सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळु दे...

Submitted by अतुल ठाकुर on 19 October, 2014 - 07:09

aatya.jpg

उंबरठा चित्रपटातील सुरेश भटांचे "गंजल्या ओठास माझ्या" हे गीत मला फार आवडते. हृदयनाथ मंगेशकरांचे सुरेल संगीत आणि रविंद्र साठेंचा भारदस्त आवाज. त्यातली "सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळु दे" या ओळीत तर समाजासाठी झिजणार्‍या सार्‍या व्यक्तींबद्दल भटसाहेब एका ओळीत सारंकाही सांगुन गेलेत. मात्र या ओळीचे मुर्त स्वरुप आत्यांच्या रुपात मुक्तांगणमध्ये भेटले आणि त्या ओळीचा अर्थ नव्याने कळुन आला. आत्या म्हणजे प्रफुल्ला मोहिते. अनिल अवचट यांच्या त्या भगिनी. मात्र त्यांना सारे मुक्तांगण आत्या म्हणुनच ओळखते. काही माणसांच्या आयुष्यात ऐन तारुण्यात पराकाष्ठेची दु:ख भोगण्याचा दुर्दैवी योग असतो. अपमान, तिरस्कार, भय, वेदना यांनी तारुण्याची, बहराची वर्षे कोळपुन जातात. आत्यांचे आयुष्यही असेच मुर्तिमंत वेदना बनुन गेले होते. असे दु:ख ज्यांच्या वाट्याला येते त्यातल्या काही माणसांचा मानसिक तोल ढळतो. काही आत्महत्या करुन दु:ख संपवताना दिसतात. जे जगतात त्यातले बहुतेक पालवी नसलेल्या वठलेल्या झाडाप्रमाणे मनात चीड साठवत दिवस ढकलतात. मात्र आत्यांनी अगदी वेगळा मार्ग स्विकारला. सहन केलेल्या अपार वेदना, त्यातुन आलेला अनुभव त्यांनी इतरांची दु:खे दुर करण्यासाठी वापरला. मुक्तांगणमध्ये व्यसनी रुग्णमित्रांच्या पत्नींचा सहचरी गट आहे. पतीकडुन व्यसनाच्या दरम्यान अपरिमित छळ सहन केलेल्या सार्‍या माऊली तेथे एकत्र येतात. आपल्या दु:खांना वाट करुन देतात. संशय, अमानुष मारझोड आणि कल्पनेपलिकडला छळ यांच्या नशीबी आलेला असतो. व्यसनी पतीमुळे सहन करावे लागणारे सारे भोग आत्यांनी सहन केलेले आहेत. त्यामुळे या स्त्रिया जेव्हा आत्यांकडे येतात तेव्हा त्यांना जाणवतं कि आपण सहन केलेल्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने या बाईने सहन केले आहे. आणि कदाचित त्यामुळेच त्या आत्यांसमोर मोकळ्या होतात. आत्या या सार्‍यांचा आधार झाल्या आहेत. दुसरीकडे व्यसनी रुग्णमित्रांसमोर जेव्हा आत्या उभ्या राहतात आणि आपले अनुभव सांगतात तेव्हा व्यसनादरम्यान त्याने केलेला आपल्या कुटुंबियांचा छळ त्याला दिसु लागतो. आणि तो अंतर्मुख होऊ लागतो. आत्यांनी आपल्या वेदनेला अशा तर्‍हेने वाट करुन दिली आहे. त्यांच्याशी बोलण्याआधी यातील काही गोष्टी माहित होत्या. मात्र अनिल अवचट यांच्या भगिनी या परिचयाचे दडपण मनावर होते. मात्र समोर बसल्यावर पाहिले कि त्या "आत्या"च आहेत. कुणीतरी अगदी जवळच्या नात्यातल्या असल्याप्रमाणे त्यांचं हसणं आणि मोकळं वागणं पाहुन ते सारं दडपण निघुन गेलं आणि आमचं बोलणं सुरु झालं.

