माननीय श्रीमती सोनियाजी गांधी यांस

Submitted by बेफ़िकीर on 20 October, 2014 - 01:36

माननीय श्रीमती सोनियाजी गांधी यांस,

आदरपूर्वक नमस्कार!

यंदाच्या राजकीय मोसमात आम्ही पाच पत्रे लिहिण्याचे काम हाती घेतलेले आहे व हे दुसरे पत्र आपणांस लिहीत आहोत.

हे पत्र सुरू करताना आमचे मन खरे तर आनंदाने भरून आलेले असायला हवे. लहानपनापासून भाजपीय संस्कारात वाढलेले आम्ही, काँग्रेसचा चौफेर दारूण पराभव होत असलेला पाहून पेढे वाटायला हवेत.

पण बघतो तर काय, हा अनुभव अगदीच निराळा आहे.

सोनियाजी, हे पत्र लिहिताना आमचे मन विषण्णतेने भरून आलेले आहे. मनाचे व्यापार कोणाला कुठे कळतात? आमचाच विश्वास बसत नाही आहे की आपल्याला पत्र लिहिताना खिन्न खिन्न वाटत आहे.

त्याचे काय आहे? आपण ह्या देशाच्या स्नुषा असलात तरी त्यापूर्वी एक परकीय नागरीक आहात. त्यातही ज्या देशातील नागरिकांच्या त्वचेच्या रंगाचा ह्या खंडातील मानवाला नेहमीच आकर्षणयुक्त दबदबा वाटत आला आहे त्यापैकी एका देशातील आहात. नाही विसरता येत हे आम्हाला! हे आमच्यातील पुस्तकी, छापील व नैमित्तिकरीत्या उफाळून येणारे खोटे देशप्रेम नाही आहे. ही आहे आमच्यातील स्वतःला गोर्‍यांपेक्षा कनिष्ठ मानण्याची जन्मजात प्रवृत्ती! मात्र ह्याला समांतर अशी आणखी एक प्रवृत्ती आमच्यात आहे. ती म्हणजे आपल्या घरी आलेल्या प्रत्येक परक्याला अतिशय उबदार, आपलेसे वाटेल अशी वागणूक देणे!

ही जी दुसरी प्रवृत्ती आमच्यात आहे ना सोनियाजी, ती अशी प्रवृत्ती आहे जी बहुसंख्य देशांमध्ये आढळत नाही. इतर देशात आमच्या नेत्याला व्हिसा नाकारला जातो. वारंवार आमच्या नेत्यांनी इशारे देऊनही आमच्या देशाच्या सीमा शेजारी देशांकडून उल्लंघल्या जातात. आमच्या देशातले सामान्य नागरीक बाँब उडवून मारले जातात. आमच्यावर दिडशे वर्षे राज्य करणार्‍या आणि आम्हाला लुटणार्‍या देशाशी आम्ही आजही सद्भावनेने क्रिकेटच्या मालिका घेतो. आमच्या महिला राजदूताचा तपासणीच्या निमित्ताने अपमान करणार्‍या देशातील कंपन्यांना आम्ही आमच्याकडे गुंतवणूकीसाठी आमंत्रीत करतो. अरुणाचलमध्ये रस्ता बनवल्यावर संतापणारा उत्तरेचा मोठा भाऊ चीन कितीही संतापला तरी आम्ही त्याच्या दारात जाऊन उद्योगकराराची भीक मागतो. अशी प्रवृत्ती जगात नाही आढळत सोनियाजी! म्हणून तर हा देश निराळा, हटके आहे. इथे मुसलमानाच्या घरी नवरात्र बसते आणि हिंदू ईदला शीरखुर्मा मागून आणतो. इथे पंचा गुंडाळून, सूत काढून, अहिंसाधर्माचे व सत्याग्रहाचे पालन करून कोट्यावधींचे नेते बनता येते. नेता होण्यासाठी येथे हिटलरशाही, सद्दाम हुसेन शाही किंवा जॉर्ज बुश शाही आवश्यक नसते.

