बैरागी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 13 September, 2014 - 13:44

घर दार टाकुनिया
नांवगाव पुसलेले
बेवारस अस्तित्वाचे
बैरागी दूर निघाले

हातामध्ये झोळी काठी
वर केस बांधलेले
लुंगी शाल देहावर
भाळी नाम कोरलेले

जगामध्ये असूनही
सारे जग तुटलेले
सरलेल्या जीवनाचे
ओझे खोल गाडलेले

कुणी अलिप्त अबोल
तुळस भांगेमधले
कुणी धुरात पांढऱ्या
स्व:खुशीने गुंतलेले

अन्नासाठी जरी कुणी
वेषांतरही केलेले
कुणी चिंता सोडूनिया
देहा लाथ मारलेले

या चेहऱ्या नाव असे
मेंदूमध्ये लिहिलेले
प्रीती स्मृती गोष्टी किती
उरामध्ये जपलेले

काही पाने सुटलेली
कवितेच्या वहीतली
घडीच्या होड्या होवून
धारेमध्ये पडलेली

कुणीतरी लिहितांना
अर्धी टाकून दिलेली
एक उदास कहाणी
शेवट न सुचलेली

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

thanks shashank ,mohini,ashwini
<<<शेवटची अडीच कडवी>>>मोहिनीजी ,ती तर साधी रूपक आहेत व्यर्थ जाणाऱ्या सुंदर गोष्टींची ..जे मला बऱ्याच वेळा बैराग्याच्या जीवना कडे पाहतांना जाणवते .

विक्रांत जी आपल्याला बैराग्याच जीवन हि व्यर्थ गेलेली सुंदर गोष्ट आहे असं वाटतं का ?