"एकदा स्त्री रुग्ण आली असताना मुक्तांगणमध्ये बायकांसाठी सोय नव्हती. तिला दुसरीकडे पाठवण्यात आले." आत्या सांगु लागतात ,"स्त्रीपुरुष एकत्र एका ठिकाणी उपचार घेत असलेले पाहुन तिच्या पतीने आपल्या पत्नीस दाखल करण्यास नकार दिला. यातुन प्रेरणा घेऊन निशिगंध ची स्थापना झाली." मुक्तांगणमध्ये "निशिगंध" हा फक्त व्यसनी स्त्रीयांसाठी चालवला जाणारा विभाग आहे. या विभागाच्या उभारणीत आत्यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्याशी बोलताना अपरिहार्यपणे स्त्रियांमधील व्यसनाचा विषय निघाला आणि निशिगंधच्या अनुभवामुळे आत्या त्यावर भरभरुन बोलल्या. व्यसनाचा एक अगदीच वेगळा पैलु माझ्यासमोर त्यांनी उलगडला. "आईचा बॉयफ्रेंड घरी आल्यावर आई मुलिला पाचशेची नोट हातात ठेऊन बाहेर पाठवते आणि मुलगी ड्रगच्या व्यसनातच नव्हे तर ड्रग ट्रॅफिकींगमध्ये सापडते" आत्या निशिगंधमधली हकिकत सांगत असतात. थोरामोठ्यांच्या मुली व्यसनाने अक्षरशः गटारात पडुन अंत झालेल्या आत्यांना माहित आहेत. अतिशय हुशार, कलांमध्ये प्रविण अशा स्त्रीया व्यसनाने देहविक्रीच्या पातळीवर गेलेल्या त्यांना माहित आहेत. अशा हृदयाला घरे पाडणार्‍या असंख्य कथा आत्यांना माहित आहेत. त्यांनी या स्त्रीयांना पाहिले आहे, त्यांच्यावर उपचार केले आहेत. असे अनुभव गाठीशी असणार्‍या आत्या जेव्हा व्यसनाच्या कारणाबद्दल बोलु लागतात तेव्हा त्या पाश्चात्यांचे अंधानुकरण यावर बोट ठेवतात. मित्र मैत्रिणींमध्ये दारु न पिणारा किंवा न पिणारी म्हणुन हेटाळणी होऊ नये म्हणुन सुरुवात करणारे कित्येक जण आहेत. व्यसन हे प्रतिष्ठेचं लक्षण म्हणुन सुरुवात करणारेही आहेत. शिवाय व्यसनी आईबाप हे देखिल एक महत्त्वाचे कारण त्या मानतात. त्यांच्या अनुकरणाने मुले व्यसनी निपजु शकतात. मुलिंमध्ये १६ ते २० या वयाच्या दरम्यात व्यसनात पडण्याचे प्रमाण खुप असते. कुटूंबातली पडझड, मोडकळीला आलेली परिस्थिती हे एक कारण असतेच. मात्र या वयातील मुलांचे रोल मॉडेल, अभिनेते, अभिनेत्री या व्यसनी असु शकतात किंवा व्यसनाला उत्तेजन देणार्‍या जाहीराती करतात. त्यामुले देखिल या वयात व्यसनाचे अनुकरण घडु शकते. कारणे सांगताना आत्या स्वभावदोषाचा उल्लेख वारंवार करतात. "बिग आय" हा शब्द त्यांच्या बोलण्यात नेहेमी येतो. प्रचंड इगो हा व्यसनी व्यक्तींमध्ये आढळणारा महत्त्वाचा स्वभावदोष आहे असे त्या मानतात. आणि व्यसनसुटण्यामध्ये या दोषाचा अडथळा खुप येतो असेही त्यांचे मत आहे. व्यसन हे सर्वांचे सारखे असले तरी स्वभाव वैशिष्ट्यांमुळे स्त्रीपुरुषांमधल्या रिकव्हरीत फार फरक पडतो.