आमच्यातील हीच ती सहृदयता आहे सोनियाजी, जी तुम्ही ह्या देशाच्या स्नुषा असूनसुद्धा आज आम्हाला विषण्ण बनवत आहे. खिन्न बनवत आहे. वास्तविक पाहता ज्या इंदिराजींच्या एकाधिकारशाहीचा आमच्या मनात तिरस्कार होता, ज्या राजीवजींच्या राजकीय उदयापासूनच आम्हाला अडचणी होत्या त्यांच्या पश्चात त्यांच्या पक्षाची झालेली ही त्रेधा पाहताना आम्हाला कोण आनंद व्हायला पाहिजे? पण वाईट वाटत आहे. एक स्त्री आपले सर्वस्व सोडून भारतात लग्न करून भारताची सून बनून येते. कोणतेही सक्रीय राजकीय पद न स्वीकारता पक्षबांधणीपुरती स्वतःला मर्यादीत ठेवते. तिच्या पक्षाला आज माती चारली जात आहे. तिच्या पाठीशी आज तिची खंबीर सासू नाही, करिष्माई पती नाही! त्या सुनेच्या खिन्न डोळ्यांकडे पाहताना असे वाटते की कित्येक दशके ह्या देशाला एकसंघ ठेवू शकणार्‍या पक्षाची शकले ह्याच नेतृत्वाच्या कालावधीत का उडाली?

सोनियाजी, तुमचा भारतीय राजकीय पटावर झालेला उदय अमिताभ बच्चन ह्यांचा राजकीय पटावरून झालेला अस्त हे साधारण एकाच काळातील! स्व. राजीवजींच्या दुर्दैवी व निंदेस पात्र अश्या भ्याड हत्येमुळे अचानक सगळी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडली. त्यावेळी बिग बी ह्यांनी शिष्टाई करून तुम्हाला सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला व तो तुम्ही मानलात. खरे सांगू का? आम्हाला तेव्हा फार बरे वाटले होते. ह्याचे कारण हे की तुम्ही तेव्हा राजकारणात कोंग्रेसचा चेहरा म्हणून उतरला असतात तर विरोधकांची डाळ पुढच्या दोन निवडणूकांपर्यंत शिजली नसती. पण तुम्ही दूर राहिलात. तुम्ही हिंदी नीट बोलू शकायचा नाहीत, आजही नीट बोलू शकत नाही, तुमचे व्यक्तीमत्व भारतीय वाटत नाही, इंदिराजींच्या देहबोलीचे केविलवाणे अनुकरण करता तुम्ही! एकुण, तुम्ही सक्रीय न होणे हा राजकीय सूज्ञपणाच म्हणावा लागेल. कारण आमचा देश भावनांवर आणि व्यक्तीपूजेवर चालतो. आम्ही नुसते व्यक्तीमत्व पाहून ठरवतो की ह्या विशिष्ट व्यक्तीत विशिष्ट पदाचे मटेरिअल आहे की नाही. आणि त्यावरच आम्ही मतदानही करतो.

नरसिंह राव आणि मनमोहन सिंह हे दोन चांगले पंतप्रधान भारत देशाला बराच काळ एक स्थिर सरकार देऊन गेले. ह्या दरम्यान वलयांकित व्यक्तीमत्व मात्र तुम्हीच राहिलात. प्रत्यक्ष पदभार कोणीही सांभाळत असो, काँग्रेस म्हणजे सोनिया हे समीकरण तसेच राहिले. वादग्रस्त मुद्यांमध्ये न येता तुमची कारकीर्द समांतररीत्या झळाळू लागली. पतीनिधनाचे दु:ख तुमच्या मनात असणार ही कालवाकालव आमच्या मनात कायम तशीच राहिली. इतकेच काय हळूहळू आम्हाला वाटू लागले की तुम्ही खरोखरच महान आहात. तुम्हाला ना पद हवे आहे ना प्रसिद्धी! फक्त पक्ष बळकट राहावा इतकीच तुमची इच्छा आहे. हे सगळे होत असताना तुमचे परकीयत्व विरून जात होते.

पद न स्वीकारणे, तरीही वलयांकित राहणे, गांधी कुटुंबीयत्व मिरवणे ह्यात तुम्ही जेव्हा पारंगत होत होतात, तेव्हा सोनियाजी तुमच्या एक गोष्ट लक्षातच आली नाही. आत्मगौरवाच्या ह्या दुष्टचक्रातून आपली व पक्षाची सुटका व्हावी ह्यासाठी नेतृत्वाची दुसरी फळीच तुम्ही निर्माण केली नाहीत. 'मी नसले तर कोण' हा प्रश्न इंदिराजींना आणि राजीवजींना नव्हता. तो तुम्हाला मात्र पडायलाच हवा होता. ह्याचे कारण तुमचे चिरंजीव काय वकूबाचे आहेत ह्याची तुम्हाला उत्तम जाण होती. तुमच्या कुटुंबियांपलीकडचा नेता पक्षावर थोपला तर पक्षाची शकले उडतील हेही तुम्हाला माहीत होते. मनमोहन सिंग मुखदुर्बळ ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हे तुम्हाला ज्ञात होते. तुमचे एक चांगले नेते तर थेट राष्ट्रपतीच होऊन बसले. चिदंबरम ह्यांना वलय नव्हते. बाकीचे नेते तुमच्या कुटुंबाच्या वलयाला चिकटल्यामुळे सत्तेत तग धरून होते. त्यांना स्वतंत्ररीत्या विशेष अस्तित्त्व नव्हते.

