महाराष्ट्र राज्या पासून विदर्भ वेगळे राज्या होणे खरच गरजेचे आहे का ?

Submitted by जय@ on 13 October, 2014 - 06:33

महाराष्ट्र राज्या पासून विदर्भ वेगळे राज्या होणे खरच गरजेचे आहे का ? ह्याने विदर्भ वासियांचे प्रश्न सुटतील का ? महाराष्ट्रातील नाकर्ते राज्यकर्त्यान मुळे आजतागायत विदर्भाचा अपेक्षित विकास झाला नाही. अखंड महाराष्ट्र राहून हि विदर्भाच विकास होऊ शकेल ना ..... मात्र तोडून तुकडा करणे हा काही त्यावरील उपाय नाही.
विदर्भातील नेते मंडळी आपल्या राजकीय फायद्या साठी वेगळ्या विदर्भाची मागणी तर नाही ना करत ?
मायबोलीवर असंख्य विदर्भ वासी आहेत. आपणास काय वाटते ?
( चर्चा खेळी मेळीची व्हावी उगाच कुणी महाराष्ट्र X विदर्भ असा वाद घालू नये )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तुम्हीच केव्हापासून बोंबलताय मी तिथल्या अनेकांशी बोललोय...लोकांचा शू्न्य पाठिंबा आहे वगैरे....
>>म्हणलं तुमचा भोंगळपणा तुम्हालाच विचारावा किती आहे तो
मते पटत नसतील म्हणुन अशा भाषेत वाद घालणे योग्य आहे का ?

असो, मुळ विषयाबद्दल,

मुळात मराठी भाषिक एक राज्य करण्याऐवजी ३ वेगळी राज्ये केली जावीत ही कल्पना प्रथम बाबासाहेबांनी मांडली होती. त्यांचे मत होते की दक्षिण भारतीय भाषांची ४ राज्ये, उत्तरेकडे हिंदी भाषिक राज्ये असल्याने मराठी भाषिक एकाच राज्याचे वजन जास्त होणार नाही. हे असे करणे खरेच योग्य होते का हा प्रश्नच आहे.

मुळात भाषावार प्रांतरचना केली गेल्याने अनेक गंमतीदार निर्णय घेतले होते, त्यापैकी द्विभाषिक राज्य (महाराष्ट्र + गुजरात) बाकी नंतर लढे झाले, इ. इतिहास सर्वांना माहिती आहेच.

आता एकजुटीने राज्य करायचे सोडून तुकडे कसले पाडता ? की मराठी माणुस एक होऊ शकत नाही हे दाखविण्याची हौसच आहे ?

मते पटत नसतील म्हणुन अशा भाषेत वाद घालणे योग्य आहे का ?
<<
ऑब्जेक्शन, मिलॉर्ड!
भाषा आधी कुठून घसरली ते पाहिलंत का आपण?

-काळाकोट(इ)

वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडाच आहे, आणि केंद्रशासित मुंबई हा देखील डाव आहे हे आता लपून राहीले नाही.

तर ज्यांना महाराष्ट्राचे तुकडे होऊ नये असे मनापासून वाटत असेल त्यांनी भाजपाला मत द्यावे का?>>>>>>. ह्म भाजपला आता मत मिळाली नाहीत तर याच कारणासाठी मिळणार नाहीत....... स्वतःच्या पायावर धोन्डा कसा पाडून घ्यावा हे याच्याकडूनच शिकावे Lol

आता एकजुटीने राज्य करायचे सोडून तुकडे कसले पाडता ? की मराठी माणुस एक होऊ शकत नाही हे दाखविण्याची हौसच आहे ?

>> महेश.. खुपवेळा अनुमोदन.

शिवबाच्या आईने जिजाऊने वऱ्हाड महाराष्ट्र एक केला , जिजाऊचे जन्मस्थळ सिंधाखेडराजा बुलढाण्यामधील आणि शहाजी राजे भोसले वेरूळमधिल महाराष्ट्रीय . एकीकडे शिवाजीमहाराजांचा जय जयकार करायचा आणि इथे स्वतंत्र विदर्भ मागायचा, हा असा ढोंगीपणा

वडोदरामध्ये (बडोदा) मराठी भाषिक जास्त राहतात म्हणून उद्या दक्षिण गुजरात वेगळा करणार आहात का?

करा करा सगळ वेगळ करा.. शेवटी गाव आणि नंतर गावतल्या वाड्या .. छोटी छोटी राज्ये.. मग मज्जाच मज्जा..
<<आता एकजुटीने राज्य करायचे सोडून तुकडे कसले पाडता ? की मराठी माणुस एक होऊ शकत नाही हे दाखविण्याची हौसच आहे ?>> +१११११

आणि मराठी माणुस एक होऊ शकत नाही हे दाखविण्याची हौस झाली कि ह्या निवडनणुकीत पुर्ण...तोंडाजवळ आलेलं खायच ते.. माज केला कि.. आता तर मजा निकाला नंतर येनार आहे.. सगळाच निकाल लावनार महाराष्ट्रा चा..