आत्या सांगतात कि आपल्याला व्यसन नाहीच. किंवा ज्या प्रमाणात घरचे सांगताहेत त्याप्रमाणात आपण व्यसन करीत नाहीच. आपला स्वतःवर ताबा आहे. आपण व्यसनात वाहवुन गेलेलो नाही अशा तर्‍हेचं डिनायल या स्त्रीपुरुष दोघा रुग्णमित्रांमध्ये असतं. पण पुरुष या डिनायलमधुन स्त्रीच्या तुलनेत लवकर बाहेर येतात. स्त्रीयांना वेळ लागतो. सत्य न स्विकारणं हे व्यसनी स्त्रीयांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसुन येतं. काही बाबतीतला अट्टाहास प्रचंड प्रमाणात आढळतो. निशिगंधमध्ये स्वतःची कामे स्वतःला करावी लागतात. उच्चभ्रु वर्गातल्या स्त्रीने लसुण सोलावा लागल्याने आपली नखे खराब झाल्याची तक्रार केल्याचे उदाहरण आत्यांनी दिले. त्यातुन व्यसनी स्त्रीयांमध्ये ज्याला मॅन्युप्युलेशन म्हणता येईल त्याचे प्रमाण फारच जास्त असते. समोरच्याला गुंडाळण्याची प्रवृत्ती फार. त्यासाठी मदतीला अश्रु असतात. स्वभावात निरनिराळे मुखवटे घालण्याचे प्रमाण तर खुपच. त्यामुळे स्त्रीची रिकव्हरी हे समुपदेशकासाठी आव्हान असते. डोळ्यात आलेले अश्रु खरे कि खोटे हे ओळखावं लागतं. व्यसनी स्त्रीया स्वत:शीच व्यसन नाकारुन खोटेपणा करीत असतात. हे डिनायल मोडुन काढणे हे फार कठीण काम निशिगंधच्या समुपदेशकांना करावे लागते. त्याला वेळ देखिल लागतो. व्यसनी स्त्री जर आई असेल तर तिच्या मातृत्वाला साद घालावी लागते. तिच्या व्यसनामुळे तिच्या मुलांवर होणारा परिणाम समोर उलगडुन दाखवावा लागतो. ही गोळी मात्र बरोबर लागते. या स्त्रीया व्यसनातुन लवकर बाहेर पडतात. मात्र अगदी तरुण, लग्न न झालेल्या मुलिंना व्यसनातुन बाहेर आणणे हे कर्मकठीण काम असते. त्या मुळात ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतात. त्यांना त्यांच्या भाषेत त्यांच्या पातळीवर जाऊन समजवावे लागते. अन्यथा आज्जीबाईंचा, बुढ्ढेपणामुळे केलेल्या उपदेशाचा आरोप त्या करु शकतात. आम्हाला आमचं आयुष्य आहे, ते आम्हाला हवं तसं जगण्याचा अधिकार आहे आणि आम्ही ते आम्हाला हवं तसंच जगणार हे आयुष्याचं मूलभूत तत्त्व मानणारी ही पिढी बहुधा मायेने सांगितलेली गोष्ट बुढ्ढ्या आजीबाईचा उपदेश म्हणुन उडवुन लावणार असते. मात्र अशांचीही विचारपद्धती हळुहळु बदलुन निशिगंधमध्ये त्यांच्या व्यसनावर उपचार केले जातात. नुसते व्यसन नाही तर झालेले चुकीचे संस्कार बदलणं हे देखिल आवश्यक असतं हे आत्या आवर्जुन नमुद करतात. मात्र या सार्‍या उपायांनी स्त्रीया एकदा योग्य मार्गावर आल्या कि पुरुषांपेक्षा त्यांची रिकव्हरी जास्त वेगाने होते हेही त्या सांगायला विसरत नाहीत.

