अपवादात्मक अपवाद

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 12 September, 2014 - 02:22

भारतीय समाजाने येथील मानवांची अलिखित आणि अनौपचारिक वर्गवारी केलेली आहे. या वर्गवारीनुसार पुरुषांनी कसं वागावं, महिलांनी कसं वागावं, याचे काही एक नियम ठरून गेले आहेत. महिला आणि पुरुषांमध्ये असणाऱ्या शारीरिक भेदांशिवाय त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेतील फरकदेखील समाजाने ठरवून टाकला आहे. या आखणीनुसार महिला व पुरुषांची कार्यक्षेत्रेही ठरली आहेत. त्यानुसार ढोबळ मानाने घराच्या आतले कार्यक्षेत्र हे महिलांचे आणि घराबाहेरचे कार्यक्षेत्र ही विभागणी तर फारच जुनी आहे. परंतु या नियमांना अपवाद म्हणून काही महिला या घराबाहेर देखील कार्यरत राहतील हे समाजाने मान्य केले आहे. या अपवादांची देखील समाजाने पुन्हा वर्गवारी केली आहे. त्यानुसार आर्थिकदृष्ट्या निम्नवर्गीय महिला या घरकाम अथवा लघु उद्योगातील कामगार म्हणून कार्यरत राहतील असे ठरले आहे. प्लंबर, सुतार, लोहार (वेल्डर / फॅब्रिकेटर), रेल्वे स्थानकावरील हमाल, वाहन / मोबाईल / इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती कारागीर या खास पुरुष राखीव जागांवर चुकूनही महिला दिसणार नाहीत. मुद्रण उद्योगात (छापखान्यात) महिला आहेत पण त्या कुठे? तर यंत्रावर पुरुषांनी मुद्रणाचे मुख्य काम केल्यावर मुद्रित कागदाच्या घड्या घालणे, पुस्तके चिटकविणे अशा कमी जोखमीच्या आणि अर्थातच कमी मोबदल्याच्या कामावर. वर्तमानपत्र विक्रीतही घरोघरी दुचाकीवरून वर्तमानपत्रे पोचविण्याचे काम पुरुषांचे तर महिलांचे काम दुकानात एका जागी बसून विक्री करण्यापुरतेच मर्यादित. रिक्षा, टेम्पो, ट्रक अशा व्यावसायिक वाहनांचे चालक देखील पुरुषच. टॅक्सीचालक म्हणून आता काही प्रमाणात महिला पुढे येताहेत पण त्या देखील प्रियदर्शिनी सारख्या संस्थेच्या माध्यमातून, स्वतंत्र पणे नव्हे. शिवाय त्यांचे प्रमाण देखील अत्यल्पच आहे. खासगी वाहनांचे चालक या पदावरही अजूनही पुरुषांचेच साम्राज्य आहे.

आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय महिलांचे प्राधान्य अध्यापन, कला, सेवा क्षेत्रात राहील हे गृहीत धरले जाते. उद्योग, अभियांत्रिकी, वैद्यकीय अर्थ, गुंतवणूक या क्षेत्रात जर महिला असल्याच तर त्यांच्यावर प्रामुख्याने कमी जबाबदारीचे अथवा दुय्यम श्रेणीचे काम राहील हे पाहिले गेले आहे. उदाहरणच घ्यायचे तर कार्यालयात पुरुष व्यवस्थापक तर महिला स्वागतिका, विमान सेवेत पुरुष वैमानिक तर महिला हवाई स्वागतिका, इस्पितळात पुरुष शल्य विशारद तर महिला परिचारिका अशा प्रकारे भूमिकांचे वाटप झाले आहे.

