याने उलट्या अवस्थेत ११ बोल्ट ठोकले होते (वटवाघळासारखे). अनैसर्गिक अवस्थेत दिवसभर लटकून राहिल्यामुळे अंगावर भयंकर ताण पडलेला, तरीही नरेंद्रने त्याची पर्वा न करता कामगिरी फत्ते केली होती.

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

दिवसभराची चढाई थांबवून नरेंद्र परत खाली लेजवर सुभाषकडे पोहोचला. बेसकॅंपकडे निघणार इतक्यात खालून शेखरची हाक एकू आली……………………

इकडे खाली किरणने काल चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून आज पुंडलिकने सुरुवात केली, सोबतीला शेखर होता, तर किरण खाली अरुंद लेजवर (कॅंप ३) होता. तीन वाजेपर्यंत पुंडलिकने चेन बोल्टिंग करत ११ बोल्ट ठोकले. पुढील चढाई शेखरने आपल्या हातात घेतली आणि संध्याकाळपर्यंत ६ बोल्ट ठोकले. आज जवळपास ५५ फुटांची उंची गाठली होती. म्हणजे कॅंप ३ पासून जवळपास २२५ फुट उंचीवर पोहोचलो होतो. आणखी ५०-६० फुट उंचीवर एक छान प्रशस्त गुहा आहे हे शेखर व पुंडलिकने पहिल्याच दिवशी रॅपलिंग करत खाली येताना पाहिली होती. आमची सध्याची कॅंप ३ वरील मुक्कामाची लेज खूपच अरुंद होती, त्यातच बोचऱ्या थंडीमुळे दोन रात्री झोपही येत नव्हती. एकमेकांना खेटून झोपत असल्याने कुसही बदलता येत नव्हती. म्हणून तिघांनीही वरच्या गुहेत जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी वरच्या लेजवर हजर असलेल्या मंडळीनी खाली दोर सोडावा लागणार होता. शेखरने आवाज देताच वरच्या लेजवरून दोराच्या साहाय्याने जेवण व पाणी खाली सोडले. या खाली सोडलेल्या दोराच्या साहाय्याने शेखर कमांडो पद्धतीने दोर पकडून त्या गुहेत पोहोचला.

शेखर गुहेत पोहोचताच पाठोपाठ पुंडलिक व किरण कॅंप ३ ला कायमचा रामराम करून सर्व साहित्य घेऊन गुहेत पोहोचले. किरणच्या अंगावर सर्व साहित्य आणि त्यातच त्यांच्याकडे झुमार नसल्याने लेजवर उभ्या असलेल्या सुभाष व नरेंद्रने किरणला अक्षरशः खेचून वर घेतले. या खटाटोपात सात वाजले. सुभाष व नरेंद्र काळोखातच लेजवरून बेस कॅंपच्या दिशेने निघून गेले. तिकडे बेसकॅंपवर नंदू, व अनिल त्यांच्याच काळजीत बसले होते. ज्या लेजवरून दिवसा उजेडीदेखील जीव मुठीत धरून चालावे लागे त्याच लेजवरून अंधारात चाचपडत पुढे सरकताना त्यांना खूपच त्रास झाला. कड्याच्या वर आल्यावर मात्र लख्ख चंद्र प्रकाशात परिसर न्हाऊन निघाला होता. बेसकॅंपवर पोहोचताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.

इकडे कड्यावरच्या गुहेतच पुंडलिक, शेखर व किरणने कॅंप ४ स्थापन केला. खालील कॅंप ३ च्या अरुंद लेजपेक्षा हि गुहा थोडी प्रशस्त होती. रात्री मेणबत्तीच्या उजेडात जेवण करून घेतलं आणि झोपण्यासाठी जागा थोडीशी ठाकठीक करून घेतली. रात्री कधीतरी काहीतरी चावल्याने पुंडलिक जागा झाला तर एक उंदीर त्याच्यापासून थोडासा दूर अंतरावर उभा राहून याच्याकडेच टकामका पाहत होता. रात्रभर २-३ उंदरांनी अंगावर उड्या मारून भंडावून सोडले. खरतर आम्हीच त्यांच्या घरात घुसखोरी केली होती आणि आता आम्हीच त्याना त्यांच्याच घरातून हुसकावण्याचा प्रयत्न करीत होतो.