सोनियाजी, भारताचे राजकारण म्हणजे थट्टा वाटली का तुम्हाला? कोणीही यावे, गांधी घराण्याची सून बनावे आणि इथे राज्य करावे? आम्हाला अक्कल नाही असा भ्रम झाला का आपल्याला? दुसरी फळी कोण तुमचे चिरंजीव उभी करणार का? काँग्रेस पक्षाला आपल्याशिवाय कोणी एक तारणहार असायला हवा हे एखाद्या शेंबड्या आमदाराच्याही लक्षात आले असते ते तुम्हाला समजू नये? कोणती धुंद चढली होती?

गेल्या वीस वर्षात ना तुमच्या वक्तृत्वाचा दर्जा सुधारला ना तुम्ही कोठली जबाबदारी पत्करलीत! तुमची सुरक्षा, तुमचा थाटमाट ह्यावर कोट्यावधी खर्च मात्र झाले. तुमच्या चिरंजिवांनी मनमोहन सिंगांनी काढलेला फतवा फाडण्याच्या लायकीचा आहे असे वक्तव्य केले तेव्हा तुम्ही त्यांची भर संसदेत कातडी सोलायला हवी होतीत. तेही शक्य नसले तर निदान लहानपणापासून त्यांच्यात नेतृत्वगुण येतील हे तरी बघायला हवे होतेत. अहो नुसते त्या कुटुंबात जन्म घेऊन किंवा त्या कुटुंबाशी लग्न करून नाही एवढ्या मोठ्या देशाचा नेता बनता येत!

आमचे मन विषण्ण होण्याचे कारण काय आहे माहितीय का सोनियाजी?

आज भाजपला तोडिचा विरोधक उरलेला नाही हे शल्य बोचत आहे. राष्ट्रवादीसारख्या स्थानिक आणि पोखरलेल्या पक्षाशी लढती द्याव्या लागत आहेत. त्यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या प्रस्तावाला विचारात घ्यावे लागत आहे. अहो सगळी अंडीपिल्ली तुमच्याच पक्षापासून फुटलेली आहेत आणि तुम्हालाच जड जात आहेत. आज ना तुम्हाला विरोधी पक्षनेते पद आहे ना पराभवाची मीमांसा देण्याचे धाडस! ना एखादे राज्य जिंकून घेण्याची उमेद आहे ना एकेकाळच्या विजेत्याची देहबोली! लोकसभा निवडणूकीपासून पराभूताच्या देहबोलीत वावरणारे तुम्ही मायलेक हे इंदिराजींच्या खमकेपणाची नियतीने केलेली जहाल थट्टा आहे सोनियाजी! जेव्हा एक जायंट स्टार मृत्यूमुखी पडतो तेव्हा त्याची प्रभा कित्येक अब्जावधी किलोमीटरवर पसरून त्याच्या मालिकेतल्या ग्रहांना गिळंकृत करते आणि मग तो तारा विझतो. तुमच्या कारकीर्दीत काँग्रेस पक्ष नुसताच विझला सोनियाजी! फुटलेली अंडीपिल्ली तशीच चेकाळून बेभानपणे तांडव करत आहेत. अस्ताला फक्त काँग्रेस पक्ष चाललेला आहे. ह्या पक्षाचा पुन्हा उदय होणे हे आता कशावर अवलंबून आहे माहितीय का? भाजपचा जनतेला उबग येण्यावर! तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून नाहीच आहे आता ते!