उच्च आर्थिक गटातील महिलांची परिस्थिती काय आहे? विविध उद्योगसंस्थांच्या मालक, संचालक या पदांवर महिला दिसतील. राजकारणातही काही मोजक्या उच्च पदांवर महिला आहेत. पण त्या तिथे का आहेत? तर त्या एखाद्या घराण्याशी संबंधित आहेत म्हणून. जसे की, कायनेटिक उद्योगसमूहाचे मालक श्री. अरुण फिरोदिया यांच्या कन्या सुलज्जा फिरोदिया-मोटवाणी. पंडित नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी इत्यादी. जर सुलज्जा व इंदिरा यांना सख्खे बंधू असते तर त्या आपल्या पित्याच्या वारसदार ठरल्या असत्या काय? २०१४ लोकसभा निवडणूकीत मुंबईमध्ये एक अपवादात्मक चित्र दिसले. सुनील दत्त व प्रमोद महाजन या दिवंगत राजकारण्यांच्या कन्या प्रिया व पूनम एकमेकींच्या विरोधात खासदारकीची निवडणूक लढवीत होत्या. या घटनेत या दोघींनाही सख्खे भाऊ असतानादेखील आपापल्या पित्याचा वारसा या दोन्ही कन्यांकडे आला. अर्थात या दोघींचे बंधू संजय दत्त व राहुल महाजन वैयक्तिक कारणांमुळे ही निवडणूक लढविण्यास असमर्थ असल्यानेच या दोघींना ही संधी मिळाली.

अर्थात या सर्व व्यवस्थेला आव्हान देत अनेक मध्यम व उच्च मध्यम आर्थिक गटातील महिलांनी अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने मोठमोठी पदे मिळविली आहेत. तसेच उच्च आर्थिक गटात (कॉर्पोरेट विश्व) इंद्रा नूयी, चंदा कोचर अशा महिलांनी आपले स्थान पुरुषांच्या बरोबरीच्या पातळीवर आणले आहे. इतके असले तरीही अजून लिमिटेड कंपन्यांपैकी ५५ टक्के कंपन्यांमध्ये (किमान एकतरी महिला संचालक नेमणे कायद्याने बंधनकारक असूनही) एकही महिला संचालक नाही ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. शिवाय मोठ्या पदांवर असणाऱ्या व संख्येने अत्यल्प अशा महिला या त्या ठिकाणी अपवादानेच आहेत हे देखील विविध नियतकालिकांतून लेखांद्वारे सातत्याने लोकांसमोर मांडण्यात येते जेणेकरून महिलांचे अशा स्थानी असणे सहजसाध्य नाही तर अतिशय जिकिरीचे आहे हे इतर महिलामनांवर बिंबविले जावे.

कला विश्वातले महिलांचे स्थान काय आहे? चित्रपट, नाट्य ही क्षेत्रे समाजाचा आरसा आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांच्या कथांमध्ये महिला व पुरुष पात्रांचे प्रमाण सारखेच असणार. त्यामुळे अभिनय व गायन क्षेत्रात महिला व पुरुष यांचे प्रमाण सारखेच असणे नैसर्गिक आहे. (अर्थात पूर्वीच्या काळी महिलांच्या भूमिका देखील पुरुषच करीत, त्यामुळे तिथेही महिलांचे प्रमाण कमीच होते पण आता ती परिस्थिती राहिली नाही. ) गायक व गायिकांचे आणि अभिनेते व अभिनेत्रींचे संख्यात्मक प्रमाण सारखे असले तरीही त्यांच्या दर्जात्मक प्रमाणातला फरक लक्षणीय आहे. अभिनेत्यांची कारकीर्द तुलनेने प्रदीर्घ व आव्हानात्मक आहे तर अभिनेत्रींची कारकीर्द अल्प स्वल्प तसेच अभिनयाला फारसा वाव नसणारी आहे. त्यांच्या मानधनातला फरकही लक्षणीय आहे. गायक व गायिकांमध्ये असा फरक दिसून येत नाही. किंबहुना तिथे प्रकार उलटाच आहे. १९८० साली वयाच्या अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी मोहम्मद रफी आणि १९८७ साली वयाच्या अवघ्या अठ्ठावन्नाव्या वर्षी किशोर कुमारांचा मृत्यू झाला ही बाब लक्षात घेता आणि आघाडीच्या गायिका लता व आशा या तुलनेने दीर्घायुषी ठरल्या आहेत हे पाहता गायक व गायिकांची कारकीर्दीची तुलना करणे थोडे किचकट असले तरीही हे लक्षात घ्यावे लागेलच की आशा व लता या दोघींनी कुठल्याही पुरुष गायकापेक्षा अफाट संख्येने गाणी गायली आहेत. या दोघींच्या जास्त गाण्यांमुळेही पुन्हा महिला पुरुष असमानताच सिद्ध होते आणि तीदेखील गायनक्षेत्रातली नव्हे तर अभिनय क्षेत्रातली. लता व आशा यांना पुरुष गायकांपेक्षा जास्त गाणी मिळण्याचे कारण -