मला एक कळत नाहीये हा मुद्दा एवढा भावनिक का केला जातोय....
मराठी माणूस एक होऊ शकत नाही म्हणजे काय....एकजूटीने राज्य म्हणजे काय...आत्तापर्यंत जे चालले आहे ते...त्याला तुम्ही एकजूट म्हणता???????
सगळे जण असे बोलताय की उद्या वेगळा विदर्भ झाला तर सीमेवर काटेरी तारांचे कुंपण घालून सैनिक पहारा करणार आहेत. प्रशासकिय सोय सोडली तर असे काय बदलणार आहे.
वेगळा विदर्भ झाला म्हणून पश्चिम महाराष्ट्रातले ताडोबा, नागझिराला पर्यटनाला जाणे बंद करणार आहेत का....त्यांची रेल्वे महाराष्ट्रात येणार नाही का...
गोवा वेगळे राज्य आहे. तिथेही कित्येक मराठी आहेत. पण म्हणून सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला त्याने फरक पडतो का. लोक जातातच ना. राष्ट्र वेगळे होणे ही संपूर्ण वेगळी संकल्पना आहे. राज्य वेगळे झाल्याने त्यांचे ते रस्ते, धरणे, नद्या बाजूला काढून घेणार आहेत का काय कैच्याकै.....
बर जे लोकं वेगळ्या विदर्भात जातील त्यांनाही प्रशासकिय त्रास काय होऊ शकतो. जे खेटे त्यांना मुंबईला मारावे लागतात ते नागपूरला मारावे लागतील. एवढाच काय तो फरक.
कर्नाटक किंवा गुजरातच्या बाबतीत फरक असा होता की भाषिक रचनेमुळे सर्व व्यवहार गुजराती किंवा कानडी मध्ये होत होता आणि त्याची सक्ती केली जात होती. इथे मराठी माणसावर मराठीची सक्ती होईल....त्यालाही हरकत आहे का...
महाराष्ट्राची अस्मिता करणाऱ्या सगळ्यांनाच हा प्रश्न आहे की गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ मधील किती गावे, त्यांची माहीती आहे. मला खात्री आहे यातल्या कुणीही तिथे जाणे तर सोडाच तिथल्या बातम्याही कधी वाचल्या नसतील. उगाच आपला महाराष्ट्र म्हणून मिरवणे वेगळे आणि प्रत्यक्षात तसे वागणेही....

.

पुन्हा मत मांडतो. विदर्भ वेगळा झाल्याने तो एक वेगळा देश बनणार नाही. कुणालाही महाराष्ट्र ते विदर्भ वा उलटा प्रवास बिनबोभाट करता येईल. व्हिसा, पासपोर्ट असे काही लागणार नाही. व्यापार, दळणवळण, देवाणघेवाण बिनबोभाट चालू राहील.

आमच्या जिजाऊ शिंदखेडच्या वगैरे टाळ्याखेचक डायलॉग मारून काही साध्य होत नाही. जिजाबाईंनी विदर्भ महाराष्ट्रात आणला वगैरे थोतांड आहे. तेव्हा असे प्रशासकीय संस्थान नव्हतेच. तसे शहाजी बंगलोरला रहायचे मग काय बंगलोरही महाराष्ट्रात आणायचे का? तंजावरमधे त्यांची बायका मुले होती मग काय तेही महाराष्ट्रात सामील करायचे का? उगाच शिवाजी महाराज व जिजाऊ आणून भावनेला हात घालायची गरज नाही. विदर्भ काही शिवरायांचा द्वेष करत नाही.

छोट्या राज्यांचा कारभार चांगला हाकला जातो. लोक आणि सरकार यातील अंतर कमी होते. महाराष्ट्रातील पश्चिम भाग सध्या सत्तेवर दादा बनून रहात आहे. त्यामुळे विदर्भाला दुर्लक्षित केला जात आहे. नव्या योजना, नवे प्रकल्प याकरता ह्या दादा लोकांचा सल्ला जास्त मनावर घेतला जातो. विदर्भाला आपला कारभार हाकायचे स्वातंत्र्य मिळाले तर वाईट काय आहे?

१९४७ पासून भारताच्या आजवरच्या इतिहासात मोठ्या राज्यांचे छोट्या राज्यात विभाजन होत आले आहे. उलटे, लहान राज्यांची मोठी राज्ये बनणे हे घडलेले नाही. आणि त्यामुळे कुठलाही उत्पात घडलेला नाही. तेलंगणाप्रकरणी थोडाफार झाला तरी तो आता थंडावला आहे. आणि त्याचे कारण राज्य वेगळे नको असे नसून हैद्राबाद कुणाकडे जाणार हे होते. विदर्भ वेगळा झाल्यानेही तसे होईल असे वाटत नाही.