सोनियाजी, स्वतःच्याच धुंदीत वावरणे, दुसरी फळी निर्माण न करणे, गांधी घराण्याच्या वलयापासून मुक्त झाला तरी काँग्रेस बलाढ्य आहे ही भावना कार्यकर्त्यांमध्ये न पोचवणे, स्वतः कोणतेही पद किंवा जबाबदारी न घेणे, वक्तृत्व न सुधारणे, आपलेसे न वाटणे आणि राहुल हे अपत्य ह्या देशाच्या राजकारणावर लादणे! ह्या सर्व अपयशाच्या मालिकांच्या मुळाशी तुमचे परकीय असणे आहे आणि तरीही तुम्ही आमच्या देशाच्या स्नुषा असल्याने आम्ही ते परकीयत्वही कनवाळूपणे चालवून घेतलेले आहे. पण आता बास करा कृपया! प्रियांकाला नका आणू राजकारणात! स्वतःपासून फुटलेल्या पक्षांवर खरा सूड उगवायचा असेल तर काँग्रेसला असेच नामशेष होत राहूद्यात! ते स्थानिक पक्ष एकमेकांचेच गळे दाबून मरतील बघा!

सोनियाजी, तुमच्या कारकीर्दीत आम्ही काँग्रेसचे रसातळाला जाणे, टप्प्याटप्प्याने कोसळणे पाहिले. आता भाजपचा उबग येईपर्यंत प्रतीक्षा आहे किंवा रामराम आहे तुमच्या नशीबी!

स्वतःच्या देशात राजीवजींची विधवा म्हणून राहिला असतात तर काय किंमत असती हो तुमची? रस्त्यावरून शेजारून गेला असतात तरी कोणाला समजले नसते. आणि इथे येऊन वीस वीस वर्षे स्टारपद? चूक आमचीच आहे. सगळ्या जगाला, त्यातल्या त्यात गोर्‍या कातडीला आम्ही वचकून असतो, कनवाळूपणे वागतो.

सोनियाजी, विरोधी पक्ष हारण्याचा प्रत्येकाला उन्माद चढतो, प्रत्येकाला आनंद होतो. तुम्ही हारल्याचे वाईट वाटत आहे. कारण तुमच्याबरोबर तुम्ही तो पक्ष घेऊन हारला आहात, ज्या पक्षाची धुरा ह्या देशाने आजवर ज्यांची पूजा केली त्यांनी एकेकाळी वाहिली होती.

उरल्यासुरल्या वलयानिशी परत जा कृपया! आपले सर्व कुटुंबही घेऊन जा! जगूदे ह्या भारताला आणि काँग्रेस पक्षाला तुमच्या नावाशिवाय! बघू काय होते! शिकूदेत सगळ्यांना, की कोणी कोणाला जन्मभर पुरत नसतो.

====================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदी तिकडे थ्रीडी सभा घेतात आणि बेफी आउटडेटेड पत्राचा मार्ग अवलंबतात ,कसे व्हायचे मोदीभक्तांचे?

हे पत्र फारसे पटले नाही, किंबहुना सोनिया गांधी यांना आयते अध्यक्षपद मिळालेय, त्यांच्यात पात्रताच नाही हे मला वैयक्तिक कधीच पटले नाही. एखादा राष्ट्रीय पक्ष, तो देखील काँग्रेससारखा सांभाळणे, सत्तेत राहणे, सर्वांना कंट्रोलमध्ये ठेवणे, हे कर्तव्यशून्य आणि प्रतिभाहिन माणसाला जमेल याची सुतराम शक्यता नाही. फक्त गोर्‍या रंगाने वचकून सर्वांनी त्यांना मान दिला हे तर माझ्यामते पुर्णपणे गंडलेले लॉजिक आहे.

त्यांची चूक झाली असेलच तर ती भ्रष्टाचारावर रोख लावता आला नाही. त्यांना ते शक्य होते खरे तर पण थोडाफार चालून जाईल म्हणत त्यांनी जनतेला गृहीत धरले. या नादात थोडाफारच्या जागी बराच झाला ती गोष्ट वेगळी, आणि मग मात्र जनतेने आपटला.

अवांतर - त्यांच्या चिरंजीवाबद्दल मात्र असे नक्कीच बोलू शकतो.

ऋन्मेऽऽष तुमचे म्हणणे पटले!!

मी स्वत: प्रो-भाजपा असले तरीही ---- परक्या देशात येउन, पतीची हत्या झालेली असताना, सक्रिय राजकारणाचा कोणताही अनुभव नसताना कॉंग्रेस पक्षाला सत्ता मिळवून देणे आणि १० वर्ष भारतामध्ये स्थिर सरकार देणे ह्या सगळयात सोनियांचे कर्तुत्व नाकारणार नाही. हे काम सोपे निश्चितच नव्हते. केवळ पुत्रमोहापोटी राजकीय वारस त्यांना देता आला नाही आणि त्यांनी तसे प्रयत्नही केले नाहीत इथेच काय ती चूक झाली. प्रियांकांच्या राजकारण प्रवेशाविषयी बोलायचे झाले तर त्यासाठी कॉंग्रेसचे निष्ठावानच आंदोलने करीत आहेत.