  • चित्रपटात नायिकेलाच नाचगाण्याला जास्त वाव असतो. नायक तुलनेने महत्त्वाचे असे म्हणजे शौर्य, धाडस, पराक्रम, बौद्धिक कसोटी यात व्यग्र असतो.<
  • नायिका कुणीही असली तरीही तिला कुठलाही कॉमन आवाज चालतो. फार तर सोज्वळ गाण्यांकरिता लता आणि कॅब्रे, इत्यादी बोल्ड गाण्यांकरिता आशा अशी विभागणी पुरेशी आहे हा चित्रपटकर्त्यांचा दृष्टिकोन. याउलट नायक कोण आहे? त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा बाज काय आहे? हे नीट विचारात घेऊन त्यानुसार त्याकरिता गायकाचे नियोजन. जसे की देव आनंद व राजेश खन्ना करिता किशोर कुमार, दिलीपकुमार व शम्मी कपूर करिता मोहम्मद रफी, राज कपूर व मनोज कुमार करिता मुकेश ही विभागणी पुरुष गायकांना कमी काम मिळवून देणारी असली तरीही पुरुष अभिनेत्यांचे महत्त्व वाढविणारीच ठरते नाही काय?

याशिवाय कला प्रांतातील महिलांच्या बाबतीत असणारे विविध प्रवाद. त्या स्वतःच्या क्षमतेवर किती आणि पुरुषांचा शिडी सारखा वापर करून किती वरपर्यंत चढल्यात याबाबत चर्चिले जाणारे किस्से. या व्यवस्थेलाही तोंड देत एखादी महिला अगदी उघडपणे व निःसंशय स्वतःच्या मेहनतीच्याच जोरावर यशशिखरावर विराजमान झाली असेल आणि उणीव दाखवावी असे तिच्यात शोधूनही सापडण्यासारखे दूरान्वयानेही काही नसेल तर तिला लगेच वेगळ्याच कोंदणात बसविले जाते. मग ती सर्वांचीच ताई, माई, अक्का असल्याचा तिच्यावर शिक्का बसतो. ती कोणाची प्रेयसी, कोणाची मैत्रीण देखील होऊ शकत नाही. एका वेगळ्याच गंभीर नजरेने तिच्याकडे पाहिले जाते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लता मंगेशकर. त्यांच्या पिढीतील, पुढच्या आणि त्याही पुढच्या पिढीतील सर्वच जण त्यांचा दीदी म्हणूनच उल्लेख करतात. त्यामुळेच जेव्हा त्यांच्या एका वाढदिवसाच्या जाहीर समारंभात सोनू निगमने "मी थोडा आधी जन्माला आलो असतो किंवा लताजी थोड्या उशीराने जन्माला आल्या असत्या तर मी त्यांना विवाहाकरिता मागणी घातली असती." असे विधान केले तेव्हा ते अनेकांना खटकले. सोनू निगमांवर टीकाही झाली. खरे पाहता सोनूने लताजींकडे पाहण्याच्या समाजाच्या चाकोरीबद्ध नजरेची कोंडी फोडली असेच म्हणावे लागेल. परंतु आपल्या समाजाने अपवादांचीही वर्गवारी केली असल्याने सोनूचे विधान समाजाच्या पचनी पडले नाहीच.