From Aajoba 1991

१७ डिसेंबर १९९१ :
सकाळी ठीक ८.३० वाजता शेखरने रॅपलिंग करत खाली जात काल चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून सोलो क्लाईम्ब सुरु केले. तर गुहेच्यावर पुंडलिकने सुरुवात केली. पुंडलिकला मेन लेज पर्यंतच २०० फुट अंतर पार करायचं होत तर शेखरला ८० फुटांचा कातळ टप्पा पार करत गुहेपर्यंत पोहोचायचं होत. दरम्यान किरणला गुहेतील दगड बाजूला सारताना एक काळी इंगळी दिसली, त्याने थोडा विचार करून तिला ठार मारलं. तिला खाली फेकता येत नव्हत कारण शेखर चढाई करीत होता आणि तिला गुहेतच ठेवताही येत नव्हत. म्हणून तिघांच्याही सुरक्षिततेचा विचार करून पहिल्यांदाच जीव हत्या केली होती. दरम्यान बोल्टिंग करताना शेखरच्या हातातून हातोडी सुटून थेट खाली कॅंप ३ वर असलेल्या झाडी मध्ये पडली. दुसरी हातोडी नव्हती आणि त्यातच संपूर्ण बोल्टिंग करायचे असल्याने शेखरला तिथेच ठेऊन सुद्धा काहीच उपयोग नव्हता, म्हणून त्याला परत गुहेत खेचून घेतले. एव्हाना वरच्या बाजूला पुंडलिकने सोलो क्लाइंब करत २ बोल्ट व १ पिटॉन च्या साहाय्याने फ्री मूव्ह करत सुमारे ८० फुटांची उंची गाठली होती. शेखर गुहेत पोहोचताच किरण पुंडलिकच्या मदतीला त्याच्यापर्यंत पोहोचला व पुढील चढाई आपल्या हाती घेतली. ३ बोल्ट व १ पिटॉनच्या साहाय्याने दुपारी १.३० वाजेपर्यंत फ्री मूव्ह करत त्याने जवळपास १२० फुटांची उंची गाठत सुभाष व नरेंद्र असलेल्या मेन लेजवर पोहोचला. सकाळ पासून २०० फुटांच्या भिंतीवर फक्त ५ बोल्ट वापरण्यात आले होते. हा संपूर्ण मार्ग भुसभुशीत मातीने अस्थिर खडकांनी भरलेला होता. खाली उभ्या असलेल्या पुंडलिकच्या अंगावर अक्षरशः किलो किलोने माती पडत होती.

किरण व पुंडलिक मेन लेजवर पोहोचताच खाली गुहेत बसलेल्या शेखरकडे हातोडी पोचवण्यात आली. कारण सकाळी हातोडी खाली पडल्याने गुहेच्या खालील जवळपास ६० फुटांच्या रॉकपॅचवर चढाई अद्याप शिल्लक होती. त्याला सोलो क्लाइंब करायला सांगून किरण व पुंडलिक मेन लेजवरून जेवण व पाणी आणण्यासाठी बेसकॅंपच्या दिशेने निघून गेले. चार दिवस त्यांनी कड्यावरच मुक्काम केलेला असल्याने त्यांच्या अंगावर आज प्रथमच उन्ह पडत होती. आम्ही चार दिवसानंतर दर्शन दिल्याने बेसकॅंप वरील सहकारी सुद्धा हरखून गेले. विश्रांती घेण्यसाठी सुद्धा वेळ नव्हता, लगेच रात्रीच्या मुक्कामासाठी जेवण व पाणी घेऊन परत कड्यावर येण्यासाठी निघालो. इथे शेखर एकटाच कड्यावर लटकून बोल्टिंग करत होता. त्यातच त्याच्याकडील वेज (बोल्टच्या फटीमध्ये टाकण्यात येणारी पाचर) संपल्याने नाईलाजाने बोल्टिंग थांबवावे लागले.

