कैलास मानससरोवर यात्रा: भाग ३ - सिरखा ते गुंजी

Submitted by Adm on 30 September, 2014 - 00:02

भाग पहिला : http://www.maayboli.com/node/50335
भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/50832
--------------------------------------------------------------

दिवस ४ : सिरखा ते गाला. अंतर: १५ किमी. मुक्कामी उंची: ७६८० फूट / २३४० मिटर.

सिरखाहून निघाल्यावर रस्ता अगदी ढगांमधून जाणारा होता! पहिल्या उतरंडीनंतरच्या गावात घोडेवाला मिळणार होता. त्या गावापर्यंतचं चालणं अगदी छान रमत गमत झालं. मला घोडेवाल्याचं जे नाव सांगितलं होतं, तो माणूस तिथे नव्हताच मग कमानच्या ओळखीचा अभिलाष नावाचा दुसरा घोडेवाला तयार झाला. कमानने बॅग घोड्यावार बांधली आणि म्हणाला आपण पुढे जाऊया, घोडा येईल मागून. तिथे त्याने झर्‍याचं पाणी बाटलीत भरून घेतलं. रस्त्यात गावातली मुलं आजुबाजूला थांबलेली दिसली. त्यांना यात्रींकडून गोळ्या चॉकलेटांची अपेक्षा असते. आम्हांला ते आधीच माहित असल्यान गोळ्यांची पाकिटं वरच ठेवली होती. ही लहान मुलंही यात्री दिसल्यावर हात जोडून 'ॐ नमः शिवाय' म्हणतात.

थोड्यावेळाने चढण सुरु झाली. सिंहगडावर अगदी वर पोचत आल्यावर एक दगडांची चढण लागते. साधारण तितपत म्हणजे ५० ते ६० डिगरीच्या कोनात चढाई होती. इथे सगळ्यांचा दम निघायला लागला. रस्ता सरळसोट नव्हता, झिग-झॅग होता. त्यामुळे कष्ट थोडे कमी झाले पण एकूण अंतर मात्र वाढलं. आमच्या प्रवासातली ही पहिलीच मोठी चढण आणि ती फार सुंदर होती. सगळीकडे हिरवंगार, दाट जंगल, पक्ष्यांची किलबिल, अधेमधे दिसणारे झरे. दम लागला आणि थांबून आजुबाजूला बघितलं की थकवा निघून जायचा. अर्ध्यापेक्षा थोडं जास्त अंतर चढून गेल्यावर एका झोपडीत नाश्त्याची सोय केली होती. गेल्यागेल्या तिथल्या मुलांनी कोमट पाणी प्यायला दिलं. सकाळच्या थंडीत ते अगदी बरं वाटलं. उसळ, रोट्या आणि पुदिन्याची अतिशय चविष्ट चटणी होती. इथे आसपास खूप पुदिना उगवतो. त्यामुळे अगदी ताज्या पुदिन्याची वाटलेली चटणी होती. अशी चटणी नंतरही बर्‍याच ठिकाणी मिळाली. आम्ही निघता निघता अभिलाष घोड्यासकट येऊन पोचला. घोडा चरत होता, त्यामुळे आम्ही पुन्हा त्याच्यासाठी न थांबता पुढे निघालो.

उरलेलं चढण संपता संपता घंटेचे आवाज ऐकू यायला लागले. कमान म्हणाला, वर देऊळ आहे. वर पोहोचलेली मंडळी दर्शन घेऊन घंटा वाजवत असतील. खरतर घंटा खूप मोठी नव्हती पण आसपासच्या डोंगरांमुळे आवाज घुमत होता. सकाळी सकाळी तो घंटेचा आवाज खूप प्रसन्न वाटत होता. ह्या टॉपचं नाव रिंगलिंग टॉप. रिंगलिंग नावाचा चिनी हेर भारताच्या हद्दीत शिरला पण आपल्या जवानांना त्याची खबर लागल्याने ते त्याच्या मागे लागले. आम्ही ज्या मार्गाने चढून आलो त्या मार्गाने तो वर चढून ह्या डोंगरमाथ्यावर येऊन पोचला. पण इथून चिनी हद्द खूप लांब असल्याचं लक्षात आल्यावर त्याने इथे गोळी झाडून आत्महत्या केली. त्यामुळे ह्या माथ्याला रिंगलींग टॉप म्हणतात.
अगदी सुरुवातीला माझा घोडेवाला न सापडल्याने मी जरा मागे पडलो होतो. पण ह्या टॉपपर्यंत पोहोचेपर्यंत केदार, श्याम, भीम वगैरे मंडळी भेटली. केदारच्या घोड्याला तीन चार महिन्यांचं पिल्लू होतं. ते पण आमच्याबरोबर पार लिपुलेखपर्यंत आलं. ते खूपच लहान असल्याने अजून गवत वगैरे काही खात नाही. फक्त आईचं दुध पितं आणि आई पडली 'वर्कींग मदर'. काम सोडता येत नाही आणि पिल्लालाही टाकून जाता येत नाही. त्यामुळे मग निघाली त्यालाही बरोबर घेऊन. घोडेवाला म्हणाला, पिल्लाचे पायही आत्तापासून तयार होतील. मग पुढे ते ही हेच काम करेल. एकंदरीत काय माणसं असो की घोडे, वर्कींग मदर्सच्या समस्या सारख्याच!

रिंगलींग टॉपच्या पलिकडे खूप उतार होता. उतारापेक्षा चढ परवडला असं जे बरेच अनुभवी ट्रेकर्स म्हणतात त्याची प्रचिती इथे आली. पायाचे अंगठे आणि गुडघे ह्यांची अश्या उतारांवर खूप वाट लागते. पावलं तुटेपर्यंत चढा आणि गुडघे फुटेपर्यंत उतरा ह्या पॅटर्नची ही सुरुवात होती. दरम्यान कमान आसपासच्या झाडीत जाऊन मश्रूम तोडून घेऊन आला. रात्रीच्या मुक्कामी भाजी करू म्हणे त्यांची.

थोडसं खाली गेल्यावर बाजूच्या हिरवळीवर ही कोब्रा फ्लॉवर्स दिसली.

लांबून बघावं तर अगदी खरच फणा काढलेला नाग वाटावा! आम्ही बरेच फोटो काढले. कमान म्हणाला 'आगे काली जुबान वाले भी मिलेंगे' आणि पुढे खरच काळ्या जिभेची फुलं ही होती. ही दिसतात नागासारखी आणि विषारीही असतात त्यामुळे जनावरं ह्यांच्या वाट्याला फारशी जात नाहीत.

