दरवळून टाक ना !

Submitted by निशिकांत on 19 September, 2014 - 01:08

एक प्यास अंतरात, शांतवून टाक ना !
माझिया मिठीत रात्र दरवळून टाक ना !

का असा उगाच बाण मारतोस चहुकडे ?
मार नेम, काळजास भळभळून टाक ना !

कैद आसवास मी किती सख्या करायचे ?
आठवात ये तयास ओघळून टाक ना !

वेदनेतही सुखास शोध शोध शोधले
अन् बजावले मनास "तू हसून टाक ना" !

फैसले विकावयास बैसलेत पंच हे
लाच दे नि न्यायदीप मालवून टाक ना !

"काय जग म्हणेल?" या विवंचनेत त्रस्त का ?
हो भणंग काळजीस ठोकरून टाक ना !

माणसा जुलूम कोठवर किती सहायचे ?
घे मशाल रान सर्व पेटवून टाक ना !

प्रेत विनविते सख्या चिता नकोस पेटवू
झाड वाचवावया, मला पुरून टाक ना !

काफिया, रदीफ अन् खयाल मस्त पाहिजे
शक्य हे असेल तर गझल लिहून टाक ना !

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू हसून टाक ना << सर्वाधिक आवडला

पुरून टाक ना << हाही आवडला छान मैफिलीचा शेर आहे हा

शेवटचाही आवडला >>वृत्तही असेल तर ....<< असा बदल करून वाचला