स्वप्नरिक्त

Submitted by भुईकमळ on 6 November, 2014 - 04:41

आता फक्त भास
सोबतीला उरे
कुठे शब्दझरे
झाले लुप्त..॥१॥

कशा उजळाव्या
मंद प्राणवाती
पापणीच्या काठी
अश्रुराग ...॥२॥

लाटाळली रात्र
कशी यावी नीज
बैचेनीची गाज
काळजात॥३॥

नाही बघायचे
पुन्हा पुन्हा मागे
गाव पाठी जागे
हुंदक्यांचे .॥४॥

अंधारपालखी
फांद्या पेलतात,
पाने पोळतात
काजव्यांनी..॥५॥

चांदव्यास माझ्या
वेढते ग खळे
झाले माझे डोळे
स्वप्नरिक्त॥६॥

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेव्ह झाले नाही
असे वाटल्याने चुकून
दोनदा रिपीट झालेय उरलेल्या कविता
डिलीट कशा करतात?
आणि समस्त माबोकरांना प्रणाम ,हे मी
पहिली कविता पाठवली तेव्हाच
करायला हवे होते. आजची दुसरी ....
काही खटकत असल्यास कळवावे..
आवडल्यास मनमोकळी दाद अपेक्षित आहे.

वा वा... सुरेख शब्दंकळा आहे...
अंधारपालखी
फांद्या पेलतात,
पाने पोळतात
काजव्यांनी

जियो.

पाने पोळतात
काजव्यांनी..!
सुरेख!

छाने... Happy

सुंदर लिहिलंय, बांधणीही आवडली. शब्दप्रतिमा सुरेख योजल्यात.
शेवटच्या कडव्यात माझ्या...माझे ही द्विरुक्ती टाळल्यास आणखी उठाव येईल असे वाटते, पण छानच रचना.

भुईकमळ,

नुसती कविताच सुंदर नाही पण बाकी इतर गुण देखील सुंदर आहेत कवितेत. आशय, शब्द, लय, भाव सगळे काही उत्तम जमले आहे.

भुईकमळ खरच पाण्यात न उगवता भुईत उगवतो का? मी भुईचाफा हे नाव ऐकले आहे पण हे नाही.

भुईकमळ - मला बुवा आवडले हे सांगता येते, का आवडले, काय भावल,, हे शब्दबद्ध करता येत नाही पण अर्थातच ही कसर इथल्या बाकी दर्दी वाचकांनी भरून काढली आहेच Happy

मायबोलीवर स्वागत असो.

दाद,के.अंजली,जाई,शशांकजी,अमेय,बी आणि मुग्धमानसी
सर्वांनी दिलेल्या सुंदर प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद
हर्पेन जास्त काय लिहू या स्वागताबद्दल माहेरी
आल्या सारख वाटतय.
बी, भुईकमळ जमिनीवरले केशरी फूल असते जे भवानी
मातेच आवडते फुल आहे. तळेगावी बहीणीकडे पाहीलय.

सुशांतजी , जिज्ञासा,भक्तीप्रणवजी आणि पाठकजी प्रतिसादासाठी अत्यंत आभारी आहे. आपली सर्वांचीच दाद लेखनाचा उत्साह द्विगुणित करणारी आहे.
धन्यवाद.

छान आहे कविता Happy
'लाटाळली रात्र' हा शब्दप्रयोग मला समजला नाही.

जाता जाता, 'भुईकमळ' नामाचे स्वतःसाठीचे प्रयोजन पण सांगा.

लाटाळली रात्र म्हणजे रात्रभर एकातून एक फुटणारया आठवांच्या लाटावर लाटा.या आवर्तनांतून क्षण न क्षण
वाहत राहणारे अगतिक मन.
सई ,मी प्रचंड कमळवेडी आहे आणि मला स्वतःसाठी त्याचच कुठल तरी नाव हव होतं.कमळ पाण्यातच अधिक राजस वाटत पण माझ बालपण मातीतून रुजून आलेलं मातीतली कमळण म्हणून भुईकमळ. भवानीआईच लाडकं. 'भुईकमळं,ह्या नावाची एक भन्नाट कविता वाचलेली
अरूण कोलटकरांच्या संग्रहात. त्या प्रभावाने सुध्दा मी हे नाव निवडले असेल.
सई,तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मग सगळंच समर्पक वाटतंय, धन्यवाद Happy
तुमचं माणिक नांवही खरंतर सुंदर आहे.. अलिकडे ऐकायलाही मिळत नाही.

अगदीच सुन्दर काव्यरचना.....मांडणी आवडली

संतोषजी … प्रतिसादाबद्दल आभार मानायला खूप दिरंगाई झाली. इतकी वर्ष कागद पेनाशी गट्टी जमल्याने हे अस टाईप करण्याचा मनस्वी कंटाळा येतोय.
आणि सई, माणिक अशी हाक मारलीत तरी आवडेलच ...