कॅंप ४ च्या खाली अद्यापही २०-२५ फुट चढाई शिल्लक होती. आता त्याला किरण व पुंडलिक परत येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता, शेवटी कड्यावर लटकून त्यालाही कंटाळा आला म्हणून खाली उतरून सरळ गुहा गाठली आणि मस्तपैकी ताणून दिली. संध्याकाळी ५.३० वाजता किरण व पुंडलिक बेसकॅंपवरून परत लेजवर आले आणि रॅपलिंग करत परत कॅंप ४ वर उतरले. आज कसेही करून कॅंप ४ खालील उरलेली २०-२५ फुटांची चढाई पूर्ण करायचीच होती. शेखरला आणखी विश्रांती देऊन त्याने जिथे चढाई थांबवली होती तिथे किरण व पुंडलिक खाली उतरले. प्रथम किरण ने १० फुटांची फ्री मूव्ह करीत एक बोल्ट ठोकला व त्या बोल्ट च्या आधारे उभे राहून जवळपास ६ फुटांवर दुसरा बोल्ट ठोकला. फ्री मूव्हची संधी होती, पुंडलिकला सावध राहायला सांगून किरणने झटकन मूव्ह करत उरलेलं अंतर पार करून संध्याकाळी ६.४५ वाजता कॅंप ४ वर पोहोचला.
मेन लेजच्या खालील चढाई संपल्याने तिघेही खुश होते. बेस कॅंप वरून अनिल इमारते परत घरी गेल्याने आम्ही आता सात जण उरलो होतो.

किरण, पुंडलिक व शेखर ने तब्बल पाच रात्री कड्यावरच्या सांदी-कोपऱ्यात घालवल्या होत्या. बेसकॅंप वरील मंडळीना आम्हाला पाहून अक्षरशः गहिवरून आले.

From Aajoba 1991

१८ डिसेंबर १९९१ :
दरम्यान सुभाष व नरेंद्रने छताच आव्हान मोडीत काढल्यावर आपल्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे लेजच्यावर माथ्याच्या दिशेने आगेकूच चालूच ठेवली होती. आजोबाचा माथा आता अगदीच आवाक्यात आला होता. काही दिवसांपूर्वी जे अशक्य वाटत होत ते अगदी काही फुटांवर दिसत होत. या नंतरची चढाई आता माथ्यावरूनच नियंत्रित करणार होतो. त्यामुळे बेसकॅंपवरून परत लेजवर येण्याजाण्याचा त्रास वाचणार होता. चढाई जवळजवळ पूर्ण होत आली होती. सुभाषने ३ बोल्ट व ३ पिटॉनच्या सहाय्याने बहुतेक चढाई संपवत आणली होती. त्यात नरेंद्रने १ बोल्ट व १ पिटॉनची भर घातली. शेवटची मुव्ह करण्यास पुंडलिक खाली उतरला. शेवटची फ्री मूव्ह करत २० दिवसांच्या परिश्रमाचे कोणतेही परिणाम न जाणवता पुंडलिकने ठीक १.३० वाजता आजोबाचा माथा गाठला आणि एका खडतर मोहिमेची सांगता झाली. फक्त आमच्या ७ जणांच्या आयुष्यातीलच नव्हे तर भारतीय प्रस्तरारोहण क्षेत्रातील आजवरची सर्वात मोठी मोहीम पूर्ण झाली होती. डेहणे गावापासून १ डिसेंबर १९९१ रोजी सुरुवात करून साथीदारांची कमी, पाण्याचे दुर्भिक्ष, साप, विंचू यांचा त्रास इ. अडचणीवर मात करून एकूण १८३ expanasion बोल्ट, १९ पिटॉन, दोन पेग व एक चोक नट वापरून आजोबावर अगदी मध्य भागातून अत्यंत अवघड मार्गाने चढाई केली होती.

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम. आतातरी खुप आधुनिक साधने उपलब्ध आहेत १९९१ मध्ये कसे मॅनेज केले असेल ह्याची कल्पनाही करवत नाही.

ह्या सर्वांच्या जिद्दीला मनापासून सलाम आणि साष्टांग दंडवत...