नविन राज्य झाल्याने टॅक्सचे काय होईल ?
अनेक उद्योग असे आहेत की ज्यांचे काम पुर्ण महाराष्ट्रभर चालते,
त्यांना नवनविन ठिकाणी कर जोडावे लागतील.

या पट्ट्यात भाषिक अस्मितेचा जोर कमी राहील.

जमल्यास अजुनकाही मुद्दे लिहायचा प्रयत्न करीन,
अशा प्रोज कॉन्स वर चर्चा झाल्यास निदान वेगवेगळे मुद्दे तरी लक्षात येतील.

<नविन राज्य झाल्याने टॅक्सचे काय होईल ?
अनेक उद्योग असे आहेत की ज्यांचे काम पुर्ण महाराष्ट्रभर चालते,
त्यांना नवनविन ठिकाणी कर जोडावे लागतील.

या पट्ट्यात भाषिक अस्मितेचा जोर कमी राहील.>

कृपया सविस्तर लिहा.

विदर्भाला स्वतंत्र होण्याचा हक्क मिळाला पाहिजे. उर्वरित महाराष्ट्राला विदर्भा पासून मुक्ती मिळालीच पाहिजे.विलास मुत्तेमवार, गडकरी, फडनवीस यांचे मुमं पदाचे स्वप्न पुरे झालेच पाहिजे.

हूड, उगाच कोणाला मु.मं. बनायचे आहे म्हणुन राज्य वेगळे करायचे ? Uhoh
मुळात मला ही तोडातोडीची मानसिकताच पटत नाहीये कोणत्याच कारणासाठी.
वेगळा महाराष्ट्र ठीक होता, कारण तिथे मुळातच भाषावार प्रांतरचना हा मुद्दा होता.
आता अनेक वर्षे भाषिक प्रांत जसे केले आहेत तसे ते मेन्टेन करणे महत्वाचे.
केवळ एवढेच नव्हे तर जे अंतर्गत सिमावाद आहेत, तिथे स्वतंत्र मतदान घेऊन ते भाग योग्य त्या राज्यात विलिन करणे पण महत्वाचे आहे.

मयेकर : नविन राज्य निर्माण झाल्याने उद्योगांना नविन कर वाढणार नाहीत काय ? उदा. जर एखाद्याने माल महाराष्ट्रातुन विदर्भात पाठवला तर आयात कर, तिकडे विक्री करणार असाल तर वेगळा विक्रीकर, इ. कर वाढणार नाहीत का ?

<<छोट्या राज्यांचा कारभार चांगला हाकला जातो. लोक आणि सरकार यातील अंतर कमी होते. >>

गुजरात हे काही 'छोटं राज्य' म्ह्णता येणार नाही. तरीही तिथे तुकडे न पाडता मोदींनी व भाजपने केलाच ना इतकी वर्षं चांगला कारभार? तेच राजस्थान व म.प्र. मध्येही भाजप चांगला कारभार करते आहे असा त्यांचा दावा आहे. ही दोन्हीही मोठी राज्यं आहेत. त्यामुळे जर सक्षम सरकार असेल तर कारभार उत्तम होतो...लहान का मोठं राज्य हा प्रश्न नाहीये.

<<महाराष्ट्रातील पश्चिम भाग सध्या सत्तेवर दादा बनून रहात आहे. त्यामुळे विदर्भाला दुर्लक्षित केला जात आहे. नव्या योजना, नवे प्रकल्प याकरता ह्या दादा लोकांचा सल्ला जास्त मनावर घेतला जातो. विदर्भाला आपला कारभार हाकायचे स्वातंत्र्य मिळाले तर वाईट काय आहे?>>

विदर्भाचे तीन मुख्यमंत्री होऊन गेले असं इथेच वाचलं. त्यांनी का नाही केला विदर्भाचा विकास? भाजप १९९५-९९ सत्तेत होतं. तेव्हा का नाही केला विकास? आणि आता जर गडकरी/फडणवीस/खडसे असा भाजपचा प्रो-विदर्भ मुख्यमंत्री झाला तर तो पूर्ण राज्याचा विकास (विदर्भाला न्याय देऊन) करु शकेलच की. त्यासाठी वेगळा विदर्भ कशाला?

विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरुन काढण्याचे अनेक मार्ग आहेत. तोडायची गरजच नाहीये.
वेगळा विदर्भ केवळ मराठी समाजाची ताकद कमी करण्यासाठी, मराठी समाजात फूट पाडण्यासाठीच मागितला जातोय. त्यात विदर्भातील अमराठी जनतेचा फक्त फायदा आहे. विदर्भ वेगळा केल्यास तिथली राज्यभाषा हिंदी असणार आहे.
विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठी गळा काढणार्‍यांनी लक्षात ठेवा की त्यांच्यावर ही वेळ पठाणी व्याज लावणार्‍या सावकारांमुळे येते जे बनिया/मारवाडी/गुजराती/हिंदी भाषिक आहेत. हीच मंडळी वेगळा विदर्भ, तिथे हिंदीसाठी मराठीशी समान स्टेटस मागत आहेत आणि हेच भाजप चालवत आहेत.

<एक सुधाकरराव नाईक सोडले तर अजुन २ कोण होते विदर्भातले ???> हे माहीत नसणं हाही विदर्भावर घोर अन्याय आहे.

वसंतराव नाईक. चांगले बारा वर्षे मुख्यमंत्री होते. (शिवसेनेच्या वाढीस यांचा हातभार होता. शिवसेनेला वसंतसेना म्हणत)
महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार हेही विदर्भातलेच.

मध्य प्रदेशचे विभाजन होऊन छत्तीसगढ हे वेगळे राज्य झाले.
उत्तरप्रदेशातून उत्तरांचल वेगळे काढले तरी त्याचे आणखीही विभाजन करण्याच्या योजना पुढे येताहेत. मायावतींना तर सहाने भाग द्यायचा होता.

राजस्तानचे लोकसंख्या ७ कोटी आहे महाराष्ट्राची ११ कोटी .त्यातली मुम्बै चीच १ कोतीहून वर. मग राजस्तान छोटे कसे? आणि राजस्तानमधला वालुकामय भाग २ जिल्ह्यांचा वगळता इरिगेटेड आहे...

<<राजस्तान हे मोठे राज्य आहे हे ऐकुन हसु अले.

एरिया जास्त आहे. पण निम्मा भाग वालुकामय अहे.

लोकसंख्या अगदी कमी आहे>>

एरिया जास्त आहेच शिवाय लोकसंख्येने देशातील टॉप टेन राज्यांपैकी एक आहे. 'अगदी कमी' वगैरे नाही Happy

मराठी माणुस म्हणजे काय प्रकार आहे. मराठी बोलणारा सगळा समाज काय एकसंध आहे का?

त्यांचा इतिहास, चालीरीती, संस्कृती, विचार पद्धती थोडीतरी सारखी आहे का?
उगाच काय मराठी मराठी चाललय?

इथे ब्रिगेडी लोकांपासुन ब्राह्मणांना सुटका हवी आहे.
ओबीसींना मराठ्यांपासुन सुटका हवी आहे.

विदर्भ वेगळा झाला तरी... विकासाच्या दुष्टिकोनातुन फार काही फरक पडणार नाही.

>> पाण्याचा प्रश्न निकाली काढायला... विदर्भातला खुप मोठा भाग हा सपाट आहे... तेव्हा तिथे धरण बांधुन पाण्याच्या प्रश्न सोडवायला जागा नाही... तसेच नविन धरणांना स्थानिक लोकांचा खुप विरोध होतो.

>> प्रत्येक ठिकाणि ज्या M.I.D.C. आहेत... त्यात सहसा शेतीवर आधारीत कारखाने आहेत... तेहि खुप मोठा प्रमाणात रोजगार देऊ शकत नाहीत कारण... या भागात जरी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी... त्यापासुन कापड बनविणे... हे काम गुजरात मधे केले जाते... कारण कापड बनवायला दमट हवामान लागते...ते समुद्रकिनारीच असते... म्हणुन आधी सुतगिरण्या मुंबईत होत्या.

>> हे नेहमी लक्षात घ्या की या भागातले शेतकरीच... आत्महत्या करतात... शेतमजुर करत नाहीत... ह्याचे मुख्य कारण शेतीच्या उत्पादनासाठी लागणारे बियाणे.. खते.. किटकनाशके.. याच्या किंमत खुप वाढलेल्या आहेत... यावर कोणाचेही नियंत्रण नाही... तसेच आताचे तरुण शेती करायला तयार नाहीत कारण... आताच्या समाजव्यवस्थेत शेतकर्‍याला मानाचे स्थान नाही... म्हणुन १० एक्कर शेती सोडुन ते ५ हजाराची नोकरी सहज तयार होतात.

>> तसेच भांडारा, गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ हे जिल्हे अजुनही जंगलानी व्यापलेले आहेत... या भागात मोठी लोकसंख्या राहत नाही, फार तुरळक वस्ती आहे...या भागात विकासाची कोणती धोरणे राबवीणार.

>> आजही या भागात हिंदी बोलनार्‍या लोकांचे प्रमाण मोठे आहे... हा भाग जर वेगळा झाला तर फार दिवस हे मराठी भाषिक राज्य राहणार नाही.

