लखलाभ

Submitted by भगवाननिळे on 24 September, 2014 - 09:02

लखलाभ

एकूण जगण्याचाच आलेला कंटाळा पदरात टाकून
मी आवरण्याचा प्रयत्न करतोय
माझ्या आत्मचरित्राचा फाफटपसारा.
स्वत:ला शांत करण्यासाठी
मी सोडून देणार आहे स्वत:शीच भांडणं
बंदही करणार आहे
दुसऱ्याला समजून घेण्याचे दार
मी वाकलोय कमरेत
दिखाऊ सांत्वनाच्या ओझ्याखाली
भूतकाळाची परवड
सोडत नाही पाठ जेथे जाईल तेथे
माणसांच्या गर्दीत शोधावा लागातो
स्वत:चा पत्ता
खरे तर, मला करता येत नाही स्वत:चे मार्केटिंग
अन्यथा मीही होऊ शकतो एका रात्रीत लोकप्रिय
तरीही मी कुरवाळीत बसणार नाही
याचनेच्या प्रतीक्षेत चिरंजीव दु:ख
मी जोडून घेणार आहे
फाटक्या माणसांशी एकात्म नाते
कधी काळी सुटलेले.

तुमचे जग तुम्हाला लखलाभ ....

- भगवान निळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users