ऋन्मेष +१.
हे पत्रं नाही आवडले.
खास करून 'आम्ही तुम्हाला जरूरीपेक्षा जास्तं भाव देतोय म्हणून तुम्ही परत जा' हा अ‍ॅटिट्यूड नाही आवडला.
या देशात सून आपल्या घरी लग्नं करून आली म्हणजे आपलीच झाली असा अ‍ॅटिट्यूड आहे.
पतीनिधनानंतर काही नतद्रष्टं लोक विधवेला माहेरी पोचविणे, घराबाहेर करणे असे करतातही.
पण ती या देशाची खरी संस्कृती नाही.

ईटलीच्या नागरिकत्व कायद्या प्रमाणे त्यांची मुलगी लग्न होऊन कोणत्याही देशात गेली तरी तीचे इटलीचे नागरिकत्व रद्द होत नाही. एवढेच नाही तर इटालीयन मुलीना अशा विवाहातून जी काही मुलं होतील त्याना सुद्धा बाय डिफॉल्ट इटलीचे नागरिकत्व मिळते. या नियमा नुसार राहूल गांधी यानाही इटलीचे नागरिकत्व मिळाले आहे.
सोनीया व राहूल हे दोघेही इटालीयन पासपोर्ट होल्डर आहेत.

भारताचा नागरिक्त्व कायदा म्हणतो की भारतीय नागरिकाला दुहेरी नागरिकत्व स्विकारता येत नाही. त्यामुळे सोनीया व राहूलनी इटली सरकारला पत्र लिहून तिकडचे नागरिक्त्व रद्द करण्याची विनंती करणे व ते रद्द करवून घेणे अनिवार्य आहे.

२००४ साली सोनीया गांधी यानी पंतप्रधान पदासाठी समस्त खासदारांचे बहुमतासाठी मान्यता देणारे पत्र राष्ट्रपती कलाम यांच्याकडे सादर केले होते. यात जाणता राजाचे पत्र सुद्धा होते. सकाळी १० वा. टी. व्ही. वरुन तशा बातम्याही झडकल्या होत्या की सोनीया गांधी उद्या शपथविधी घेणार असून आज सायंकाळी पंतप्रधान पदाच्या दाव्यासाठी त्या कलामाना भेटणार आहेत वगैरे.

पण त्या आधी १ ते २ च्या दरम्यान हे दुहेरी नागरिक्त्वाचे प्रकरण पुढे आल्यामुळे कलामानी ती मिटींगच रद्द केली. कायद्याच्या कसोटीत सोनीयाचे पंतप्रधानपद टिकणार नसून दुहेरी नागरिक्त्व सर्व उध्वस्त करुन जाईल हे समोर दिसल्यावर मनमोहन सिंग यांचे नाव पुढे करण्यात आले.

थोडक्यात सोनीया गांधीना पंतप्रधान बनायचे होते पण दुहेरी नागरिक्त्वामुळे ते हुकले.

राहूल गांधीचे शालेय नाव व इटालीयन पासपोर्ट विन्सी गांधी असे आहे. सुरक्षेच्या कारणामुळे आपण हे नाव वापरतो असे शपथपत्र रागानी अमेरीकेतील एका महाविद्यालयाला दिले होते. ते खरेही असेल पण आज तेच दुहेरी नागरिक्त्व त्यांच्या आड येत आहे. काँग्रेस जिंकली असती तरी याच कारणामुळे रागाला सुद्धा पंप्र बनता आले नसते.

एवढे सगळे प्रताप होऊनही इटालीयन नागरिक्त्व का सरेंडर केले जात नाही हे अनाकलनीय आहे.

बेफ़िकीर

तुमचे विचार आहेत आणि तुम्ही ते मांडलेत हे ही ठीकच.

तुम्ही जस म्हणता तस समान्य कार्यकरत्याला कळत तस या दोघांना समजत नसेल?

की या दोघांना पुढे करुन जो होईल तो आणि होईल तेवढा फ़ायदा करुन घेणारे वेगळेच आहेत?