क्वचित काही व्यसनीरुग्णमित्रांमध्ये सुईसायडल टेंडेंसी असते. मुक्तांगणमध्ये या बाबीचा कडेकोट बंदोबस्त केलेला आहे. कुठुन उडी मारता येईल अशी जागा ठेवलेली नाही. काही इजा करुन घेता येईल अशी वस्तु बाळगु देत नाहीत. ही आत्महत्येची प्रवृत्ती तुलनेने व्यसनी स्त्रीयांमध्ये जास्त आढळते. त्यामुळे आत्यांना आणि त्यांच्या सहकार्‍यांना निशिगंधमध्ये डोळ्यात तेल घालुन राहावं लागतं. दुपट्टे, रिबिनी, कुठल्याही तर्‍हेच्या दोर्‍या स्त्रीयांच्या हाती पडु नये याची दक्षता घ्यावी लागते. व्यसनी रुग्णमित्रांवर उपचार सुरु असतानाच कुटुंबाचे समुपदेशन आवश्यक असते. कारण व्यसन हा कुटुंबाचा आजार मानला गेला आहे. आत्या पती, पत्नीला, कुटुंबाच्या सदस्यांना समोरासमोर बसवतात. एकमेकांच्या अपेक्षा, ठळक मुद्दे त्या लक्षात घ्यायला सांगतात. या प्रसंगी आत्या क्षमेचे महत्त्व अपार आहे असे सांगतात. भुतकाळ उगाळण्यात अर्थ नसतो. कुणीतरी कुणावर तरी अन्याय केलेल्या असतो. अपरिमित त्रास झालेला असतो. विश्वास गमावलेला असतो. कडवटपणा आलेला असतो. अशावेळी मनःपूर्वक क्षमा करुन पुन्हा सुरुवात करण्याचा सल्ला आत्या देतात. व्यसन होण्यापूर्वीची व्यक्ती आठवण्यास सांगतात. तेव्हा तो किंवा ती चांगले होते. वाईट वागणुक व्यसनामुळे झाली. हे लक्षात घेऊन "व्यसन वाईट आहे. व्यक्ती वाईट नाही" हे आत्या कुटूंबियांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. कुटुंबाच्या मदतीची रुग्णमित्राला नेहेमी आवश्यकता असते. एकटेपणा टाळायला हवा. त्याने औदासिन्य किंवा न्युनगंड येऊ शकतो. व्यसनामुळे व्यक्ती जगाच्या मुख्य प्रवाहातुन दुर फेकली गेलेली असते. मुख्य प्रवाहात पुन्हा येण्यासाठी जगाच्या प्रमाणपत्राची जरी आवश्यकता नसली तरी व्यक्तीचा आत्मविश्वास हा त्याचे समाजाशी असलेले संबंध, कौटुंबिक सबंध, स्वबद्दलची प्रतिमा यावर अबलंबुन असतो. त्यामुळे एकटेपणा टाळुन समाजाच्या प्रवाहाशी एकरुप होणं आवश्यक असतं. एकटेपणाने राहुन हळुहळु खचत जाऊन संपलेल्या व्यक्ती या एका अर्थी आत्महत्याच करतात असे आत्या म्हणाल्या. हे ऐकुन मला आमच्या समाजशास्त्रातल्या प्रसिद्ध शास्त्रज्ञ इमाईल डुरकाईम आणि त्याच्या "सुइसाईड" पुस्तकाची आठवण झाली. एकटेपणामुळे आलेल्या मृत्युची वर्गवारी डुरकाईमने आत्महत्येच्या प्रकारात केली आहे. आत्यांनी फार महत्त्वाच्या गोष्टीला स्पर्श केला होता.

फॉलोअपचे महत्त्व तर आत्यांनी अतिशय सुरेख उलगडुन सांगितले. त्यांच्या गृहीणीच्या भाषेत त्यांनी सुरुवात केली. भाकरी करपु नये म्हणुन सतत फिरवावी लागते. फॉलोअप त्याप्रमाणेच आहे. एकदा शिकलेले नेहेमी लक्षात राहात नाही. आपण मुक्तांगणमध्ये जे काही शिकलो त्याची उजळणी आवश्यक असते. व्यसन हा कायमस्वरुपी आजार आहे. त्याचा उपचार आयुष्यभर करावा लागतो. त्यासाठी सावध असणं आवश्यक आहे. हा सावधपणा फॉलोअपला जाऊन माणसात येतो. व्यसन करण्याची तीव्र उबळ आली, त्या घंटा डोक्यात वाजु लागल्या की कशी कुठे मदत मागावी हे समजते. व्यसनाने सुरुवातीला आनंद दिलेला असतो. तो मेंदुत पक्का बसलेला असतो त्यामुळेच व्यसन पुन्हा पुन्हा करावेसे वाटते. आता सोबर राहिल्यावर जे छोटे छोटे आनंद मिळतात ते मेंदुला मुद्दाम सांगायचे असतात. ते मनात बिंबबायचे असतात ही फार महत्त्वाची गोष्ट आत्यांनी सांगितली. फॉलोअप हि एक प्रकारची ग्रुप थेरेपी आहे. तेथे येणे, एकमेकांना भेटणे महत्त्वाचे आहे. व्यसनादरम्यान नेहेमी व्यसनाची आठवण येईल अशा असोसिएशन्स निर्माण झालेल्या असतात. बार दिसतो. सुंदर हवा पडलेली असते. पावसाळा असतो. भारताने क्रिकेटची मॅच जिंकलेली असते किंवा हरलेली असते. सार्‍याने आठवण येते ती व्यसनाचीच. मात्र या असोसिएशन्स मोडुन चांगल्या असोसिएशन्स निर्माण करणे हे समुपदेशकाचे काम असते. आत्यांनी बोलता बोलता चांगल्या समुपदेशकाचे लक्षणच सांगुन टाकले. हे ऐकुन मला दोन रुग्णमित्रांची आठवण आली. पैकी एक ऑफीसमधुन येताना आपल्या निर्व्यसनी सहकार्‍याला दुचाकीवर मागे बसवुन घरापर्यंत लिफ्ट देतात. आणि दुसरे गणपतीचा फोटो गाडीत आणि ऑफीसमध्ये पटकन दिसेल अशा ठिकाणी ठेवतात. गणपतीचे दर्शन झाले कि आपण दारुची आठवण करायची नाही असे त्यांनी मनाला बजावले आहे. दोघांची सोबराईटी राखण्यासाठी अशातर्‍हेच्या असोसिएशन्सची खुप मदत झाली आहे.

