वरती खूप दिखावे होते

Submitted by बेफ़िकीर on 21 September, 2014 - 04:02

वरती खूप दिखावे होते
खाली हेवेदावे होते

स्वप्नांच्या खुरट्या वाढीवर
झोपेचे शिडकावे होते

होड्या सागर ढवळत नव्हत्या
लाटांचे कांगावे होते

कुठेच त्याचे नसणे हेही
असण्याचेच पुरावे होते

श्वासाश्वासामार्फत आले
मृत्यूचे सांगावे होते

खुनी कुणाला नकोच होता
हाती सर्व सुगावे होते

अघळपघळ गप्पा नव्हत्या त्या
तुझे विषारी कावे होते

तेथे मी ढुंकतही नाही
जेथे उजवे डावे होते

ही नाती टिकण्याचे कारण'
नात्यातील दुरावे होते

खूपजणांच्या मनात येथे
'बेफिकीर मी व्हावे' होते

=================

-'बेफिकीर;!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही नाती टिकण्याचे कारण'
नात्यातील दुरावे होते

खूपजणांच्या मनात येथे
'बेफिकीर मी व्हावे' होते

क्या ब्बात ..

मस्त गझल.

सगळे शेर छान आहेत पण मक्ता मला अधिक आवडला
मक्त्याचा मूळ अर्थ मला पोचला पण मी कालपरवा एक असा शेर केला आहे तो आठवला

अता मी बेफिकिर होणार आहे
कशाची काळजी घ्यावी कळेना

आता मी जेंव्हा ती गझल पेश करीन तेव्हा लोकाना माझा शेर प्रभावित वगैरे वाटणार म्हणून मला पुन्हा काळजी करत बसावे लागेल बहुधा Happy

सुंदर

होड्या सागर ढवळत नव्हत्या
लाटांचे कांगावे होते

कुठेच त्याचे नसणे हेही
असण्याचेच पुरावे होते

हे दोन शेर फारच सुंदर.

श्वासाश्वासामार्फत आले
मृत्यूचे सांगावे होते
हा एकदम अध्यात्माकडे गेलेला छान शेर.

वरती खूप दिखावे होते
खाली हेवेदावे होते
मात्र, मतल्यामध्ये दोनही ओळींचा अर्थ साधारण सारखाच होतो आहे असे वाटते. कारण, वरती दिखावे म्हटल्यानंतर त्याच्याआत काहीतरी खोटेनाटे असणार हे आलेच ओघाने. फक्त ते काय असणार याची उत्सुकता राहते. असो. काही वेळा ठरवून लिहिल्याने थोडे डावे-उजवे होणारच... Happy

अघळपघळ गप्पा नव्हत्या त्या
तुझे विषारी कावे होते
पहिली ओळ मला वाटते,
अघळपघळ त्या गप्पा नव्हत्या
अशी असती तर अधिक उत्तम. विषारी कावे छानच.

ही नाती टिकण्याचे कारण'
नात्यातील दुरावे होते
हाही शेर आवडला.

वा..!!

स्वप्नांच्या खुरट्या वाढीवर
झोपेचे शिडकावे होते

श्वासाश्वासामार्फत आले
मृत्यूचे सांगावे होते..................सुंदर.