आमच्या ह्या फोटोग्राफी दरम्यान चेटचंद, रामसेवकजी आणि श्याम पुढे गेले. पुढे एकेठिकाणी मी रस्त्याच्या कडेला थांबून पाणी पित असताना कमान एकदम ओरडला 'संभलके साहब, बिच्छू है..' मी घाबरून बाजूला झालो, मला वाटलं मी विंचवावर पाय दिला की काय! पण तिथे बिच्छू नावाची झाडं होती. ह्यांच्या नुसत्या स्पर्शाने विंचू चावल्यासारखी आग आणि वेदना होतात. तास - दोनतास काही कमी होत नाहीत. आपल्या मलमा-क्रिमांचाही काय फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे ह्यांच्यापासून जपून रहावं लागतं. ह्या विंचवांवर उतारा म्हणून जंगल्यातल्याच कुठल्यातरी दुसर्‍या वनस्पतीचा पाला वाटून लावतात.

थोड्यावेळाने एक मोठा झरा पार केला. अजून पाऊस फारसा झालेला नसल्याने झर्‍याला खूप पाणी नव्हतं.

कुठल्याही वेगळ्या आधाराशिवाय चालत पार करण सहज शक्य झालं. झरा ओलांडल्यावर दुरवर गालाचा कॅम्प दिसला. फोटोत वाटेच्या शेवटी जी घरं दिसत आहेत तो गाला कॅम्प.

कमानला विचारलं की किती वेळ लागेल अजून तर तो म्हणाला दोन अडीच तास तरी लागतील. रिंगलींग टॉपच्या पुढे आम्ही चांगला वेग घेतला होता. इथून पुढे डोंगरांच्या सोंडांलगत वळणावळणांचा थोड्याफार चढ उताराचा रस्ता होता त्यामुळे वेग कायम राखता आला. इथे चालत असताना केदारला एकंदरीत लेह लडाखची खूपच आठवण येत होती आणि इथल्या तुलनेत ते कसं जास्त चांगलं आहे असं बराच वेळ सांगत होता. मी म्हटलं आता इथे आलोच आहोत तर हे बघून घेऊ, लेह-लडाखला (किंवा स्पितीला) ट्रीप प्लॅन करू. थोड्यावेळाने मॅराथॉनवीर फनी दिसला. त्याची आज खूपच वाट लागल्याचं दिसत होतं. तो अक्षरशः झोकांड्या खात होता. आम्ही त्याला म्हटलं की तुझं सामान घेऊ का, तुझा हात धरू का? तर नको म्हणाला. तो उतारावर सुसाट असायचा पण थोडा जरी चढ आला की पार ढेपाळायचा!

थोडं पुढे गेल्यावर आयटीबीपीचा चेकपोस्ट होता. तिथे गाला कॅम्प वर स्वागत आहे वगैरे पाट्या होत्या. तिथे जवानांनी चहा आणि चिप्स दिले. आम्हांला वाटलं आलाच कॅम्प. पण इथून ही पुढे जवळ जवळ दिड किलोमिटरचा हलका चढ असलेला रस्ता होता. इथे घोड्यांची मुक्कामी जागा असल्याने रस्ताभर लीद पडलेली होती आणि त्याची घाण सुटली होती!

नंतर कळलं की श्याम, रामसेवकजी आणि टेकचंद आमच्या आधी अर्धातास म्हणजे साडेनऊ वाजताच ह्या चेकपोस्टला येऊन पोहोचले. एव्हड्या लवकर यात्री सहसा येत नसल्याने जवानांनी त्यांची तुम्ही कोण, इथे कसे आलात वगैरे चौकशी सुरू केली. यात्री इतक्या लवकर आले कळल्यावर त्यांना खूपच आश्चर्य वाटलं! आम्ही मजल-दरमजल करत साडे दहाच्या सुमारास गाला कॅम्पला पोहोचलो. हा कॅम्पपण अगदी दरीकाठी आहे. श्यामने आमच्यासाठी खोली पकडलीच होती. पाणी/सरबत पिऊन स्ट्रेचेस केल्या. आंघोळीसाठी गरम पाणी तयार होतं. पण माझा घोडा आणि घोडेवाला येतच नव्हते आणि सामान घोड्यावर बांधलेलं! मला धड आवरता येत नव्हतं. तश्या घामट कपडयांनी पलंगावर आडवंही होता येत नव्हतं. एकंदरीच जरा चिडचिडच झाली. दोन तासांनी एकदाचा अभिलाष उगवला. म्हणे घोडा खूप भुकेलेला होता, त्यामुळे तो चरत राहिला आणि उशीर झाला. मात्र तेव्ह्ड्यावेळात मला कॅम्पवरच्या सॅटेलाईट फोनवरून घरी फोन करून घेता आला. तेव्हा फारसं कोणी आलेलं नसल्याने गर्दी नव्हती. रियाच्या प्ले-स्कूलचा आज पहिला दिवस होता. त्याची सगळी हकिगत कळली. आंघोळी, जेवणं वगैरे आटोपून आम्ही बाहेर निवांत बसलो होतो. अजून बाकीचे यात्री एक-एक करून येत होते. सगळ्यात शेवटी साधारण दोन अडीचला गुज्जू मंडळी आली. आज सामानही मिळणार होतं. त्यामुळे कपडे धुणे, हव्या त्या गोष्टी सामानातून काढणे-घालणे वगैरे कार्यक्रम केले. आमचा मुख्य टाईमपास हा कंपू करून गप्पा मारणे असायचा. सौम्या, रानडे, केदार, मी आणि बन्सलजी आमची पूर्णवेळ टकळी सुरू असायची. श्याम आणि भीम अधेमधे बोलायचे. संध्याळाकी दरीकाठी चक्कर मारली आणि फोटो काढले.

इथे रात्री सिरखा इतका अंधार नव्हता आणि मुख्य म्हणजे दमणूक झालेली असल्याने चांगली झोप लागली. दुसर्‍या दिवशीचा रस्ता म्हणजे गाला ते बुधी हा यात्रेतला सगळ्यात अवघड टप्पा असल्याचं ब्रिफींगमध्ये सांगितलं. गाला हे सिरखापेक्षा कमी उंचीवर आहे. त्यामुळे आजच्या प्रवासात चढाबरोबरच उतारही बराच होता. पण उद्या मात्र बुधीला आम्ही जवळ जवळ १२०० फूट जास्त उंचीवर पोहोचणार होतो त्यामुळे ह्या १८ किलोमिटरच्या रस्त्यात चढण बरीच असणार होती. त्याचाच विचार करत सगळे झोपून गेले!