काय बोलू सतिश…नि:शब्द करणारा अनुभव आणि प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभे करणारे वर्णन…किरण काका हे प्रस्तरारोहण क्षेत्रातले "लिजंड" का आहेत हे समजायला एवढी एक मोहीम पुरेशी आहे. फक्त तेच नाही तर ह्या मोहिमेत नेटाने लढणारे सर्वच शिलेदार.

तुमच्या सामर्थ्याला…जिद्दीला…कष्टांना आणि उदंड यशाला मानाचा मुजरा !!!

खरंच इतक्या अडचणींतून मार्ग काढत मोहिम यशस्वी केली त्याबद्दल खरोखरच अभिनंदन. पण तरीही असं वाटलं की प्लॅनिंग थोडंसं फसलंच एकंदरीत.

काही प्रश्न पडले पण मला हे सगळं वाचून.

इतकी मोठी मोहिम व इतकी महत्वाची. रेकी करताना रूटचीच पाहणी केली कां? पाण्यासारख्या इतक्या महत्वाच्या गोष्टीचा विचार नाही केला गेला? इतके सभासद अर्ध्यातूनच निघून गेले. मगाशी वाचताना मी विचार करत होते, त्यांच्याजागी मी असते तर मी काय केलं असतं? कारण हा काही एक दोन दिवसांचा प्रश्न नव्हता ना शेवटी. सुभाष लीडर असताना असं काही न कळवता निघून जाण्याचं काहीच समर्थन नाही होऊ शकत.

मस्त

आधीच्या भागांची लिंक देत आहे...

गरजूंनी लाभ घ्यावा...

आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग १

http://www.maayboli.com/node/51593

आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग २

http://www.maayboli.com/node/51595

सर्वांचे धन्यवाद!

आऊटडोअर्स-

गिरीविराज हाईकर्सची रेखी करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. कारण आम्ही मार्ग ठरवताना खालूनच पाहतो, वरून खाली रॅपलिंग करून संपूर्ण मार्ग पाहिला जात नाही. त्यामुळे मार्ग किती खडतर असेल हे कड्याला भिडल्यावर थेट चढाई करतेवेळीच जाणवते. त्यामुळे चढाईपूर्व आखणी आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यात तफावत होणार हे गृहीत धरलेले असते. ज्याचा प्रत्यय आताच पंधरवड्यापूर्वी माळशेजमध्ये पूर्ण केलेल्या मोहिमेदरम्यान मलाही आला. कारण या मोहिमेच्या रेखी पासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत माझा सक्रिय सहभाग होता.

सध्याच्या प्रचलित परिस्थितीमध्ये मार्ग ठरवताना तो आधी वरून खाली येत संपूर्णपणे नजरेखालून घालतात, जे आम्ही अद्याप तरी टाळतो आणि पारंपारीकरित्याच प्रस्तरारोहण करतो. यात आम्हाला जास्तीचे आव्हान वाटते. पुढे मागे कदाचित आम्हीसुद्धा काळाला शरण जाऊ. कारण सध्याच्या काळात श्रम करण्यास कोणीही तयार नाही. असेही आता trad पद्धतीनेच प्रस्तरारोहण करण्याचाच दृष्टीकोण आहे. trad पद्धतीने प्रस्तरारोहण करताना तुम्ही आधीच संपूर्ण मार्ग ड्रील मशीनने बोल्ट मारून सुरक्षित केलेला असतो, त्यात काही लोक त्याच्यावरहि कडी करून top belay घेतात आणि american alpine journals मध्ये लेख लिहून स्वतःचीच पाठ थोपटून घेतात. आता याला प्रस्तरारोहण म्हणायचे का? अद्याप तरी आम्ही बोल्टिंग हातोडी आणि पंचच्याच मदतीने कड्यावर लटकूनच करतो, ज्यात शारीरिक मेहनत खूप लागते, एक बोल्ट ठोकायला अर्ध्या तासापासून एक तास लागतो.