अपवादांची वर्गवारी करण्याची समाजाची सवय तशी फारच जुनी. महिला शक्यतो घरातच राहणार. घराबाहेर पडल्या तरीही त्यांच्यावर तसा प्रसंग आला तरच. म्हणजे झाशीची राणी ही शूर लढवय्यी असे आपण म्हणतो पण ती तशी का? तर तिचे पती गंगाधरपंत (जे तिच्याहून चाळीस एक वर्षांनी मोठे) यांच्या मृत्यूनंतर तिला अकाली वैधव्य आल्यावर राज्याचे रक्षण करण्याकरिता. कारण तिचा पुनर्विवाह होऊन तिच्या नव्या पतीला राज्याचा रक्षणकर्ता बनण्याची संधी देणंही परंपरेला मंजूर नाहीच. त्यापेक्षा अपवाद म्हणून तिलाच रणरागिणी बनविणं समाजाला जास्त सोयीस्कर आणि म्हणूनच राणीला श्रेयस्कर. पण या श्रेयाची धनीण होताना राणीला वयाच्या बाविशीतच मृत्यूला सामोरं जावं लागून फार मोठी किंमत चुकवावी लागली हे कोणी ध्यानात घेत नाही. [काव्यात्म न्याय / योगायोग म्हणजे उपग्रह वाहिनीवरील मालिकेत झाशीच्या राणीची भूमिका करून लोकप्रिय झालेल्या कृत्तिका सेनगर हिनेच पुढे पुनर्विवाह या मालिकेत महिलेच्या पुनर्विवाहाचा मुद्दाही ऐरणीवर आणण्यात मुख्य भूमिका निभावली.] असो. तर झाशीच्या राणीचे शौर्य हे अपवादच होते असे समजणाऱ्या समाजाच्या मानसिकतेचे पुरावे म्हणजे झाशीच्या राणीच्या इतिहासोत्तर काळात जन्माला आलेल्या मुलींनाही घोडसवारीचे प्रशिक्षण दिले जात नसे. अगदी त्यापुढील काळातही किती जणी सायकली अथवा स्वयंचलित दुचाकी चालवीत असत? सुनीताबाई देशपांडे चारचाकी मोटार चालवीत आणि भाई चालकाच्या बाजूला बसत. एकदा सुनीताबाई रस्त्याने अशाच गाडी चालवीत असताना दोन मुले रस्त्यात दिसली. त्यातल्या एकाने दुसऱ्याला सांगितले - अरे बाई गाडी चालवतीये, बाजूला हो नाहीतर अपघातात सापडशील. त्यावर दुसरा पहिल्याला म्हणाला - काळजी करू नकोस शेजारी बाप्या बसलाय ना. तोच काळजी घेईल अपघात होणार नाही याची. आयुष्यात कधीही वाहनाचे सुकाणूचक्र न धरलेल्या भाईच्या केवळ शेजारी असल्यामुळे रस्त्यावरील मुलांना हायसे वाटावे आणि त्यापुढे सुनीताबाईंच्या वाहन चालविण्याच्या अफाट कौशल्याचा काडीचाही प्रभाव पडू नये याचे सुनीताबाईंना मोठे वैषम्य वाटले. पण सामाजिक वर्गवारीने पुरुष व महिलांची कार्यक्षेत्रे ठरविली त्याला सुनीताबाई किंवा रस्त्यावरची ती मुले तरी काय करणार?

पुढे महिला दुचाकी वाहने चालवू लागल्या तरी कोणती? तर स्कूटर किंवा मोपेड यांसारखी. एखादी महिला मोटरबाईकसारखे वाहन चालविते असे सत्तर ऐंशीच्या दशकांतील चित्रपटांतून दाखवायला सुरुवात झाली. अशी वाहने चालविणारी महिला पुरुषांसारखे पँट शर्ट असा पोशाख, पुरुषांप्रमाणेच अगदी लहान कापलेले केस अशी टॉमबॉय स्वरूपात दाखविली जाऊ लागली. म्हणजे तिला काही वेगळे करायचे तर तिला महिलांच्या नेहमीच्या गटातून बाहेर काढून तिचे छंद हे अपवादात्मक आहेत असे दाखवूनच. ही झाली समाजाच्या अपवादांचीही वर्गवारी करावयाच्या मानसिकतेची पद्धत. म्हणजे महिला अमुक एक वाहन प्रकार चालविणार नाहीत आणि समजा एखादीने चालविलेच तर ती लगेच टॉमबॉय कॅटेगरीतली.

पुरुषांप्रमाणे वाहन प्रमाणे वाहन चालविले, किंवा तसे कपडे घातले, किंवा तसे केस ठेवले तर ती महिला पुरुषी वृत्तीची ठरते काय? तिच्यातील स्त्री-सुलभ भावना लोप पावतात काय? अजिबात नाही. आणि हे समाजाला दाखवून दिले पुरुषांसारखे कपडे घालणाऱ्या, बारीक केस ठेवणाऱ्या आणि बरीचशी त्यागराज खाडिलकरांसारखी चेहरेपट्टी असणाऱ्या गायिका फाल्गुनी पाठकने. तिची सर्व गाणी पाहा आणि ऐका. प्रत्येक गाण्याचे बोल आणि सादरीकरण स्त्री-सुलभ भावनांचे यथार्थ प्रदर्शन मांडणारे आहे हे लगेच जाणवेल. आता तर अनेक महिला टिपीकल महिला वेषात आणि केशभूषेत राहून देखील खास पुरुषांची समजली जाणारी बुलेट सारखी वाहने देखील चालवीत आहेत. महिलांकडून आता अपवादांच्या वर्गवारीलाही आव्हान दिले जाण्यास सुरुवात झाली आहे.