>>ह्या पक्षाचा पुन्हा उदय होणे हे आता कशावर अवलंबून आहे माहितीय का? भाजपचा जनतेला उबग येण्यावर! तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून नाहीच आहे आता ते!<< +१०० हे मात्र खरय बेफी !!

उरल्यासुरल्या वलयानिशी परत जा कृपया! आपले सर्व कुटुंबही घेऊन जा! जगूदे ह्या भारताला आणि काँग्रेस पक्षाला तुमच्या नावाशिवाय! बघू काय होते! शिकूदेत सगळ्यांना, की कोणी कोणाला जन्मभर पुरत नसतो.>>>> बाकि लेखाबद्दल स्वतंत्र प्रतिक्रिया देतो.पण बेफी तुमच्यासारख्या संवेदनशिल लेखकाकडुन हे अपेक्षित नव्हते.
या वाक्याचा निषेध.

एक मिनिट! त्या वाक्याला कृपयाच 'एका विधवेला माहेरी पाठवण्याचा हेतू' असला विकृत रंग दिला जाऊ नये. काय आहे, इथे एकाने काहीतरी लिहिले की पन्नास वातकुक्कुटे प्लस वन करायला धावतात आणि लेबले बसतात. माझ्या लेखनाखाली आलेल्या प्रतिसादांवर मी सहसा बोलणे टाळतो, पण इथे काही भलताच रंग दिसू लागला म्हणून बोलत आहे.

सोनिया गांधींना परत जा असे सांगणे ह्याची पार्श्वभूमी इतकीच आहे की येथील राजकारणात ह्यापुढे त्यांची डाळ त्यांच्या कर्तृत्वामुळे शिजणे कठीण आहे. त्यांच्या पक्षाला आता चेहरा नाही आणि सलग दोन तीन निवडणूकांमध्ये ते पराभूत झालेले आहेत.

जरा पुढची वाक्ये संवेदनशीलपणे वाचणे हीसुद्धा वाचकाची जबाबदारी असते, भारतीयांना गांधी-नेहरू व्यतिरिक्तचे राजकारण जमावे ह्या हेतूने कुटुंबकबिला घेऊन जा असे म्हंटलेले आहे. हे घराणे युगानुयुगे सत्ता मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरेल अश्या गैरसमजात आता येथील नेत्यांनी राहू नये ह्या अर्थाने तसे म्हंटलेले आहे.

वाचन करताना आपण स्वतः किती अचूकपणे लेखाची नस पकडू शकतो ह्यावरही काही किरकोळ बाबी अवलंबून असू शकतात.

हे खालचे वाक्य वाचले नाही की ते समजलेच नाही की अ‍ॅप्रिशिएटच झाले नाही?

>>>शिकूदेत सगळ्यांना, की कोणी कोणाला जन्मभर पुरत नसतो<<<

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

>>वाचन करताना आपण स्वतः किती अचूकपणे लेखाची नस पकडू शकतो ह्यावरही काही किरकोळ बाबी अवलंबून असू शकतात. >>

अगदी, अगदी. Happy

सोनिया गांधी यांना आयते अध्यक्षपद मिळालेय, त्यांच्यात पात्रताच नाही हे मला वैयक्तिक कधीच पटले नाही. <<<

सोनिया गांधींनी पक्षाची धुर सांभाळण्याआधी कोणते महत्कार्य केले होते त्याची कृपया यादी द्यावीत.

>>>एखादा राष्ट्रीय पक्ष, तो देखील काँग्रेससारखा सांभाळणे, सत्तेत राहणे, सर्वांना कंट्रोलमध्ये ठेवणे, हे कर्तव्यशून्य आणि प्रतिभाहिन माणसाला जमेल याची सुतराम शक्यता नाही.<<<

पुस्तकात शोभेलशी वाक्ये लिहिण्यात अर्थ नाही. हा लेख वाचला नसलात तर वाचा.

http://www.maayboli.com/node/49107

ज्याला तुम्ही राष्ट्रीय पक्ष, सत्तेत राहणे, कंट्रोल वगैरे म्हणत आहात ते सोनियाजींना निव्वळ 'गांधी' असल्यामुळेच जमलेले आहे. त्यांचे कर्तृत्व व प्रतिभा हीच की त्यांनी राजीव गांधींशी लग्न केले.

>>>फक्त गोर्‍या रंगाने वचकून सर्वांनी त्यांना मान दिला हे तर माझ्यामते पुर्णपणे गंडलेले लॉजिक आहे.<<<

हे तुमच्यामते गंडलेले लॉजिक आहे, हे बरे लिहिलेत.