दिवस ५ : गाला ते बुधी. अंतर: १८ किमी. मुक्कामी उंची: ८८९० फूट / २७१० मिटर.

आजच्या मार्गात गाला कॅम्पहून निघाल्यावर सुमारे दोन किलोमोटर कालच्या रस्त्याच्याच पुढचा रस्ता होता. नंतर तिथून पुढे ३ किलोमिटर अंतर ४४४४ पायर्‍या उतरून कालीनदीकाठच्या लखनपुरपर्यंत जायचं होतं. लखनपुरहून पुढे पूर्ण रस्ता कालीनदीच्या काठून होता. हा डोंगरात कोरून काढलेला अतिशय अरूंद रस्ता आहे. इथे दोन्ही बाजूंनी माणसे तसेच घोडे ह्यांची ये-जा सुरू असते. घोडे आले की डोंगराच्या कडेला खेटून उभं रहायचं, दरीच्या बाजूला अजिबात जायचं नाही असं सतत बजावून सांगितलं गेलं. फोटो काढतानाही नेहमी डोंगराच्याच बाजूला थांबायचं शिवाय पोर्टर/गाईड/आयटीबीपीचे जवान ह्यांच्या सुचना काटेकोर पाळायच्या असंही सांगितलं गेलं. इथे जर कालीनदीच्या प्रवाहात कोणी पडलं तर वाचायची अजिबात शक्यता नाही. प्रवाह अतिशय वेगवान आहे. मागे २०१० साली यात्रेदरम्यान परतीच्या प्रवासात फोटो काढताना एक मराठी गृहस्थ ह्या नदीत पडले. त्यांचा अजुनही पत्ता लागलेला नाही. दुर्दैवाने त्यांची पत्नीही सोबत त्याच बॅचला होती! त्यांची अवस्था काय झाली असेल ह्याची कल्पनाही करवत नाही.

पहाटे पाचवाजता बोर्नव्हिटा घेऊन सगळे निघालो. पहिला दोन अडीच किलोमिटरचा प्रवास एका लयीत विनासायास पार पडला.

नंतर एक छोटं देवीचं देऊळ लागलं. तिथे एक पुजारी पुजा करत होता. नमस्कार करून, प्रसाद खाऊन जेमतेम दहा पावलं पुढे आलो आणि एका वळणानंतर ४४४४ पायर्‍यांची उतरंड सुरू झाली.

हा अक्षरशः ७०-७५ डिग्री कोनातला रस्ता आहे. उभाच्या उभा जीना! पायरीवरून पाय घसरून पडलं तर कपाळमोक्ष अटळ. अधेमधे कोसळणार्‍या दरडींमुळे पायर्‍यांवर बरेच दगड, राडारोडा पडलेला होता. अर्थात कोणतंही साहस न करता काळजीपूर्वक चाललं तर काही अवघड नव्हतं. जरी तुम्ही घोड्यावरून जात असाल तरी कुठल्याही उतारावर घोड्यावर बसता येत नाही. कारण घोड्याचा पाय सटकू शकतो. त्यामुळे जेष्ठ नागरीकांचे ह्या पायर्‍यांवरून उतरताना बरेच हाल झाले.

ह्या उतारादरम्यान सोलापूरजवळच्या एका गावातला मराठी जवान आमच्याबरोबर होता. त्याच्याशी बर्‍याच गप्पा झाल्या. आमच्याबरोबर तो ही त्याच्या कॅमेर्‍यातून मधेमधे फोटो काढत होता ते पाहून गंमत वाटली. तसं सांगितलं तेव्हा कळलं की त्याचं ह्या भागातलं हे पहिलच पोस्टींग होतं आधीची वर्ष तो हिमाचलमध्ये असायचा. सुमारे पन्नास एक मिनीटांत पायर्‍या उतरून खाली लखनपूरला पोचलो. आता नदी आमच्यापासून अगदी हाताच्या अंतरावर होती. तिथे एका टपरीवर नाश्त्याची सोय होती. ढगाळ, थोड्याश्या थंड वातावरणात, नदीच्या काठी बसून गरम गरम भटूरे आणि बटाट्याची भाजी आणि चहा घ्यायला छान वाटलं. इथून पुढे कालीनदीच्या काठचा अरूंद रस्ता सुरू झाला. माणसे तसेच खेचरांची ये-जा बरीच होती. पण नशिबाने पाऊस नव्हता. पावसात ह्या रस्त्यावर अवघड गेलं असतं. दोन उंच पहाडांच्या मधली अरूंद दरी, डोंगरातून काढलेला रस्ता, हवेत सुखद गारवा, नजर पोहोचेपर्यंत हिरवळ आणि प्रवाहाचा लयीत येणार आवाज! एक प्रकारच्या ट्रान्समध्ये जायला होत होतं. आसपासचा निसर्ग इतका सुंदर होता की काहीही न बोलता ते काय म्हणतात तसं स्वत:शीच संवाद साधत वगैरे मार्गक्रमण करत होतो. इथल्या झर्‍यांचं पाणीही अतिशय चवदार होतं. मधे एकेठिकाणी काली नदी आणि एका मोठ्या प्रवाहाचा संगम लागली. बरोबरच्या जवानाला विचारलं की कुठली नदी, तर तो म्हणे ही गोरी नदी. म्हटलं म्हणजे धौली गंगा का? तर म्हणे नाही ती वेगळी, ही जरा गोरी आहे म्हणून गोरी नदी!