... तेव्हा आपण सगळे एकत्रच राहु!

इथे लिहिण्यार्यांपैकी कितीजण विदर्भातील आहेत? तिथे सामान्य माणसाला वेगळा विदर्भ नकोच आहे, हे सगळे तिथले सावकार ( जे अमराठी आहेत) त्यांनी मराठी म्हणवणाऱ्या नेत्यांना हाताशी धरून वेगळ्या विदर्भाची टुम काढली आहे. बाकी काही नाही . जेव्हा शेतकरी आत्महत्या करत होते तेव्हा कुठे होते हे सावकारी नेते? शेतकऱ्यानी कर्ज ह्या अश्याच रक्तपिपासूकडून घेतली होती , महत्वाच्या गोष्टी झाकल्या जात आहेत .

गेल्यावर्षी केंद्रशासनाने रघुराम राजन यांच्या अध्य्क्षतेखाली एक समिती नेमली होती. कोणती राज्ये तुलनात्मकदृष्त्या अधिक मागास असून त्यांना तुलनेने अधिक केंद्रीय मदत देण्यात यावी याचा अभ्यास या समितीने केला. विदर्भ खरंच मागास असेल तर वेगळे राज्य झाल्यास त्याला अधिक केंद्रीय मदत मिळू शकेल. (नव्या केंद्रसरकारात जुने रिपोर्ट्स केराच्या टोपलीत गेले असतीलही, पयोजना आयोगासोबत).

http://www.finmin.nic.in/press_room/2013/Report_CompDevState_press.pdf
विदर्भ, मराठवाडा यांचा बॅकलॉग लक्षात घेऊनही महाराष्ट्र तुलनेत विकसित राज्य ठरले आहे.
हरयाणाही विकसित राज्य आहे.

गुजरात?............................कमी विकसित.

तिथे सामान्य माणसाला वेगळा विदर्भ नकोच आहे, <<< शंभर टक्के अनुमोदन!

सामान्य माणसाला अजिबात वेगळा विदर्भ नको आहे. खरे तर सामान्य माणसाला काय हवे असायला हवे हे त्या बिचार्‍याला ह्याच नेत्यांकडून पढवण्यात येत आहे.

चंद्रपूरला बैठक ठेवली तर मुंबईहून विमानाने नागपूर आणि नागपूरहून कारने चंद्रपूर असा प्रवास करून बैठक आटोपून आमदार त्याच दिवशी तसाच उलट प्रवास करून मुंबईत येतात. का तर तिकडे राहण्यात स्वारस्य नसते. अरे पण ते आमदार चंद्रपूरात राहिल्याने काय मोठे प्रेम व्यक्त होणार आहे की चंद्रपूरची फारच प्रगती होणार आहे?

एखाद्या प्रदेशाची प्रगती होण्यासाठी निव्वळ प्रशासनाशिवाय इतर अनेक घटकांची आवश्यकता असते.

स्वतंत्र भारतात सर्वत्र समान विकास व्हावा ह्या न्याय्य प्रयत्नांना यश न येऊन काहीच राज्यांचा विकास का झाला ह्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर बहुधा असे जाणवेल की मनुष्यबळाची गुणवत्ता, नैसर्गीक साधनसंपत्ती, दळणवळणाची साधने, स्वच्छ प्रशासन व व्यावसायिक तत्वांवर आधारीत मोबदला हे पाच घटक इन्स्ट्रुमेंटल ठरतात.

विदर्भामध्ये नैसर्गीक साधनसंपत्ती ही खनिज स्वरुपात प्रचंड आहे. दळणवळण व संपूर्ण भारताशी कनेक्शन ह्या निकषावर नागपूर एक नंबर ठरेल. (झिरोएथ माईलही नागपूरमध्येच आहे). मात्र तेथील मनुष्यबळ हे प्रामाणिक, मेहनती, निष्ठावान नाही. ते उद्दाम, कामटाळू व उन्मादात वावरणारे आहे. प्रशासन बोंबललेले आहे. समजा बुटीबोरीमध्ये उत्तम चालू असलेल्या काही कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांना अधिक विकास करता यावा म्हणून तेथील सुविधा, रस्ते, कर (जसे जकात वगैरे) ह्यावर व्यावसायिक विचार करण्याऐवजी तेथे सगळ्यांना एकच निकष लागू होतो. (हे भारतात सर्वत्रच आहे, आता मोदी सरकारमध्ये काही बदल झाले तर होतील बहुधा! नुकतेच असे ऐकण्यात आले की परदेशी बनावटीच्या वस्तू विकत घेणारा द्यावा लागणारा विक्रीकर मोदी सरकारने वाढवून घेतलेला आहे, स्वदेशी बनावटीच्या वस्तूंच्या व्यापाराला बरे दिवस यावेत म्हणून).

