जाऊ विठू चल घरी..

Submitted by रसप on 23 September, 2014 - 03:21

जाऊ विठू चल घरी
बोलावते पंढरी

डोळे तुझी आरती
ओंजळ बनो कोयरी

जगतो मनापासुनी
मज्जाव आहे तरी

बोटावरी मोजल्या
मी पावसाच्या सरी

सोबत इथे फक्त मी
का यायचे ह्या घरी ?

आवळ स्वत:चा गळा
घे फास काळेसरी

जहरी नजर दे मला
बघशील तर तू खरी !

तू बोल, थांबीन मी
मृत्यू मिळाला तरी

चित्तास व्याधी तुझी
अन् तूच धन्वंतरी

पाषाण काळा 'जितू'
अन् रेघ तू पांढरी

....रसप....
२३ सप्टेंबर २०१४
http://www.ranjeetparadkar.com/2014/09/blog-post_23.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जहरी नजर दे मला
बघशील तर तू खरी !

चित्तास व्याधी तुझी
अन् तूच धन्वंतरी

विशेष आवडले शेर . Happy

जाऊ विठू चल घरी<<< ही ओळ मला अतिशय आवडली. दोन छोटी मुले इतर सवंगड्यांची खेळण्यासाठी वाट पाहात आहेत पण बराच वेळ झाला तरी कोणीच खेळायला येत नाही आहे. त्यामुळे हिरमुसलेला एक मुलगा दुसर्‍याला म्हणत आहे की चल घरी जाऊ, नाही येणार बहुतेक कोणी खेळायला! तसे वाटले ही ओळ वाचून!

गझलही छान! अश्या वृत्तांमध्ये यतीस्थानाला महत्व प्राप्त होते व ते पाळले गेल्यास सुखद व सुलभ उच्चारण होते.

धन्वंतरी आणि सरी हे शेर अधिक आवडले.

शुभेच्छा!

(फार लांब वृत्तात भरीचे शब्द घेतले जाऊ शकतात तसे फार लहान वृत्तात अर्थाची दाटीवाटी होते - एक निरिक्षण)

जहरी नजर दे मला
बघशील तर तू खरी !

तू बोल, थांबीन मी
मृत्यू मिळाला तरी

चित्तास व्याधी तुझी
अन् तूच धन्वंतरी

पाषाण काळा 'जितू'
अन् रेघ तू पांढरी

क्या बात...! मस्त शेर......!

काही कडवी कळली नाहीत .

>> कोणती कळली नाहीत हे कळल्यास मी प्रयत्न करीन सांगायचा. (वि.पु.त सांगितले तरी चालेल.)

धन्यवाद !