मनोरंजन क्षेत्रात गायन, अभिनय अशा विभागांमध्ये महिलांची आवश्यकता असल्याने महिलांना स्थान आहे पण लेखन / दिग्दर्शन /संगीत दिग्दर्शन या विभागांत महिलांचा सहभाग अत्यल्प आहे. अपवाद म्हणून काही महिला या क्षेत्रात आहेत. त्यातही दिग्दर्शन हा प्रांत अतिशय विद्वत्तेचा समजला जातो त्यामुळे या प्रांतातील महिला अपवादाच्या वर्गवारीप्रमाणे अतिशय अभ्यासू, विद्वान आणि महत्त्वाचे म्हणजे धीरगंभीर स्वभावाच्या हे ठरून गेल्यासारखे आहे. सई परांजपें ह्या अपवादाच्या परंपरेतला एक अपवादात्मक अपवाद. त्यांनी गंभीर चित्रपटांबरोबरच निखळ विनोदी चित्रपट देखील बनविले. परंतु मीरा नायर, कल्पना लाजमी, तनुजा चंद्रा या धीरगंभीर दिग्दर्शिकांनी पुन्हा अपवादाची वर्गवारीच सिद्ध केली.

अशा वेळी मनोरंजन विश्वाच्या क्षितिजावर उदय झाला फराह खानचा. ह्या दिग्दर्शिकेने पहिल्याच प्रयत्नात (मै हूं ना - २००४) प्रेक्षकांना अगदी खळखळून हसायला भाग पाडलं. विनोदासोबतच चित्रपटात देशभक्ती, प्रेम, शौर्य हे सर्व रस मिसळून एक चांगला मसालापट बनविला, त्याला उत्तम व्यावसायिक यश देखील मिळालं आणि समीक्षकांची प्रशंसाही. मुख्य म्हणजे शाहरुख सारख्या मनस्वी कलाकाराला लीलया हाताळलं. महिला अष्टपैलू नसतात किंवा अनेक आघाड्यांवर त्या एकाच वेळी कार्यरत राहू शकत नाहीत या पारंपरिक समजालाही तिने छेद दिला. मूळची ती तशी दिग्दर्शिका नव्हेच. पहिल्या दिग्दर्शकीय प्रयत्नापूर्वी तिने जलवा, सात साल बाद (१९८७), कुछ कुछ होता है (१९९८) आणि कल हो ना हो (२००३) या चित्रपटांमधून किरकोळ भूमिका केल्या होत्या. त्याशिवाय १९९२ च्या जो जीता वही सिकंदर पासून २००३ च्या चलते चलते पर्यंत तिने अनेक चित्रपटांत नृत्यदिग्दर्शिका म्हणूनही काम केले. २००४ साली दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केल्यावरही तिने आपले हे जुने काम सोडले नाहीच. अजूनही ती पाहुणी अभिनेत्री आणि नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम करतेच. शिवाय पटकथा लेखन आणि निर्मिती ह्या जबाबदाऱ्याही तिने पार पाडल्या आहेत. इतकेच नव्हे तर शिरीन फरहाद की तो निकल पडी या चित्रपटाद्वारे तिने पूर्ण लांबीची नायिकेची भूमिकाही निभावली आहे. तेही वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी आणि पारंपरिक नायिकेला शोभेल अशी शरीरयष्टी नसतानाही.

त्याशिवाय आपल्या दिग्दर्शकीय आणि नृत्यदिग्दर्शकीय कौशल्यातून इतर कोणालाही न जमलेली गोष्ट सर्वात आधी साध्य करून दाखविली. कत्रिना कैफने पदार्पणातच (बूम - २००३) बिकिनी दृश्य दिले. इतर अनेक चित्रपटांतूनही तिने देहप्रदर्शनाचा अजिबात संकोच केला नाही. परंतु इतके करूनही ती कधी 'मादक' किंवा 'चालू' दिसू शकली नाही. याचे कारण तिच्या चेहऱ्यावर असलेले कायमचे निरागस भाव. अगदी अक्षय कुमार सोबतच्या नमस्ते लंडनमध्ये तिच्या संवादांमुळे ती भांडकुदळ किंवा उर्मट वाटली असली तरीही तिला 'चालू' दाखविणे कुठल्याच दिग्दर्शकाला जमले नव्हते. परंतु ही बाब जणू एक आव्हानच आहे असे समजून फराह खानने तिला तीस मार खान चित्रपटात शीला की जवानी या गाण्यातून 'मादक' किंवा 'चालू' रूपात प्रेक्षकांसमोर सादर केले. या गीतात कत्रिनाच्या चेहऱ्यावरचे नेहमीचे निरागस भाव पार पुसले गेलेले आढळतात. आता हे फराहने योग्य केले की अयोग्य हा वादाचा मुद्दा असला तरीही इतर कुणालाही साध्य न होऊ शकलेली गोष्ट तिने सहज करून दाखविली हे मान्य करावेच लागते.