अश्या अवस्थेत वेगळ्या विदर्भाची मागणी ही मुंबई पुण्याच्या महाराष्ट्रावर असलेल्या नियंत्रणाच्या मत्सरातून व पैसे खाण्याची संधी मिळत नसण्यातून आलेली आहे हे समजायला फार बुके शिकायची गरज नसावी.

गुजराथ हा अपवाद असेल त्याने नियम सिद्ध होत नाही. आकाराने छोटे असणारे राज्य प्रशासनाकरता सोयीचे असते हे धडधडीत सत्य आहे. विदर्भाचे निर्णय नागपूरात होत असतील आणि मुंबईला खेटे मारायला लागत नसतील तर ते सामान्य माणसाकरता सोयीचे असणार.
तीन मुख्यमंत्री विदर्भवासी होते पण ते विकास करू शकले नाहीत कारण त्यांच्यावर उरलेल्या महाराष्ट्राचा दबाव होता. काँग्रेसी राज्यात मुख्यमंत्री किती स्वावलंबी असतात ते पुन्हा पुन्हा दिसलेले आहे. पण तो एक वेगळा मुद्दा आहे. जर विदर्भ राज्यात सत्ता हवी असेल तर विदर्भाकरताच काम करावे लागले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र आपल्या खिशात आहे ना मग तो विदर्भ गेला खड्ड्यात अशी भूमिका स्वतंत्र विदर्भात घेता येणार नाही.
विदर्भ वेगळा केल्यास त्याची भाषा मराठी नसेल. हे कुणी ठरवले? विदर्भाचे लोक काय ते निर्णय घेतील. माझ्या मते तिथे पुरेसे मराठी लोक आहेत आणि ते योग्य तो आवाज उठवतील. तशात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषा त्या राज्यात अधिकृत झाल्या तर काय मोठा पहाड कोसळणार आहे? मराठी अस्मितेच्या रिकामटेकड्या गप्पा फार झाल्या. लोकांची सोय बघणे आवश्यक आहे. विदर्भ वेगळा झाल्याने मराठी देशोधडीला लागेल असे मला आजिबात वाटत नाही. हा निव्वळ एक बागुलबुवा उभा केला जात आहे.
मला एक कळत नाही, जर विदर्भात हिंदी बोलणार्‍यांचे प्रमाण मोठे असेल तर त्यांच्यावर मराठी का लादायची?

विदर्भातील तमाम लोक आळशी आहेत वगैरे वरती केलेले दावे कितपत खरे आहेत ते माहित नाही. पण जर शिरावर जबाबदारी पडली तर लोक हा आळस झटकतील ह्यात मला तरी शंका नाही.
विदर्भ वेगळा झाल्याने एखादी जादूची कांडी फिरावी तद्वत सगळीकडे आनंदीआनंद होईल असे नाही. पण पुन्हा एकदा, जर विदर्भाच्या लोकांना वेगळे राज्य हवे असेल तर ते देण्यात फालतू कारणे देऊन आडकाठी करणे माझ्या मते अनाकलनीय आहे.

>>>तीन मुख्यमंत्री विदर्भवासी होते पण ते विकास करू शकले नाहीत कारण त्यांच्यावर उरलेल्या महाराष्ट्राचा दबाव होता.<<<

ही भूमिकाच माझ्यामते गैर आहे. एका विशिष्ट भूप्रदेशाचा नेता झालेल्या मनुष्याने आधी तो जेथून आला आहे त्या भागाच्या विकासाला प्राधान्य द्यायला हवे ही अपेक्षाच गैर आहे. त्याच्यावर जबाबदारी आहे संपूर्ण भूप्रदेशाचा सर्वांगीण व समान विकास घडवण्याची! त्यामुळे विदर्भाचे किती मुख्यमंत्री झाले, त्यांनी काय केले, ते का काही करू शकले नाहीत हे अ‍ॅनॅलिसिस मुळातच गफलतीच्या गृहीतकावर आधारीत वाटते.

असे कधी झाले आहे का की सत्तेत असलेल्या पक्षाचे पुरेसे आमदार विदर्भात कधीच नव्हते? ते आमदार काय करत होते? की विलासराव मुख्यमंत्री असताना फक्त लातूरवासीयांचेच प्रश्न सोडवले गेले?

