दंश

Submitted by अमेय२८०८०७ on 8 November, 2014 - 02:48

हे कोसळणे भाग्याचे
तृप्तीच्या शोधासाठी
आवर्तांचे हिंदोळे
लज्जेच्या सुटती गाठी

देहाचे हिरवे वळसे
निळसर ज्योतीसम डोळे
भरतीची रातकहाणी
गात्रा-गात्राला पोळे

नर्तन इच्छा-सर्पांचे
विळख्यांची शाश्वत माया
झिजताना चंदन होते
अत्तरगंधाची काया

ओठांत जाणिवा साऱ्या
शोषाचा चढतो पारा
प्रहराच्या सोबत फुलतो
रक्तामधला अंगारा

दे दंश तुझ्या जहराचा
फेसाळत भरुनी प्याला
हेलावत जन्माभवती
धुंदीभरल्या मरण्याला

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

class !