पुढे थोड्या अंतरावर मालपा आलं. मालपाला पूर्वी कॅम्प असायचा. पण १९९८ दरम्यान प्रचंड मोठी दरड ह्या कॅम्पवर कोसळली आणि संपूर्ण बॅच, त्यांचे पोर्टर, घोडे आणि घोडेवाले, बरोबरचे आयटीबीपी जवान आणि गावातली लोकं असे जवळ जवळ दोन अडीचशे जण एकतर गाडले जाऊन मृत्युमुखी पडले किंवा वाहून गेले. प्रसिद्ध नृत्यांगना प्रोतिमा बेदी सुद्धा ह्या बॅचमध्ये होत्या. तेव्हापासून काली नदीच्या काठावर कुठलाही कॅम्प न ठेवता एकदम बुधीलाच मुक्काम केला जातो. कालापानीला ह्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली म्हणून स्मारक बांधलं आहे. मालपाला आमच्या सकाळच्या जेवणाची सोय केली होती. पण आम्ही तिथे ९ वाजताच पोचलो! तिथला माणूस म्हणाला जरावेळ थांबा गरम रोट्या करून देतो. शिवाय आम्हांला फारशी भूकही नव्हती. पण पुढे बुधीला जेवण मिळणार नव्हतं. मग तिथेच थोडं खाऊन निघायचं ठरवलं.

इथून पुढे सात किलोमिटरचा रस्ता बाकी होता. सगळे जण म्हणाले फार अवघड नाही. आत्ता आलात तसेच चालत रहा. पण ह्या रस्त्यात बरेच चढ होते. आजुबाजूची दृष्य इतकी सुंदर होती की कितीही वेळ बघितलं तरी नजर हटत नव्हती आणि कितीही फोटो काढले तरी समाधान होत नव्हतं.

मधे एकेठिकाणी नदी बरीच जवळ आली. प्रवाहातल्या एका मोठ्या शिळेवर पाणी आपटून त्याचे तुषार वरपर्यंत उडत होते. डोळे बंद करून ते तुषार अंगावर, चेहेर्‍यावर घेत उभं राहिलो. जगातली कुठलाही शॉवर, टब, झॅकुझी वगैरे ह्याच्या समोर फिके पडावे. आलेला थकवा क्षणार्धात नाहीसा होऊन सगळे ताजेतवाने झाले. काही काही ठिकाणी झर्‍यांच्या/धबधब्यांच्या खालून रस्ता पार करावा लागत होता. तो प्रवाह अंगावर घ्यायलाही फार छान वाटत होतं.

तयारी करत असताना वाचनात आलं होतं की चालताना सुकामेवा खावा, त्यानं लगेच शक्ती येते. त्याप्रमाणे मी सुक्या मेव्याच्या लहान लहान पुड्या करून नेल्या होत्या. त्यातल्या रोज थोड्या थोड्या बॅगेतून काढून खिशात ठेवायचो. शक्ती येते की नाही ते माहीत नाही पण चालताना ते खायला बरं वाटायचं खरं. एका लयीत बरच चालणं झाल्यावर मी केदारला सांगणार होतो की जरा पाणी पिण्यासाठी थांबूया. पण तितक्यात आयटीबीपीच्या लामारी कॅम्पची पाटी आली आणि तिथल्या जवानांनी चहा-पाण्यासाठी बसायला सांगितलं. अमृत अमृत म्हणतात ते असंच काहीसं असावं असा तो चहा लागला! जवानांना अनेक धन्यवाद देऊन पुढे निघालो. आता चार किलोमिटर बाकी होतं. आता बरीच चढण होती. पार्वते आधी आमच्या बरोबर होता. पण नंतर तो मागे पडला. पण आम्ही चहा घेत असताना तो लामारीला पोचला. आम्हांला निघालेलं बघून घाईघाईने निघून केदारला अक्षरशः धक्का देऊन पुढे गेला. लोकांना कसली घाई असते इतकी कोण जाणे! आता ढग जाऊन ऊन्हाचा चटका बसत होता. चढही होता. एकंदरीत दमायला होत होतं. शेवटी एकदाची बुधी गावाची पाटी आली. कमानला विचारलं की कॅम्प कुठे आहे. तर त्याने दरीच्या पलिकडे एका टेकडीकडे बोट दाखवलं आणि म्हणे तो बघ तिथे आहे. तिथून जवळ जवळ दिड किलोमिटर अत्यंत जाचक चढ होता. पुढे रस्त्याच्या कडेला पार्वते बसलेला दिसला. विचारलं काय झालं? तर म्हणे चढावर उगीच फास्ट आलो, खूप दम लागला, श्वास फुलला. म्हटलं भोगा कर्माची फळं! केदार दरीवरच्या पुलापाशी फोटो काढायला थांबला. पण मला आता एकदाचा तो कॅम्प आल्याशिवाया थांबणं नको वाटायला लागलं. हिय्या करून पुढे चालत राहिलो आणि मजल दरमजल करत शेवटी कॅम्पवर पोचलो! तिथल्या माणसाने स्वागत करून मधूर सरबताचा ग्लास हातात दिला. आमचे यशस्वी कलाकार श्याम, टेकचंद, रामसेवकजी पोहोचलेले होतेच. काल मी सज्जड दम भरल्याने आज अभिलाष मागे न रहाता वेळेत सामान घेऊन आला. तितक्यात केदारही आला. माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे लगेच जाऊन घरी फोन केला. नंतर छान गरम पाण्याने अंघोळ केली. खरतर एक दीड वाजला होता पण इथे जेवण मिळणार नव्हतं मग आमच्या सामानातला खाऊ खाल्ला. वेळच वेळ होता. ऊनही होतं त्यामुळे लगेच कपडे धुतले पण हिमालयात आहोत हे विसरलो. तासाभरात ऊन जाऊन पाऊस आला! अर्थात रात्री वार्‍यात वाळले कपडे. जे यात्री अजूनही येत होते त्यांची मात्र पावसात जरा त्रेधा उडाली. शेवटचे यात्री विनोद सुभाष काका तब्बल सात वाजता पोहोचले! आज सौम्या, रानडे, बन्सलजी वगैरे मंडळी खूप लवकर आली. त्यामुळे नेहमीप्रमाणेच दुपारी आणि संध्याकाळी गप्पा, इतरांच्या टवाळक्या हे कार्यक्रम रंगले. केदारने त्याच्या मोबाईलमधली काही गाणी ऐकवली पण ती आता बंद केली नाहीत तर मी मोबाईल गायब करून टाकेन असा दम श्यामने भरला. इथे नक्की कश्यामुळे काय माहित पण खोलीच्या आता बसलं की मला सारख्या शिंका यायच्या जरा बाहेर फिरून आलं की बरं वाटायचं. मग सगळ्यांच्या सांगण्यावरून गोळी घेतली. रात्री दुसर्‍या दिवशीच्या प्रवासाबद्दल ब्रिफींग झालं. उद्याचा रस्ता आजच्या तुलनेत सोपा होता पण उद्या आम्ही हाय अल्टीट्युड एरिआत जाणार होतो कारण उद्याच्या मुक्कामाचं ठिकाण गुंजी हे दहा हजार फुटांच्या वर होतं. दिवे गेल्यावर करण्यासारखे काहीच नसल्याने सगळे झोपून गेले.

