एक छोटासा भ्रष्ट ..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 27 September, 2014 - 03:49

फुकट काळ्या पैशाचा
राजमान्य भ्रष्टाचाराचा
एक प्रवाह छोटासा
बाजूनेच वाहतो आहे.
आणि तो बिनदिक्कत
त्यात पाणी भरतो आहे.
पापाची भिती नाही
चोरीची लाज नाही
प्रौढीने मिरवतो
अन मोठ्याने म्हणतो
इथे काय मी आज नाही...
..
तसा माणूस चांगला आहे
मानतो देवाला
धावतो पूजेला
जातो नेहमीच शिर्डीला
येतो मित्रांस कामाला
प्रेमाने सांभाळतो
बायको आणि पोराला
..
म्हणतो मी तर प्यादे आहे
नव्हे छोटा उंदीर आहे
कुरतडतो उगाच थोडे
तिथे कळप अफाट आहे
..
दोन थेंब विषाचे पण
असतात खूप भारी
भले थोरले धूड ही
येते क्षणात भूमीवरी
हे त्याला कळत नाही
धनोर्मी मिटत नाही
..
वाटेमध्ये आलेल्यांना
अलगद दूर करायचे
नाही जमले तर
छान पैकी नडायचे
तंत्र सारी अवगत आहे
मंत्र सारी पाठ आहेत
त्याची गणित सौद्याची
अगदी पक्की आहेत
प्रत्येक व्यवहार सावध
डाव बेरकी आहे
कधी कुठला पत्ता काढायचा
त्याला माहित नक्की आहे
त्याच्या हाती कळ आहे
तो पाईपचा नळ आहे
इवलासा जीव परी
सारे आकाश पाताळ आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users