विदर्भामध्ये नैसर्गीक साधनसंपत्ती ही खनिज स्वरुपात प्रचंड आहे. दळणवळण व संपूर्ण भारताशी कनेक्शन ह्या निकषावर नागपूर एक नंबर ठरेल. (झिरोएथ माईलही नागपूरमध्येच आहे). मात्र तेथील मनुष्यबळ हे प्रामाणिक, मेहनती, निष्ठावान नाही. ते उद्दाम, कामटाळू व उन्मादात वावरणारे आहे. >>>>>

विकास होण्यासाठी साधनसामुग्री लागते वगैरे ही बकवास आहे. लोक चांगले पाहीजेत. आफ्रिकेत इतकी खनिज संपत्ती आहे, काही उपयोग आहे का?
अत्यंत थंड प्रदेशातील नोर्वे, फिनलंड वगैरे देशांना ३-४ शतका पूर्वी प्रगती करुन घेतली.
इस्त्रायल चे उदाहरण देणार होतो पण काही सेक्युलर ढोंग्यांना आवडणार नाही.

>>>विकास होण्यासाठी साधनसामुग्री लागते वगैरे ही बकवास आहे. <<<

राजस्थानच्या वाळवंटात विकास न होण्याचे कारण हेच आहे.

जाऊंद्या फार वाद होतोय...
सर्वात उत्तम म्हणजे आर्यंलडच्या धर्तीवर सार्वमत घ्या....
इथल्या काही जणांचे म्हणणे आहे की बहुसंख्य लोकांचा वेगळ्या विदर्भाला विरोध आहे.
मग होऊनच जाऊ द्या ...दूध का दूध पानी का पानी
जर खरेच तसा विरोध दिसला तर मग राहील अखंड महाराष्ट्र...हाकानाका..
बहुसंख्य लोकांचा विरोध डावलून कोणी जर म्हणला की तरीही वेगळा विदर्भ झालाच पाहिजे त्याला मग तिथले लोकच बघून घेतील.

ओके माझ्या जीकेची येथे हार आहे हे मान्य करतो.
वसंतराव नाईक वाशिमचे आहेत हा मुद्दा सुटला होता. Sad

आणि असे जर असेल तर हे अतीच होते आहे,

बेफि : तुमच्या मुद्द्याशी असहमती ! नेता ज्या भागातला असतो त्या भागाचा विकास करण्याला तो प्राधान्य देतो, नव्हे त्याने ते का देऊ नये ? म्हणुनच तर प्रत्येकाला आपापला मतदारसंघ असतो.
विदर्भात जर एवढे जिल्हे आहेत, एवढे आमदार आहेत, आणि ३ मुख्यमंत्री होऊन गेले (त्यातले व.नाईक तर तब्ब्ल १२ वर्षे मु.मं. होते) म्हणजे तिकडच्या आमदारांना त्यांची कामे करून घेणे अजुनच सोपे होते.
मग असे असताना देखील का विकास होऊ शकला नाही ? Uhoh

राजस्थानच्या वाळवंटात विकास न होण्याचे कारण हेच आहे.>>>>>>

@बेफी -

राजस्थानचा मेवाड भाग चांगलाच संमृद्ध आहे. वाळवंटी भाग मोठा असला तरी तिथे लोकवस्ती कमी आहे.

मुंबई आणि पुणे वगळले तर महाराष्ट्र सर्व आर्थीक पॅरॅमिटर मधे मेवाड पेक्षा बराच मागे आहे.

तसेच मी वर म्हणलो तसे. कायम बर्फ असलेले, आकारानी छोटे असलेले, कसलीच साधनसंप्पत्ती नसलेले अनेक देश फार प्रगती करुन बसले आहेत.

आणि आफ्रीकेच्या कित्येक देशात प्रचंड साधनसंपत्ती असुन ते विदर्भा पेक्षा मागासलेले आहेत.

ही दोन्ही उदाहरणे तुमचे जे हायपोथिसीस आहे ते चुकीचे ठरवते .

त्या त्या देशातली लोक आणि त्यांची गुणवत्ता हा मुख्य प्रॉब्लेम आहे/उत्तर आहे.

आशु तुला स्कॉटलँड म्हणायच का? आर्यलँड आणि युनायटेड किंगडम मधला नॉर्दन आर्यलंड हा वादाचा विषय आहेच पण त्याच कारण वेगळ आहे (कॅथेलीक विरुद्ध प्रोटेस्टंट).

या भागात जरी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी... त्यापासुन कापड बनविणे... हे काम गुजरात मधे केले जाते... कारण कापड बनवायला दमट हवामान लागते...ते समुद्रकिनारीच असते... म्हणुन आधी सुतगिरण्या मुंबईत होत्या >> हे कारण आता इतिहासजमा झालेले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कुठल्याही भौगोलिक भागातील कापडगिरणीत पाहिजे तसे हवामान निर्माण करणं शक्य आहे. त्याशिवाय इचलकरंजी महाराष्ट्राचे मॅंचेस्टर बनले नसते. Happy

मनीष... मी विदर्भातलाच आहे... या भागात उन्हाळ्यात तापमान एवढे जास्त असते की...त्या दोन्-तिन महिन्यात दुपारी १२ - ४ यावेळेत कोणीच सहसा घरा बाहेर पडत नाही... तसेच या भागात तयार झालेल्या कापसाच्या गाठी ह्या... मध्यप्रदेश, गुजरात, तसेच चिनला जातात... इचलकरंजीत माझ्या माहीती नुसार चादरी बनवितात... कापड नाही.