>>>शिकूदेत सगळ्यांना, की कोणी कोणाला जन्मभर पुरत नसतो<<<

इतकेच महान विचार मांडायचे असते तर सरळ सक्रीय राजकारणातून निवृत्त व्हा, हरीहरी करत बसा, मुलाला कामधंदा लावून द्या असं काही लिहायचं होतं.
परत जा वगैरे कशाला?

बेफिकीर,

एकीकडे आपण म्हणत आहात की त्यांचे काय असे कर्तुत्व आहे..

दुसरी कडे आपण त्यांनाच म्हणत आहात शिकूदेत सगळ्यांना, की कोणी कोणाला जन्मभर पुरत नसतो.. थोडक्यात त्यांच्या आधारावर पक्ष आहे हे कबूल केल्यासारखे झाले..

नक्की काय म्हणायचे आहे ते ठरवा, तोपर्यंत मी चहा पिऊन येतो Happy

ऋन्मेष,

मी काय म्हणालो ते तुम्हाला समजावे अशी मी अजून तरी अपेक्षा ठेवत नाही.

साती,

विधवा हा विषय धाग्यावर तुम्ही आणला आहेत आणि वातकुक्कुट मी तुम्हाला म्हणालेलो नाही आहे.

(राजीवजींची विधवा म्हणून इटलीला का राहिला नाहीत ह्या प्रश्नाचा अर्थ वेगळा आहे, त्याची येथे सांगड घालण्याचा व्यायाम टाळावा)

असंबद्ध विषय धाग्यावर आणण्याचे कारण काय?

सक्रीय राजकारणात नसलेल्या आणि हरीहरी ऐवजी वढ्रावढ्रा करणार्‍या प्रियांकाला अनुयायी आक्रोशून बोलवत आहेत कालपासून! कालपासून काय, लोकसभेपासूनच चालू आहे हे! असेच राजीवजींना आणि सोनियाजींना बोलावलेले चांगले आठवते.

त्यामुळे सोनियाजी येथे निवृत्त होऊन हरीहरी करते म्हणाल्या तर तुमचेच नेते त्यांना परत पाठवतील. 'जो गांधी आम्हाला सत्तेत येऊन देत नाही तो काय कामाचा' असे म्हणत!

स्वतःच्या देशात राजीवजींची विधवा म्हणून राहिला असतात तर काय किंमत असती हो तुमची? रस्त्यावरून शेजारून गेला असतात तरी कोणाला समजले नसते.>>>

हे काय माझ्या कीबोर्डातून आलेले वाक्यं नाही.

बेफिकीर मी चहा पिऊन आलो आणि अपेक्षित घूमजाव दिसले.

असो, धाग्यावर येणे अगदीच काही फुकट गेले नाही, तेवढाच वरचा किबोर्डमधून आलेला विनोद वाचायला मिळाला Happy

अवांतर - आपले भाजपा नेत्यांना लिहिले जाणारे पत्र वाचण्यास उत्सुक Happy

हे वाचलं का साती?

>>>(राजीवजींची विधवा म्हणून इटलीला का राहिला नाहीत ह्या प्रश्नाचा अर्थ वेगळा आहे, त्याची येथे सांगड घालण्याचा व्यायाम टाळावा)<<<

अपेक्षित घूमजाव दिसले.<<<

तुम्हाला मुद्दाच समजलेला नाही तिथे घूमजाव बिमजाव कुठून दिसते कोण जाणे!

माझ्या मते रागांनी कॉग्रेस ला संपवून जे देशकार्य केले आहे ( अजाणता का होइना ) त्याबद्दल त्यांना भारतरत्नच द्यायला पाहीजे.
रागा पेक्षा थोडा बरा मुलगा असता सोगा ला ( किंवा प्रियांका एकटीच मुलगी असती ) तर भाजपला २०० सीट सुद्धा मिळाल्या नसत्या.
भाजपने रागाचे हे ऋण मानायलाच हवे. रागा नसता तर भाजप आत्ता सत्तेवर पण नसता.

त्यामुळे भाजपने रागा कॉग्रेस चा पुढच्या ५० वर्षा पर्यंत अध्यक्ष रहावा असा नवस बोलावा.