दिवस ६ : बुधी ते गुंजी. अंतर: १७ किमी. मुक्कामी उंची: १०३७० फूट / ३१६० मिटर.
बुधी ते गुंजी प्रवासात निघाल्याबरोबर पहिली ३ किलोमिटरची खडी चढण लागते. हिला चिलालेखची चढाई म्हणातात. ही चढण चढून मग मागे थोडं उतरायचं की तो परिसर वॅली ऑफ फ्लॉवर्स किंवा फुलोंकी घाटीचा भाग आहे. जसजसा उन्हाळा वाढत जातो आणि पाऊस पडतो तशी इथे खूप फुलं फुलतात. मग पुढे पुन्हा कालीनदीच्या काठून गुंजीपर्यंत साधारण १० किलोमिटरचा सरळ रस्ता आहे.
नेहमीच्या प्रथेप्रमाणे सकाळी गरम बोर्नव्हिटा घेऊन निघालो. पोर्टर आणि घोडेवाल्यांना आदल्या दिवशी तिथल्या निवडणूकीतल्या उमेद्वाराने (ओली) पार्टी दिली होती म्हणे. त्यामुळे सगळे जणं जरा पेंगत होते. चियालेखची चढाई एकदम सणसणीत होती! ७०/७५ डिगरीच्या कोनात चढताना एकदम दम निघाला. घोडेही मधे थांबून दम खात होते. मित्तलजींचं त्यांच्या घोडेवाल्याशी भांडण झालं. तो म्हणायला लागला की घोडा दमलाय, मी काही तुम्हांला त्याच्यावर बसू देणार नाही. पण ती चढण त्यांना चालत चढता येत नव्हती. मित्तलजी त्याला म्हणे, 'ये यात्रा है इसलिये, नही तो तुम्हे और तुम्हांरे घोडे को यहांसे उठाकार खाई मे फेंक दिया होता!' त्यांचा एकंदरीत आवेश पाहून घोडेवाला जरा वरमला. थोडी विश्रांती झाल्यावर ते पुढे आले. इथे एक गोष्ट चांगली होती की ऑक्सिजनची कमतरता नव्हती. त्यामुळे अगदी धाप लागत नव्हती. खरतर ह्या चढादरम्यान आम्ही गुंजीपेक्षा जास्त उंचीवर चढून खाली आलो होतो. आम्ही जसजसे वर जात होतो तसतसं उजाडत होतं. वरची शिखरं छान चमकत होती.

काही ठिकाणी उंच डोंगरांवर रात्रीत बर्फ पडून त्यांचे पट्टे तयार झालेले दिसत होते.

मी, केदार, भीम बरोबर होतो. मधे सौम्या घोड्यावरून पुढे गेला. एकंदरीत १६०० फुटांची उंची आणि तीन किलोमिटर अंतर आम्ही पावणे दोन तासांत चढून गेलो. वर गेल्यावर एका छान टुमदार झोपडीत नाश्ता होता.
चढण चढल्यावर सगळ्यांनाच भूक लागली होती त्यामुळे सगळ्यांनी पुरी भाजी वर आडवा हात मारला.

पुढे पठारावर भारतीय सेनेने पासपोर्ट तपासले. कारण इथून पुढे इनर लाईन परमिट लागतं. हा पठाराचा प्रदेश सुंदर होता. मोठं हिरवगार मैदान होतं. फुलं फारशी नव्हती. पण सकाळच्या कोवळ्या उन्हात तिथे चालायला छान वाटत होतं.

मधेच कोणीतरी म्हणायला लागलं की तिथल्याच कुठल्यातरी गुहेतून रावणाने सितेला पळवलं होतं. आता मी काही इतिहास/संस्कृतीतज्ज्ञ नसलो तरी ऐकलेल्या माहितीवरून दंडकारण्य म्हणजे हा प्रदेश नसावा असं वाटलं. पण कोण वाद घालणार म्हणून सोडून देऊन पुढे गेलो. पठारावर चार किलोमिटर गेल्यावर 'गरब्यांग' नावाचं गाव आलं. हे 'सिंकींग विलेज' आहे. दोन अर्थाने सिंकींग. एकतर तिथली जमीन खरच खचते आहे आणि दुसरं म्हणजे पूर्वी हे गाव सिल्क रूटवर होतं. तेव्हा व्यापार होता, लोकांना काम होतं पण आता काहीच उद्योगधंदे नाहीत त्यामुळे लोकही स्थलांतरीत होत आहेत. कमान म्हणाला टपरीवर समोसे खाऊ. पण आम्ही म्हटलं जे काय खाण्याचे प्रयोग ते येताना आत्ता काही नको.

गरब्यांग नंतर पुन्हा एकदा पासपोर्ट तपासणी आणि नोंदणी झाली. पुढचा आठ-साडेआठ किलोमिटरचा प्रवास मात्र अत्यंत रटाळ होता! भारताच्या बाजूला आता रस्त्याचे काम सुरू आहे. सीमेपर्यंत रस्ता होईल ही खूपच चांगली गोष्ट आहे. पण ह्या कामामुळे सगळीकडे सुरुंगाने फोडून ठेवलं होतं. आम्हांला दिलेल्या ब्रिफींगममध्ये तसेच बरेच ठिकाणी वाचलेलं होतं की हा टप्पा सगळ्यांत सुंदर आहे, पण तसं अजिबातच जाणवलं नाही. मजल दरमजल करत आम्ही गुंजीच्या जवळ पोहोचत होतो.

इथे रस्ता चांगला रुंद आहे. कालीनदीही कालच्या सारखी भितीदायक नाहीये. प्रवाह उथळ आहे. मधे एकेठिकाणी कालीला काली का म्हणतात हे स्पष्ट दाखवणारा प्रवाहांच्या रंगांमधला फरक दिसतो.

तसेच एकेठिकाणी नदीच्या पात्रात तयार झालेला बदामाचा आकार आणि त्यात जाणार बाण दिसला!

