पाऊस तुझ्या स्मरणांचा

Submitted by निशिकांत on 6 November, 2014 - 00:43

मज भास नेहमी होतो
तू आसपास असल्याचा
अनुभवतो बारा महिने
पाऊस तुझ्या स्मरणांचा

हरवलो कुठे? ना दिसतो
माझ्यातच मी असलेला
अन् वजावटीने तुझिया
सरल्यागत मी उरलेला
मुल्यांकनात मी खाली
वरती नंबर शुन्याचा
अनुभवतो बारा महिने
पाऊस तुझ्या स्मरणांचा

वादळात पाचोळ्याचे
होते ते झाले माझे
बस उडतो सैरावैरा
विरहाचे पेलत ओझे
गोंधळलो, दिसे न रस्ता
जगण्या किंवा मरण्याचा
अनुभवतो बारा महिने
पाऊस तुझ्या स्मरणांचा

तो विराम स्वल्प असावा
अपुल्यात, वाटले होते
पण पूर्णविरामाने का?
आयुष्य व्यापले होते
तळ कसा कोरडा झाला?
आपुलकीच्या धरणाचा
अनुभवतो बारा महिने
पाऊस तुझ्या स्मरणांचा

हा प्रश्न मेनके तुजला
का शिकार अर्धी करशी?
तिरप्या नजरेने जखमी
करुनी का वरती हसशी?
ही जातकुळी पुरुषांची
घायाळ कळप हरणांचा
अनुभवतो बारा महिने
पाऊस तुझ्या स्मरणांचा

तू गेल्याने तर झालो
मी कुबेर आठवणींचा
मन विस्तारुनी सोडवला
मी सवाल साठवणीचा
या खजान्यात सापडतो
मज साठा रत्नकणांचा
अनुभवतो बारा महिने
पाऊस तुझ्या स्मरणांचा

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users