लेख वाचून एक घटना आठवली.एका कार्यक्रमाच्या वेळी पाच सवाष्णींना ओवाळायला बोलावले गेले. पुढे एक विधवा स्त्री उभी होती तिला मागे जाण्यास सांगितले गेले. कार्यक्रम काय होता ते आता लक्षात नाही पण त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचे खिन्न भाव त्यातला अपराधीपणा अजून आठवतोय जणू विधवा असणे हा तिचा गुन्हाच होता. आपल्या समाजात स्त्रियांचे त्यातही जर ती विधवा असेल तर तिचे जिणे हे अत्यंत खालच्या स्तराचे होते ह्या गोष्टीला शतकही उलटले नसेल.

आता आपण सुसंस्कृत(?) समाजात राहतो स्त्रियांना जो मान मिळतो तो स्वेच्छेने देण्यापेक्षा कायद्याच्या धाकाने दिला जातो. स्त्रियांनी, विधवेने आपल्या पायरीने राहायला हवे असे बऱ्याच पुराणमतवादी लोकांना वाटते. त्यातही एखाद्या विधवेने जरा नीटनेटके राहिले थोडाफार मेकअप केला तरी त्यावर शेरेबाजी करणारे महाभाग मी पाहिलेत. स्त्रियांनी आपली पायरी सोडू नये असे बऱ्याच जणांना वाटते त्यात एखादी स्त्री जर त्यातही पुढे जावू न एखाद्या क्षेत्रात नाव कमावत असेल तर पुराणमतवादी लोकांची अवस्था कशी होते हे समजून आले.

एखाद्या व्यक्तीला असलेला विरोध समजू शकतो तिच्या कार्यपद्धतीविषयी असलेला राग समजू शकतो परंतु देशाच्या माजी प्रधानमंत्र्याच्या पत्नीला नि मुलांना देशातून हाकलून देण्याची अथवा निघून जाण्याविषयी सांगणे हे निंदनीय आहे. अर्थात त्यामागे ह्याच देशाची पुरातन संस्कृती आहे.स्त्री द्वेषाचा वृक्ष छाटला गेलाय पण अजूनही काही बीजे शिल्लक आहेत

ऋन्मेऽऽष मुद्दा समजलाय .....राजीव गांधींच्या हत्येनंतर नरसिंहराव प्रधानमंत्री झाले त्यानंतर कॉंग्रेस पक्ष हा जवळपास संपल्यातच जमा होता. सीताराम केसरी कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले असा तो इतिहास होता.भाजपला सत्ता दृष्टीक्षेपात येवू लागली त्याच वेळी सोनिया गांधीनी राजकारण प्रवेश केला. भाजपा नि सत्ता ह्यामध्ये केवळ एकाच व्यक्ती उभी होती सोनिया गांधी.भाजपला जी सत्ता आज मिळतेय ती १४ वर्षापूर्वीच मिळाली असती परंतु सोनिया गांधींमुळे ते शक्य होवू शकले नाही.

ज्यांना न नेहरू पटले नि गांधी पटले त्यांना सोनिया गांधी मान्य होणे शक्यच नव्हते.जरी सोनिया गांधी भारतीय वंशाच्या असत्या तरी त्यांना विरोध झाल्याच असता कारण ह्यांच्या सत्तामार्गातील त्या अडथळा होत्या. आणि स्त्री पुरुष भेदाची किनारही आहेच इंदिरा गांधींना प्रधानमंत्री असताना केवळ त्या स्त्री आहेत म्हणून प्रवेश न देणारी आपली संस्कृती . म्हणूनच म्हंटले होते स्त्रीद्वेषाचा काळ संपला पण काही विषारी बीजे अजूनही आहेत..

सचिन पगारे,
माझ्या वाक्याचा गभितार्थ वेगळा होता Happy

असो,

सोनिया गांधींमुळे भाजपा सत्तेपासून दूर राहिला नाहीतर आधीच सत्ता मिळाली असती याच्याशी बरेपैकी सहमत. आणि म्हणूनच त्यांची एक राजकीय नेत्रुत्व म्हणून त्यांची कर्तबगारी नाकारता येत नाही.

असो,

वर बेफिकीर यांनी मला विचारलेले की त्यांनी काँग्रेस अध्यक्षपद भूषवायच्या आधी त्यांचे काय कार्य होते. खरे तर मग याचेच जास्त कौतुक वाटायला हवे नाही का, की अचानक अंगावर आलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. गांधी घराण्याची सून असणे हे फक्त त्यांना त्या जागी घेऊन गेले, पण तिथे जाऊन जे काही करायचे होते त्याला अंगभूत गुणच लागतात.

पण असोच !

Pages