इतक्या आघाड्या सांभाळणारी ही बुद्धिमान महिला अपवादात्मक असली तरी इतर अपवादात्मक महिलांप्रमाणे हिचे व्यक्तिमत्त्व विद्वत्तेच्या ओझ्याखाली धीरगंभीर बनले आहे असे मात्र अजिबात नाही. अतिशय हसतमुख व विनोदी व्यक्तिमत्त्वाची ही महिला डान्स इंडिया डान्स, जो जीता वही सुपरस्टार, एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा या व अशा इतर कार्यक्रमांतून प्रेक्षकांसमोर येते, स्पर्धकांशी दिलखुलास संवाद (तेही अगदी थेट बंबईय्या हिंदीतून) साधते तेव्हा कुणी सेलिब्रेटी न वाटता आपल्यातीलच एक सामान्य व्यक्ती वाटते.

व्यक्तिगत आयुष्यात देखील या महिलेने अनेक परंपरांना छेद दिला आहे. सहसा महिला आपला वैवाहिक जोडीदार शोधताना वय व शारीरिक क्षमता यांत आपल्यापेक्षा वरचढ पुरुषास पसंती देतात. तसेच मुस्लिम महिला सहसा गैर मुस्लिम पुरुषांना पसंती देत नाहीत. परंतु इथेही सर्व परंपरांना छेद देत फराहने आपल्यापेक्षा तब्बल साडेआठ वर्षांनी लहान असलेल्या शिरीष कुंदेर सोबत विवाह केला. चाळिशीनंतर महिलांचा मातृत्व टाळण्याकडे महिलांचा कल असतो. इथेही पुन्हा अपवाद करीत फराहने वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षी ही संधी घेतली आणि निसर्गानेही तिला अपवादांची मालिका प्रवाहित ठेवण्यास साहाय्य करीत एक पुत्र (झार) व दोन कन्या (दिवा आणि अन्या) या तिळ्यांची आई बनविले.