दरम्यान आदी कैलासाचं दर्शन झालं. एकूण पाच कैलास आहे. त्यातले तीन हिमाचलात, एक तिबेटमध्ये आणि हा आदीकैलास उत्तराखंडात. आदी कैलासला जाण्यासाठीही केएमव्हिएन तर्फे यात्रा आयोजित केली जाते. त्यामुळे कुठले गावकरी आम्हांला भेटले की ते विचारायचे की छोटे कैलास जा रहे हो या बडे कैलास?

आयटीबिपीचे अनेक जवान ह्या मार्गावर ये-जा करत होते. त्यातले एक अधिकारी आमच्याशी बोलायला थांबले. त्यांना मी भसकन् म्हटलं हा परिसर किती रटाळ आहे, कालच कसं छान होतं. तर त्यांना ते आवडलं नसावं बहुतेक, त्यांनी विचारलं काय वाईट आहे, काय आवडत नाहीये वगैरे. मी नंतर सारवासारव केली पण त्यांचं बरोबरच आहे. ती लोकं आपल्या कुटूंबापासून दुर, संरक्षणाच्या हेतूने इथे रहातात. हा परिसर त्यांच्यासाठी घरच! आणि त्याला मी अशी नावं ठेवलेली कोणाला अवडणार? (केदार उगीचच्या उगीच येता जाता कोथरूडला नावं ठेवत असतो तेही मला खटकायचं, ह्या अधिकार्‍यांचा तर पोलिसी खाक्या!)

कालच्या प्रमाणेच गाव आलं तरी कॅम्प मात्र गाव ओलांडून नदीच्या पलिकडे भला मोठा चढ चढल्यावर! हा चढही बराच वैतागवाणा होता. गुंजीचा कॅम्प बराच मोठा आहे.इथे दवाखाना, बॅंक, दुकानं वगैरे सोई आहेत. आजुबाजूच्या डोंगरांना खूप वेगवेगळे रंग आहेत. करडा, राखाडी, जांभळट, हिरवट वगैरे बर्‍याच छटा दिसतात. आम्ही आता हाय अल्टीट्युड परिसरात असल्याने आम्हांला खोलीत बसून राहू नका असं सांगितलं होतं. जितकं बाहेर फिराल तितकं अ‍ॅक्लमटायजेशन लवकर होईल, बिपी वाढलं असेल तर ते लवकर खाली येईल असं सांगितलं होतं. गुंजीला पुन्हा वैद्यकीय तपासणी होते आणि तुम्ही पास झालात तरच पुढे जाता येतं नाहीतर परत फिरावं लागतं. आत्तापर्यंतच्या प्रवास फार सुंदर परिसरातून झाला होता. त्यामुळे तपासणीत नापास झालोच असतो तरी इथून परत फिरणं एकवेळ तरी ठिक होतं. इथे खोलीवाटपावरून पुन्हा भांडणं झाली. पार्वतेचं म्हणणं की नवरा बायकोंना एका खोलीतच ठेवायचं! खरतर अजून कुठले नवरा बायको पोचलेच नव्हते पण ह्यालाच समाजसेवेची हौस. त्या गोंधळात आम्हांला चांगली खोली सोडवी लागली. इतक्यात भानुभाई पटेल फनीला उद्धटपणे बोलले. फनी आल्यापासून पाणीही न पिता खोल्यांचा घोळ निस्तरत होता, त्यामुळे ह्यावेळी आम्ही फनीची बाजू घेऊन भानुभाईंना गप्प बसवलं. इथे दुपारी जोरदार वारं सुटलं होतं. दुसर्‍या दिवशी वैद्यकिय तपासण्यांसाठी मुक्काम असल्याने आज सगळे निवांत होते. दुपारी आणि संध्याकाळी पुन्हा टवाळक्या करून निवांत वेळ घालवला.
संध्याकाळी असं लक्षात आलं की आमच्या चीनमधल्या जेवणाच्या शिध्याची खोकी सामानाबरोबर आलेलीच नाहीयेत . इतकच नाही तर ती कुठल्या कॅम्पपर्यंत आली आहेत हे ही कोणाला आठवेना, धारचुलापर्यंत नक्की होती एव्हडच आठवत होतं. फूड कमिटी त्याबद्दल पूर्ण विसरून गेली होती. मग एलओ नि जरा त्यांच्यावर जरा चिडचिड केली पण बरीच फोनाफोनी करून दुसर्‍या दिवशीपर्यंत ती खोकी गुंजीत आणायची व्यवस्था केली.
रात्री जेवायला नेहमीच्या भाज्या सोडून छान कढी पकोडे होते. त्यामुळे सगळे एकदम खुष.
दुसर्‍या दिवशी मेडीकल असल्याने चारला उठायची गरज नव्हती साडेआठला दवाखान्याबाहेर भेटायचं होतं. पण रोजच्या सवयीने सगळे लवकरच उठून बसले. सुर्योदयाच्या वेळी बाहेर अन्नपूर्णा शिखराचं दर्शन झालं.

आयटीबिपीच्या देवळात एलओ तर्फे पुजा झाली आणि मग बाहेर तिथल्या डॉक्टरने ब्रिफिंग दिलं. रांगेने एकेकाची तपासणी सुरू झाली. तिथे आत जाणापूर्वी रांगेतल्या व्यक्तीशी जवान तसेच डॉक्टर गप्पा मारत होते जेणेकरून टेन्शन येऊन बिपी वाढणार नाही. त्या डॉक्टरचं व्यक्तिमत्त्व एकदम रुबाबदार होतं (आणि नाव पराग होतं!) माझं बिपी एकदम नॉर्मल पेक्षा नॉर्मल आलं. कदाचित शुद्ध हवेमुळे आणि व्यायामामुळे आधी वाढलेलं कमी झालं असावं. सगळेजण मेडिकल पास झाले. फक्त सगळ्यात मोठे यात्री विनोद सुभाष ह्यांनी स्वतःहून माघार घेतली कारण त्यांची गाला ते बुधी आणि बुधी ते गुंजी दरम्यान खूपच दमछाक झाली. खरतर एकोणसत्तराव्या वर्षी ते इथपर्यंत आले (आणि घरच्यांनी त्यांना येऊ दिलं) हेच खूप आहे. मेडिकल टेस्ट आटोपल्यावर घरी फोन करून पोटभर गप्पा मारल्या. रियाच्या शाळेचे वृत्तांत कळले. तिच्याशीही गप्पा मारल्या. विंबल्डनमध्ये शारापोव्हा हरल्याचं कळलं. बाकी सगळ्या बाया हरलेल्या असताना तिला खरं जिंकायची चांगली संधी होती. पण नेहमीप्रमाणे ढिसाळपणा नडला असं म्हणून तिला मनात शिव्याही घातल्या. नंतर रानडे मला म्हणे तू असं विंबल्डनबद्दल वगैरे इथून विचारूच कसं शकतोस फोनवर? म्हटलं मग मी इतका वेळ काय प्रेमाच्या गप्पा मारत होतं असं वाटलं की काय तुम्हांला. पणाआजच्या मोकळ्या दिवशी फारच होमसिक वाटत होतं खरं.