सुभाष लीडर असताना असं काही न कळवता निघून जाण्याचं काहीच समर्थन नाही होऊ शकत.>>>>>>

सुभाष जरी लीडर असला तरी तो सुद्धा एक माणूसच! रोज बेसकॅंप आणि प्रत्यक्ष चढाई या दरम्यानच्या चढ उताराने त्याची सुद्धा दमछाक झाली असणार. त्यात पाण्याची बोंब आणि माणसे कमी. त्यातच यापैकी कोणीही आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हताच, त्यावेळेस प्रत्येकाचे हातावर पोट होते. या लोकांकडे त्यावेळेस साधी सॅकसुद्धा नव्हती. सामान अक्षरशः गोण्यामध्ये भरून न्यायचे. काहीवेळेस तर पाण्याचे ड्रम सुद्धा वापरलेत. सगळी साधने स्वतःच बनवलेली असल्याने त्याचं वजन सुद्धा तिप्पट आहे. काही साधने आम्ही आताही वापरतो. एका लोखंडी कॅराबिनरच वजन आताच्या हलक्या aluminium कॅराबिनरपेक्षा तिप्पट आहे.

आता प्रश्न आला माणस कमी असुनसुद्धा एव्हढी मोठी मोहीम हाती का घ्यावी. कारण हे समजण्यासाठी तुम्हाला एकदा किरण अडफडकर या अवलीयाशी प्रत्यक्ष भेट झाल्यावरच कळेल. आता साठीकडे झुकलेल्या वयात सुद्धा ज्या प्रकारे ते प्रस्तरारोहण करतात ते पाहिल्यावर तुम्हाला तुमची उत्तर सापडतील.

सूनटून्या, माझ्या वरच्या प्रतिसादात एक शब्द घालायचा राहिलाय त्यामुळे कदाचित वेगळा अर्थ निघत असावा.

रोज बेसकॅंप आणि प्रत्यक्ष चढाई या दरम्यानच्या चढ उताराने त्याची सुद्धा दमछाक झाली असणार. त्यात पाण्याची बोंब आणि माणसे कमी>>मी ही तेच म्हणत होते की हा एक दोन दिवसांचा प्रश्न नव्हता अ‍ॅडजस्ट करायला. असो.

किरण अडफडकरांचे नाव मी आधीपासूनच खूप ऐकून आहे. अर्थात माझा इंटरेस्ट रॉक क्लायम्बिग नसल्याने त्यांच्याशी कधी भेट व्हायचा प्रश्न नाही आला.

आऊटडोअर्स

मी काहीही वेगळा अर्थ घेतलेला नाही. तुम्हाला जो प्रश्न पडला त्यात काहीही वावग नाही. शेवटी श्रम करण्याची क्षमता प्रत्येक माणसागणिक कमी अधिक असते. ज्यावेळेस इतरजण न थकता माझ्यापेक्षा जास्त श्रम करतात ते पाहून मी सुद्धा तोंडात बोट घालतो आणि त्याचं कौतुकही वाटत.

मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यातच यापैकी कोणीही आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हताच, त्यावेळेस प्रत्येकाचे हातावर पोट होते. त्यामुळे तो सुद्धा कळीचा मुद्दा असावा.

धन्यवाद सूनटून्या,

एक जबर्दस्त मोहिमेचि मेजवानि. किरण अडफडकर सर हे तर रॉक क्लायम्बिगचे गुरु आहेत.

जबरदस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

केवळ दन्डवत ह्यापलिकडे काय बोलेना कळेना.

हे डोक्युमेन्टेशन खुप महत्वाच आहे.

मच्या सामर्थ्याला…जिद्दीला…कष्टांना आणि उदंड यशाला मानाचा मुजरा !!! >> +१११

सूनटून्या, सध्या गडबडीत असल्यामुळे नंतर निवांत लिहितो.
सध्यातरी एवढंच - स....ला....म!!!

थ-रा-र-क!!!
२०१४ मध्येही फार कोणत्या ग्रूपच्या यादीत फिरकणार नाही, अशी कठीण मोहीम.
खरंच, किरणकाकांनी केवळ कातळारोहण मोहिमा राबवल्या नसून, क्ल्याम्बर्सच्या पिढ्या कश्या घडवल्या आहेत, ते जाणवतंय!!!
सतीश: तू आमच्यासाठी इतका अमुल्य अनुभवांचा खजिना तपशीलवार उलगडलास, याबद्दल तुझे विशेष आभार!!!

जबरदस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

केवळ दन्डवत ह्यापलिकडे काय बोलेना कळेना. >>>> +१००