जीवना इतका तुझ्यावर जीव जडला पाहिजे...

Submitted by मयुरेश साने on 24 September, 2014 - 00:50

जीवना इतका तुझ्यावर जीव जडला पाहिजे
प्राण नेताना यमाचा पाय अडला पाहिजे

हेच सांगाया इथे अवतार घेतो देवही
फार झाली देवळे माणूस घडला पाहिजे

घट्ट कर काळीज आणी बन असा घोटिव दगड
काळही आला पुढे तर कोलमडला पाहिजे

यापुढे होऊ नये रावण कुणी शकुनी कुणी
कट कुणी रचलाच तर उलथून पडला पाहिजे

खूप धक्के खात लोकल पकडतो मी रोजची
जन्म मरणाशी तसा आजन्म नडला पाहिजे

कोण कोणाला किती पुरणार आहे जन्मभर
जन्मतः रडलास बस तितकाच रडला पाहिजे

....मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप धक्के खात लोकल पकडतो मी रोजची
जन्म मरणाशी तसा आजन्म नडला पाहिजे<<<< मला हा शेर सर्वाधिक आश्वासक वाटला . शब्दरचना अजून छान व्यायला हवी होती

बाकीचे ठीक वाटले

कोण कोणाला किती पुरणार आहे जन्मभर
जन्मतः रडलास बस तितकाच रडला पाहिजे<<<

फारच वेगळा आणि मस्त विचार!

लोकलचा शेरही आवडला पण रूपक पटताना किंचित दम लागला.

मतला सहज,

घट्ट कर काळीज आणी बन असा घोटिव दगड
काळही आला पुढे तर कोलमडला पाहिजे..... क्या बात !

कोण कोणाला किती पुरणार आहे जन्मभर
जन्मतः रडलास बस तितकाच रडला पाहिजे...वा वा !

आवडली गझल.

बरी