मुक्तांगणमध्ये अनेक समुपदेशकांशी बोललो. समुपदेशन करताना काही वेळा त्रास होतो. "बर्न आउट" परिस्थिती होते. सतत समोरच्यांची दु:खं ऐकुन मनावर ताण येतो. तेव्हा काहीजण म्हणाले कि आम्ही मन मोकळं करण्यासाठी आत्यांकडे जातो. मला कुतुहल होतं असाच ताण आल्यावर आत्या कुणाकडे जात असतील. "मी बाबाकडे (अनिल अवचट यांच्याकडे)जाते." आत्या हसत हसत म्हणाल्या," मुद्दाम जाऊन काही विचारत, सांगत नाही. पण एक दिवस त्याच्याबरोबर राहिलं कि सारा ताण निघुन जातो. बाबाकडे पाहिलं कि उत्साह वाटतो. बाबाकडुन एकलव्याप्रमाणे शिकले आहे." शिवाय आत्यांवर डॉ. अनिता अवचटांचा प्रचंड प्रभाव आहे. काटकसर, साधेपणा, आपल्या आवाक्यात राहुन इतरांना मदत करणे हे त्या त्यांच्याकडुन शिकल्या. आज आत्या मुक्तांगणमध्ये निशिगंध आणि सहचरी साठी काम करतात. त्या प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहेत. शिवाय मुक्तांगणच्या समुपदेशिकादेखिल आहेत. तारुण्यात सहन कराव्या लागलेल्या छळाच्या खुणा शरिरावर आहेत. त्यामुळे उत्पन्न झालेल्या शारिरीक व्याधी सतत त्रास देत असतात. अर्धांगवायुपासुन ते हृदयातील अडथळ्यांपर्यंत सारं पचवुन आत्या उभ्या आहेत. आणि या परिस्थितदेखिल त्या काय करताहेत? तर त्या पुण्याच्या अशा वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये जातात जेथे दर काही अंतरावर दारु गाळली जाते. तेथे जाऊन आत्या सहचरी गट स्थापन करतात. तो व्यवस्थित चालेपर्यंत त्याची पाहणी करतात. आजदेखिल नवीन प्रोजेक्ट सुरु करण्याची उमेद त्यांच्याकडे आहे. इतकं सहन केलेल्या व्यक्तीत किती कडवटपणा साचला असेल असे वाटले होते. विचारले तर आत्या म्हणाल्या एक दिवस आला आणि ठरवुन मी अगदी मनापासुन सार्‍यांना माफ करुन टाकलं. ऐकुन मी थक्कच झालो. वाटलं करूणा म्हणजे यापेक्षा दुसरं काय असणार? त्यांच्या केबीनमध्ये बसुन त्यांच्याशी मी बोलत होतो. आत्यांचे व्यक्तीमत्व सुरेख आहे. आणि अतिशय अगत्याने बोलण्याची त्यांची पद्धत आहे. त्यांना भेटल्यावर त्यांच्या व्यक्तीमत्वाची छाप पडतेच. स्वतः झिजुन इतरांना सुगंध आणि शितलता देणार्‍या व्यक्तींना चंदनाची उपमा दिली जाते. स्वतः वेदना सहन करुन इतरांच्या आयुष्यात शितलता निर्माण करणार्‍या आत्या असेच चंदन बनुन गेल्या आहेत.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users