फराहचे विशेष कौतुक करावेसे वाटते ते तिच्या द्रष्टेपणा बाबत. द्रष्टेपण म्हणजे भविष्याचा वेध घेण्याची कला. हे भल्याभल्यांना जमत नाही. पुरुषांत देखील हा गुण अपवादानेच आढळतो तिथे स्त्रियांची काय कथा? मनोरंजन क्षेत्रात पूर्वी एखाद्या बड्या असामीने एखादा चित्रपट बनविला आणि तो प्रेक्षकांनी स्वीकारला नाही की लगेच आम्ही काळाच्या पुढचा चित्रपट बनविला असे म्हटले जायचे. देव आनंद यांचा तर हा अतिशय प्रसिद्ध युक्तिवाद होता. अर्थात त्यांचे मै सोलह बरस की, सेन्सॉर आणि मिस्टर प्राईम मिनिस्टर हे चित्रपट पाहताना हा युक्तिवाद माफक प्रमाणात पटतो देखील. परंतु यश चोप्रांनी जेव्हा त्यांचा लम्हे हा चित्रपट अपयशी ठरला आणि तो काळाच्या पुढचा असल्याचा दावा केला तेव्हा त्यात काही तथ्य नव्हते कारण याच कथेवर पूर्वी गुलजार यांनी मौसम हा एक यशस्वी चित्रपट बनवून दाखविला होता. असो. तर असे हे द्रष्टेपण समाजात अभावानेच आढळणारे. फराह खान मध्ये ही भविष्याचा वेध घेणारी कला दिसून आली ती २००९ मध्ये जेव्हा तिने तेरे मेरे बीच में नावाचा एक सेलिब्रिटी रिअलिटी शो स्टार प्लस या उपग्रह वाहिनीवर सादर केला. तेरा भागांच्या कार्यक्रमाला फारसा प्रतिसाद लाभला नाही कारण तेव्हा ही संकल्पना नवीन होती. आता मात्र अशी संकल्पना रुळली आहे. अनुपम खेर देखील असा एक कार्यक्रम आता सादर करतात आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. तर फराह च्या कार्यक्रमात तिने दुसऱ्याच भागात मुष्टीयोद्धा विजेंद्र सिंग आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांना निमंत्रित केले होते. त्यात तिने विजेंद्रला अभिनय करण्याविषयी सुचविले होते आणि त्याच्याकडून लहानसा प्रसंग सादरही करून घेतला होता. त्याचप्रमाणे प्रियांकालाही तिने लुटुपुटूचे बॉक्सिंग करायला लावले होते. गंमत म्हणजे विजेंद्र सिंग फग्ली या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून प्रेक्षकांपुढे आलाय आणि प्रियंकानेही मेरी कोम वरील चित्रपटात प्रशंसनीय बॉक्सिंग केली आहे. ह्या भविष्याचा पाच वर्षांपूर्वीच वेध घेणाऱ्या ह्या महिलेला द्रष्टेपण नाही असे म्हणावे तरी कसे? विकिपीडियावरील माहितीनुसार फराह खानचा जन्म ९ जानेवारी १९६५ चा म्हणजे चित्रपटसृष्टीतील तीनही दिग्गज खानांपेक्षा ती वयाने जराशी मोठीच. तिच्यापेक्षा कमी वय असलेल्या पद्मिनी कोल्हापुरे आणि रेणुका शहाणे या आणि अशा इतर अनेकींची कारकीर्द आता जवळपास संपुष्टात आलेली असताना पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही महिला मनोरंजन क्षेत्रात अनेक आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे कार्यरत राहू पाहत आहे. दिवाळीत तिचा अजून एक भव्य प्रकल्प हॅपी न्यू इयर प्रेक्षकांसमोर सादर होत आहे. या निमित्ताने तिच्या भावी वाटचालीकरिता शुभेच्छा देऊन ह्या लेखाची सांगता करतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतांश सगळे >> येस्स, मग त्या बहुतांशमध्ये जे येत नाहीत त्यांचे मी आधी कौतुक करेन.

इथे सेलेबल स्टार्सना (पक्षी : शाहरुखला) दोष तर मुळीच द्यायचा नाहीये. उलट त्यांनी हे पद मिळवणे कौतुकास्पदच आहे. अ‍ॅण्ड येस्स, एसआरके माझाही आवडता आहे. Happy

नका तिचे कौतुक करू. कूणी काय जबर्दस्ती केलेली नाही... Proud

मी मसाला बॉलीवूडपटांची फॅन आहेच आहे. आणि माझ्यादृष्टीनं कांती शाह सर्वात श्रेष्ठ दिग्दर्शक आहे. Lol

छान

नंदिनी,
आपल्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व !
पण उद्या मला कोणी आवडणारे असेल तो आपल्याला आवडत नाही असेही होऊ शकतेच ना, प्रत्येकाची आवड वेगळी असते.

जसे आपल्याला कोण आवडते आणि का आवडते हे आपण सांगतो तसे आपल्याला कोण फारसे आवडत नाही आणि का आवडत नाही हे किमान फिल्ल्मस्टार्रबाबत सांगायचा हक्क आपल्याला आहेच. कारण आपुन पब्लिक आहे बॉस!

आपण मसाला बॉलीवूडपटांचे फॅन आहात हे मी एक अंदाज म्हणून व्यक्त केले होते. तो बरोबर आला याबद्दल स्वताची एकदा पाठ थोपटतो.
पण मसाला बॉलीवूडपटांचा फॅन असणे गैर आहे असे मला कुठेही म्हणायचे नव्हते. Happy

अवांतर - कोण कांती शाह ? कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शक ?

अवांतर - कोण कांती शाह ? कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शक ? >>> हा प्रश्न या पृथ्वीतला ई वर स्वतःला बॉलीवूड फॅन म्हणवणार्‍या कोणीही विचारला तर खोचकातले खोचक उत्तर द्यायची उर्वरित सिनेरसिकांवर नैतिक जबाबदारी येते. ती कोणीतरी कांती शाह चित्रपटातल्यासारख्या काव्यात पार पाडा.