जर विदर्भात कापसावर प्रक्रिया करुन कापड बनवणे शक्य नसेल तर राजकीय इच्छाशक्ती वापरून कापसाला जास्त आणि उचित किंमत मिळवून देणे हे तर शक्य आहे? जर राजकारण्यांवर थेट दबाव असेल तर तसे होणे शक्य आहे.

राज्य हे भाषिकच असले पाहिजे ही एक कालबाह्य संकल्पना होत चालली आहे. नाहीतर आंध्र आणि तेलंगणा वेगळे झाले नसते.

अमुक भाषेचा विकास व्हायला त्या अमुक भाषेवर आधारित शक्य तितके प्रचंड राज्य आवश्यक आहे हे अजब तर्कशास्त्र आहे. ह्याला काही आधार नाही.

आज विदर्भात उन्हाळ्यात दुपारी लोक घराबाहेर पडत नाही म्हणून त्यात बदल संभवत नाही हे पटत नाही. इच्छाशक्ती असेल तर वीज, झाडे, पाणी, सूर्यप्रकाश ह्यांचा वापर करून लोकांना काम करता येईल अशा अनेक इमारती बनवून त्यात व्यवसाय, धंदे चालू राहतील असे बघता येईल.
सगळे राज्यकर्ते जर विदर्भ केंद्रस्थानी ठेवून आपल्या योजना बनवत असतील तर हे जास्त संभवनीय आहे नाही का? स्वतंत्र विदर्भात ते होईलच. महाराष्ट्रात हे झाल्याचे आजवर तरी दिसत नाही.

आता जरा आवराच .
काही झाल की प. महाराष्ट्रान केल .
काय मिळालय प. महाराष्ट्राला ?
वर लिहिल्याप्रमाणे फक्त सधन कोल्हापूरला धरून सगळे बोलतायत .
जत , आटपाडीला १२ महिने टँकर चालतात पिण्याच्या पाण्यासाठी .
जवळ जवळ सगळी तरूणाई सैन्यात नाही तर दक्षिणेकडे सोन्या चांदीच्या दुकानावर कामाला आहे .

तुम्हाला कसल राज्य करायच ते करा , पण सगळ यानाच मिळतय पण आम्हाला काही नाही हे बंद करा.

महाराष्ट्रासाठी वि.म.दांडेकर समितीने तालुका हा युनिट धरून विविध क्षेत्रातील अनुशेषाची निश्चिती केली आहे. त्यात विकासातील मागास असे बरेच तालुके प. महाराष्ट्रातीलही आहेत...

स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे. उर्वरित महाराष्ट्राला विदर्भापासून मुक्ती मिळालीच पाहिजे. !

मला वाटत रॉबीनहूड ह्यांना विदर्भाचा काहीतरी त्रास आहे. उर्वरीत महा. विदर्भापासून मुक्ती मागत आहेत. नक्की काय केले असे विदर्भानी?

विदर्भात उन खूप असते हे खरे आहे पण म्हणून उन्हाळ्यात लोक घरी बसतात हे चुक आहे. ज्यांच्या नोकर्‍या आहेत ते नोकरीला जातातच. उलट लग्नामुळे आणि उन्हाळ्याच्या सुट्यामुळे खूप गर्दी असते बाजारात. खरे तर विदर्भात उन्हाळाच जास्त एनजॉय करतात लोक.

अरे बेळगाव विसरले होते, ते पण हवे अख्ख्या महाराष्ट्रात

गंगेत घोड न्हायल एकदाचं या राजकारण्यांच. बघुया निकाल आपला ( जनतेचा) लागतो का त्यांचा.

उलट लग्नामुळे आणि उन्हाळ्याच्या सुट्यामुळे खूप गर्दी असते बाजारात. खरे तर विदर्भात उन्हाळाच जास्त एनजॉय करतात लोक.
>>>>>>
मी मुंबईचा आहे, पण माझा विदर्भाचा अनुभव वेगळा आहे. दुपारचे उन्ह कडक म्हणाल तर असले की शंभर पावलांवर चक्कर येईल. त्यात पण डोक्याला पांढरे फडके गुंडाळून चाला अन्यथा ५० पावलांवर चक्कर. घर असो कार्यालय, कूलर हा हवाच. आणि त्याचे तोंडही आपल्याकडे. घर वा कार्यालय सोडून रस्त्यावर पडायची हिंमतही नाही व्हायची .. कदाचित तेथील लोकांना सवयीचे असावे, पण बाहेरचे लोक तिथे अ‍ॅडजस्ट होणे कठीण..

Pages