संध्याकाळी घोडेवाले आणि पोर्टच्या इनरलाईन परमिटचा काहीतरी घोळ चालू होता. त्यांच्याकडे परमिट नव्हतच आणि तिथे पोटनिवडणूका असल्याने डीएमने परमिट बनवत बसायला वेळ नाही असं सांगितलं. मग परत एलओनी आर्मी, आयटीबीपी आणि डीएम अशी त्रिस्थळी फोनाफोनी करून घोडेवाल्यांना पुढे नेण्याची परवानगी घेतली. तेव्हा सगळे घोडेवाले आणि पोर्टर कॅम्पवर आले होते. त्यांच्याशी बर्‍याच गप्पा झाल्या. गावतल्या प्रथा, खाणंपिणं, स्थानिक राजकारण अशी काहीबाही माहिती ते सांगत होते. त्यांना विचारलं मतदान केलं का? तर म्हणे हो मोदींना मत दिलं. म्हटलं मोदी इथून कुठे उभे होते? तर म्हणे खडा कोईभी रहे, काम तो मोदीही करेगा, हमारा वोट मोदीको ही! नंतर मग आसपास चक्कर मारून आलो.

संध्याकाळी ती शिध्याची खोकी येऊन पोहोचली. पण सातपैकी दोन गायब होती. मग सगळी खोकी उघडून त्यातलं काय सामान गायब आहे हे शोधून काढून ते किंवा त्याच्या जागी जे काय घेता येईल ते, जवळच्या दुकानांमधून घेऊन आलो आणि सगळी खोकी पुन्हा पॅक केली. हे काम फुडकमिटी करत होती. पण आम्हीही त्यांना मदत केली.

दुसर्‍या दिवशीचा प्रवास भारतातल्या शेवटच्या कॅम्पपर्यंत म्हणजे नाभिढांग पर्यंत होता. तिथून मध्यरात्री निघून सीमापार जायचं होतं. त्यामुळे तिथे मुख्य सामान उघडायला लागू नये अश्या हिशोबाने सामान भरून टाकलं आणि सगळे झोपून गेले.

क्रमशः
-----------------------------------

भाग चौथा : http://www.maayboli.com/node/51358

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार दरीवरच्या पुलापाशी फोटो काढायला थांबला.
>> हो ना ते माझं पुलांच ऑब्सेशन बघून तू गुंजीच्या की कुठल्या एका पुलापाशी दिलेला टोमना लक्षात आहे. Happy

फनीचा पहिल्या पूर्ण ट्रेकच्या दिवशीच डुल्या मारोती झाला होता. उतार आला की हे लोंक पळायचे, अन चढ आला की डुल्या मारोती.

त्या लामारीची बरी आठवण काढलीस. पार वैताग आला होता न चहा हवा होता, तितक्यात लामारी आलेच.

मस्त झालाय भाग.

पहिलाच फोटो बघितला आणि आजची सकाळ सत्कारणी लागली.
वर्णन सुंदर आहेच आणि प्रकाशचित्रे एकदम विलोभनीय. असं वाटतयं जणु तुमच्या बरोबर मी सुध्दा ही यात्रा करतोय.

काय मस्त लिहिलंयस पराग. फोटो तर खासच.

सगळं वाचून उग्गाच मनात शंका येतेय आपल्याला की जमेल की काय अशी Wink

किती लिहाल, किती रमवाल, कुठे फेडाल... Proud

मस्तच झालाय हा भाग.
वर उडणारे तुषार आणि जॅकुझी वगैरेंची तुलना खासच.

डॉक्टर पराग Lol

४,४४४ पायर्‍यांचा इथला फोटो केदारने टाकलेल्या फोटोपेक्षा डेंजर वाटतोय.

अदम, खूप सुंदर लिहिल आहेस. नेहमीप्रमाणे एकदम सुंदर.

केदारपेक्षा तुझे लेख जास्त सकस वाटताहेत वाचायला.

सुंदर चालला आहे तुमचा प्रवास.. आरामात लिही... मजा येतेये..

btw वॅली ऑफ फ्लॉवर्सला जायच असेल तर ४४४४ टोल भरावाच लागतो का? की दुसरा रस्ता आहे Wink

हा भाग ही अप्रतिम.
लिखाण आणि फोटो दोन्ही सुरेख.
तुम्हा दोघांची लिहिण्याची शैली वेगवेगळी असल्याने तोचतोचपणा जाणवत नाही. मज्जा येतेय वाचायला. Happy

मस्त वर्णन आणि फोटो. अजून किती भाग आहेत?
>>केदारपेक्षा तुझे लेख जास्त सकस वाटताहेत वाचायला.>> बी, तुलना कशाकरता? दोघेही आपापल्या परीने लिहित आहेत. दोघांची शैलीही वेगळी.

मस्त झालाय हा पण भाग. केदारचे लेख आधी येतात पण त्यात इतकं डीटेल नसतं त्यामुळे आधी त्याचा टीझर टाइप फोटो जास्तीवाला भाग आणि तब्बेतीत तुझं सविस्तर वर्णन ..दोन्हीत जाम मजा येते आहे.

मस्त झालाय हाही भाग..एकाच ट्रीप ची दोन वर्णनं वाचायला जास्ती मजा येत्येय!
घोडी आणि शिंगराबद्दल वाचून हळहळ वाटली! लीपुलेखच्या पुढे काय सोय केली त्या पिल्लाची?

सगळ्यांना प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. Happy

ललिता.. Proud

आडो, तुला न जमण्यासारखं अजिबात नाहीये हे.. तू तर इतकी अनुभवी ट्रेकर आहेस!

इंद्रा.. वॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक ह्या भागातून होत नाही. त्यामुळे टोल नाही लागणार.. Happy

सायोला तुलनेबद्दल अनुमोदन!!
सायो, अजून तीन किंवा चार भाग होतील असं वाटतय. खरतर ह्या भागात अटकेपार जायचं होतं पण बराच मोठा झाला भाग त्यामुळे गुंजीलाच थांबवलं.