चेसुगु - अवांतराबद्दल सॉरी. लेख मोठा असल्याने अजून वाचला नाही. नक्की वाचेन आणि मग त्यावर प्रतिक्रिया देइन.

चेसुगु,
भेंडी यू आर टू सेक्सी Wink
रच्याकने : लेखात नक्की काय लिवलंय? (माउसचा स्क्रोल मोडलाय. प्लीज २ ओळीत सांगा की)

उत्सुकतेने कांती शाह गुगाळले तर विकीभाऊंनी त्यांच्यावर चार लाईनी खरडलेल्या आढळल्या ज्यातील पहिली लाईन वाचताच खपलो - Kanti Shah is a director and producer of B grade Hindi movies.

संदर्भ - http://en.wikipedia.org/wiki/Kanti_Shah

असो, यावरून एक प्रश्न मात्र पडला. एखादा सिनेमा "बी ग्रेड" आहे की "सी ग्रेड" हे ठरवते कोण आणि कोणत्या निकषावर? कोणाला काही माहिती?

लेख वाचला. हिंदी चित्रपटाच्या बाबतीत ज्ञान शून्य (माझं)... त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही. लेख
मोठ्ठा आहे आणि... अभ्यासपूर्णं असावा असं वाटतय. त्याबद्दल अभिनंदन.
पण... पुढलं हे एक वाक्यं मला खटकलय.

<<फराहचे विशेष कौतुक करावेसे वाटते ते तिच्या द्रष्टेपणा बाबत. द्रष्टेपण म्हणजे भविष्याचा वेध घेण्याची कला. हे भल्याभल्यांना जमत नाही. पुरुषांत देखील हा गुण अपवादानेच आढळतो तिथे स्त्रियांची काय कथा?>>

हा एकच स्टिरियोटायपिंग भाग जो अभावाने आलाय लेखात ... लेखाच्या उद्देशाला छेद जातोय का?

दाद,

<< <<<<फराहचे विशेष कौतुक करावेसे वाटते ते तिच्या द्रष्टेपणा बाबत. द्रष्टेपण म्हणजे भविष्याचा वेध घेण्याची कला. हे भल्याभल्यांना जमत नाही. पुरुषांत देखील हा गुण अपवादानेच आढळतो तिथे स्त्रियांची काय कथा?>>>> >>

<< हा एकच स्टिरियोटायपिंग भाग जो अभावाने आलाय लेखात ... लेखाच्या उद्देशाला छेद जातोय का? >>

हो ते तसं मुद्दामच लिहीलंय. आपल्या लक्षात आलं याचाच अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे की आपण संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचलाय आणि आपल्याला त्याचं सार कळलंय. आपल्या निरीक्षणशक्तीला दाद आणि इथे प्रतिक्रिया मांडल्याबद्दल धन्यवाद.

डोंगर पोखरून उंदीर असं वाटलं. फराह खान कडे महिला दिग्दर्शिका म्हणून पाहीलं गेल्याने अपवादात्मक अपवाद असं वाटलं असेल. (अपवादात्मक अपवाद हे नक्की काय आहे ? महिरपी कंसात आणखी एक कंस किंवा मॅट्रिक्स सारखं वाटलं).

हिंदी सिनेसृष्टीत टॅलेण्ट पाहीलं जात असावं बहुतेक. नाहीतर गौरी शिंदेला पदार्पणात एव्हढी मोठी संधी मिळणे, श्रीदेवी ने तिच्या सोबत काम करणे झालंच नसतं. झोया अख्तर ला मिळालेली संधीही महिला म्हनून मिळालेली नाही तसंच फरहा खानचं. विनोद हा स्त्री किंवा पुरूषाची मक्तेदारी असतो असं समजण्याचे दिवस केव्हांच मागे पडलेले आहेत. उलट स्त्रियांमध्ये पुरूषांपेक्षा तल्लख विनोदबुद्धी असते तर पुरूषांमधे उगाचच गंभीर असण्याचे प्रमाण जास्त असावे असं वाटतं. समाजात स्त्री ने कसं वागावं , पुरूषाने कसं वागावे याचे मापदंड मागे पडलेले आहेत. जे कुणी कुरवाळत बसतील त्यांच्या साचलेपणाबद्दल त्यांना शुभेच्छा !

Pages