जिज्ञासा.. लिपूहून घोडे परत फिरतात परतीच्या बॅचेसबरोबर.. त्यामुळे पिल्लू आणि घोडी परत खाली आले.

परत एकदा सगळ्यांना खूप धन्यवाद.. Happy

अप्रतीम नजारे आणी नजर खिळवुन ठेवणार्या नद्या. अ‍ॅडम खूप छान लिहीलय.:स्मित: केदार ने जे फोटो काढलेत, त्यापेक्षा तुमचे वेगळे असल्याने आणी थोडे तसेच फोटो सुद्धा खूप आवडलेत. दोघानी लिखाणामुळे आणी फोटोग्राफीमुळे दर भागामागे नवीन उत्सुकता वाढवलीय. तो गोर्‍या नदीचा फोटो खूप आवडला.

केदारचे लेख आधी येतात पण त्यात इतकं डीटेल नसतं त्यामुळे आधी त्याचा टीझर टाइप फोटो जास्तीवाला भाग आणि तब्बेतीत तुझं सविस्तर वर्णन ..दोन्हीत जाम मजा येते आहे. + १००

मला एक शंका आहे की ज्यांना चालवत नाही अशा वयोवृद्ध यात्रींनाही फिटनेसमध्ये कसे काय पास केले जाते.
कारण सगळ्यांकडूनच ती टेस्ट अवघड असल्याचे सांगितले जातेय पण सगळ्यात वयोवृद्ध आणि चालताना हाल होणाऱ्यांचेही वर्णन आहे...
नक्की फंडा काय आहे.

धन्यवाद रश्मी.. Happy

आशू.. मेडिलक टेस्ट्स ह्या हृदय आणि फुफुस्सांशी संबंधीत असतात.. बिपी, शुगर आणि श्वास घेण्याची क्षमता हे प्रामुख्याने तपासलं जातं.. ह्या क्षमता उत्तम असतील तर हाय अल्टीट्यूडला त्रास होत नाही.. वयोमर्यादा ७० असते. हे सगळं अटींमध्ये बसणारं असलं तर टेस्ट पास होते..

यात्रींना तस चालवतं पण दमछाक कधी होईल सांगता येत नाही.. काही काही माझ्यापेक्षा लहान यात्रीही पूर्णवेळ घोड्यावर बसले होते.. ! त्यामुळे चालणं बर्‍यापैकी व्यक्तीसापेक्ष असतं.

ह्या भागाच्या अन एकंदरीत गुंजीच्या बर्याच आठवणी आहेत, ड्युटी च्या !! वाचुन नॉस्टल्जिक व्हायला झाले!! Happy

छान झालाय हा पण भाग. फोटोसुद्धा मस्त. तुझ्या कॅमेराच्या लेन्सचं फक्त बाहेरचं कव्हर तुटल हे चांगलं झालं (म्हणजे लेन्स शाबुत राहिली हे चांगलं झालं). नाहीतर असे छान फोटो बघायला मिळाले नसते.

हिमालयातल्या झर्‍यांचं पाणि पिऊन बर्‍याच लोकांचं पोट बिघडतं. कारण ते वाहतं असल्यामुळे त्यात धुपलेल्या मातीचा अंश जरा जास्त असतो जो हाय अल्टीट्युड ला पचायला त्रास देतो. तुम्हाला कोणाला असा त्रास झाला नाही का? हिमालयात 'परवर' नावाची भाजी मिळते (आपल्या पडवळाशी संबंध नाही). ती चाखलीत का?

पराग फार फार सुंदर लिहीतो आहेस .. आणि फोटोही झकास .. Happy

>> काम सोडता येत नाही आणि पिल्लालाही टाकून जाता येत नाही. त्यामुळे मग निघाली त्यालाही बरोबर घेऊन.

Happy

>> भोगा कर्माची फळं! , काल मी सज्जड दम भरल्याने

हे एकदम थेट "पराग" स्टाईल .. Lol

>> प्रवाहातल्या एका मोठ्या शिळेवर पाणी आपटून त्याचे तुषार वरपर्यंत उडत होते

Happy

प्रॉतिमा बेदीं ची बॅच किती दुर्दैवी .. :|

हा एकूण प्रवास खरंच खूप कठिण असेल नाहीतर त्या बन्सल की कोण त्यांच्या मनात "खाईत फेंक दिया होता" वगैरे टाईप हिंस्त्र विचार का यावेत? :|

इथले काही प्रतिसाद काल पाहिले. सगळ्यांना धन्यवाद परत एकदा. Happy

जंगलात प्राणी नाहीत का तिथे ? >>>> फारसे नाहीत. खालच्या भागात लांडगे वगैरे आहेत म्हणे.

हिमालयातल्या झर्‍यांचं पाणि पिऊन बर्‍याच लोकांचं पोट बिघडतं. कारण ते वाहतं असल्यामुळे त्यात धुपलेल्या मातीचा अंश जरा जास्त असतो जो हाय अल्टीट्युड ला पचायला त्रास देतो. तुम्हाला कोणाला असा त्रास झाला नाही का? हिमालयात 'परवर' नावाची भाजी मिळते (आपल्या पडवळाशी संबंध नाही). ती चाखलीत का? >>>> जे झरे उंच डोंगरांमधून येतात त्यांचं पाणी प्यायला काही हरकत नसते. नदीचं पाणी पिऊ नये म्हणतात कारण त्यात सांडपाणी वगैरे मिसळलं जातं आणि मातीही जास्त असते. प्रवासादरम्यान आम्ही सगळीकडे झर्‍यांचच पाणी प्यायलं.
परवर नाही खाल्लं ह्या ट्रीपमध्ये.

"खाईत फेंक दिया होता" वगैरे टाईप हिंस्त्र विचार का यावेत? >>>> त्यावेळी कोणाच्या मनात काय येईल काही सांगता येत नाही. शारिरिक क्षमतेबरोबर मानसिक कस लागतो म्हणतात तो हाच.

मस्त झाला आहे हा भाग सुद्धा.

रिया एवढी लहान आहे तिला आठवणार पण नाही कदाचित तू इतके दिवस नसल्याचं. पण मोठी झाल्यावर ट्रिपविषयी ऐकून तिची काय रिअ‍ॅक्शन होते ते बघायला/ऐकायला मजा येइल तुम्हाला.

Pages